ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com
१५ जानेवारी २०२२. या दिवशी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अखेर विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाच्याही कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि भारतीय क्रिकेटमधील कोहलीचे नेतृत्वपर्व संपुष्टात आले. कोहलीने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरात दोन गट निर्माण झाले आहेत. कोहलीच्या वर्चस्ववादी नेतृत्वाचे कौतुक करणारा गट आणि त्याच्या फसलेल्या नेतृत्वनीतीवर ताशेरे ओढणारा दुसरा गट. मात्र कोहलीसारखा आक्रमक कर्णधार भारताला पुन्हा लाभणे कठीणच.

कोहलीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची मालिका सुरू झाली सप्टेंबरमध्ये. १६ सप्टेंबर २०२१ रोजी कोहलीने भारताच्या ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्याला गेल्या दोन वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवरही परिणाम जाणवू लागला. म्हणूनच कोहलीने स्वत:वरील दडपण कमी करण्याच्या हेतूने अमिरातीत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. सप्टेंबरमध्येच कोहलीने ‘आयपीएल’मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूूरु संघाचेही कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन

ऑक्टोबरमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. दुर्दैवाने भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वावर अधिकच टीका होऊ लागली. त्याच्या अन्य प्रकारांतील नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र यानंतर जे घडले, ते सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक होते.

डिसेंबरच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताने १-० असे यश संपादन केले. त्यानंतर २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड ८ डिसेंबरला करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात सर्वात शेवटची ओळ अशी होती की, ‘भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नेमणूक करण्याचा निर्णय वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीने घेतला आहे.’ हा निर्णय रोहित कर्णधारपदी आला यापेक्षा कोहलीचा नामोल्लेख न करताच त्याची हकालपट्टी करण्यात आली, असे सांगणारा होता. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली. मुख्य म्हणजे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने कोहलीची हकालपट्टी करण्यामागील एकही कारण त्या निवेदनात नमूद केले नाही अथवा ही घटना होऊन जवळपास १२ तास उलटले तरी ‘बीसीसीआय’ने ट्विटरवर कोहलीचे कौतुक करणारी एकही पोस्टदेखील टाकली नाही. त्यामुळे कोहलीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली.

कोहलीची हकालपट्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अखेर बीसीसीआयला भान आले. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने निवड समितीच्या निर्णयाबाबत अधिक स्पष्टीकरण देताना मर्यादित षटकांच्या सामन्यात म्हणजेच एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात भारताचा एकच कर्णधार असावा, अशी निवड समितीची इच्छा असल्याचे सांगितले. तसेच निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्येच कोहलीला ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोडू नकोस, असे बजावल्याचे गांगुली म्हणाला; परंतु कोहलीने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे रोहित ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार झाला आणि त्यानंतर आता एकदिवसीय प्रकारातही त्याचीच नियुक्ती करण्यात आली. गांगुलीच्या या विधानानंतर कोहली काय प्रतिक्रिया व्यक्त करतो, याची सगळय़ांनाच उत्सुकता होती. कोहलीने यादरम्यानच्या काळात नेतृत्वाविषयी एकही ट्वीट वा वक्तव्य केले नाही.

अखेर १५ डिसेंबर रोजी आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला, ‘आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघनिवड करण्यास अवघी ९० मिनिटे शिल्लक असताना आपल्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने मला हा निर्णय मान्य करावा लागला. आयसीसी स्पर्धा जिंकण्यात आलेले अपयश माझ्या हकालपट्टीमागील प्रमुख कारण ठरले, असे निवड समितीने सांगितले.’ कोहलीने एकामागून एक केलेल्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली. त्याशिवाय बीसीसीआय अथवा निवड समितीच्या एकाही पदाधिकाऱ्याने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको, असे त्या वेळी बजावले नव्हते, असेही कोहली म्हणाला. त्यामुळे बीसीसीआय आणि कोहली यांच्यातील विसंवाद उघड झाला. गांगुलीने दुसऱ्याच दिवशी बीसीसीआय यासंबंधी कोहलीशी लवकरच संवाद साधेल, असे सांगून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

यानंतर जवळपास एक महिना उलटला. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-० अशा आघाडीवरून भारताला १-२ अशा फरकाने मालिका गमवावी लागली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ‘गेली सात वर्षे मेहनत, अथक परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर भारतीय संघाला प्रगतीच्या दिशेने नेल्यावर आता थांबण्याची वेळ आली आहे. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून मी नेहमीच माझे १२० टक्के योगदान दिले; परंतु प्रत्येक गोष्टीचा कधी ना कधी अंत होतोच,’ असा संदेश निवेदनाच्या सुरुवातीला लिहून कोहलीने चाहते व बीसीसीआय यांचे आभार मानले. त्याशिवाय माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्याच्यातील नेतृत्वगुण हेरणारा महेंद्रसिंह धोनी यांचेही कोहलीने विशेष आभार मानले.

२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू असताना महेंद्रसिंह धोनीने मध्येच कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून विराटने संघाची जबाबदारी उचलली. पुढे २०१७च्या सुरुवातीलाच त्याच्याकडे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्वपदही सोपवण्यात आले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७च्या चॅम्पियन्स करंडकाची अंतिम फेरी गाठली. तिथे पाकिस्तानकडून भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीपर्यंत दिमाखात मजल मारली; परंतु उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा अडथळा ओलांडण्यात भारताला अपयश आले. त्याचप्रमाणे २०२१ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही न्यूझीलंडनेच भारताच्या विजयाचा घास हिरावला. आयसीसी स्पर्धामधील हेच अपयश कोहलीच्या गच्छंतीस कारणीभूत ठरले; परंतु कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक क्रमवारीत तब्बल चार वर्षे अग्रस्थानी टिकून राहिला, हेही तितकेच खरे.

नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नजर टाकणेही गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत कोहली भारतीय क्रिकेटचा चेहरा म्हणून उदयास आला. भारताच्या कर्णधाराविषयी नेहमीच जगभरात चर्चा केली जाते. कोहली आणि शास्त्री यांच्या जोडीविषयी वेगळे सांगायला नको. २०१७च्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम लढत गमावल्यावर त्या वेळचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्या वेळी कोहली आणि कुंबळे यांच्यात बिनसल्याचे समोर आले. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वी फिरकीपटू कुलदीप यादवनेसुद्धा त्याला संघातून का वगळण्यात आले, याविषयी कोहलीला विचारण्याची भीती वाटल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे सचिन, द्रविडने धोनीत भावी कर्णधार पाहिला, धोनीने कोहलीला कर्णधारपदासाठी तयार केले, त्याप्रमाणे कोहली कधीही युवा खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण रुजवताना दिसला नाही. शेवटी खेळापेक्षा खेळाडू मोठा होऊ शकत नाही, हे कोहलीला दाखवून देणे गरजेचे होते.

तूर्तास, कोहली कर्णधार नसला तरी पुढील पाच ते सहा वर्षे भारताचे तिन्ही प्रकारांत सहज प्रतिनिधित्व करेल, यात शंका नाही. २०१९ पासून तो ७० शतकांवरच थांबला आहे. त्यामुळे तो लवकरच बहरात येईल, अशी आशा आहे. मात्र भारताचे आयसीसी स्पर्धेत विजयी नेतृत्व करण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहील, याची क्रीडा चाहत्यांना कायम खंत असेल.

‘‘कोहली भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक!

विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील विसंवादाविषयी मला फार काही बोलायचे नाही; परंतु कोहली हा भारताला लाभलेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक नक्कीच आहे. गेली सात वर्षे कोहलीने तिन्ही प्रकारांत भारताचे प्रामाणिकपणे नेतृत्व केले. विशेषत: कसोटीत त्याने भारताला वेगळय़ा उंचीवर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियामध्ये आपण प्रथमच कसोटी मालिका जिंकलो. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. आयसीसी स्पर्धा जिंकण्यात तो अपयशी ठरला, हे मान्य आहे; परंतु कोहलीसारख्या दर्जाच्या खेळाडूने काही महिन्यांत तीनही प्रकारांतील कर्णधारपद गमावणे धक्कादायक आहे. फलंदाजीत संघाला आजही कोहलीची गरज आहे. त्यामुळे आता तो लवकरच पूर्वीच्या लयीत फलंदाजी करून शतकांची रांग लावेल, अशी आशा आहे. तसेच कोहलीनंतर रोहितकडे कसोटी संघाचेही कर्णधारपद देण्यापेक्षा बीसीसीआय के. एल. राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमरा यांसारख्या नव्या दमाच्या खेळाडूंच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवू शकते. यामुळे रोहितवरही अतिरिक्त दडपण येणार नाही. त्याला यंदा ऑक्टोबर महिन्यात होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक तसेच पुढील वर्षी भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक यासाठी संघबांधणी करण्यावर लक्ष केंद्रित करता येईल.
– लालचंद राजपूत, माजी क्रिकेटपटू