वास्तुरचना आणि आपले हवामान यांचा सर्वात जवळचा संबंध आपल्या पूर्वजांनी केंव्हाच ओळखला होता. गरज आहे ती त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन जाणून घेऊन, त्याचा वापर आजच्या वास्तुचनेत करण्याची.

सध्या टीव्हीवर एक मालिका चालू आहे. त्यातील एका प्रमुख पात्राच्या तोंडी सतत एक वाक्य दिले आहे- ‘परंपरेशी तडजोड नाही’. या सीरिअलमध्ये आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक काही नियम, चालीरीती आखून दिल्या आहेत आणि त्या पाळणे किती गरजेचे आहे वगरे गोष्टी सांगितल्या आहेत. गंमत म्हणून ती सीरिअल पाहताना जाणवले की, खरंच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला होता. पण दुर्दैवाने त्या मागील शास्त्र आपण समजून न घेता परंपरेच्या नावाखाली आंधळेपणाने त्याला नको तो अर्थ देत आहोत.

कॉलेजमध्ये असताना आम्हाला क्लायमॅटोलॉजी किंवा ऋतुचक्र, हवामानाबद्दल लेक्चर्स असायची. कुठल्याही वास्तुतज्ज्ञाला इमारत बांधण्यापूर्वी त्या जागेच्या हवामानाबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या इमारती व चेरापुंजीला बांधल्या जाणाऱ्या इमारती यांमध्ये खूप फरक आहे किंवा असावाच. हा फरक मुख्यत्वे दोन्हीच्या भौगोलिक फरकामुळे आहे. याच्या पूर्ण अभ्यासाशिवाय इमारती बांधणे शुद्ध वेडेपणा ठरेल. आणि याचाच सखोल  विचार आपल्या पूर्वजांनी केला होता. भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन वास्तुरचनेचे काही नियम त्यांनी लोकांना घालून दिले. यासाठी त्यांनी दिशांचा अभ्यास करून नसíगक ऊर्जा, जी आपल्याला मुबलक प्रमाणात फुकट मिळते आहे, त्याचा वापर कसा करावा हे सांगितले. त्याचबरोबर पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांचा आपल्या मनावर व शरीरावर होणारा परिणाम त्यांनी अभ्यासिला. थोडक्यात वास्तुरचना म्हणजे नसíगक गोष्टींबरोबर साधलेला समतोल हा मुख्य उद्देश समोर ठेवला.

29-lp-realestateमुळातच दक्षिण दिशेला आपल्याकडे खलनायकाप्रमाणे वागवले जाते. दक्षिण दिशेला दारे नकोत, तिकडच्या िभतीची उंची जास्त असावी, घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला नसावा वगरे वगरे. नेहमी सावत्र वागणूक मिळणाऱ्या या दिशेप्रति आपसूकच त्यामुळे माझ्या मनात कणव निर्माण झाली. त्याच्यावरील लागलेला बट्टा पुसून टाकण्यासाठी परत क्लायमॅटोलॉजीच्या (climatology) पुस्तकांची मदत घेतली. तेव्हा जाणवले याच्यावरील सगळे आरोप बरोबर आहेत, फक्त त्यामागील शास्त्रीय कारणे कोणीच लक्षात घेत नाही. आपल्याला माहितीच आहे सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो. त्याचा हा प्रवास दक्षिण दिशेकडून होतो. त्यामुळे सूर्याचा जास्तीत जास्त कालावधी दक्षिण दिशेला असतो. साहजिकच या दिशेला असलेल्या खोल्या तापून निघतात. हे मला केव्हा जाणवले जेव्हा आमच्या  पुण्याच्या नवीन घरी राहायला गेलो. पूर्वीच्या काळी शेक-शेकोटीने बाळंतिणीची खोली कशी गरम राहायची तशी ही खोली तापायची. दिवसभर अंगाची लाही लाही आणि बेचैनी. याचे मुख्य कारण या खोलीची जागा. बरोब्बर दक्षिणेला असल्याने दिवसाचे सहा-सात तास उन्हात न्हाऊन निघायची. बरं उन्हापासून संरक्षण करायला पडदे ओढले तर दोन महिन्यांत प्रखर उन्हाने पडद्याचा रंग उडून पोतेरे झाले. आता मी सूर्याला तर सांगू शकत नाही तुझा मार्ग बदल, गुपचूप आमची खोली बदलली आणि अशा ठिकाणी गेले जिथे उन्हाचा त्रास कमी होईल. तेव्हा एक गोष्ट पटली की, आपल्या वास्तूचे दक्षिण दिशेकडून येणाऱ्या प्रखर उन्हापासून संरक्षण करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे या दिशेला उंच िभतीचा आडोसा का करावा व खिडक्या का नसाव्यात हे समजले. ह्य दिशेला असलेल्या खोल्या वर्षांतून एकदाच कधी तरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी गेस्ट रूम म्हणून किंवा स्टोअर रूम म्हणून वापरल्या तर उत्तम. रोजच्या वापरायच्या खोल्या शक्यतो बाकीच्या दिशांना ठेवाव्यात.

दुसरे, दक्षिणेला उंच िभत बांधणे व दारे खिडक्या न ठेवणे याचे प्रमुख कारण म्हणजे भारताची भौगोलिक स्थिती. आपल्याला माहितीच आहे की मान्सूनचा पाऊस दक्षिण- पश्चिमेकडून येतो. वाऱ्यामुळे आडवातिडवा कसाही घरात घुसणाऱ्या पावसाने काय हाल होतात हे मी प्रत्यक्ष बघितले आहे. माझ्या ग्राहकाचा वरळीला १४ व्या मजल्यावर सी फेसिंग फ्लॅट आहे. त्या फ्लॅटची पावसामुळे झालेली दुर्दशा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. ह्यचे मुख्य कारण दक्षिण-पश्चिमेकडील खिडक्या. एकतर आजकाल खिडक्यांना छज्जे नसतात. त्यामुळे पाऊस अडत नाही. खिडक्यांच्या फटींमधून पाणी येऊन फक्त याच खोलीत सुनामीसदृश वातावरण झाले होते. बाकीच्या दिशांना असलेल्या खोल्या पाषाणासारख्या कोरडय़ा ठणठणीत होत्या! अशावेळी सांगा दक्षिण दिशेची काय चूक? वास्तुतज्ज्ञाने दिशांचा नीट अभ्यास करून खिडक्यांची रचना केली असती तर ही वेळच आली नसती.

30-lp-realestateदक्षिण दिशेच्या अगदी विरुद्ध, पट्टराणीसारखी असलेली दिशा म्हणजे पूर्व दिशा. पूर्वाभिमुख घर असावे, अभ्यास करताना पूर्वेला तोंड करावे, स्वयंपाकघर पूर्व किंवा आग्नेयला असावे वगरे गोष्टी आपण ऐकतो. यामध्येसुद्धा निसर्गाचा शास्त्रोक्त अभ्यास केलेला जाणवतो. पूर्वीपासून आपल्याला सांगितले जाते की सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. पूर्वीच्या काळी हा अभ्यास बाहेर झाडाखाली बसून होत असे. साहजिकच पूर्वेला बसून अभ्यास केल्याने सूर्याची पहिली कोवळी उन्हे अंगावर पडत. ज्यामुळे विद्यार्थी दशेतील मुलांना भरपूर नसíगक ऊर्जा मिळत असे. त्याचप्रमाणे कोवळे ऊन म्हणजे विटामिन डीचा मुबलक स्रोत. सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक फायद्याची माहिती आपल्या पूर्वजांना नक्कीच असणार. आजकाल प्रत्येक दुसऱ्या माणसामध्ये विटामिन डीची जी कमतरता आढळते व त्यामुळे हाडांच्या समस्यांना त्यांना तोड द्यावे लागते, याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाकडून फुकट उधळलेली ही ऊर्जा आपण घेतच नाही. आपल्या पूर्वजांनी मात्र जाणूनबुजून, कधी धाक-दपटशाने किंवा कधी धार्मिकतेचे कारण देऊन हे नियम आचरणात आणायला भाग पाडले. ज्याचा फायदा फक्त एका व्यक्तीला व कुटुंबाला न होता पूर्ण समाजाला झाला.

अभ्यासाच्या जागेप्रमाणेच भर दिला गेला स्वयंपाकघरावर. सकाळची लगबग सुरू होणारे घरातील हे प्रथम व मुख्य स्थान. याच्या स्थानाबद्दलसुद्धा मला वाटते की सूर्याचा प्रामुख्याने विचार केला गेला असावा. सूर्याची कोवळी उन्हे अन्नपदार्थावर पडल्यास त्यातील बॅक्टेरिया नाश पावून सकसपणा वाढीस लागतो हे आपण जाणतोच. हेच प्रमुख कारण असावे पूर्वेला किंवा आग्नेयला स्वयंपाकघर ठेवण्याचे. त्याचप्रमाणे पूर्वी खिडकी हे एकच साधन होते स्वयंपाकघरातील वास व धूर बाहेर घालवायचे. अशा वेळी भारतीय उपखंडातील वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास करून स्वयंपाकघर या दिशांना ठेवल्यास वास व धूर घराच्या आतमध्ये न शिरता बाहेर फेकला जाई.

पश्चिमेचा वारा म्हणजे सर्वात आल्हाददायक! त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशेला घराचे तोंड असण्याचा अजून एक फायदा म्हणजे उत्कृष्ट वायुविजन किंवा व्हेंटिलेशन. नवरा-बायकोच्या भांडणाने तापलेले वातावरण थंड करण्याचा हा नसíगक उपाय. तुम्ही आलिया भटचा ‘टू स्टेट्स’ पिक्चर पाहिला असेल, तर तुम्हाला तिच्या घराच्या मधोमध असलेला चौक नक्कीच आवडला असेल. मोहेंजोदडो संस्कृतीपासून ते आत्ताच्या वाडा संस्कृतीपर्यंत असे ‘ओपन टू स्काय’ चौक भारतीय वास्तुरचनेची खासियत होती. पूर्व-पश्चिम दिशेला उघडणारा हा चौक घरात हवा खेळती ठेवून, तापमान आल्हाददायक ठेवण्याचे काम करायचा. आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे ही रचना काळाच्या पडद्याआड गेली आहे. पण जर का आपण पूर्व-पश्चिम दिशेला दारे-खिडक्या असणारे घर निवडले तर हवा खेळती राहायला नक्कीच मदत होईल.

31-lp-realestateमला आठवतेय लहानपणी आजीला छळायला म्हणून मुद्दामून दक्षिणेकडे पाय करून झोपायचे. त्या वेळी ती परोपरीने समजवायची की दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने तब्येत बिघडते, नको झोपूस. पण मला ती त्या वेळी कटकट वाटायची. तिच्याकडेपण त्या वेळी ‘असे का झोपू नये’ ह्यचे समाधानकारक उत्तर नसायचे. साहजिकच जुन्या काही तरी चाली-रीती म्हणून मी कानाडोळा करायचे. नंतर कळले की ही अंधश्रद्धा नसून यालापण शास्त्रीय आधार आहे. आपल्या पृथ्वीला उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही दोन चुंबकीय क्षेत्रे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. या चुंबकीय लहरी उत्तर ते दक्षिण सतत वाहत असतात. आपल्या रक्तात लोह असल्याने या चुंबकीय प्रवाहाचा आपल्या शरीरावर साहजिकच परिणाम होतो. आपण या चुंबकीय प्रवाहाच्या दिशेने म्हणजे उत्तरेला डोके व दक्षिण दिशेला सतत पाय करून झोपलो तर आपल्या रक्तातल्या लोहावर व पर्यायाने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गरगरणे, चक्कर येणे, डोकेदुखी व रक्ताशी संबंधित दुखणी सुरू होतात. यासाठी म्हणून उत्तर दिशेला सोडून बाकी कुठल्याही दिशेला डोके करून झोपल्यास आपली तब्येत नीट राहते व झोपपण नीट लागते. आजीची कळकळ आत्ता समजतेये सॉरी आजी!

प्रत्येक दिशेची खास वैशिष्टय़े आपण पहिली. पण त्याच बरोबर घरात भरपूर नसíगक उजेड येणेपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. इंग्लंडसारख्या ठिकाणी हिवाळ्यात जेव्हा दिवसेन् दिवस सूर्याचे दर्शन होत नाही, त्या वेळी लोकांमध्ये नराश्याचे झटके येण्याचे प्रमाण कैक पटींनी वाढते. अशा वेळी बीबीसीवर लोकांचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम मुद्दामहून दाखवले जातात. आपल्याकडे नशिबाने भरपूर उजेड असतो, त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.

वास्तुरचनेबद्दल हा शास्त्रीय दृष्टिकोन समजल्यानंतर मनोमन मी आपल्या पूर्वजांसमोर नतमस्तक झाले. हाताशी काहीही साधने नसताना प्रत्येक गोष्टीची शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आखणी बघून आपल्या परंपरेविषयीचा अभिमान दुणावला. टीव्हीवरील सीरिअलचे पुढे काय होईल माहीत नाही. पण शास्त्रीय कारण दिलेत तर परंपरेशी हातमिळवणी करायला मला मात्र नक्कीच आवडेल.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com