सर्वगुणी बटाटय़ापासून ते अगदी कारल्यापर्यंत अनेक प्रकारच्या भाज्या आपल्या रोजच्या आहारात असणं आवश्यक आहे. कारण या भाज्यांमधले गुणधर्म आपल्या पोषणाबरोबरच आपल्यावर उपचारदेखील करत असतात.

तांबडा भोपळा
तांबडा भोपळा बालकांकरिता टॉनिक आहे. पचावयास हलका, शिजवायला सोपा, सोबत कोथिंबीर, मिरची मीठ एवढी तोंडीलावणी पुरतात. तांबडा भोपळय़ाची भाजी खाल्ली की तोंडाला रुची येते. रसधातू कमी झाला असता ही भाजी अवश्य खावी. हा भोपळा शुक्रवर्धक आहे. नेहमी उकडून खावा. एकदम खूप खाऊ नये. भस्मकाग्री किंवा ज्यांना कितीही खाल्ले तरी भूक असते, त्यांनी तांबडा भोपळा खावा. तांबडा भोपळा उकडून कणकेत मिसळून केलेल्या दशम्या लांबच्या प्रवासात उपयुक्त आहेत. त्या बरेच दिवस टिकतात. बियांतील मगज पौष्टिक व चविष्ट आहे. जंत झाल्यास या बिया खाव्या, नंतर एखादे रेचक घ्यावे.
दुध्या भोपळा
‘आमचे वाढते वजन’ कमी करा, आम्ही काही खातपित नसूनही वजन कसे वाढत नाही कळत नाही. किती औषधे घेतली तरी शरीर हटत नाही.’ अशा एक ना अनेक गोष्टी मी दिवसातून पाच-दहा रुग्णांच्या तोंडून तरी ऐकतो.
वजन घटवायचे ठरवले तर त्याकरिता उपाय आहे. सोपा उपाय आहे. पण तो नेटाने केला पाहिजे. दुध्या भोपळा सर्वाच्या परिचयाचा आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांत तरी मुबलक, सदासर्वदा व स्वस्तात ताजा मिळतो. दुध्याची भाजी पथ्यकर आहे. दुध्या हलवा उत्तम बनतो. शरीर ज्यावेळी क्षीण होते, शरीरातील रसधातू क्षीण होतो, त्यावेळेस दुध्याचा रस, भाजी, खीर व हलवा यासारखे टॉनिक नाही. रसक्षय झाल्यामळे शब्द सहन होत नाही. राग लवकर येतो. झोप अशांत लागते, हातापायाला भेगा पडतात, मानसिक ताण वाढतो. अशा वेळेस दुध्या भोपळय़ाला चांगल्या तुपात परतून घेऊन, उत्तम दर्जाच्या दुधात खीर करून खावी.
मात्र ज्यांना दमा, सर्दी, पातळ परसाकडे होणे या तक्रारी आहेत त्यांनी दुध्या भोपळय़ा रस, खीर किंवा हलवा खाऊ नये. माफक प्रमाणात भाजी खावी. शरीरात फाजील कफ असणाऱ्या कृश व्यतींनी दुध्या भोपळय़ाबरोबर, आले, लसूण, जिरे, मिरी अशी वाजवी तोंडीलावणी तारतम्याने वापरावी. मधुमेह विकारात दुध्या भोपळा आवर्जुन खावा. गोड पदार्थ खाल्ल्याचे समाधान लाभते. ब्लड शुगर वाढत नाही. या भाजीचा कंटाळा येत नाही.
ज्या लहान मुलांना शौचाला साफ होत नाही, कृश आहेत अशांना पाव ते अर्धा कप दुध्या भोपळय़ाचा रस चवीपुरता साखर मिसळून द्यावा. किरकिरी, हातपाय रुक्ष असणारी कडांगी किंवा कडकी असणाऱ्या लहान मुलांना वजन वाढविण्याकरिता दुध्याची खीर द्यावी.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

वजन कमी करण्यासाठी…
अतिस्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्याकरिता पुढील पद्धतीने दुधी भोपळा खावा. नेहमीच्या जेवणाअगोदर पाव किलो दुधी भोपळय़ाच्या फोडी उकडाव्या. त्याला मीठ, साखर काहीच लावू नये. नुसत्या फोडी प्रथम खाव्या. नंतर इतर जेवण जेवावे. अशा पद्धतीने दोन वेळा दुध्या भोपळा खावा. त्यामुळे लघवी, परसाकडे साफ होते. पोटात आग पडत नाही. दुध्या भोपळय़ात काबरेहायड्रेट, चरबी, प्रोटीन, स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ नाहीत. दुध्या भोपळा भरपूर खाऊन पोट भरते. महिन्याभरात पाच किलो वजन नक्कीच घटते. तोंडावर ताबा ठेवला तर या पद्धतीने न थकता न येता वजन घटते.

दोडका
दोडका, शिराळे, कोशातकी या विविध नावांनी ओळखला जातो. फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा. आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.
आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे. अरुची, खोकला, कप, कृमी व ताप या विकारात दोडका पथ्यकर पालेभाजी आहे. कृश व्यक्तींना वजन वाढविण्याकरिता दोडका उपयुक्त आहे. दोडक्याच्या मुळांचा उपयोग मूतखडा पडून जाण्याकरिता होतो.
आमांश, जुलाब, मंदाग्नी, पोटदुखी या विकारात रुग्णांनी दोडका टाळावा. दोडक्याच्या शिरांची किसून तीळ मिसळून फोडणी देऊन चटणी करावी. दोन घास अन्न जास्त जाते.
नवलकोल
कोबी व फ्लॉवरपेक्षा कोवळा नवलकोल उत्तम भाजी होय. गुणाने शीत असून पित्तशामक व पथ्थकर आहे.
पडवळ
प्राचीन काळापासून पडवळ, कडू पडवळ अनुक्रमे भाजी व औषधी उपयोगाकरिता वापरात आहे. पडवळ फळ, पाने तसेच सर्व पंचांग औषधी उपयुक्ततेचे आहे. पडवळ गुणाने थंड असूनही वातवर्धक किंवा कफवर्धक आहे. पडवळ तीनही दोषांच्या विकारांत उपयुक्त आहे. जास्त उपयोग कफ व पित्तविकारात आहे.
कफाचे विकार विशेषत: तृप्ती, अन्न नकोसे वाटणे, भूक मंद असणे, रुची नसणे, खूप तहान लागणे, स्थौल्य, मधुमेह या विकारात पडवळाची भाजी उत्तम काम देते. पडवळ नुसते उकडावे. चवीपुरते जिरे, मिरी, धने, सुंठ अशी चूर्णे सोबत तोंडी लावणे म्हणून वापरावे. पोटाची भरपाई होते. अजीर्ण, अपचन हात नाही. शरीराचे वाजवी पोषण होते. सम्यक् मल तयार होतो. खूपच कफ होत असल्यास पडवळाचे तुकडे वाफारून त्यांचा रस कपभर घ्यावा. चवीपुरते जिरे व हिंग मिसळावे. ज्यांना खूप उष्णतेशी काम आहे, तीव्र ताप, चक्कर, भ्रम या लक्षणांचा वारंवार त्रास आहे, त्यांनी पडवळाची भाजी किंवा रस नियमित घ्यावा. गुळवेलीचे गुणधर्माशी सादृश्य असलेले पडवळाचे कार्य आहे. पडवळाच्या पानांचा रस उलटय़ा करवणे किंवा विरेचक म्हणून उपयोग आहे. थोडय़ा मोठय़ा मात्रेने हा रस घ्यावा लागतो. लहान बालकांना तुलनेने लहान मात्रेत हा रस दिला तर त्यांच्या छातीतील साठलेला कफ पडून जातो. छाती मोकळी होते. दमा, गोकला याला उतार पडतो. चाई पडली असता केस गेलेल्या जागी पडवळाच्या पानांचा वाटून चोथा बांधावा.
पडवळ खाण्याकरिता कोवळेच पाहिजे बिया, जून झालेले पडवळ निरुपयोगी आहे. पथ्यकर पालेभाजी म्हणून आजारातून उठलेल्या, अशक्तांकरिता पडवळ चांगले काम देते. साध्या-सोप्या किरकोळ स्वरुपाच्या ज्वरात पडवळाच्या पंचगाचा काढा उपयुक्त आहे. अनुलोमनाचे कार्य करून तीनही दोष समस्थितीत आणण्याचे पडवळाचे कार्य गुळवेलीसारखे आहे. कडू पडवळाचे बी तीव्र रेचक व भेदनाचे कार्य करते. कडू पडवळाच्या बियांचे चूर्ण उदरविकार, कावीळ, शोथ या विकारात उपयुक्त आहे.
परवल
परवलाची फळे तोंडल्यासारखी असतात. उत्तरेत काशी, अलाहाबाद, दिल्ली इकडे या भाजीची फार चलती आहे. पथ्यकर भाज्यांत परवलाचा क्रमांक फार वरचा आहे. मोठय़ा आजारात, जेवणावर नियंत्रण असते, लंघन चालू असते, आहार मर्यादित असतो. अशा अवस्थेतून प्रकृती सुधारण्याकरिता आहार
वाढविण्याकरिता परवल भाजी खाऊन सुरुवात करावी. जेवणातील इतर पदार्थ खाण्याअगोदर परवल उकडून खावे. परवल पचायला हलके, रूचिप्रद व निदरेष आहे. सततचे पडसे, सर्दी, ताप या विकारात परवलाची भाजी खावी, भूक लागते. हे विकार पुन्हा उद्भवत नाहीत.
भोकर
भोकरास ‘श्लेष्मान्तक’ म्हणजे कफ दूर करणारे फळ अशा अर्थाचे संस्कृत नाव आहे. जीर्णज्वर, जुलाब, लघवीची तिडीक, छातीत कफ होणे या विकारात नुसती भाजी म्हणून नव्हे तर औषधे म्हणून जरूर वापर करावा. भोकराची भाजी किंवा पिकलेली फळे खाऊन आतडय़ांना जोम येतो. वजन वाढते.
फ्लॉवर
फ्लॉवर किंवा फुलकोबी दीर्घकाळच्या आजारानंतर ताकद मिळण्याकरिता उपयुक्त आहे. फ्लॉवरमध्ये कीड असते. ती काळजी घ्यायलाच पाहिजे. फ्लॉवर पचावयास जड आहे. पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी, पोट दडस होते त्यांनी फ्लॉवर टाळावा. कच्चा फ्लॉवर चवीला चांगला लागतो. पण ज्यांची जीभ अगोदरच जड आहे त्यांची कच्चा फ्लॉवर खाऊ नये. फ्लॉवर नेहमी खाल्ल्यामुळे घसा जड होतो. तहान वारंवार लागते.
बटाटा
बटाटा, पिंडाळू, गोलालू या नावाने ओळखली जाणारी ही भाजी वैश्विक, सर्व जगभर बहुसंख्य लोक खात असलेली आहे. आपल्याकडे बटाटय़ाचा तुलनेने ‘पर कॅपिटा’ वापर कमी आहे. बटाटा शीतल, मधुर रस गुणाचा मलावष्टंभक आहे. ताकदीकरिता बटाटा खावा. स्काव्‍‌र्ही या विकाराच्या रुग्णांकरिता बटाटा आवश्यक अन्न आहे. सालासकट बटाटा खाण्याने दात बळकट होतात. भाजल्यावर बटाटा उगाळून त्याचे गंध लावावे. फोड येत नाहीत. बटाटा स्तन्य आहे. बाळंतिणीनं दूध वाढण्याकरिता व तोंड आलेल्या रोग्यांनी बटाटा उकडून खावा. बटाटय़ाच्या पानात जवखार आहे. लघवी अडल्यास बटाटय़ाच्या पानांचा रस घ्यावा.
कच्चा बटाटा दाह निर्माण करणारा आहे. बटाटा बद्धकोष्ठ वाढवतो. सतत सर्दी, शिंका यांचा त्रास असणारांनी बटाटा खाऊ नये. बटाटा जास्त खाल्ला तर अग्नी मंद होतो. मधुमेही व रक्तात चरबी वाढलेल्या, स्थूल व्यक्तींनी बटाटा पूर्ण वज्र्य करावा. शरीरात सर्वत्र सूज आली असताना बटाटा वज्र्य करावा. वारंवार जुलाब, पोटदुखी तक्रार असणाऱ्यांनी बटाटय़ाच्या वाटेस जाऊ नये.

सुरणपाक टॉनिक
सुरण पाक तयार करण्याकरिता सुरणाचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये लगदा करून घ्यावा. साजूक तुपावर परतावा. दुप्पट साखर घेऊन त्याचा तीनतारी पाक करावा. वडय़ा पाडाव्या, कृश व्यक्तींकरिता उत्तम टॉनिक आहे.

बीट
आपल्या महाराष्ट्रात बिटाचा वापर कमी आहे. क्वचित सलाडबरोबर किंवा इतर भाज्यांना रंग यावा म्हणून बिटाचे चार तुकडे मिसळण्याचा प्रघात आहे. बीट ही भाजी पाश्चिमात्यांची भारताला देणगी आहे. ऊस पुरेसा मिळेनासा झाला की काही साखर कारखान्यांना साखर बनविण्याकरिता बिटाचाच आश्रय घ्यावा लागेल, असो.
बीट कच्चे उकडून त्याचा रस विविध प्रकारे वापरता येतो. घशातील जळजळ, अम्लपित्त, पित्त होणे, मूळव्याध, रसक्षय, विलक्षण थकवा, हातापायांची ताकद जाणे, वजन घटणे, दिर्घकाळचा पांडू विकार या तक्रारीत बिटाचा रस किंवा कोशिंबीर जरूर खावी. कच्चे बीट तरुण माणसाने जरूर खावे. कोणतेही श्रम सहन करण्याची टिकाऊ ताकद येते. चवीकरिता शेंगदाणे, आले, कांदा यांची योजना करावी. गाजरासारखा बिटाचा
हलवा किंवा शिरा उत्तम होतो. तुलनेने साखर कमी लागते. बीट वाळवून त्याचा कीस केल्यास त्यांतील शरीरास बळकटी आणणारे गुण कमी होतात. बीट नेहमी ताजेच खावे.
भेंडी
भेंडी नुसतीच पथ्यकारक किंवा म्हाताऱ्याकरिता भाजी नसून शुक्रवर्धक आहे. भेंडीचे ब्राह्मणप्रिय असे वर्णन केले जाते. सुलक्षणी ललनांच्या सुंदर बोटांसारखी मऊ लुसलुशीत म्हणून ‘लेडिज फिंगर’ असे इंग्रजी नाव आहे. आहारात अशी कोवळी मऊ, हिरवी, लुसलुशीत भेंडीच हवी. शरीरातील सार्वत्रिक दाह, गलगंड, आवाज बसणे, रुक्ष त्वचा, मलावरोध, खडा होणे, स्वप्नदोष, दीर्घ आजारातील दुबळेपणा याकरिता भेंडी उत्तम आहार आहे. ताकाबरोबर भेंडी बाधत नाही. मूतखडा, जुलाब या विकारांत भेंडी खाऊ नये.
भोपळी मिरची
भोपळी मिरची ही फार औषधी उपयोगाची नव्हे पण मेदस्वी, मधुमेह, कृमी विकारग्रस्तांकरिता उपयुक्त आहे. ज्यांना तिखटाशिवाय चालत नाही. पण खाऊन मूळव्याध, पोटात आग पडणे, भगंदर इत्यादी त्रास आहे. त्यांनी नेहमीच्या मिरचीऐवजी भोपळी मिरची खावी. भोपळी मिरचीमुळे तोंडाला चव येते. भोपळी मिरचीबरोबर बटाटा, टोमॅटो वापरावा म्हणजे त्रास होत नाही. आम्लपित्त, उन्हाळी लागणे, पोटदुखी, अल्सर, वारंवार खाज सुटणे विकारांत भोपळी मिरची वज्र्य करावी. भोपळय़ा मिरचीचे पंचामृत एक उत्तम तोंडी लावणे आहे.
रताळे
रताळे, रक्ताळू या नावाने मिळणारे कंद उपवा्रसापुरतेच वापरले जातात. रताळे बटाटय़ासारखेच उत्तम पूरक अन्न आहे. बटाटय़ापेक्षा काही चांगले गुण रताळय़ांत आहेत. रताळे मधुर, वृष्य, गुरू व सिग्ध आहे. रताळय़ापासून उत्तम दारू बनवतात. रताळय़ाचे पीठ व साखर सर्व सामान्यांकरिता सोपे टॉनिक आहे.
कृश व्यक्तीच्या दाह या विकारात रताळे उकडून खावे. लगेच आराम पडतो. लघवी कष्टाने होणे, अडखळत होणे, त्यामुळे शरीरात सूज येणे. या तक्रारीत रताळय़ाच्या चांगल्या तुपावर परतलेल्या फोडी किंवा उकडलेले या स्वरुपात वापर करावा. पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी, मधुंमेही रुग्णांनी रताळे खाऊ नये. अकाली ताकद गमावलेल्यांनी शुक्र धातू वाढविण्याकरिता रताळी खावी. ज्यांचा अग्नी चांगला आहे त्यांच्याकरिता एकादशी, चतुर्थी, गुरुवार, शनिवार, महाशिवरात्र इ. पवित्र दिवशी, शेंगदाण्याचे कूट, उकडून बटाटा व रताळी, साबुदाणा व शिंगाडय़ाचे पीठ व सुरण किसून एकत्रित थालीपीठ पुण्यही देते, तसेच ते उत्तम ताकदीचे पोटभरू अन्न आहे.
वांगे
वांगे हे फळ औषधी गुणांचे आहे. यावर सर्वसामान्य जनांचा विश्वास बसणार नाही. हल्ली स्टेरॉईड औषधांचे बंड खूप माजले आहे. शरीरात एकदम जोम आणण्याकरिता, रोगाला लगेच आवर घालण्याकरिता स्टेरॉईड असलेली औषधे घेतली जातात. अ‍ॅथलेट, मैदानी खेळ खेळणारे खेळाडू याच घटकद्रव्यांचा गैरवाजवी उपयोग करीत असलेल्या कथा आपण ऐकतो. वांगे या फळाच्या फॅमिलीत नैसर्गिक स्टेरॉईड आहेत.
थोडय़ाशा श्रमाने थकवा येऊ नये, शरीर सक्षम व्हावे म्हणून कोवळी बिनबियांची वांगी खावीत. घाम कमी येतो, घामावाटे शरीरातील चांगली द्रव्ये, फाजील प्रमाणात बाहेर जाण्याची क्रिया थांबते. जादा बी असलेले वांगे खाऊन आतल्या बियांमुळे वृक्क किंवा मूत्रमार्गात मूत्राश्मरी बनण्याची शक्यता असते. वांगे रुची आणणाऱ्या भाज्यांत अग्रेसर आहे. कफप्रधान व फुप्फुसाच्या विकारात कोवळय़ा वांग्याचा रस किंवा शिजवून फार मसाला न मिसळलेली भाजी खावी. गळू झाले असल्यास वांगे शिजवून फार मसाला न मिसळलेली भाजी खावी. गळू झाले असल्यास वांगे शिजवून त्याच्या पोटिसाचा शेक द्यावा. गळवे बसतात. पू होत नाही. ज्वारीमध्ये वांगे शिजवले की, पूर्ण निदरेष होते. त्यातील काही असलेले नसलेले विषार दूर होतात. कृश व्यक्तींनी शिजवलेलीच वांगी खावीत.
तरुणांनी व बलवानांनी भरपूर श्रमाची कामे ज्यांना करावयाची आहेत त्यांनी कोवळे कच्चे वांगे खावे व त्यासोबत आले, लसूण, जिरे, ओवा, लिंबू, मीठ, हिंग, ताक असे तोंडी लावण्याचे पदार्थ प्रकृतीनीरुप व आवडीप्रमाणे खावे. वांग्याच्या पानांचा रस मूत्रच आहे. ज्यांना लघवी कमी होते, मसालेदार पदार्थ किंवा चमचमीत पदार्थ खाऊन लघवीचा त्रास होता, त्यांनी वांग्याच्या पानांचा रस प्यावा. वृद्ध माणसांच्या कफ विकारात वांग्याच्या पानांचा चहासारखा काढा उपयुक्त आहे. आमाशयात कफ साठला असेल तर वांग्याच्या पानांचा रस प्यावा. कफ पडून जातो. पोटदुखी, मुरडा, मलावरोध असणाऱ्या व वृद्ध व्यक्तींनी वांगी खाणे टाळावे.
सुरण
सुरण संस्कृती भाषेत अशरेघ्न म्हणून ओळखला जातो. सुरणाची ताकातील भाजी मुळव्याध कमी करते, हे सर्वाना माहीत आहे. पण रक्त पडणाऱ्या मूळव्याधीत त्याचा उपयोग होत नाही. हे रक्ती मूळव्याधीच्या रुग्णांन लक्षात ठेवावे. सुरण उष्ण, शोथहर व पथ्यकर भाजी आहे. सुरणाचे खाजरे व गोड असे दोन प्रकार आहेत. खाजरा सुरण जास्त औषधी गुणाचा आहे. दणकट माणसांनी अधिक ताकदीकरिता तुपावर परतून सुरणाच्या चकत्या खाव्या. भूक मंद असताना, पचन ठीक होण्याकरिता, मूळव्याधीचा ठणका व सूज कमी होण्याकरिता सुरणाची ताकातील भाजी उत्तम गुण देते. मोडाचा आकार कमी होतो.
शेवगा
शेवगा-शेंगेपप्रमाणे त्याची कोवळी पाने पालेभाजीकरिता वापरतात. लाल शेवगा हा अधिक औषधी गुणाचा आहे. त्यामध्ये अनेक रासायनिक घटक आहेत. समस्त वातविकारांकरिता शेवग्याची पालेभाजी पथ्यकर व उपयुक्त आहे. अग्निमाद्य, कुपचन, अनाह, आध्मान, पोटदुखी, पोटफुगी या वातविकारात पाल्याचा रस वापरावा. वेदना लगेच थांबतात, उचकी लागली असता पानाचा रस प्यावा. लगेचच गुण येतो. जेवणानंतर धाप लागल्यास शेवग्याच्या पानांची भाजी खावी किंवा आले स्वरस व शेवग्याच्या पानांचा रस डोक्याला चोळावा. कोंडा, नायटा, खवडे बरे होतात. तापातून उठलेल्यांकरिता भूक पूर्ववत व्हावी लागते, त्याकरिता शेवग्याची पालेभाजी प्रशस्त आहे. गळवे बसण्याकरिता पानांचा वाटून लेप करावा.