‘अनमोल नथ’ हा हेमा वेलणकरांचा लेख वाचला. राजकारण, धार्मिक वाद, सामाजिक प्रबोधन असे अनेक विषय अनेक माध्यमांतून अंगावर येत असताना, कोणताही आवेश नसलेला, प्रबोधन न करणारा हा लेख सुखावून गेला. एखादी वाऱ्याची झुळूक यावी, त्याबरोबर मंद प्राजक्ताचा सुगंध यावा तसं वाटलं. नथ तर अनमोल आहेच. कारण ‘बसरा’ मोत्यांबद्दल खरंच काहीच कल्पना नव्हती. पण या अनमोल नथीच्या निमित्ताने कोणताही चेहरा किंवा ओळख नसलेल्या आपल्या आईच्या वयाच्या स्त्रीचे एक चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. मी आज साठीच्या घरात आहे. लेखिकेची आई ही त्या वेळची फारसे प्रभावी व्यक्तिमत्त्व नसलेली, संसारी स्त्री असावी. या नथीच्या निमित्ताने त्या पिढीतील ती ‘वैश्विक’ स्त्री, ती आई, पणत्यांच्या व मोत्यांच्या तेजात झळाळून उठली.  संसारात असूनही नसल्यासारखी, मागे मागे राहणारी, अशा त्या स्त्रीला नायिकेच्या स्थानावर नेण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या सच्च्या भावनेत व शब्दात आहे. लेखाची नायिका नथ नसून ‘आई’ आहे हे जाणवले. संसार समरसून करणाऱ्या आपल्या आईचा चेहरा त्या पणत्यांच्या उजेडात सर्वाना दिसला असेल. मलाही दिसला. फार भावनाविवश न होता किंवा सहानुभूतीचा कढ न आणता त्या स्त्रीला नायिका बनविल्याबद्दल लेखिकेचे कौतुक. चेहऱ्यावर प्रसन्न हसू, पण ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा हीच या लेखाची प्रतिक्रिया  किंवा पडसाद.

 – मीरा दीक्षित

या लेखमालेसाठी धन्यवाद!

‘परंपरा आणि नवता’ हे उत्पल व. बा. यांचं सदर नियमित वाचलं. खूप आवडलं. प्रगतिशील विचार आणि संयत भाषा याचं उत्तम संयोजन या लेखमालेत आढळलं. ते वाचावं यासाठी आजूबाजूच्या सर्वाना आग्रहदेखील केला. एखाददोन जणांशी त्याविषयी अधूनमधून चर्चाही केल्या. आम्ही पर्यावरणविषयक काम करत असल्याने तुम्ही लिहिलेल्या संकल्पना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या तरी चपखल वाटत होत्या. सारख्या विचारांचं कुणी भेटलं की जो आनंद होतो तो मी दर वेळी लेख वाचताना अनुभवला. स्वत:च्या मतांवर शिक्कामोर्तब झालं की बरं वाटतं. या लेखमालेसाठी धन्यवाद!

– केतकी घाटे