lp01दरवर्षी आळंदीहून पंढरपूरला विठूच्या नावाचा गजर करीत केलेली पदयात्रा अर्थातच पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचितच. यंदाच्या वारीनिमित्ताने या संचिताला उजाळा.

‘वारी’ हा शब्द कानी पडताच आठवण येते ती पंढरपूरला होणाऱ्या आषाढीवारीच्या सोहळ्याची. महाराष्ट्रातून आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, सासवड, एदलाबाद, पैठण, शेगाव इ. प्रसिद्ध संतांच्या गावांहून त्यांच्या पालख्या आषाढी एकादशीस पंढरपूरला जाण्यास हजारो भक्तांसह प्रस्थान ठेवतात. सर्वजण श्रीविठ्ठलाचे दर्शनासाठी भूवैकुंठ पंढरपूरला निघतात ते हरिनाम घोष करत. ऊन, वारा, वादळ, पाऊस कशाचीही पर्वा न करता. तसेच कार्तिकी एकादशीसही आळंदी व पंढरपूर येथे मोठय़ा प्रमाणावर भक्तांची रीघ लागते. दिंडय़ा, पताका, टाळ नि मृदुंग यांनी हा सोहळा लक्षवेधी, भक्तीरसानंदाचा होतो.
‘वारी’ या शब्दाचा अर्थ येरझारा हा असला तरी भक्ती संप्रदायात त्यास एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. तो म्हणजे आपल्या आराध्य दैवताचे दर्शनास विशिष्ट महिन्यात विशिष्ट दिवशी नित्यनियमाने जाणे. ज्ञानेश्वरीत ‘वारी’ हा शब्द येरझारा याअर्थी आलेला आहे. विशिष्ट दैवताचे भक्तगण जेव्हा एकत्र येऊन प्रस्थान ठेवतात त्यास दिंडी म्हणतात. या दिंडय़ा अनेक ठिकाणांहून निघतात व त्या आराध्यदैवताच्या परमभक्ताच्या ठिकाणी- गावी एकत्र येऊन त्या परमभक्ताच्या पालखीबरोबर आराध्य दैवताच्या ठिकाणी जातात. या भारतवर्षांत अशा पद्धतीने अनेक देवदेवतांच्या वाऱ्या करणारे आहेत. बद्रिकेदार, वैष्णोदेवी, अमरनाथ, गाणगापूर, अक्कलकोट, काशीविश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, उज्जन, रामेश्वर, तिरुपती, शबरीमलेया, शेगाव, शिर्डी इत्यादी. मुसलमानही नित्यनेमाने हज यात्रा करतात. तीही वारीच. प्रत्येक धर्माचे पवित्रतम् ठिकाणी त्या त्या धर्माचे लोक विशिष्ट पुण्यप्रद दिवशी नित्यनियमाने येरझार करीत असतातच. जगन्नाथपुरी, द्वारका, सोरटी सोमनाथ, गया, अजमेर, पावापुरी, चंपापुरी इ. इ. असंख्य पवित्र स्थाने आहेत व त्या ठिकाणी नित्यनियमाने जाणारे भक्त आहेत.
वारी करणारा तो वारकरी अशी वारकऱ्याची व्याख्या करता येईल, म्हणजे सर्व धर्मात वारकरी आहेतच. प्रत्येक धर्माचे, संप्रदायाचे वारकरी असतातच व त्यांच्या दैवतांच्या उत्सव/ उरूस/ पुण्यतिथी/ जयंती साठी ते कधी वेगळे कधी जथ्याने तर कधी दिंडय़ायुक्त पालखी सोहळ्यारूपाने वारी करतात.
या लेखात भारतातील हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायाचा त्यातही भागवत संप्रदायाचा परामर्श घेण्याचा अल्प प्रयत्न आहे. महाराष्ट्रात वेगवेगळे धर्म, संप्रदाय आहेत त्यांचे तत्त्वज्ञान, आचारधर्म, उपासनाप्रणालीमुळे विभिन्न असले तरी जनसामान्यांचे प्रबोधन व परमार्थ हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे ते शतकानुशतके अनेक परकीय आक्रमणातही धर्म व संस्कृती टिकवून अस्तित्वात राहिले. याचे श्रेय त्या संप्रदायातील संत-आचार्य यांना आहे. विशेषत: हिंदू धर्म व संस्कृती यांची परंपरा या अग्निदिव्यातून तावूनसुलाखून पार पडली व कसास उतरली ती या संत, आचार्य, महात्मे यांच्याच अथक प्रयत्न, परमनिष्ठा, परमश्रद्धा, परमसहिष्णुता, परमशुद्ध पवित्र आचरणानेच.
भारतात हिंदू धर्म संप्रदायाचा विचार करता १) शैव २) वैष्णव व ३) शाक्त ही तीन संप्रदाय रूपे असून, शैव पंथीय प्रभाव दक्षिण भारतात, वैष्णव- उत्तर व पश्चिम भारतात तर शाक्त पूर्व भागात आसाम, बंगाल ओरिसा येथे आहे. तरीही या सर्व संप्रदायांची विभागणी केवळ दोनच भागात होते ती म्हणजे सगुण व निर्गुण. प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय सगुण आहे. तरीही काही या दोन्हींचा समन्वय करणारे आहेत. दत्त, गाणपत्य, नाथ, राम, कृष्ण, वेदान्ती इ. अनेक संप्रदाय उदय पावले व अस्तित्वात आहेत. वैष्णव/ भागवत संप्रदाय हा प्रमुख गणला जातो. त्यातही उपसंप्रदाय महानुभाव, राधावल्लभ इ. आहेतच. यात निर्गुण भक्ती आचरण करणारा संप्रदाय वेदान्ती वैष्णव व उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता ही आत्मज्ञानी श्रेष्ठ साधने हे त्यांचे तत्त्व तर सगुण संप्रदाय यात भक्तीमार्ग हा सगुण साकार ईशतत्त्व मानणारा आहे. नवविधाभक्तीस यात महत्त्वपूर्ण स्थान आहे.
शैव व शाक्त संप्रदायाचा प्रभाव वाढल्याने वैष्णव धर्मास लागलेली घसरण व्यासरचित भागवत पुराणाने नुसतीच थांबली नाही तर त्याद्वारे गीतातत्त्वज्ञानास पुष्टी मिळून वैष्णव संप्रदायाचा पाया भक्कम केला. यंत्र, मंत्र, तंत्र या तीन साधनांत देहकष्ट व बाह्य़ उपासनेची उणीव/ अभाव यामुळे भक्तीसाधना व गुणोपासना जी वैष्णव संप्रदायाची मुख्य तत्त्वे ती बहुजन समाजास भावली व त्याचे रूपांतर भागवत धर्म भागवत संप्रदायात झाले.
बौद्ध व जैन या धर्माचा उदय व प्रसार यामुळे भागवत धर्मास लागलेली उतरती कळा वा ओहोटी रामानुजाचार्य, मध्वाचार्य यामुळे थांबली. त्यांनी या दोन धर्मातील साधु, सम्राट, आचार्य व विद्वानांना वादात जिंकून भागवत धर्मध्वजा उंचावली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत व अन्य धर्मआक्रमणांतूनही भागवत धर्म/ संप्रदाय भरभक्कम उभा राहिला याचे कारण त्यास असणारी पूर्वपरंपरा/ पूर्वपीठिका. अन्य धर्म वा संप्रदाय उदयास येण्या आधीच हजारो वर्षे हा भागवत/ वासुदेव संप्रदाय निर्माण झाला होता व अनेक तपस्वी, मुनी ऋषी आचार्य व राजे/सम्राट यांनी त्यास भक्कम आधार देऊन तो अक्षय ठेवला.
यास थोडीशी अवकळा अकराव्या शतकात लागली होती, पण ती फार लक्षणीय नव्हती. ‘यदा यदा ही धर्मस्य.. संभवामी युगे युगे।।’ या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे भगवंताने अशा परिस्थितीचा उद्भव झाल्यावर अंशावतार वा स्वत: पूर्णावतार घेऊन धर्मरक्षण वा धर्मध्वजा उन्नत केली आहे. तसे करण्याचे त्यांचे हे वचन त्रिकालाबाधित आहे. त्यामुळे त्यांनी या वेळीही हे कार्य केले. असं म्हणतात की भक्तश्रेष्ठ पुंडलिकाचे घरी भगवान श्रीकृष्ण स्वत: विठ्ठलरूपात पंढरपुरात त्यांचे घरी प्रगटले व तो माता-पित्याच्या सेवेत मग्न असल्याने त्याने दिलेल्या विटेवर उभे राहिले युगानयुगे. असे सांगतात की भगवान विठ्ठल कायम येथेच राहावेत म्हणून भक्त पुंडलिकाने स्नान करून येईतो थांबा असे सांगून नदीत आत्मसमर्पण केले व तो परत आलाच नाही. परिणामी विठ्ठल भगवान युगान्युगे त्या विटेवरच उभे आहेत. या आख्यायिकेचे सत्यासत्यतेत न जाता एवढे मानता येईल की श्रीविठ्ठल भक्तावर प्रसन्न होऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे पंढरपुरात अक्षय वास करून आहेत. यासंबंधी काही शिलालेख व ताम्रपट आहेत.
भक्त पुंडलिक हाच वारकरी संप्रदाय प्रवर्तक आहे. वारकरी संप्रदायही तसेच मानतो. असे मानतात की त्या वेळचे होयसळ यादव घराण्यातील विष्णुवर्धन राजास भगवान विष्णू प्रगट झाल्याचे वृत्त कळताच त्याने पंढरपूर (त्या वेळचे) पांडुरंगपूर येथे विठ्ठल मंदिर उभारले व हे विठ्ठलरूप वैष्णवांना अत्यंत प्रिय झाले. भक्त पुंडलिकाने आषाढी शुद्ध एकादशी ही तिथी निश्चित केली त्यामुळे आषाढी एकादशी हा दिवस या संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जातो. हा त्यांचा व्रत दिवस होय.
चौऱ्यांशीचा शिलालेख शके ११९५ मध्ये पांडुरंग/ विठ्ठल मंदिराचा उल्लेख आहे, तसेच १२३७ शके मधील संस्कृत व कानडी भाषेतील विठ्ठल मंदिरातील तुळईवरील लेखात ‘पुंडरिकमुनी’ हा उल्लेख आहे. श्री आद्य शंकराचार्य यांच्या पांडुरंगाष्टकातही ‘महायोगपीठे तटे भीमरश्याम। वरं पुंडरिकाय दातुं सुनीन्दै:।। समागत्य तिष्ठन्त मानंदकंदं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्।।’ असा श्लोक असून, त्यात पुंडलिकास वर देण्यासाठी पांडुरंग पंढरीस आल्याचे सांगितले आहे.
श्रीज्ञानेश्वरमाऊलीचे पूर्वीही अनेकजण विठ्ठल भक्त होते. पांडुरंग मंदिरात पूजाअर्चाही होत असे. एकादशी व्रत प्रचलित होते. अनेक गावांहून भक्त पंढरपुरास नित्यनेमाने येत म्हणजेच वारी करीत यावरून वारकरी संप्रदायाचा मूळ प्रवर्तक ‘पुंडलिक’च होता हे सिद्ध होते.
जे आषाढी व कार्तिक शुद्ध एकादशीस पंढरपूर व वद्य एकादशीस आळंदीस नियमितपणे जातात त्यांना ‘वारकरी’ म्हणतात. पुष्कळ वारकरी प्रत्येक महिन्याचे शुद्ध ११ ला पंढरपूर व वद्य ११ ला आळंदीस जातात. त्यामुळे या संप्रदायास ‘वारकरी संप्रदाय’ संबोधिले जाते. हे वारकरी गळ्यात नेहमी तुळशीची माळ घालतात. त्यामुळे त्या संप्रदायास ‘माळकरी संप्रदाय’ असेही म्हणतात. भगवंतास सर्वस्व अर्पण करणारा तो भक्त अशी भक्ती याच पंथात सांगितली आहे म्हणून त्यास ‘भागवत संप्रदाय’ असेही संबोधन आहे.
वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामाची गाथा हे प्रमुख ग्रंथ मानतो. त्यात ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ कारण याच ग्रंथातील वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान अन्य दोन ग्रंथांत म्हणजे एकनाथी भागवत व तुकाराम गाथा यात विस्ताराने आहे. या संप्रदायाचे संपूर्ण तत्त्वज्ञान श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या ‘अमृतानुभव’ व ‘हरिपाठ’ तसेच ‘चांगदेव पासष्टी’ यात आहे. या वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान सार संक्षेपाने ज्या प्रमुख पाच भागांत विभागले गेले आहे ते पाच भाग- १) परमात्मा परब्रह्म २) विश्व/ जगत ३) जीव ४) माया व ५) मुक्ती/ मोक्ष.
या संप्रदायाचे एक वैशिष्टय़ म्हणजे यांतील दोन संत श्रीज्ञानेश्वर व एकनाथ ज्यांनी याचा प्रचार केला प्रसार केला त्यांचा गुरूउपदेश वा गुरूपरंपरा अन्य संप्रदायांतील होता. श्रीज्ञानेश्वर माऊलींची गुरूपरंपरा ही नाथ संप्रदायातील तर एकनाथांची दत्तसंप्रदायातील, तरी पण हे दोघे महान विठ्ठल भक्त होते.
वारकरी संप्रदायात श्रीराम व श्रीकृष्ण ही दैवते समाविष्ट आहेत. कारण दोन्हीही श्रीविष्णूंचेच अवतार आहेत. वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञानात १) परमात्मा/ परब्रह्म हे सनातन व स्वयंप्रकाशी, स्वयंसिद्ध व सत्चित्त व आनंदरूप आहे. ते स्वयंतेजोमयी ज्ञानस्वरूप आहे. ते ना सगुण ना निर्गुण. हे शिव व शक्तीचे एकत्रीकरण असून, दोन्हींमध्ये अद्वैत आहे. ज्ञानेश्वरीत ‘ओम नमोजी आद्या’ ही प्रारंभ ओवी, तसेच त्यांचे ‘अमृतानुभव’मधील ‘ऐशी इथे निरुपाधिके। जगाची जिये जनके। ती वंदिली प्रिया मुळिके। देवोदेवी।। ही ओवी व ‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रे। एक गोविंदु रे। हा अभंग इ.तून परब्रह्मतत्त्व सांगितले आहे.
२) जगत/विश्व- या संबंधी ते परमेश्वराची लीला व स्फूर्ती आहे असे समजतात. अमृतानुभवातील ७-२९१ मधील ओवी ‘यालागी वस्तुप्रभा। वस्तुची पावे शोभा। जात असे लाभ। वस्तुचिया।।’ हेच सांगते. श्रीज्ञानेश्वर माऊली हे स्पष्ट करते की परमात्मा जगत्रूपाने स्वत:शीच खेळत असतो म्हणून जगत् हे मायारूप नाही तर चिद्विलासरूप आहे आणि हाच माऊलीचा आवडता सिद्धांत आहे. नामरूपात्मक जगत्मिषाने एक ब्रह्मवस्तूच प्रकाशली आहे. तत्त्वत: जगत् काही नसून स्वयंप्रकाशाने ब्रह्मवस्तूच शोभायमान झाली आहे.
३) जीव- तिसरा घटक जीव जो परमात्म्याचा अंश आहे, पण कर्मामुळेच त्याला जीवदशा प्राप्त झाली आहे.
४) माया- चौथा घटक जिच्यामुळे जीव बद्ध होतो. ही दोन प्रकारची म्हणजे विद्यामाया व अविद्यामाया असून अविद्यामाया परमार्थप्राप्तीस बाधक आहे तर विद्यामाया परमार्थप्राप्तीस साधक/साहाय्यक आहे. ही माया नदी केवळ महाभयंकर असून अनन्यभावे सर्वसमर्पण करून भगवंत/ परब्रह्मास शरण जाणाराच ती पार करू शकतो. ज्ञानेश्वरीतील सातवा अध्याय यावरच आहे.
५) मोक्ष- हा पाचवा घटक. मोक्ष हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. जिवा-शिवाचे ऐक्य साधणे परब्रह्मात एकरूप होणे म्हणजेच मोक्ष. वारकरी संप्रदायात नवविधाभक्तीप्रकारात नामस्मरण/नामसंकीर्तन हे मोक्षप्राप्तीचे अमोघ साधन मानले जाते व त्यासाठी सत्संगतीलाही फार महत्त्व आहे. स्वत: श्रीविठ्ठलांनीच ‘विठ्ठल हृदय स्तोत्रात स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘ॐ कारोऽ नाहतो मूर्तिराहतो नामसंकीर्तनम्।।.’ हरिपाठातसुद्धा हेच नाममहात्म्य वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरीतील अध्याय- ९, ओवी- २०८ हेच सांगते. वारकरी संप्रदायसत्संगतीस मोक्षाचे साधन मानतात. ‘‘संत हेच भूमीवर। चालते बोलते परमेश्वर। वैराग्याचे सागर। दाते मोक्षपदाचे।।’’ ‘‘संत हेच सन्नितीची। मूर्ती होय प्रत्यक्ष साची। संत भव्य कल्याणाची। पेठ आहे विबुध हो।।’’ असे संतकवी दासगणूंनी ‘गजाननविजय’ या पोथीत लिहिले आहे. ज्ञानेश्वरीत अध्याय १८, ओवी १३५६ मध्ये माऊली सांगते ‘आत्मज्ञाने चोखडी। संत जे माझी रूपडी। तेथ दृष्टी पडो आवडी। कामिनी जैशी।।’ तसेच त्याच अध्याय २८त ओवी क्र. १६३१ मध्ये ‘‘चंद्र तेथे चंद्रिका। शंभू तेथे अंबिका। संत तेथे विवेका। असणे की जी।।’’ अशी संतांची प्रशस्ती वा गुण वर्णिला आहे. हरिपाठातही सत्संगमहिमा ‘‘साधुबोध झाला, नुरोनिया ठेला। ठायीच मुराला अनुभवे।।’’ या ओवीत तसेच आणखी एका ओवीत ‘‘संतांचे संगती मनोमार्गगती। आकळावा श्रीपती येणे पंथे।।’’ याप्रमाणे दिला आहे. तेव्हा सत्संगतीला वारकरी संप्रदायात फार मान आहे. संतसंगतीनेच भक्ती स्थिर होते. भक्तीचा सहजसोपा मार्ग सापडतो व अन्ती भगवंतप्राप्ती होते यावर वारकरी संप्रदायाची दृढ श्रद्धा आहे.
वारकरी संप्रदायाचीही विशिष्ट आचारसंहिता व विशिष्ट उपासना/साधना आहे. प्रत्येक संप्रदायाची ओळख त्याचे आचारसंहिता व साधनप्रणाली यामुळे असते. नाथसंप्रदाय नाथपंथिय वेषभूषा, योगसाधना यामुळे तर दत्तसंप्रदाय त्यांचा आचारधर्म, साधना, पारायण ग्रंथ, व्रते इ.इ. मुळे, शैवपंथीय त्रिशूल शस्त्र धारण, रुद्राक्षमाळा, आडवे भस्मपट्टे इ. व शिवप्रदोशादि सोळा सोमवारादि व्रते, ॐ नम: शिवाय नामजप, इ.मुळे सहज ओळखू येतो, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची वैशिष्टय़े येणेप्रमाणे:-
अ) उपास्य दैवत – श्रीविठ्ठल- १- वारकऱ्यांच्या संप्रदायाचे व्यापक तत्त्वज्ञानाचे हे आराध्य दैवत. विष्णू, कृष्ण, राम, विठ्ठल यांचा निर्विवाद ऐक्यसंबंध संप्रदायात लोकमान्य आहे. भगवान श्रीविष्णूचे २४ अवतार व दशावतार आहेत. त्यात विठ्ठलाचा उल्लेख नाही. हा शुद्धसत्त्व विठ्ठल विष्णुसहस्रनामाहून वेगळा आहे. तो भक्तसखाही आहे तसाच तो दिनाचा दयाळू, भक्तवत्सल, दयार्णव, कृपाळू, भक्तकामकल्पद्रुम आहे. स्वत: निवृत्तीनाथांनीच सांगितले आहे की नंदाघरी नांदणारा कृष्णच विठ्ठलरूपात आला व वीटेवर उभा राहिला भक्तांसाठी तो तसाच सतत युगानयुगे उभाच आहे. श्रीकृष्ण जन्म श्रावण वद्य अष्टमीस रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री बुधवारी झाला म्हणून विठ्ठलभक्त, हे बुधवार हा विठ्ठलाचा वार मानतात व कधीही बुधवारी पंढरपुरातून परतत नाहीत. विष्णूशी संबंधीत एकादशी व्रत ते निष्ठेने करतात व विष्णुप्रिय तुळस त्यांना अत्यंत प्रिय असते. पंढरपुरातील मंदिरातील शिलालेखात पंढरपूरचा पांडुरंगपूर व विठ्ठलाचा विठ्ठलदेव असा उल्लेख आहे. येथील विष्णुपदाला ‘वेणुनाद’ असे दुसरे नाव आहे. या ठिकाणीच श्रीकृष्ण व संगमदैत्याचे युद्धात संगमदैत्य शिळेखाली दडून बसला त्या शिळेवर पाय ठेवून श्रीकृष्णाने वेणू वाजवायला सुरुवात केली. त्या श्रीकृष्ण भगवानांचा पाय म्हणजेच ‘विष्णुपद’ होय.
विठ्ठलमूर्तीचे रूप मनोहारी आहे. डोक्यावर उंच टोपीसारखा मुकुट यालाच शिविलग म्हणतात. कानात माशाचे आकाराची मकराकार कुंडले, उभट मुख, फुगीर गाल, गळ्यात कौस्तुभमणीहार, उजव्या छातीवर खळगी व वर्तुळखंड असून त्याला श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन अशी नावे आहेत. दंडावर व मनगटावर दुहेरी बाजुबंद व मणीबंद कमरेवर हात ठेवलेले व त्याच अवस्थेत उजव्या हातात कमळदेठ कमरेला तीन पदरी मेखला, कमरेला वस्त्र व त्याचा सोगा पावलापर्यंत लांब आहे.
२) विठ्ठल मंदिरे- पंढरपूर, सोलापूर, अहमदनगर, इ. इ. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात तसेच आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू इ. प्रांतांतही आहेत.
३) विठ्ठलावरील ग्रंथसंपदा- अनेक दुर्मीळ ग्रंथ आता उपलब्ध नाहीत. विठ्ठलगीता, विठ्ठलगीतासारस्तोत्र, विठ्ठल पंचरत्न, श्रीविठ्ठलस्तवराज, श्रीमद्विठ्ठलहृदयस्तोत्र, विठ्ठलाष्टक, श्रीविठ्ठलस्तोत्रम्, पांडुरंगाष्टकम्, विठ्ठलअष्टोत्तरशतनामस्तोत्रम्, विठ्ठलभूषण, विठ्ठलसहस्रनाम, श्रीविठ्ठलऋङमंत्रसारभाष्य इ. इ. श्रीस्कंद, पद्मपुराण व विष्णुपुराणात ‘‘पांडुरंगमाहात्म्य’’ पोथीचा उल्लेख आहे.
४) मंत्र – ‘‘रामकृष्ण हरि’’ हा प्रामुख्याने म्हणतात. इतर विठ्ठल मंत्र असे :- ‘‘विठ्ठलाय नम:’’, ‘‘ॐ विठ्ठलाय नम:’’ ‘‘श्रीकृष्णाय नम:’’ हे तीन विठ्ठल मंत्र म्हणताना / जपानुष्ठान करताना ‘‘ॐ अस्य श्रीपांडुरंगमंत्रस्य पुंडरिक ऋषि: श्रीविठ्ठलो देवता, श्रीविठ्ठल प्रीत्यर्थे चतुर्विधपुरुषार्थसिद्धयर्थे जपे विनियोग:।।’’ असा संकल्पप्रथम म्हणतात.
५) सांप्रदायिक वेशभूषा – गळ्यात तुळशीमाळ, गोपिचंदनादि मुद्रा, हातात भगवी पताका, उभे गंध कपाळी, हाती टाळ/ वीणा/मृदुंग. ‘‘कुंचे पताका झळकती। टाळ मृदुंग वाजती ।। आनंदे प्रेमे गर्जती। भद्रजाती विठ्ठलाचे।।’’ असा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. तसेच संत तुकारामही ‘‘गोपीचंदन उटी, तुळशीच्या माळा। हार मिरवती गळा रे। टाळमृदुंग घाई पुष्पांचा वरूषाव। अनुपम्य सुख सोहळा रे।।’’ असे वर्णन करतात.
६) मुख्य कार्यक्रम – पंढरपुरात वारकऱ्यांचे दोन महत्त्वाचे कार्यक्रम असतात. १) चंद्रभागेत स्नान व २) विठ्ठल दर्शन.
७) नीतिनियम – सत्य वदणे, परस्त्रीस मातेसमान मानणे, नियमित वारी-पंढरी व आळंदीस भिक्षापात्र न अवलंबिणे, अन्नदान-गोरगरिबांना, गरजूंना शक्य ती सर्व मदत- आर्थिक वा अन्यप्रकारची निरपेक्षपणे कुवतीनुसार करणे, नामस्मरण नित्य हरिपाठ (हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्याच असे समजतात), तसेच नामसंकीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण वा नित्यवाचन इ.इ. याशिवाय प्रत्येक दिंडीचे वेगवेगळे आचारसंहितेचे नियम असतात व ज्या दिंडीत सहभाग असतो त्या दिंडीचे आचारसंहितेचे पालन करणे हेही त्यात येतेच.
वारकरी संप्रदायास देदीप्यमान स्वरूप प्राप्त झाले ते ज्ञानेश्वर माऊलींमुळे. तुकाराम, नामदेव, एकनाथ यांचे काळात वारकरी संप्रदायाचा विकास चरमसीमेस पोहोचला व त्या संप्रदायाचे धार्मिक व सामाजिक कार्य आजही जोमात सुरू आहे. हरिपाठ, ज्ञानेश्वरी, चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, तुकाराम गाथा, नामदेवाचे अभंग, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, भारूडे इ. इ. संतसाहित्यास या संप्रदायात अत्यंत श्रेष्ठ व आवराचे स्थान आहे, तसेच सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तिनाथ यांचे साहित्यासही आहे.
वारकरी संप्रदायासंबंधी जिज्ञासूंनी ‘‘वारकरी संप्रदाय-उदय व विकास’’ हा भ.प. बहिरट यांचा ग्रंथ वाचावा अधिक विस्तृत माहितीसाठी.
अर्वाचीन काळातही या संप्रदायाची उज्ज्वल वाटचाल सुरू आहे. ती धुरा पावसचे स्वरूपानंद, गुलाबराव महाराज, विष्णुबुवा जोग, देगलूरकर, धुंडामहाराज, साखरे, सोनोपंत दांडेकर, केशवराव देशमुख इ. इ. अनेक दिग्गजांनी वाहिली. या संप्रदायातही काही वादविवाद उत्पन्न झाले, पण ते टिकले नाहीत.
आचार्य वसंत गोडबोले – response.lokprabha@expressindia.com
चित्र : वासुदेव कामत
छायाचित्र : शिरीष शेटे

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात