मालिका नायिकाप्रधान असतात, असं म्हटलं जातं. पण, आता मालिकांमध्ये खलनायिकांनाही नायिकांइतकंच महत्त्व येऊ लागलं आहे. खलनायिकांशिवाय मालिका अपूर्ण वाटतात असंच चित्र सध्या दिसून येतंय.

अलीकडच्या मालिकांमध्ये नवनव्या गोष्टी येतायत. मालिकेचा विषय असो किंवा त्यातले नवे चेहरे; कुछ तो अलग चाहिए.. हे नसलं तर लोकेशन्स नवीन शोधून काढा, मार्केटिंग हट के पद्धतीने करा असे चॅनलवाल्यांचे आदेश असतात. या नवलाईमध्ये एक गोष्ट मात्र पहिल्यापासून आणि कायमची आहे. ती म्हणजे मालिकेतली खलनायिका. एकताच्या ‘के’ फॅक्टर मालिकांपासून तिची निर्मिती झाली आहे. ‘क्यूंकी साँस भी कभी बहू थी’मधली मंदिरा, ‘कसोटी जिंदगी की’मधली कोमलिका, ‘जस्सी जैसी कोई नहीं’मधली मल्लिका, ‘कहीं किसी रोज’मधली रमोला अशा अनेक खलनायिकांनी डेली सोपचा सुरुवातीचा काळ गाजवला. भडक मेकअप, नागमोडी वळणाच्या टिकल्या, भरजरी साडय़ा अशा पेहरावात त्या मालिकेत वावरायच्या. खलनायिका ही भूमिका त्यांनी मालिकांमध्ये प्रस्थापित केली. हिंदूी मालिकांच्या अनेक गोष्टी हळूहळू मराठीकडे सरकल्या. कथा, विषय, सादरीकरण एवढंच नव्हे तर रिअ‍ॅलिटी शोजचंही पेव हिंदीमुळेच मराठीत फुटलं. या अनुकरणात खलनायिका हा एक्स फॅक्टरही मागे राहिला नाही. म्हणूनच मराठी मालिकांमध्येही नायक नसला तरी चालेल, पण खलनायिका हवीच असा अलिखित नियमच झालाय. या मराठी खलनायिकांचं ‘दिसण्या’पेक्षा ‘असणं’ जाणवतं. हिंदूीमधल्या भडक दिसणाऱ्या खलनायिकांना मराठी मालिकांमध्ये मात्र तुलनेत साधेपण दिलं गेलं.
‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेतल्या कजाग सावत्र आईचा समस्त प्रेक्षकवर्ग राग-राग करतो. मालिकेत गुंतलेल्या प्रेक्षकांना ती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आशा शेलार यांना प्रत्यक्ष भेटल्यावर ‘तुम्ही किती हो खडूसपणे वागता?’ असा प्रश्न विचारण्याचा मोह आवरता येत नाही. अति आणि खोचक बोलणं या स्वभाववैशिष्टय़ांमुळे या व्यक्तिरेखेला खलनायिकेची शेड आली आहे. मनात आहे ते आणि तेव्हाच बोलून मोकळं होण्याच्या स्वभावामुळे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहते. याबाबत आशा शेलार सांगतात, ‘मी रंगभूमीवर काम करणारी कलाकार आहे. रोज टीव्हीवर दिसावं म्हणून तर मी मालिका अजिबातच करत नाही. स्वीकारलेली व्यक्तिरेखा कशा प्रकारे साकारताय याला महत्त्व असतं. परफॉर्मन्सने कलाकार लोकप्रिय होत जातो.’ आशा गोरेगावच्या बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करतात. महिन्याचे फक्त पाच ते सहा दिवस त्या मालिकेच्या शूटसाठी देतात. त्यांच्या या भूमिकेविषयी त्या सांगतात, ‘एखादी चांगली गोष्ट दाखवण्यासाठी वाईट गोष्ट ही गडद करावीच लागते. कला ही प्रचंड बोलणारी व्यक्तिरेखा आहे. पण, प्रेक्षकांना तिला ऐकायला आवडतं. वरच्या पट्टीत बोलणं ही त्या व्यक्तिरेखेची ओळख आहे. सरतेशेवटी प्रेक्षकांना तिच्या खोचक वागण्यामागची कारणं पटतात.’ बँकेत नोकरी करत असल्यामुळे आशा यांना रोज अनेक ग्राहकांना सामोरं जावं लागतं. पर्यायाने त्यांच्या चाहत्यांशीही संवाद साधावा लागतो. ‘सुरुवातीच्या वर्षभरात प्रेक्षक बेभान होते. काही वेळा मला फक्त बघण्यासाठी बँकेत गर्दी व्हायची. काही जण माझ्याशी बोलायला यायचे. बँकेचं काम सांभाळून त्यांचं मन न दुखावता संवाद साधण्याची कसरत मी करायचे. पण, त्यांच्या प्रतिक्रिया, प्रेम यांमुळे काम करण्याची ऊर्जाही मिळायची’, त्या सांगतात. ‘झुलवा’, ‘क्षितिजापर्यंत समुद्र’, ‘सावल्या’, ‘कबड्डी कबड्डी’ अशा प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी रंगभूमी गाजवली आहे.
खलनायिकांच्या रांगेत बसणारी आणखी एक खलनायिका म्हणजे ‘का रे दुरावा’मधली जय आणि अदितीची वहिनी; शोभना. गोड बोलून अदितीकडून कामं करुन घेणं, तिच्या आईने दिलेल्या वस्तू स्वत:कडे ठेवणं यात ती माहीर. कामचुकारपणा करण्यातही तिचा पहिला नंबर. काहीच काम न करता ‘इतकी कामं पडली आहेत. सगळं माझ्यावर पडतं ना एकटीवर. कोणी मदतीला नाही’ या तिच्या म्हणण्यावर प्रेक्षक हसू का रडू असा विचार करतो. पण, ती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शीतल क्षीरसागर हिचं त्यासाठी कौतुक. शोभनाचा नाटकीपणा, खोटं बोलणं, फटकळपणा ही वैशिष्टय़ तिने उत्तमरीत्या रेखाटली आहेत. ती सांगते, ‘खलनायिका माणसाचं प्रतिनिधित्व करते. सर्वगुणसंपन्न असं कोणीच नसतं. नायिकेनंतर वजन असलेली व्यक्तिरेखा म्हणजे खलनायिकाच. म्हणूनच मी शोभना ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तयार झाले. प्रेक्षकांपैकी काहींना शोभनासारख्या व्यक्तीचा अनुभव आला असेल किंवा तशा प्रकारची वागणूक त्यांनी इतरांनी दिली असेल. म्हणून ते त्या व्यक्तिरेखेला रिलेट करतात. अनेक जण मला भेटून ‘क्यूट व्हिलन’ या वेगळ्याच संज्ञेने संबोधतात. शीतलला ‘एक होती वादी’ या सिनेमासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर ‘बेइमान’, ‘गारंभीचा बापू’, ‘रणांगण’ अशा नाटकांमध्येही तिने काम केलंय. शीतलला प्रेक्षकांचे वेगवेगळे अनुभव येत असल्याचं ती सांगते. एक किस्सा ती सांगते, ‘माझ्या दहा वर्षांच्या भाच्यासोबत मी एका दुकानात गिफ्ट घ्यायला गेले. ते पॅक करून देताना मी दुकानदाराला सांगितलं की, त्याचं प्राइस टॅग काढून टाका. तर माझा भाचा मला म्हणाला की, ‘इथे शोभना असती तर तिने तो मुद्दाम ठेवला असता. किती महागडं गिफ्ट घेतलंय हे दाखवायला.’ त्याचं हे वाक्य ऐकून मी थक्कच झाले. टीव्हीची ही वाढती व्याप्ती बघून मला आश्चर्यच वाटलं.’ शीतल सहलीसाठी गेली तरी तिला तिथे ‘अण्णांना नाही आणलंसं का?’ असंही तिला विचारलं जातं.
सिनेमांची ओळख हीरो आणि व्हिलनने असते. तशी मालिकांची ओळख ही नायिका आणि खलनायिकांमुळे असते, हे म्हणणं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच ‘होणार सून..’मधली जानूप्रमाणे तिची सावत्र आईदेखील चांगलीच लक्षात राहते. ‘असावा सुंदर..’च्या ईश्वरीबद्दल सहानुभूती वाटते पण, त्याच वेळी आत्तूच्या खडूसपणाचा राग येतो. ‘रुंजी’मधली रुंजीची धडाडी, बंड पुकारण्याची वृत्ती आणि तिच्या सासूचे कट यांचं द्वंद्व प्रेक्षक एंजॉय करतो. त्यामुळे मालिकेला खलनायिकांशिवाय पूर्णविराम नाहीच हे आता सिद्ध झालंय. डेली सोपमध्ये काही तरी हॅपनिंग तर हवंच. आणि हे हॅपनिंग खलनायिकाच उत्तम प्रकारे घडवू शकतात. मालिकेचे सलग दोन भाग कोणत्याही कारस्थानाशिवाय गेले तरी प्रेक्षकांना चुकल्यासारखं होतं. शोभनाचा ट्रॅक संपला की काय, अरे रुंजीची सासू खूप दिवस झाले दिसली नाही मालिकेत, जानूच्या आईचा सीन बघितला नाही अलीकडे किंवा अंकिताच्या आत्तूची करस्थानं झाली नाहीत, अशा प्रतिक्रिया उमटतात. नायक-नायिका, आनंदी वातावरण, सुखी संसार असं सगळं सुरू असूनही खलनायिकांची आठवण होणं हे त्या अभिनेत्रीचं श्रेय आहे. मालिकांच्या खलनायकांपेक्षा खलनायिका बाजी मारतायत हे खरं.
‘असावा सुंदर..’मध्ये ईश्वरी आणि अंकिता या दोन मैत्रिणींमध्ये शत्रुत्व आणण्याचं महत्त्वाचं काम केलंय अंकिताच्या आत्तूने. हे शत्रुत्व कसं टिकून राहील किंवा कसं वाढत जाईल याची मोठी जबाबदारी जणू आत्तूने घेतलीय. ही व्यक्तिरेखा साकारली आहे संयोगिता भावे यांनी. याआधी त्यांनी ‘उंच माझा झोका’ या मालिकेत सुभद्रा ही भूमिका केली होती. त्यासाठीही त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्या आत्तू या भूमिकेविषयी सांगतात, ‘खलनायिका साकारताना वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. सकारात्मक भूमिकांमध्ये एकसुरीपणा असतो. विशिष्ट भूमिकेसाठी ठरावीक गोष्टीच सातत्याने करण्यापेक्षा एकाच भूमिकेसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करणं मला अधिक आवडतं. म्हणून मी आत्तू ही व्यक्तिरेखा साकारण्यास होकार दिला.’ आत्तू ही खलनायिका असली तरी ती करत असलेल्या कट-कारस्थानांमागे हेतू अंकिताचं सुख हेच असल्याचं त्या सांगतात. मालिकेतल्या जवळपास प्रत्येक ट्रॅकची सुरुवात आत्तूने केलेल्या करस्थानापासून होते. मालिकेतल्या नायिकेइतकंच महत्त्व आत्तू या व्यक्तिरेखेला आहे. त्या साकारत असलेल्या भूमिकेबाबत त्यांनाही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत असतात. त्या सांगतात, ‘खलनायकी भू्मिकांसाठी मिळणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये अजिबात नाटकीपणा नसतो. त्या खऱ्या असतात. त्या निगेटीव्ह असूनही प्रेक्षकांना आवडतात. कलाकारांचं आवर्जून कौतुक करतात. अशा प्रतिक्रिया खूप जवळच्या वाटतात. प्रत्येक माणूस सकारात्मक, नकारात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून वावरत असतो. त्यामुळे अशी व्यक्तिरेखा साकारायला मला आवडतं.’ मालिकांमध्ये इतरांवर कुरघोडी करणारी आत्तू म्हणजे संयोगिता खऱ्या आयुष्यात मात्र खूप साध्या आहेत. अडचणीत असलेल्यांना त्यातून सोडवण्यासाठी त्या मदत करतात. स्क्रिप्टमध्ये काही अडचण असली तर त्यातही त्या सहकलाकारांना मदत करतात.
सुरेखा कुडची हे नाव घेतलं की आठवते ती ‘देवयानी’ मालिकेतली सासू. कुठल्याही थराला जाऊन सुनेला छळण्याचा विडा उचलेली सासू सुरेखा यांनी उत्तम साकारली होती. ते साकारत असलेली सासू पुन्हा एकदा ‘रुंजी’ या मालिकेत दिसत आहे. इथे फरक इतकाच की, रीतसर योजना आखून रुंजीच्या प्रत्येक कामात तिला खाली पाडण्याचे प्रयत्न सुरू असतात. सुरेखा याबाबत सांगतात, ‘खरं तर ‘देवयानी’नंतर मी अशा भूमिका करणार नाही असं ठरवलं होतं. पण, मला अशाच प्रकारच्या भूमिकांची विचारणा झाली. ‘रुंजी’मध्ये घरातला ड्रामा दाखवला आहे. तो एका व्यक्तीमुळे घडत असतो. ज्या व्यक्तीमुळे घडतो ती व्यक्ती प्रेक्षकांच्या लक्षात राहते. मला अशी व्यक्तिरेखा साकारण्यात अधिक रस होता. म्हणूनच मी ही भूमिका साकारू लागले.’ सध्या नायिकांसोबतच खलनायिकांनाही महत्त्वाच्या ठरतायत. मालिकांच्या या नव्या ट्रेंडबाबत त्या सांगतात, ‘नायिका आणि खलनायिका या दोन्ही प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. नायिकांप्रमाणेच खलनायिकांच्या स्वभाववैशिष्टय़ांनी त्या ओळखल्या जातात, हे खरंय. हा चांगला ट्रेंड आहे. शंभर मालिकांपैकी नव्वद मालिका तर स्त्री-प्रधान असतात.’ मालिकेत दाखवत असलेला ड्रामा खऱ्या आयुष्यात घडत नाही याची जाण त्यांनाही असते असं त्या म्हणतात. पण, तो ड्रामा बघायला प्रेक्षकांना आवडतो. एक मजेशीर किस्सा त्या सांगतात, ‘मी माझ्या मुलीच्या शाळेत फॉर्म भरायला गेले होते. फॉर्म देणाऱ्या काऊंटरवर ज्या बाई होत्या त्यांनी मला ओळखलं. आणि मला बघून बाजूला असलेल्या दुसऱ्या बाईला ती म्हणाली, ‘ही बाई फार कजाग आहे. त्या रुंजीला छळत असते.’ तिचं ते वाक्य ऐकून मला हसूच आलं. मग नंतर तिने माझ्या कामाचं कौतुकही केलं.’ मालिकांमध्ये इतरांना रडवणाऱ्या सुरेखा खऱ्या आयुष्यात मात्र स्वत:च रडूबाई असल्याचं सांगतात. पण, सकारात्मक भूमिकांपेक्षा नकारात्मक भूमिका करणं त्यांना अधिक आवडतं. नाटकी, आगाऊ वागताना डोळ्यांवर खेळणं हे त्यांना आवडतं. ‘फू बाई फू’मुळे किशोरी अंबिये यांची एक विनोदी अभिनेत्री म्हणून छाप पडली होती. त्यांना खलनायिकेच्या भूमिकेत बघण्याचा प्रेक्षकांनी विचारच केला नसावा. पण, ‘एक मोहोर अबोल’नंतर आता त्या ‘देवयानी’ या मालिकेतही नायिकेच्या खाष्ट सासूची भूमिका साकारतायत. खलनायिका साकारण्यामागचं कारण त्या सांगतात, ‘खऱ्या आयुष्यात मला फार रागवता येत नाही. त्यामुळे आपल्याला ते जमत नाही ते साकारण्याचं मला आव्हान वाटलं. पूर्वी मराठी सिनेमांमध्ये नायिका, विनोदी, गंभीर अशा भूमिका करून झाल्या होत्या. आता खलनायिका करणं राहिलं होतं.’ ‘एक मोहोर अबोल’ आणि ‘देवयानी’ या दोन्ही मालिकांमध्ये खाष्ट सासू साकारल्यानंतर प्रेक्षक प्रत्यक्ष भेटल्यावर वाईटसाईट बोलतात. पण, हे वाईट बोलणं आमच्या व्यक्तिरेखेसाठी असतं. आणि ते आमच्यासाठी कौतुकास्पदच असतं, असंही त्या सांगतात. याबाबतचा एक किस्सा त्या सांगतात, ‘माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती म्हणाली की, तू विनोदी भूमिका करतेस ना त्याच करत राहा. या खलनायिकेच्या भूमिका करू नकोस. मी तिला का म्हणून विचारलं. तर ती म्हणाली की, ‘माझ्या सासरकडच्यांनी मला विचारलं की, ही किशोरी तुझी मैत्रीण आहे का? त्यांना वाटतंय तू खरंच अशी खडूस आहेस. तुझ्याबद्दल लोकांचे गैरसमज होतायत.’ यावर मला काय बोलावं काही सुचेना.’ खलनायिकांच्या मालिकांमधल्या वाढत्या प्रस्थाबद्दलही त्या बोलत्या झाल्या. ‘मालिकांच्या खलनायिका प्रेक्षकांना आवडतायत, लक्षात राहतायत ही चांगली गोष्ट आहे. त्यातही हिंदीप्रमाणे त्यांच्या भडक लुकबाबत मराठी चॅनल हट्टी नाहीत. खलनायिकांचा लुक ठरवण्याबाबत चॅनल्सने मालिकेच्या टीमला स्वातंत्र्य दिलं आहे’, त्या सांगतात. मालिकेत इतरांना दु:ख देणाऱ्या किशोरी खऱ्या आयुष्यात मात्र आनंदी असतात आणि इतरांना आनंदी ठेवतात.
खलनायिका असूनही त्या प्रेक्षकांच्या लक्षात राहतायत, हे त्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रींचं यश आहे. खऱ्या आयुष्यात वेगळ्या स्वभावाचे असताना मालिकेत नेमकं त्याच्या विरुद्ध स्वभावाची भूमिका करणं हे कलाकारासाठी आव्हान असतं. हे आव्हान या अभिनेत्रींनी उत्तमरीत्या पेललं आहे. चोख अभिनय, सादरीकरण, अभिनयातले वेगवेगळे प्रयोग, आवाजाचा चढउतार, देहबोली या सगळ्यात एक पाऊल पुढे जाऊन या अभिनेत्री खऱ्या अर्थाने खल‘नायिका’ झाल्या आहेत.
चैताली जोशी