08-lp-cvrदि. १२ फेब्रुवारीचा ‘लोकप्रभा’ लग्नसराई विशेष अंक आवडला. मुख्य म्हणजे सध्या लग्नाचा सीझन चालू असल्यामुळे एका लग्नाला गेलो होतो, तेथे बसल्याबसल्या अंकात आलेल्या लग्नाविषयीच्या मार्मिक चर्चा सुरू होत्या. खासकरून ‘होणार ती नवरी’, ‘लग्नाला यायचं हं!’ ‘हवाहवासा पंक्तिप्रपंच’, ‘आली समीप लग्नघटिका’ हे लेख म्हणजे लग्नाचे पॅकेजच डोळ्यापुढे उभे राहिले. विशेष म्हणजे ‘लग्न पाहावं करून’ या लेखात सिने/टीव्ही कलाकारांनी विवाह संस्थेबद्दल त्यांची मतं मांडली ती योग्य आहेत. फॅमिली कोर्टात शेकडय़ांनी घटस्फोटाच्या केसेस पडून आहेत आणि समुपदेशकांच्या गटाने २००च्या वर जोडप्यांचं मध्यस्थी करून कोर्टातच मनोमीलन घडवून आणल्याची बातमी नुकतीच वाचली. विवाह संस्था व इंटरनेट संकेतस्थळांचं पेव फुटलं आहे. याबद्दल कोर्टाने सरकारलाही जाब विचारला आहे. लग्न मोसमात उगवलेल्या या विवाह संस्था व संकेतस्थळं कोणताही पुरावा अगर खऱ्याखोटय़ाची माहितीची खातरजमा न करता उमेदवारांची म्हणजे मुलामुलींची नावं नोंदवून घेतात. यामुळे हतबल, उतावीळ झालेले पालक त्यात फसतात. हे सर्व पाहून ‘तो मी नव्हेच’ या आचार्य अत्रे यांच्या नाटकातल्या लखोबा लोखंडे याची आठवण झाली. या सर्वाला आपला समाजच कारणीभूत आहे. कारण हल्ली नातेवाईक, शेजारीपाजारी, ग्रामस्थ, लग्नमध्यस्थी करण्याची किंवा लग्नस्थळ सुचवण्याची जबाबदारी घेत नाहीत. त्यांच्या एखादय़ा जवळच्या मुला/ मुलीची माहिती विचारली तर जुजबी उत्तर देतात. जग लहान होत चाललं आहे. मुलं/ मुली भरपूर शिकत आहेत, त्यामुळे पंचक्रोशीत लग्न जमवण्याचे दिवस इतिहासजमा झाले. लग्नं टिकतात ती ओळख पटण्यावर केवळ ओळख आहे यावर नाही. छोटय़ा छोटय़ा कारणांवरून खटके उडाल्याने लग्न मोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लग्न हे चांगलं मुरावं लागतं, त्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो. संयम, धीर व सहनशीलता यामुळे दोन्हीकडून तडजोडीची तयारी झाली की मगच लग्नाला चव येते.
– श्रीनिवास डोंगरे, दादर, मुंबई

धन्य तो सुट्टय़ा घेणारा देश09-lp-cvr
दि. ५ फेब्रुवारीचा ‘लोकप्रभा’ नेहमीप्रमाणेच वाचनीय होता. खास करून डॉ. विजय पांढरी पांडे यांचा सुट्टय़ांबाबतचा लेख अंतर्मुख करणारा व वास्तवपूर्ण आहे. खरोखरी एवढय़ा सुट्टय़ांची गरज आहे का? बँकांना सरसकट दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टीची गरज आहे का? एकतर संगणकीकरणामुळे मानवी श्रम (ुमन लेबर) लक्षणीय कमी झाले आहे. उत्तर प्रदेशात वर्षांतले २०१ दिवस सुट्टी? म्हणजे १६४ दिवस काम करून वर्षभराचे वेतन घेणार! सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली भरमसाठ सुटय़ा. जगात इतरत्र कुठेही असे घडत नसेल. २०२० सालापर्यंत भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या गोष्टी आपण करतो. पण एवढय़ा सुट्टय़ा घेतल्यावर ते शक्य आहे का? सरकारचे असे निर्णय सस्त्या लोकप्रियतेसाठीच असतात. भविष्यात जर शिवसेनेचा मुखमंत्री झाला तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती/पुण्यतिथीलाही रजा जाहीर होईल व त्याला विरोध करणारे महाराष्ट्रद्रोही ठरतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या नावाने सुट्टी आहे. मग बाळासाहेबांच्या नावाने का नको? असा युक्तिवाद कोणी केलाच तर काय उत्तर असणार आहे? निवडणुकांतील मतांवर डोळा ठेवूनच सरकार असे निर्णय घेते. दीर्घकाळापासून सरसकट पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी होत आहे. कामाच्या वेळात तरी नीट मन लावून काम किती जण करीत असतील? नवीन कॅलेंडर आल्यावर पहिल्यांदा सुट्टय़ांचाच शोध घेतला जातो. दुसऱ्या व चौथ्या शनिवार व रविवारला जोडून सुट्टी आली की चाकरमान्यांना किती आनंद होतो. पगार, सुट्टय़ा वाढवा आणि काम कमी करा असे म्हणणे हा राष्ट्रद्रोह आहे. अमेरिकेत आहे म्हणून आमच्याकडे पाच दिवसांचा आठवडा हवा. हा युक्तिवाद चुकीचा आहे. पण यात कपात तर होणार नाहीच, पण वाढच होणार. धन्य हा देश- धन्य ती जनता- धन्य ते सरकार!
– प्रकाश जोशी.

10-lp-cvrकॉर्पोरेट कथेचा वेगळा विचार
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. २२ जानेवारी २०१६ चा अंक खूपच छान आहे. अगदी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत (रंगोत्सवापर्यंत). तुम्ही जे ‘युथफूल’ हे सदर चालू केले आहे ते खूपच छान आहे. म्हणजे आजच्या तरुणाईच्या मुखातून त्यांचे विचार ‘लोकप्रभा’तर्फे समाजापर्यंत पोहोचवले जात आहेत. हे खूपच आवडले. म्हणजे आजची तरुणाईदेखील लेखणीकडे वळली आहे. हे स्वागतार्ह आहे. तसेच ‘संक्रांती’ची माहितीदेखील मस्त. अशीच सर्व तऱ्हेची माहिती आम्हाला नेहमी मिळत राहो, हीच अपेक्षा.

१२ फेब्रुवारी २०१६ चा अंक अगदी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत खूपच छान आहे. ‘युथफुल’मधील ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ ही कॉर्पोरेट कथा खूपच छान आहे. अगदी छोटी छोटी उदाहरणे देऊन प्रशांत दांडेकर यांनी खूप छानरीत्या समजावले आहे की, कसे इतरांपेक्षा वेगळा विचार करून आपण काही तरी नवीन घडवू शकतो. अशीच सर्व तऱ्हेची माहिती आम्हा ‘लोकप्रभा’च्या वाचक मित्रांना नेहमी मिळत राहो, हीच अपेक्षा.
 – सदानंद दत्तात्रय बोरकर, ई-मेलवरून.

आयातीची किंमत विचारात घ्या
दि. १५ जानेवारीच्या ‘लोकप्रभा’च्या अंकामघ्ये सेट टॉप बॉक्सवरील लेखात असे लिहिले आहे की, ‘एक सेट टॉप बॉक्सची किंमत साधारणपणे पंधराशे रुपये पकडली तर आपल्या डिजिटायझेशनमुळे तब्बल २२ हजार कोटी रुपयांच्या आयातीचा फायदा चीनला मिळाला आहे.’ लेखकाने सेट टॉप बॉक्सच्या विक्रीची किंमत हिशोबात घेतली आहे. वास्तविक त्याने सेट टॉप बॉक्सच्या आयातीची (कर वगळता) किंमत विचारात घ्यावयास हवी होती. टी.व्ही.चे बरेच भाग आयात केलेले असतात. याचे एक महत्त्वाचे कारण आपल्या येथील चढे व्याजदर व सरकारी कर यामुळे आयात स्वस्त पडते. अरविंद प्रभू यांनी असे म्हटले आहे की, ‘देशात तयार होणाऱ्या सेट टॉप बॉक्सना शासन तांत्रिक कारणास्तव परवानगी देत नाही.’ हे तांत्रिक कारण कोणते, याबद्दलपण लेखात खुलासा झाला असता तर बरे झाले असते.
– अ. कृ. अभ्यंकर, पुणे</strong>

11-lp-cvrखंड पडू देऊ नये…
‘लोकप्रभा’ने नवीन वर्षांत अनेक नवनवीन सदरे सुरू केलीत. या सदरांमध्ये बहुतांशी सगळे विषय समाविष्ट केले आहेत. यामुळे वाचकांना एकाच वेळी विविध लेखांमधून अनेक विषयांची माहिती होते. यामध्ये विशेष कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे युथफुल या विभागाचे. हा विभाग वैविध्यपूर्ण लेखांनी सजलेला असतो. हलकफुलका विषय ते गंभीर चर्चा अशा प्रवाहातून युथफुल विभाग वाचकांसमोर येत असतो. अ‍ॅडवाट हे सदर मस्त आहे. ‘शब्द-प्रतिमांची किमया’ हा लेख चांगला जमून आला. लेखामुळे निरमा, अमूल अशा नावाजलेल्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती डोळ्यांसमोर आल्या. जाहिरातींमध्ये वापरल्या गेलेल्या कॅचलाइनमध्ये खरंच जादू होती हे हा लेख वाचून लक्षात आले. युथफुलमधीलच नेटकट्टा या सदराचाही मी नियमित वाचक आहे. यातली चर्चा कधी गंभीर, वैचारिक तर कधी मजेशीर असते. याच चर्चेतून काही वेळा महत्त्वाचे मुद्दे वाचनात येतात. नाटक, स्टार्टअप, तरुण वल्ली, नाटक, मनस्वी, विविधा, फॅशन फंडा ही सगळीच सदरे उत्तम आहेत. तरुण पिढी वाचत नाही असं अलीकडे फार बोललं जातं. पण, त्यांचे विषय त्यांच्याच भाषेत मांडले तर ते नक्की वाचतात. अशा पद्धतीच्या मांडणीमुळे एखादा गंभीर विषयही त्यांना पटवून देता येतो आणि सांगताही येतो. मनस्वी या सदरातून ललित लेख वाचण्याचं सुख मिळतंय तर नाटक या सदरात एकांकिकांपासून ते व्यावसायिक नाटकांसंबंधित विषय वाचायला मिळताहेत. हे असंच पुढेही सुरू राहील अशी अपेक्षा आहे. एकुणच, युथफुल हा विभाग नावाप्रमाणेच वाचकांना लेखांची मेजवानी देत आहे. कृपया यात खंड पडू देऊ नये. तरुण वाचक या विभागातील लेख वाचताहेत.
– गौरव देशमुख, पनवेल.

टीव्हीचा पंचनामा आवडला
‘काहीही’च्या पलीकडले. या पराग पाठक यांचे टाचण अप्रतिमच. तसे बरेच प्रेक्षक टी.व्ही. मालिका पाहात असतात. पण असे टाचण सगळ्यांनाच जमेल असं नाही. मला फार आवडलं म्हणून मुद्दाम हे पत्र.
– काका गाडगीळ,  पुणे.

‘एकला चलो रे’ आवडले
‘एकला चलो रे!’ हा तेजाली कुंटे (लोकप्रभा, १२ फेब्रुवारी) यांनी लिहिलेला लेख फार आवडला. मला लहानपणापासून एकटे राहणे आवडायचे. त्यामुळे मला एकलकोंडा आहे हे विशेषण न मागता मिळाले. पुढे लग्न झाल्यावर सासरी आल्यावर माझे मेहुणे फिरकी घेण्यात पुढे असत. बायको त्यामुळे नाराज असायची. पुढे तिलाही सवय झाली. मी स्वत: माझ्या मोटारीतून जवळजवळ एक लाख किलोमीटर प्रवास एकटय़ाने केला आहे व तो मला जास्त आनंद देऊन जातो. लोक मात्र वेळोवेळी उपदेशामृत पाजायला टपून बसलेले असतात. पण मी फिकरनॉट मास्टरच्या भूमिकेत असून दरवेळेस नव्या वाटेवर प्रस्थान करत राहतो.
– चंद्रकांत लेले, भोपाळ, म.प्र.