तंत्रज्ञान : ‘अ‍ॅपल’चे नवे लक्ष्य भारत

गेली अनेक र्वष भारतात आयफोन विकला जातोय पण अ‍ॅपलने त्याकडे फारसे लक्ष कधीच दिले नाही.

नव्या आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना अ‍ॅपलचे सी.ई.ओ. टीम कूक म्हणाले, ‘‘आम्ही आता भारताकडे जास्त लक्ष देत आहोत.’’ याचं कारण काय माहितीय? कारण त्यांच्या तिमाही निकालात असं दिसलंय की भारतात आयफोनचा खप मागच्या वर्षांपेक्षा तब्बल ७६ टक्क्य़ांनी वाढला आहे.

‘अ‍ॅपल’ आयफोन सिक्सची जाहिरात आठवतेय तुम्हाला? लग्नमंडपात जाण्यास सज्ज असलेला ‘तो’ आपला फोटो ‘तिला’ पाठवतो. त्यावर ती स्वत:चा, मेहेंदीच्या हाताने झाकलेल्या चेहऱ्याचा फोटो त्याला पाठवते. मग तो वरात घेऊन येत असल्याचा व्हिडीओ दाखवतो. ती लगेच आनंदाने नाचत असल्याचा व्हिडीओ दाखवते, पण चेहरा मात्र दिसू देत नाही. दोघं लग्नमंडपात येतात आणि अखेरीस तो तिला बघतो, प्रत्यक्षात. नखशिखांत सजलेली, थोडी लाजत, थोडी मुरडत ती त्याच्या समोर येऊन उभी राहते. नजरेस नजर भिडते आणि प्रेमाची अबोल भाषा व्यक्त होते. भारतातील लग्न परंपरा, लग्नातली नवरा-नवरीची हुरहूर, सजणं-सवरणं, एकमेकांना बघण्याची ओढ हे सगळं आयफोनची ही जाहिरात अचूक दर्शवते आणि  मन जिंकून घेते.

जुल २०१५ मध्ये बनवलेली अ‍ॅपलची पहिलीच भारतीय जाहिरात! गेली अनेक र्वष भारतात आयफोन विकला जातोय पण अ‍ॅपलने त्याकडे फारसे लक्ष कधीच दिले नाही. भारतसुद्धा आयफोनसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ ठरू शकतं ही बाब अ‍ॅपलने कधी ग्राह्य़ धरली नाही. पण मागच्या वर्षी बनवण्यात आलेली ही जाहिरात अ‍ॅपलच्या बदललेल्या मानसिकतेची साक्ष देते.

अ‍ॅपलचे भारतप्रेम सध्या दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. नव्या आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना अ‍ॅपलचे सी.ई.ओ. टीम कूक म्हणाले, ‘‘आम्ही आता भारताकडे जास्त लक्ष देत आहोत.’’ तिमाही निकालात हे उघड झाले की भारतात आयफोनचा खप मागच्या वर्षांपेक्षा ७६ टक्क्य़ांनी वाढला आहे. शिवाय काऊंटर पॉइंट या संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत आयफोनचे आठ लाख डिव्हाइस भारतात आणले गेले. २०१५ च्या आíथक वर्षांत १७ लाख (१७,००,०००) डिव्हाइस भारतात आणले गेले होते त्या मानाने एका तिमाहीत आठ लाख हा आकडा खूप मोठा आणि महत्त्वाचा ठरतो.

भारतातील मध्यम वर्गाची बदलती आर्थिक परिस्थिती, अधिक खर्च करण्याची इच्छा आणि ताकद, भारतीय समाजाची बदलली मानसिकता दर्शवते. तरुणांना आयफोनचे कायमच आकर्षण राहिले आहे. भारतातील ६५ टक्के लोकसंख्या आज तरुण वयोगटात मोडते. हा वयोगट असा आहे ज्याला जगाचे ज्ञान आहे, जग फिरण्याची इच्छा आहे, यशस्वी होण्याची स्वप्ने आहेत आणि त्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याची ताकद आहे. अशा या तरुण वर्गाला अ‍ॅपलचे आकर्षण नसले तरच नवल. अ‍ॅपलने कायम स्वत:चा एक दर्जा सांभाळला आहे आणि त्या दर्जाचे आकर्षण तरुण वर्गाला कायमच राहिले आहे. अ‍ॅपल हे गणित चांगलेच जाणून आहे. हेच गणित आता भारतात लागू पडताना दिसत आहे.

अ‍ॅपलने आयफोनचा भारतातला खप वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. आयफोनची सिक्स एस आणि सिक्स एस प्लस ही आवृत्ती १६ ऑक्टोबर रोजी भारतात आली. आयफोनची ही पहिलीच आवृत्ती आहे जी अमेरिकेत लाँच झाल्याच्या काही दिवसांतच भारतात आणली गेली. अ‍ॅपलने भारतातील आयफोनच्या किमती कायमच इतर देशांपेक्षा जास्त ठेवल्या आहेत, पण असे पहिल्यांदाच घडले की या नवीन आवृत्तीच्या किमती अ‍ॅपलने लाँच केल्यावर काही दिवसांतच कमी केल्या. फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अ‍ॅमॅझॉन या वेबसाइट्स, आयफोन सिक्स एस आणि सिक्स एस प्लस, कमी दारात आणि अनेक सवलतीसकट विकू लागल्या. इतकंच काय, आयफोनच्या जुन्या आवृत्त्या म्हणजेच फाइव्ह एस आणि सिक्स यांच्या किमतीतसुद्धा घट करण्यात आली आणि या सगळ्याचा परिमाण तिमाही निकालात दिसून आला. भारताचा आयफोनचा खप चांगलाच वाढला.

तरी प्रश्न पडतोच, अचानक असे काय झाले की, इतके वर्ष भारताला न जुमानणारी जगातली सर्वोकृष्ट ठरलेली मोबाइल कंपनी, अ‍ॅपल भारतावर इतकी मेहेरबान का झाली? भारतातील तरुणाई हे एक मोठे कारण असल्याचे टीम कूक यांनी नुकतेच नमूद केले, ‘‘भारताचे सरासरी वयोमान २७ आहे. भारतातील तरुण लोकसंख्या आयफोनसारख्या ब्रॅण्डसाठी अत्यंत उपयुक्त आहे.’’

भारतातील वाढती बाजारपेठ, याव्यतिरिक्त अजून एक कारण महत्त्वाचे ठरले, ते म्हणजे चीनमधील घटणारी आयफोन मागणी. अमेरिकेनंतर सर्वात जास्त स्मार्टफोनची संख्या असणाऱ्या देशांमध्ये चीनचा दुसरा क्रमांक आहे. चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या मोबाइल फोनपकी ९० टक्के स्मार्टफोन आहेत. भारत सध्या या गणतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि तज्ज्ञांच्या मते चीनला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. तरीही असे म्हणता येईल की भारतात स्मार्टफोनचे युग नुकतेच सुरू झाले आहे. या सुवर्ण संधीचा फायदा अ‍ॅपल नक्की करून घेणार यात काही दुमत नाही.

टीम कूक म्हणतात, ‘‘भारतीय सरकार आíथक परिवर्तन करण्यात उत्सुक आहे.’’ या पाश्र्वभूमीवर व्यवसायासाठी योग्य ते सहकार्य शासनाकडून मिळण्याची कूक यांना खात्री आहे. अ‍ॅपल सध्या भारतातील आयफोनच्या वितरणावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या वर्षभरात अ‍ॅपलने आयफोन वितरकांची संख्या पाच पट वाढवली आहे. इतकेच नाही तर अ‍ॅपलने केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण आणि जाहिरात विभागाकडे (Department of Industrial Policy & Promotion) स्वतची दुकाने काढण्यासाठी अर्ज पाठवला आहे. याशिवाय अ‍ॅपल इंडियाच्या ऑफिसेसमध्ये ‘खुच्र्या’ची फेरफार चालल्याचे दिसून येत आहेत. अनेक ऑफिसर्सना भारतातील खप वाढवण्याच्या दृष्टीने नवी कामगिरी, नव्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. यावरून अंदाज येतो की अ‍ॅपलने भारतातील व्यवसाय समृद्ध करण्यासाठी अतिशय ठोस पावले उचलली आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले असताना त्यांनी टीम कूक यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी अ‍ॅपलने भारतात आयफोनचे उत्पादन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जगभरात आयफोन बनवणारे फॉक्सकॉन यांनी इतर ब्रॅण्ड्सचे मोबाइल फोन भारतात बनवण्यास सुरुवात केली आहेच. अ‍ॅपलचा भारतातील प्रगतीचा वेग बघता तेसुद्धा लवकरच आयफोनचे उत्पादन भारतात सुरू करतील यात शंका नाही.
तेजल शृंगारपुरे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apple focuses on indian mobile market

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या