सध्याची शिवथर घळ खरी की वरंधा येथे असलेली घळ खरी हा अभ्यासकांमध्ये वाद आहे. पण त्या वादात न पडता वरंधा घळीला भेट द्यायला गेलात तर सह्य़ाद्रीच्या रांगडय़ा रूपाचे आणि नितांतसुंदर निसर्गाचे दर्शन मात्र घडते.

मान्सूनचे आगमन झाले की भटक्यांचे पाय आपोआप सह्यद्रीकडे वळतात. दोन-तीन महिने उन्हाने नुसती काहिली झाल्यामुळे घराबाहेर कुठेही पडणे अगदी मुश्कील झालेले असते. कधी एकदा काळे ढग आकाशात जमा होताहेत आणि कधी एकदा आपण आपला सखा सह्यद्रीच्या अंगाखांद्यावर बागडायला बाहेर पडतो आहोत असं होऊन जातं. वर्षां ऋतूमध्ये नेहमीच्या ठिकाणी जाण्यातली मजा कधीच संपत नाही, पण जर अशा वेळी एखादे नवीन, अनोखे, देखणे ठिकाण मिळाले तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. अशाच एका ठिकाणाला या वेळी भेट द्यायची आहे. ते ठिकाण नवीन तर आहेच, पण वेगळे आहे का नाही हे सांगता येत नाही.
समर्थ रामदास या व्यक्तिमत्त्वाचे गूढ काही केल्या उलगडत नाही. अखंड भ्रमंती, लोकजागर, बलोपासना, दासबोधासारख्या ग्रंथाची रचना अशा समाजोपयोगी निरनिराळ्या क्षेत्रांत भरीव कामगिरी केलेल्या या अनोख्या व्यक्तीचे वास्तव्य मात्र डोंगरात, कडेकपारी, गुहा, घळी अशा ठिकाणी असायचे.
‘दास डोंगरी राहतो,
यात्रा देवाची पाहतो’
या नीतीने समर्थाचे वास्तव्य हे गावात, मठात, मंदिरात कधीच नसायचे. ते नेहमी सांगायचे माझा प्रभू रामचंद्र सदैव माझ्या सन्निध असतो. त्यामुळेच त्यांनी वास्तव्य केलेल्या विविध घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध झाल्या. अशाच एका घळीला आज आपण भेट देणार आहोत. शिवथर घळीच्या अगदी जवळ असलेली ही अजून एक घळ आहे. या घळीचे नाव काय असे विचारले तर स्थानिक लोक सुंदरमठ असे सांगून हीच खरी शिवथर घळ असे सांगतात. ही घळ आहे वरंध गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरामध्ये. पुण्याहून महाडला जाताना वरंध घाट लागतो. तो उतरून गेले की वरंध नावाचे गाव येते. याच गावातून काहीसे पुढे महाडच्या दिशेला जायला लागले की रस्त्याच्या उजव्या बाजूला काही दुकाने दिसतात आणि तिथे उजवीकडे आत एक रस्ता जातो. प्रभू श्रीराम पथ असे या रस्त्याचे नाव लिहिलेली पाटी तिथे आहे. (मुंबईकडून आल्यावर वरंध गावाच्या काहीसे अलीकडे डाव्या हाताला ही जागा येते.) त्या रस्त्यावरून आत गेल्यावर अंदाजे चार कि.मी. अंतरावर ही घळ आहे. आत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे. आणि पुढे गेल्यावर अंगावरची चढण एक-दोन ठिकाणी लागते. दुचाकी वाहने जायला काही त्रास नाही, परंतु जीपसारखी चारचाकी वाहनेच तिथे जाऊ शकतात. आणि ऐन पावसाळ्यात तर तिथे पदभ्रमणच करावे लागेल. पण सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे. वाटेत एका जागी मोठय़ा वाडय़ाचे अवशेष लागतात. खूप मोठे जोते आणि काही अवशेष तिथे पाहायला मिळतात. तिथून समोरच्या डोंगरात पाहिले की समर्थाची ही घळ आपल्याला प्रथम दर्शन देते. घळीच्या तोंडाशी लावलेला भगवा झेंडा आपले लक्ष वेधून घेतो. या ठिकाणाहून जेमतेम दहा मिनिटांमध्ये आपण घळीच्या जवळ पोहोचतो. पाण्याची एक टाकी आणि एक बांधलेली समाधी अशा ठिकाणी रस्ता संपतो. वाहन तिथेच ठेवून समोरच्या डोंगराच्या पोटातून गेलेली एक पायवाट आपल्याला दिसते. डोंगर आपल्या डाव्या बाजूला ठेवून ही पायवाट काहीशी पुढे पुढे जाते आणि आपण त्या घळीच्या खाली येतो. तिथून दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन उभे राहतो. पाठीमागे पाहिले की सह्यद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे. त्याचे पाणी पडून खालच्या बाजूला एक डोह तयार झाला आहे आणि तिथून ते पाणी पुढे नदीचे रूप घेऊन पुढे वाहत जाते. घळीच्या दाराशी आता एक लोखंडी सरकते दार बसवले आहे. दक्षिणाभिमुख असलेली ही घळ आतमध्ये डाव्या बाजूला पूर्व-पश्चिम अशी जवळजवळ ६० फूट लांबीला आहे. तसेच ती दहा ते १२ फूट रुंद आहे. दारातून आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये दगडात कोरलेली बसण्याची जागा आहे. मूलत: ही नैसर्गिक घळ असणार नंतर मानवाने ती त्याला हवी तशी खोदून काढलेली दिसते. छिन्नीने घातलेले घाव आणि त्याची निशाणी ठिकठिकाणी जाणवते. आतमध्ये जाताना डाव्या बाजूला एक फूट उंचीचा आणि अंदाजे तीन फूट लांबी-रुंदीचा एक दगडी चौथरा आहे. तसेच पुढे गेले की खडकामध्ये खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. आणि तिथून पुढे किंचित घळ वळते आणि मग दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग दिसतो. सध्या या घळीत कच्ची भिंत बांधून त्याचे दोन भाग केलेले दिसतात.
गिरीचे मस्तकी गंगा।
तेथुनी चालली बळे।।
धबाबा लोटती धारा।
धबाबा तोय आदळे।।
अगदी असेच यथार्थ वर्णन असलेले हे अत्यंत रम्य आणि एक वेगळेच ठिकाण आपल्या अगदी जवळ आहे.
शिवथर घळीच्या अगदी जवळ ही घळ कशी काय, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. या विषयातील काही तज्ज्ञ मंडळींच्या मते हीच मूळ शिवथर घळ असणार. या त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ ते काही गोष्टी सांगतात. एक म्हणजे या ठिकाणी कितीही पाऊस आला किंवा वारे सुटले तरी घळीमध्ये आत त्याचा परिणाम जाणवत नाही. ही घळ चांगली १२-१३ फूट उंच आहे तसेच आतमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. बसायला एक चौथरा केलेला आहे त्यामुळे इथे बसूनच समर्थानी त्यांचे लेखन केले असावे. लेखनासाठी लागणारी साधनसामुग्री या ठिकाणी अगदी सुरक्षित राहणार. घळीचा दरवाजा बंद केला की कोणी जनावर अथवा वन्य श्वापद आत येण्याची अजिबात शक्यता नाही. सध्या प्रचलित असलेल्या शिवथर घळीत अशी कोणतीच सुविधा नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रामदास पठार म्हणून जो भाग सध्या प्रसिद्ध आहे त्याच्याच पोटात ही घळ खोदलेली दिसते. मग रामदासांचे वास्तव्य असलेली घळ असलेले पठार म्हणून रामदास पठार असे नाव पडले का? तसेच सात-बाराच्या उताऱ्यामध्ये या ठिकाणाचा उल्लेख हा ‘मठाचा माळ’ असा केलेला आढळतो. याचा अर्थ इथे मठ होता याची यावरून खात्रीच होते असे तज्ज्ञ सांगतात. खाली असलेले वरंध गावपण बरेच प्राचीन आहे. गावात काही वीरगळ पडलेले आहेत तर खूप जुन्या मंदिरांचे अवशेषसुद्धा गावात आढळतात. एक गोष्ट मात्र खरी की, ही घळ खरी की आधीची घळ खरी या वादात भटक्यांनी पडण्यापेक्षा एक अत्यंत सुंदर नवीन ठिकाण पाहायला अवश्य जावे. ऐन पावसाळ्यात गेलात तर चार कि.मी. चालायची तयारी ठेवून जावे. पण थकवा मात्र अजिबात जाणवणार नाही, कारण आजूबाजूला असलेला अत्यंत सुंदर निसर्ग आणि सह्यद्रीची कायम असलेली साथ यामुळे आपली ही भटकंती नक्कीच रमणीय होईल. पाऊस नसला तरी रस्त्याला चिखल असल्यामुळे आपले वाहन किती आतपर्यंत जाईल ते त्या वेळच्या परिस्थितीवरच अवलंबून असेल. पण सरत्या पावसात गेले तर मात्र इथे कोसळणारा धबधबा आणि पाठीमागे वरंध घाटाचा डोंगर, इथली नितांत गूढ शांतता आपल्याला नक्कीच भावेल. वरंध गावात कोणालाही विचारले तरी या घळीबद्दल लोक माहिती सांगतात. कोण्या रामदासीबुवांचे त्या घळीमध्ये अधूनमधून वास्तव्य असते असेही गावकरी सांगतात.
तर मग या वर्षां ऋतूमध्ये किंवा त्यानंतर या अनोख्या समर्थाच्या घळीला अवश्य भेट द्या. ती शिवथर घळ आहे की वरंधची घळ आहे की सुंदरमठ आहे हा विषय तज्ज्ञांवर सोपवून आपण भटक्यांनी या सह्यद्रीत लपलेल्या एका अनगड जागेला नक्की भेट द्यायची. इथून दिसणारा रौद्र निसर्ग, भन्नाट वारा, आणि बाजूलाच कोसळणारा धबधबा याचा मनसोक्त अनुभव घेण्यासाठी या समर्थाच्या घळीला भेट देणे अनिवार्य आहे.
आशुतोष बापट response.lokprabha@expressindia.com

Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!