मुलं घरात बसून कंटाळली आहेत? आणि तुम्हीही त्यांचं मनोरंजन करून थकलायत? मग आज त्यांना हडप्पा संस्कृतीची सफर घडवून आणा. नाही, नाही, त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आज तुमच्या घरीच ही प्राचीन संस्कृती घेऊन येणार आहे.

सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेल्या आणि काळाच्या ओघात नामशेष झालेल्या या समृद्ध संस्कृतीच्या अनेक खाणाखुणा आजही छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाने जतन करून ठेवल्या आहेत. आज प्लास्टिक किंवा धातूंच्या खेळण्यांची सवय लागलेल्या मुलांना हडप्पाकालीन खेळणी दाखवली, तर मुलं म्हणतील, हे काय खेळणं आहे का? आज आणलेली वस्तू उद्या भंगारात काढण्याचा हा काळ! या काळातल्या मुलांना एखादं भांडं दाखवलं आणि सांगितलं की हे पाच हजार वर्षांपूर्वीचं आहे, तर त्याचं डोळे विस्फारल्याशिवय राहणार नाहीत. हे एवढी वर्षं टिकूच कसं शकतं? असा वादही कदाचित सुरू होईल. पण त्यातून त्यांच्यासमोर एका प्राचीन संस्कृतीचा पट नक्कीच उलगडत जाईल.

वस्तुसंग्रहालयाने एनगुरू या अँपच्या साहाय्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. ८ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता लाइव्ह सेशन होणार आहे. अशाच स्वरूपाचे अन्यही अनेक लाइव्ह कार्यक्रम संग्रहालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहेत.