परंपरेनं सांगितलं आहे म्हणून दर वटपौर्णिमेला अनेक जणी वडाभोवती फेरे घालतात. उपासतापास करतात. पण स्वत:च्या आयुष्यात सावित्रीप्रमाणे कणखरपणे वागायची वेळ येते तेव्हा हातपाय गाळतात. म्हणूनच आजच्या जमान्यात या परंपरांकडे नव्या नजरेने पाहण्याची गरज आहे.

ज्युनिअर कॉलेजचा अकरावीचा वर्ग! पहिला तास. मी वर्गावर गेले. हजरी घेतली. त्यानंतर एकेक मुलगी उभे राहून विचारू लागली. प्रत्येकीशी माझी एकच प्रश्नोत्तरी..
‘‘मॅडम, या पिरेडनंतर मला सुट्टी हवीय..’’
‘‘का गं?’’
‘‘मॅडम, आज माझा वटसावित्रीचा उपास आहे. निर्जला उपास करते मी. त्यामुळे डोकं दुखतंय. केवळ हजरी लावायला आले मी.’’
‘‘छान! उपस्थितीबद्दलची जागरूकता बघून धन्य वाटलं मला. पण हा उपास कशासाठी करत्येस?’’
सर्वच मुलींनी जरासं लाजत, हलकंसं हसत, थोडी नजर झुकवून एकच उत्तर दिलं,
‘‘चांगला नवरा मिळावा आणि तो दीर्घायुष्यी व्हावा म्हणून!’’
‘‘हो का? म्हणजे केवळ वटसावित्रीची पूजा आणि उपास केल्यानं उत्तम नवरा मिळतो, हे कुणी सांगितलं तुम्हाला?’’
‘‘आईनं. तिला तिच्या आईनं. पुराणकाळापासून चालत आलीय ही पूजा. तुम्ही नाही करत मॅडम?’’ त्यांच्या प्रश्नाचं उत्तर न देता मी हसत विचारलं, ‘‘ही पूजा करताना आणखी काही शंका वा प्रश्न निर्माण झाले नाहीत डोक्यात?’’
एका जराशा धीट मुलीनं उत्तर दिलं, ‘‘मॅडम, पूजेतली पतिव्रता सावित्री आणि सत्यवानाची कथा अतिशय सोपी आणि बोलकी आहे. त्यामुळे शंकांना वावच नाही. सावित्रीचं पतीवरील अभंग प्रेम, पतीला अकाली मृत्यू आल्यानं त्याचे प्राण यमाजवळून परत आणण्याची जिद्द, त्यासाठी असह्य़ हाल सोसत यमाकडे जावं, त्याच्याशी वादविवाद करून पतीचे प्राण परत मिळवणं आणि चाणाक्षपणे आपल्या कुळाचा उद्धार होण्याच्या दृष्टीने वर मागणं. सगळं अगदी सरळ सरळ आहे. मग काय प्रश्न निर्माण होणार?’’
‘‘पण मला मात्र या व्रताला घेऊन काही प्रश्न पडलेत? विचारू?’’
‘‘विचाराना मॅडम.’’ आज मॅडमना प्रश्न पडलेत. त्याची उत्तरं आपण देणार याचा मुलींना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. मी सुरुवात केली. ‘‘आज तुम्ही वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा केली का?’’ बहुतेक मुलींच्या आया नोकरी करणाऱ्या होत्या. त्यांच्याजवळ एवढा वेळ नव्हता. त्यांनी घरीच कागदावर वडाच्या झाडाचं चित्र काढलं. त्याचीच पूजा केली. फार थोडय़ा मुली आयांबरोबर वडाच्या झाडाजवळ गेल्या होत्या. मी हसत म्हणाले, ‘‘अगं, त्याच्यामागे एक विज्ञान आहे. वडाच्या झाडाजवळ गेलं, थोडा वेळ थांबलं की भरपूर प्राणवायू मिळतो आपल्याला. ऊर्जा मिळते. म्हणून जायचं असतं. पूर्वी बायकांना घराच्या उंबरठय़ाबाहेर पडण्याची परवानगीच नव्हती. या निमित्तानं बायका एकमेकींना भेटत. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवत. ती त्यांची गरजही होती. आज सिमेंटच्या जंगलात ती गरज कायम आहे. ही गरज कागदावरचं चित्र पुरवू शकत नाही. म्हणून त्या झाडाजवळच जायचं असतं, हे समजून घ्यायला हवं.’’ माझे आणखी काही प्रश्न..
वडाच्याच झाडाची पूजा का? दुसरा प्रश्न असा की सावित्रीवर सत्यवानाच्या मृत्यूचा आलेला प्रसंग तुमच्या कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. पण दुर्भाग्यानं आलाच तर त्याचे प्राण परत आणण्यासाठी आपण यमाकडे जाऊ शकणार आहोत का? नाही. मग आजच्या काळाला अनुसरून याचा काही अर्थ लागतो का? दरवर्षी फक्त नियमितपणे पूजा केल्यानंच प्राण वाचतील का?
माझ्या प्रश्नांची त्यांच्याजवळ उत्तरं नव्हती. कारण असा विचार, असे प्रश्न त्यांच्यासमोर आलेच नव्हते. मी त्यांना समजावलं.
‘‘अगं, तुम्ही एकविसाव्या शतकातल्या मुली. आपल्या संस्कृतीतली व्रतवैकल्ये सार्थ आहेत. त्यांचा अर्थ समजून घेऊन करायला हवीत. ती आजच्या काळाला अनुसरून कशी करायची? त्यांचा अर्थ काय? त्यांच्यात काही बदल करायला हवेत का? काळानुसार ते बुरसटलेले तर ठरत नाही ना? या सर्व गोष्टींचा विचार करून ती करावीत. त्यासाठी आजच्या पिढीला का? याचा अर्थ काय? कशासाठी? इत्यादी प्रश्न पडायलाच हवेत. त्यांच्याशी असं बोलतानाच, मी शिकत असतानाचा प्रसंग आठवला मला..
१९५३ चा तो काळ! मी सहावी म्हणजे इंग्रजी दुसरीत शिकत होते. माझी एक बेंचमेट होती. अर्पिता तिचं नाव. त्यादिवशी वटपौर्णिमा होती. माझ्या वर्गातल्या बऱ्याचशा मुली गैरहजर होत्या. त्यातलीच एक अर्पिता. दुसऱ्या दिवशी त्याबद्दल मी तिला विचारलं तेव्हा तिनं मला या पूजेबद्दल सांगितलं. म्हणाली, ‘‘आई म्हणाली की चांगला आणि दीर्घायू नवरा मिळण्यासाठी ही पूजा या वर्षीपासून तूही आमच्याबरोबर कर. माझी आई आणि तुझ्या बाबांची आईही तुझ्या एवढय़ा असतानापासून ही पूजा करायच्या. मीही करतेय. त्यामुळे आम्हाला चांगले नवरे मिळाले. तू, तुझे दोन्ही आजोबा, बाबा यांना बघतेच आहेस. म्हणून तू पण कर.’’
‘‘ए, मग तुम्ही वडाच्या झाडापाशी जाऊन पूजा केली?’’ मी उत्सुकतेनं विचारलेल्या प्रश्नाला हसत, आनंदानं होकारार्थी मान डोलवत ती म्हणाली, ‘‘हो. इतक्या नटूनथटून, नथी घालून, फुलांच्या वेण्या माळून सवाष्णी तिथे आल्या होत्या. एकमेकींना आंब्याचं वाण देत होत्या. प्रसाद देत होत्या. इतके पेढे आणि पिकले आंबे खाल्ले मी. खूप मजा आली.’’
ती सगळं वर्णन रंगवून सांगत होती. माझ्या डोळ्यांसमोर त्याचं चित्र रंगत होतं. केवळ पूजा केल्यानं चांगला नवरा मिळतो! अर्पिताच्या आई आणि आज्यांसारखा! किती छान. पण माझे बाबाही खूप चांगले आहेत. पण आई तर नाही करत पूजा! घरी आल्याबरोबर मी आईला म्हणाले,
‘‘आई, अर्पिताच्या आईनं तिला या वर्षीपासून वटसावित्रीची पूजा दिलीय. चांगला नवरा मिळण्यासाठी. तिनं उपवासही केला.’’ तिनं जे जे सांगितलं ते मी सर्व तिला सांगितलं. विचारलं, ‘‘तू मला का नाही देत पूजा?’’ तूही ही पूजा नाही करीत. तरी माझे बाबा एवढे चांगले, कसे मिळाले? त्यावर आई हसत म्हणाली,
‘‘बाबी, देवाप्रती मनातला भाव महत्त्वाचा असतो ग. माझी अपडाऊनची नोकरी. मला रोज बसनं खेडय़ातल्या शाळेत जावं लागतं. घरचं सगळं करून जावं लागतं. जायला आणि यायला फक्त एकच बस. घडय़ाळाची गुलाम आहे मी. एवढी पूजा करायला जमत नाही मला. पण श्रद्धेने उपवास मात्र करते. पण तरीही एक सांगते. कोणतंही काही करायचं असलं तर ते का? कशासाठी? आजच्या काळात ते करणं योग्य आहे का? त्याचा नेमका अर्थ काय? हे समजूनच आपल्या भारतीय संस्कृतीतली व्रतवैकल्ये करावी. तुझ्या लग्नाला भरपूर वेळ आहे. पण आज तू विषय काढलास म्हणून सांगितलं. समजून उमजून ही व्रतवैकल्ये करावी. आंधळेपणानं करू नये. तरच त्याचा योग्य फायदा होतो. त्या श्रद्धेला अर्थ प्राप्त होतो.’’
‘‘हो का? मग मला सांग ना.’’ मी आईला म्हणाले. रात्री आईनं मला वटसावित्रीच्याच कथेचा अर्थ समजावून सांगितला. माझी आई अत्यंत हुशार, त्या काळची फर्स्टक्लास मॅट्रिक होती. त्यामुळेच तिनं मला सगळं समजावून सांगितलं. मी लक्ष देऊन आईनं सांगितलेलं ऐकलं. मनात कायम साठवलं.
पुढे मात्र वयाच्या बाराव्या वर्षांपासून ही पूजा करणाऱ्या अर्पिताचं विवाहोत्तर जो जीवनपट मी बघितला त्यातून तो अर्थ मला अधिकाधिक उलगडला. मीही सावध झाले. अर्पिताच्या आईवडिलांनी तिचं लग्न ती अकरावी मॅट्रिक झाल्याबरोबरच केलं. आम्ही दोघी जिवश्चकंठश्च मैत्रिणी! माझ्याजवळ ती सगळंच मनमोकळेपणानं बोलायची. एक दिवस ती माझ्या घरी आली. म्हणाली,
‘‘अगं खूप आनंदात आहे मी आज. माझं लग्न ठरलं. खूप छान स्थळ मिळालं मला. गडगंज संपत्ती आहे त्यांच्याकडे. भरपूर शेती आहे. घरी मुलगा, त्याचे आईवडील आणि वडिलांचे आईवडील एवढीच माणसं. भरपूर नोकरचाकर. मज्जाच मज्जा! सगळी त्या वटसावित्रीपूजेची किमया. आईबाबा म्हणतात, अर्पिताला एवढं चांगलं स्थळ मिळेल असं स्वप्नातही वाटलं नाही.’’
‘‘मुलगा काय करतो?’’ माझा स्वाभाविक प्रश्न.
‘‘अगं, त्याला काहीही कमवायची गरजच नाही. चांगलं सातपिढय़ा नुसतं घरी बसून खाऊ शकू एवढी संपत्ती आहे.’’
‘‘बरोबर आहे ते. पण केवळ साचलेलं पाणी किती दिवस पुरेल? वाहता झरा नको का? आणि इतरही नातेवाईक असतील ना?’’
बाबांनी नातेसंबंधांबाबत विचारलं माझ्या सासऱ्यांना. तेव्हा ते म्हणाले, अहो आमची संपत्ती खुपते त्यांच्या डोळ्यात. म्हणून त्यांनी कुणाशी संबंधच ठेवले नाहीत!
मी सगळं तिचं ऐकलं. मनात आलं की हिनं इतकी वर्ष वटसावित्रीची पूजा केली. मग हिला सत्यवानासारखा कर्तृत्ववान नवरा का नाही मिळाला? हिनं त्याबद्दल आग्रह का नाही धरला? केवळ लक्ष्मीच्या झगमगाटाला ही कशी भुलली? लक्ष्मीचंचल असते. तिला टिकवायला कर्तृत्वाची जोड लागते. कर्तृत्वाशिवाय भविष्य घडत नाही. सोनेरी भविष्याच्या स्वप्नरंजनातून कर्तृत्व निर्माण होत नाही, हे कसं कळत नाही हिला?
तिचं लग्न झालं. पण त्यानंतर तिला माहेरपणाला असं कधी पाठवलंच नाही. मोजक्या सणांना नवऱ्याबरोबर आली. लागलीच त्याच्याबरोबर गेली. आम्हा मैत्रिणींना तिच्या एकाही सणाला बोलावलं नाही. तिचं लग्न होऊन तीन वर्ष झालीत. तेव्हा ती एका मुलीची आई झाली होती. एक दिवस तिच्या आईनं मला त्यांच्या घरी बोलावलं. ‘‘अर्पिता आलीय, तुला भेटायचंय तिला.’’ मी तिच्याकडे गेले. तिला बघून चक्रावलेच. लग्नात लक्ष्मीसारखी सोन्यानं नखशिखान्त लदबदलेली अर्पिता आज लंकेच्या पार्वतीसारखी दिसत होती. डोळे खोल गेलेले, गालाची हाडं वर आलेली अशी निस्तेज चेहऱ्याची अर्पिता! तिची मुलगी बाजूलाच दुपट्टय़ावर निजलेली. अर्पितासारखीच गोरी आणि सुंदर. पण कुपोषितच वाटली मला. मी दिसताच अर्पिता माझ्या गळ्यात पडली आणि ओक्साबोक्सी रडू लागली. यावेळी तिचा नवरा सोबत नव्हता. रडण्याचा भर ओसरल्यावर ती म्हणाली,
‘‘इतके वर्ष अत्यंत श्रद्धेनं मी वटसावित्रीची पूजा केली. माझ्या नवऱ्याबद्दल आणि सासरच्यांबद्दल किती निश्िंचत होते मी. पण माझ्या पदरात फक्त निराशाच आली.’’
‘‘अगं, पण झालं काय असं?’’
‘‘माझं सासर म्हणजे श्रीमंतीचा पोकळ डोलारा! लग्नात मी आणि माझ्या सासवा दागिन्यांनी सजलेलो. पण तिथे जाताच दोन दिवसांच्या बोलीवर आणलेले ते दागिने पुन्हा गहाणात परत गेले. नातेवाईक दुरावायचं कारण घरातले तिन्ही पुरुष पीअक्कड. दारू पिऊन धिंगाणा घालणारे, शिवीगाळ करणारे, बायकांना मारणारे. दोन्ही सासवा अतिशय कजाग आणि तोंडाळ. त्यामुळे कुणाशीही चांगले संबंध नाही. असलेली जमीन विकवाक करत, गहाण टाकत प्रपंच चाललाय. तू म्हणालीस तसं साचलेलं पाणी संपलंय जवळजवळ. त्यात मला मुलगी झाल्यानं मी नकोशी झालेय. नवरा सदैव दारूच्या नशेत. शुद्धीवर आला की, जुव्वा खेळतो. सिगरेट, तंबाखू अशी सगळी व्यसनं आहेत. सारखं बकाबका खायला मागतो. नाहीतर मला मार खायला देतो!
तिची आई सारखी रडत होती. शेवट अर्पिता म्हणाली, ‘‘घराची सगळी हलाखीची परिस्थिती! तरी त्या घराला वारसदार म्हणून मुलगा हवाय त्यांना. हे म्हणतात, मुलीला अनाथाश्रमात टाक. सगळ्यांचा राग माझ्यावर. नवरा मारतो तेव्हा कुणीही धावून येत नाही, मला सोडवायला. असं फळ दिलं का गं वटसावित्रीच्या पूजेनं मला?’’
अर्पिताची स्थिती बघून माझ्या पोटात खळगाच पडला. तिच्या अंगावरील माराचे वळ बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिला जवळ घेत तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागले मी.
‘‘अगं, वटसावित्रीच्या पूजेला नको दोष देऊस. तू केवळ भोळी श्रद्धा ठेवून पूजा करीत राहिलीस, पण काकू, माझ्या आईनं या व्रताचा अर्थ मला जसा समजावून सांगितला, तसा तुम्ही हिला नाही सांगितला. त्यामुळे केवळ या पूजेनं नवरा चांगला मिळतो असंच समजत राहिली. तो अर्थ जर हिला कळला असता तर ही सावध राहिली असती!
‘‘कोणता अर्थ म्हणतेस तू? मला नाही माहीत! काकू म्हणाल्या, ‘‘काकू, सोयरीक जोडताना हिच्या मनात प्रश्न निर्माण झाले असते. त्याची उत्तरं मिळविण्यासाठी ही धडपडली असती. स्थळ तावूनसुलाखून निवडलं असतं.’’ ‘‘अगं पण काय समजावून सांगायचं होतं मी?’’
‘‘काकू, आईनं मला सांगितलं होतं की, वडाच्याच झाडाची वटसावित्रीला पूजा का करायची? तर वडाच्या पारंब्या इतक्या खाली वाकतात की, पुन्हा जमिनीत रुजतात. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे अखंड वटवृक्ष निर्माण होतात. म्हणून तो अक्षय वृक्ष आहे. तो डेरेदार असतो. अनेकांना सावली देत असतो. तसाच आपला वंशवृक्ष अक्षय होण्यासाठी या वडाच्या झाडाची पूजा करायची. हे जर लक्षात घेतलं असतं, तर या सोयऱ्यांचा वंश अखंड टिकविण्याच्या योग्यतेचा आहे का? सर्वाना प्रेमाची सावली देण्याची पात्रता या घराण्यात आहे का? याची माहिती इतरांकडूनही मिळविली असती. केवळ त्यांच्या सांगण्यावर विसंबून राहिले नसतात तुम्ही. अशा व्यसनी घरात मुलगीच दिली नसती. असा किडलेला वंशवृक्ष वाढविण्यासाठी हिनं वडाच्या झाडाची पूजा निश्चितच केली नव्हती.’’ ‘‘पण आता हे समजून काय उपयोग? असा व्यसनी नवरा किती काळ टिकणार? टिकूनही काय उपयोग? त्याचं काही झालं तर मी त्याचे प्राण आणायला त्या यमाच्या दारात थोडीच जाऊ शकणार? मी सावित्री थोडीच आहे? हा नवरा पुन्हा जिवंत होण्याची मी धडपड तरी का करावी? सात जन्मासाठी हा नवरा मी का मागावा? अर्पितानं मनातली सल बोलून दाखविली. ‘‘अगदी बरोबर आहे तुझं अर्पिता, पण तुला जे वाटतं की तू ती सावित्री नाहीस. हे मात्र चूक आहे. तू आधुनिक स्त्री आहेस. तुझ्यातही ती स्त्री शक्ती आहे. असं हरून माहेरी रडत परत येण्यात तुझी हार आहे. तू आधुनिक सावित्री आहेस. आजच्या काळानुसार या व्रतांचा अर्थ समजून घे!’’ ‘‘अगं, मी इतकी हताश झाले आहे, गोंधळले आहे की, मला काही समजतही नाही आणि उमजतही नाही.’’ हतबल होऊन अर्पिता म्हणाली. ‘‘हे बघ, त्या सावित्रीनं सत्यवानाला मृत्यूच्या पाशातून सोडवलं. आज जी व्यसनं, भ्रष्टाचार बोकाळले आहेत ते म्हणजे मृत्यूचा पाश आहेत. त्यांच्या विळख्यातून आपल्या नवऱ्याला सोडविणं म्हणजेच यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणं होय. आज प्रत्येक स्त्रीनं आधुनिक सावित्री बनणं ही काळाची गरज आहे. पतिव्रता धर्माचा खरा अर्थ तिनं समजून घ्यायला हवा. नवऱ्याच्या चांगल्या कार्यात त्याच्या खांद्याला खांदा भिडवून त्याला सदैव सहकार्य करणारी जशी पतिव्रता ठरते. तसंच नवरा चुकत असेल तर प्रसंगी कठोर होऊन त्याला योग्य मार्गावर आणणारीही पतिव्रताच होय. अर्पिता तू घरी परत जा. काही दिवस तुझ्या मुलीला काकूंजवळ ठेव. त्या तिची छान काळजी घेतील. तुझ्या गावाला एक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. त्यातील दोन स्त्री कार्यकर्त्यां आईच्या मैत्रिणी आहेत. त्यांना तुझी परिस्थिती कळविण्याबाबत आईला सांगते. तू इथून सरळ त्यांच्या कार्यालयात जा. घरातली दारू त्यांच्या मदतीनं तू पूर्णपणे बंद कर. त्या सावित्रीचे सासू-सासरे मनानं खूप चांगले होते, पण तुझं तसं नाही. हे बघ, अन्याय सहन करायचा नाही. या संस्थेच्या मदतीनं तू त्यांना कायद्याचा धाक दाखव. तू हे त्याचं वाईट व्हावं म्हणून करीत नाहीस. त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी करते आहेस, याची जाणीव दरक्षणी मनाला देत राहा. म्हणजे, तुझं कर्तव्य सदैव सावध राहील. आता नशिबाला आणि वटसावित्रीच्या पूजेला दोष देत रडत बसू नको. तुझं नशीब त्या सावित्रीसारखंच तुझ्या मुठीत आहे. तुझ्या कर्तृत्वात आहे, याची जाण ठेव. हीच व्रतवैकल्यांवरची डोळस श्रद्धा आहे. ती संस्था तुला बरोबर मार्गदर्शन करील. डोळस श्रद्धा ठेवून जर तू वटसावित्रीची पूजा करीत राहिली असतीस तर आज तुझ्या संसाराचं वेगळंच सुंदर असं आकर्षक रंगीत चित्र सगळ्यांनी कौतुकानं बघितलं असतं. काकू, तुम्ही आणि काकांनीही तिला हिंमत द्यावी. तिथल्या स्वयंसेवी संस्थेची हमी माझी आई घेईल. तिला परत पाठवा. अर्पिताच्या रूपानं आधुनिक सावित्रीचं खरं स्वरूप समाजाला दिसू द्या. खरी पतिव्रता म्हणजे काय, हे समाजाला समजू द्या.’’
मोठय़ा उत्साहानं आणि उमेदीनं अर्पिता सासरी गेली. आज ते सगळं कुटुंब अतिशय आनंदानं नांदतंय. पाच मिनिटांत ही स्मृती माझ्यासमोर ताजी झाली. स्मृतीचं निर्माल्य कधीच होत नाही हेच खरं. लागलीच माझ्या डोक्यात विचार आला की ही दृष्टी जर कुटुंबातून, आईकडून या मुलींना मिळत नसेल तर शिक्षण संस्थांतून ही दृष्टी द्यायला हवी. या ऊर्मीतच वर्गात मी बोलायला सुरुवात केली, ‘‘आपली भारतीय संस्कृती अतिशय वैशिष्टय़पूर्ण आहे. ती आपण जपायलीच हवी, पण अर्थ समजून घ्या आणि डोळसपणे जपा. याला अनुसरूनच मी माझ्या मैत्रिणीची सत्यकथा तुम्हाला सांगते. अर्पिताची कथा मी सांगायला सुरुवात केली. मुली कान देऊन ऐकत होत्या. कथा संपली तेव्हा लक्षात आलं की त्या अंतर्मुख झाल्या आहेत. जरा वेळानं एक मुलगी म्हणाली, ‘‘मॅडम, सगळ्या मैत्रिणीच्या वतीनं मी तुम्हाला वचन देते की, आम्ही आधुनिक सावित्री होऊच.’’

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा