12 November 2019

News Flash

कैलासवासी पार्ले

काही वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका प्रहसनाचे नाव अजूनही मनातून बाहेर पडतच नाही, अजूनही घट्ट दडी मारून बसले आहे. कदाचित त्या अनामिक लेखकाची आणि माझी सल एकच

| April 3, 2015 01:09 am

काही वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका प्रहसनाचे नाव अजूनही मनातून बाहेर पडतच नाही, अजूनही घट्ट दडी मारून बसले आहे. कदाचित त्या अनामिक लेखकाची आणि माझी सल एकच असावी.

माझा जन्म शिवाजी पार्क दादरचा आणि माझे शालेय शिक्षण माझ्या आजोळी दादांच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये झाले. आमच्या शाळेचा उल्लेख दादांची बालमोहन असाच होत होता. आमचे दादा आणि आमची शाळा हे अविभाज्य होते. आजही शाळेचे नाव सांगताना ‘दादांची बालमोहन विद्यामंदिर’ असेच शब्द उमटतात, गुरूंच्या नावाचे इतके ठसठशीत मळवट भरलेले गुरुकुल आम्हाला लाभले हे आमचे सद्भाग्य, त्यांचे प्रेम आणि आपुलकी आठवली की अजूनही मन गहिवरते. खरोखर तसे प्रेम करणे आजच्या कुठल्याही ‘ज्ञानमहर्षी’ला जमणे नाही हेच खरे. त्या काळी शिवाजी पार्कला गॅसचे दिवे होते. हातात सहा पुरुष लांबीची काठी घेतलेला महापालिकेचा एक कर्मचारी संध्याकाळ झाली की एकेक करत दिवे पेटवत जायचा, त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात आसमंत उजळून जायचा, दादांच्या आठवणीने आजही मनाचा कोपरान् कोपरा उजळतो. आजोळी आजी-आजोबांच्या आणि मामा-मावश्यांच्या अनुभवलेल्या प्रेमाची चव अजूनही अवीट वाटते.
माझे बालपण जसे दादरला गेले तसेच दर शनिवारची संध्याकाळ ते सोमवार सकाळ माझ्या आई-वडिलांच्या घरी विलेपाल्र्याला जात असे. शिवाजी पार्क आणि विलेपाल्र्यातल्या नरिमन रोडवरच्या रांगणेकर वाडीतही जात होता. दुहेरी निष्ठेला तेव्हा कुठलाही अटकाव नव्हता.
बालपणातले दिवस सुखाने जात होते. धावपळ, घाई हे शब्द जणू आमच्यासाठी नव्हतेच, खेळणे, खाणे आणि हुंदडणे याशिवाय आम्हाला काहीही माहीत नसायचे. छोटीछोटी कौलारू घरे हे पाल्र्याचे वैशिष्टय़ होते. बहुतेक सर्व घरे एक मालकांची आणि त्यांच्या बरोबर राहणाऱ्या एक अथवा दोन भाडेकरूंना गुण्यागोविंदााने सांभाळून राहत असत. काही काही चाळीवजा वाडय़ांत मालक आणि चारपाच भाडेकरू राहत असत. घराच्या भिंती केवळ मोठय़ांसाठी असत, मुलांना त्या दिसतही नसत.
पार्ले टिळक विद्यालय, टिळक मंदिर, पार्लेश्वराचे मंदिर, गोखल्यांचे राममंदिर, शानभागांचे मद्रासी राम मंदिर, कुंकू वाडीतले हनुमान मंदिर, ही पार्लेकरांची आद्य श्रद्धास्थाने.
पार्लेश्वर हे पाल्र्याचे प्रमुख देवस्थान आणि श्रद्धास्थान, कमीतकमी एकदा तरी पार्लेश्वराला हात जोडल्याशिवाय पार्लेकरांचा दिवस जात नसे, लेले गुरुजी हे तेथील प्रमुख गुरुजी, पार्लेश्वरावर श्रद्धा नसलेला पार्लेकर विरळाच. राष्ट्रीय सेवा संघाची शाखा पार्लेश्वराच्या लगतच्या इमारतीत चालत असे.
प्रत्येक देवस्थानाचे ठरावीक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जात, गोखल्यांच्या राममंदिरात राम नवमीला सुंठवडा मिळत असे, मद्रासी राममंदिरात चैत्री नवरात्रीला भोजन प्रसादाचा लाभ समस्त पार्लेकर घेत असत, त्यानंतर संपन्न होणारी रथयात्रा फारच देखणी असे.बहुतेक प्रत्येक घरांतून नारळ वाहिला जात असे, प्रामुख्याने ह्य़ा रथयात्रेचे नेतृत्व शानभाग घराण्याकडे असे, प्रसाद म्हणून परत दिलेल्या अध्र्या नारळात लावलेल्या गंधाचा प्रासादिक आणि पवित्र सुवास अजूनही माझ्या मनात दरवळतो आहे, मोठाल्या भांडय़ात बनवलेले मिरी, गूळ आणि वेलचीमिश्रित पेय ‘पानके’ ह्य़ा नावाने दिले जात असे. ह्य़ा घराण्यातील एक पुरुष डोक्यावर रामाची मूर्ती घेऊन मंगलोरहून पाल्र्यात आले आणि त्यांनी ह्य़ा राममंदिराची स्थापना केली. त्यांना ‘कवडीवाले बुवा’ ह्य़ा नावाने समस्त पार्लेकर ओळखत, आणि त्यांच्या मंदिराला ‘मद्रासी राम’ ह्य़ा नावाने ओळखले जायचे.
गोखल्यांचा राम मात्र पूर्णत: मराठी होता. खरे गुरुजी हे गोखले राममंदिराचे पुजारी होते.
सुभाष रोडवर खोसला घराण्याची एक खोसला निवास नावाची सुंदर इमारत आहे तिच्या अग्रभागी एक श्रीकृष्णाची एक देखणी मूर्ती आहे, दर गोकुळ अष्टमीला केशराचे सरबत प्रसाद म्हणून दिले जात होते.
पार्ले टिळक विद्यालय हा पाल्र्याचा मानबिंदू होता, शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरे होत होते, शिक्षक मंडळी आणि विद्यर्थी ह्य़ासाठी भरपूर मेहनत घेत.आणि संमेलन नीटपणे पार पडले की शिक्षक मंडळींच्या चेहऱ्यावर समाधानाची पावती दिसत असे. सर्वश्री पेंढारकर, भाऊ भागवत, बाबुताई रोडे, ब. व. कुलकर्णी, सहस्रबुद्धे ह्य़ा शिक्षक मंडळींनी पार्ले घडवले, पार्ले टिळकमध्ये शिकलेल्या एकाच विद्यर्थ्यांचे नाव सांगितले तर तेव्हा शाळेने काय आणि कोण घडवले ह्य़ाची पुरेशी ओळख होईल, ते नाव म्हणजे पु.ल. पुलंच्या नावापुढे स्वर्गीय हा शब्द लावायची हिंमत मला होत नाही. पुल स्वर्गात वगैरे कुठेही गेले नाहीत ते अजूनही आमच्यातच आहेत.
पुलंना पाल्र्याने घडवले आणि त्यांनी पाल्र्याला अजरामर केले.
लोकमान्य सेवासंघ हे पुलंचे श्रद्धास्थान, पुलंचे आजोबा ती. वामनराव दुभाषी हे पाल्र्यातल्या सारस्वत समाजाचे एक आदरणीय गृहस्थ होते, प्रार्थना समाज रोड आणि अजमल रोड ह्य़ा परिसरात दुभाषी, देशपांडे, भेंडे, फडणीस ही सारस्वत मंडळी राहत होती. द. र. नेवरेकर, वाघ,पाखाडे धुरंधर, रानडे ही काही तत्कालीन पार्लेकर मंडळी.
अण्णा साठे हे समस्त पार्लेकारांचे लाडके व्यक्तिमत्त्व त्यांच्या दुकानात उत्तम माल मिळतो, चोख व्यवहार उत्तम माल हे त्यांचे ब्रीदवाक्यच आणि ते अमलातही आणले जायचे. अण्णा पाल्र्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या नेहमीच अग्रभागी असत. अण्णांच्या मिठाला पार्लेकर कायमचे जागले. अण्णांचे पार्ले व पार्लेकरांवारचे प्रेम केवळ अतूट.
सुमंत जोशी हे एक तत्कालीन बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. ते एका वर्तमानपत्रात उपसंपादक होते, टिळक मंदिर रोडच्या कोपऱ्यावर त्यांचा ‘यमुना’ नावाचा बंगला होता, ग्यालरीत बसलेले सुमंतजी सायंप्रकाशात एखाद्या ऋषीसारखे भासत. पार्लेकरांचा पिंडच कलावंताचा होता, लोकमान्य सेवा संघाने सोज्वळ आणि संपन्न अदाकारी पार्लेकरांना शिकवली, अनेक गायक गायिकांना घडवले, नावारूपास आणले, दत्ता जोगदंड, लालजी देसाई, ..जयवंत कुलकर्णी ..नीला भिडेसारख्या उदयोन्मुख कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप नेहमीच मारली.
छोटेसे असे हे उपनगर काही वर्षांपूर्वी फार टुमदार होते, बहुतेक वस्त्यांना अमक्याची वाडी तमक्याची वाडी ह्य़ा नावाने ओळखले जायचे, पार्ले स्टेशनवरचे मद्रास कॅफे हे माझ्या माहितीतले सर्वात जुने उपाहारगृह. मागून आप्पा जोगळेकरांनी गणपतीच्या सुबक मूर्त्यां आणि मोदक दोन्ही पाल्र्याला पुरवले.
पार्ले बिस्किट कंपनी हे पाल्र्याचे सुगंधी गुपित. सर्व जगभर प्रसिद्ध असलेली ही बिस्कीट कंपनी आपले अस्तित्व सुगंधाने पाल्र्याचे वातावरण सुगंधित करत होती.
पाल्र्याच्या फाटकाजवळ बहुसंख्य ख्रिस्ती लाल रंगाच्या बांधवांची वस्ती होती. बरचसे ख्रिस्ती वसईकर ख्रिस्ती होते, छोटय़ाछोटय़ा वाडय़ांत, बागायती करणे आणि पार्ले मार्केटात ते विकणे हे त्यांचे रोजचे काम असे. पाल्र्यात मिळणारी ताजी पालेभाजी, भेंडे, दोडकीपडवळ-सारख्या भाज्यांचा पुरवठा ह्य़ा मंडळींनी पाल्र्याला वर्षांनुवर्षे केला.
सणासुदीला आंब्याचे पान, भाताच्या ओम्ब्या आणि गावठी झेंडू हाताने गुंफून बनवलेली तोरणे ख्रि्रस्ती समाजाने समस्त पार्लेकरांना वर्षांनुवर्षे पुरवली. लाल रंगाच्या नऊवारी साडी नेसलेल्या ख्रि्रस्ती भगिनी पार्ले मार्केटात बहुसंख्येने दिसायच्या. पाणथळ भागात बागायतीचे काम करणाऱ्या मंडळींना हत्तीरोगाची लागण झालेली दिसायची, त्या पायांना जळवा लावणे हा एक खात्रीचा उपाय मानला जात होता.
बहुतेक पार्लेकरांचा प्रवास सुमित्राबाई वाघ अथवा टिळक प्रसूतिगृहात सुरुवात होऊन वाघाजी भाई ह्य़ांच्या हिंदू स्मशानभूमीत संपत असे.
पार्लेकर हा परवलीचा शब्द होता, पाल्र्याबद्दल इतर मुंबईकरांना नेहमीच कुतूहल वाटत असे. फक्त पार्लेकर या नावाखाली अनेक प्रांतांचे, समाजाचे लोक एकसंध कसे होतात हे न सुटणारे कोडे होते.
पाल्र्याला एअरपोर्ट आला आणि इतर उपनगरांच्या मानाने पाल्र्यातल्या जमिनीचे भाव वाढत चालले, ते हनुमानाच्या शेपटाप्रमाणे आजही वाढत आहेत, पाल्र्यातल्या अनेक लोकांनी आपल्या जागा विकून डोंबिवलीला स्थलांतर केले. पाल्र्यात डोंबिवली फास्टची सुरुवात झाली. कित्येक वर्षे एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या मालक आणि भाडेकरूंमध्ये भिंती उभ्या राहिल्या, उंच इमारतींचे जंगल उभे राहिले, बऱ्याचशा वाडय़ा नामशेष झाल्या आणि त्याबरोबर पार्लेकरही हरवला, झाडांची आणि माणुसकीची हिरवळ सुकली. उंच उंच इमारतींच्या ओझ्याखाली माझे जुने लाडके पार्ले कैलासवासी झाले.
शशांक रांगणेकर

First Published on April 3, 2015 1:09 am

Web Title: vile parle