scorecardresearch

देहाची तिजोरी : झोप

सातत्याने होणाऱ्या अपूर्ण झोपेमुळे मानवीय प्रतिकारशक्तीत घट होताना आढळते.

प्राजक्ता पाडगांवकर response.lokprabha@expressindia.com

२०१७ साली नेटफ्लिक्सच्या सीईओने त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्यासारख्या सेवा देणाऱ्या कितीही कंपन्या बाजारात आल्या तरी आपल्याला अजिबात काही फरक पडत नाही, कारण आपली स्पर्धा ही कंपन्यांशी नव्हे तर माणसाच्या झोपेशी आहे! अशा आशयाचे विधान केले होते. तो म्हणाला होता, ‘‘स्लीप इज अवर एनिमी’’

हे विधान पुरते मुरू द्या आतपर्यंत! हे काय सुरू आहे सध्या? मानवी उत्क्रांतीचा हा कोणता टप्पा आहे, जिथे लोकांच्या स्वास्थ्याचा सहज लिलाव करून नफा कमावला जातो आहे आणि जवळसाप सारे जग त्याकडे सहज दुर्लक्ष करते आहे किंवा एका अर्थी त्याचे समर्थन केले जात आहे?

रात्रीचे जागरण हा माझ्यासाठीदेखील अगदीच जवळचा विषय आहे! लहानपणी लागलेल्या सवयीमुळे जागरण आणि लक्षपूर्वक करण्याचे काम, यांचे समीकरण डोक्यात पक्के झाले होते. त्यातून बाहेर पडून, वेळच्या वेळी आणि पुरेशी झोप घ्यायला शिकायला अनेक वर्षे लोटली! अजूनही जुन्या सवयी डोके वर काढतात आणि महत्त्वाच्या लक्षपूर्वक करण्याच्या कामाची वेळ ही रात्रच आहे, असे वाटत राहते! मात्र जेव्हा नेटफ्लिक्सवाल्यांचे हे विधान वाचले तेव्हा डोळय़ात कोणीतरी  झणझणीत अंजन घातल्यासारखे वाटले! आपल्या पिढीला किती नेमक्या ओळखतात या सगळय़ा कंपन्या आणि किती योग्य टिपल्या आहेत त्यांनी या पिढीच्या सवयी!

कधी विचार येतो खरोखर या कंपन्या जेवढा विचार आणि पैसे आपल्या झोपेच्या अभ्यासावर खर्च करतात त्याच्या १०% तरी विचार आपण आपल्या झोपेचा करतो का? की अगदी सहज सावज ठरलो आहोत, स्वखुशीने या विचित्र व्यवस्थेचे? सध्याच्या पिढीचे म्हण किंवा ब्रीदवाक्य झाले आहेच की, मित्र मैत्रिणीं, नेटफ्लिक्स अँड चिल्ल!

खरोखर चिल्ल करावे असे काहीच नाही झोपेच्या अभावात, किंबहुना सगळे अगदी भीषण, चिलिंग (chilling) असेच आहे!

मानवी शरीरासाठी जसे हवा, पाणी, अन्न, वस्त्र आणि निवारा मूलभूत आहे तशीच झोपही तेवढाच मूलभूत घटक आहे, अतिशय मूलभूत अशी गरज! निसर्गात लक्षपूर्वक पाहिले तर दिवसा कार्यरत असलेले निराळे प्राणी आहेत, तसेच रात्री कार्यरत असलेले प्राणी निराळे आहेत. माणूस हा एकमेव प्राणी आहे जो दोन्ही वेळा कार्यरत असतो. विजेच्या दिव्याचा शोध लागला आणि मानवीय जगण्यात आमूलाग्र असा बदल घडून आला. दिवस आणि रात्र ह्यातली सीमारेषा पुसट होऊ लागली, ती आज आता पूर्ण पुसली गेली आहे की काय असे वाटू लागले आहे.

झोपेशी निगडित एक महत्त्वाची चक्राकार गती जाणून घेऊ या, ती आहे सूर्याची! दिवसा सूर्य उगवतो, हळू हळू मध्यान्ही येऊन संध्याकाळपर्यंत अस्ताला जातो. सूर्याची ही गती आपण पृथीवर कुठेही असलो तरी थोडय़ाफार फरकाने महत्त्वाचा भाग म्हणजे याच गतीशी मानवीय ऊर्जा, झोप आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमता जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळेच सकाळी जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा शरीरातील कॉर्टिसॉल हा हॉर्मोन स्त्रावू लागतो, साधारण सकाळी ५:३० ला त्याची सुरुवात होते. पुढे साधारण पावणेसातला आपल्या रक्तदाबात लक्षणीय वाढ होते. साधारण साडेसातपर्यंत आपले झोपेला मदत करणारे मेलॅटोनीन या हॉर्मोनचे स्रवणे पूर्णत: थांबते. नऊच्या दरम्यान टेस्टोस्टोरॉनचे स्रवणे त्याच्या उच्चांकावर असते आणि दहा वाजता आपले सर्वाधिक लक्ष केंद्रित होत असते. संध्याकाळ होईस्तोवर, साडेसहाला रक्तदाब उच्चांक गाठतो, तर साडेसातला शरीराचे तापमान सर्वाधिक असते. साधारण ९ वाजता रात्री मेलॅटोनीनचे स्रवणे सुरू होते, तर रात्री २ वाजता आपल्याला सर्वात गाढ झोप लागलेली असते. आता हे चक्र अव्याहत आपल्या जन्मापासून सुरू होते ते शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच असते. ह्याला सिरकॅडिअन रिदम (circadian rhythm) असे संबोधले जाते. मानवी अस्तित्वाच्या सुरुवातीपासून हे एक अद्भुत घडय़ाळ आपल्या प्रत्येकात सुरू आहे, या अद्भुत चक्राचा उगम आहे मेंदूतील हायपोथॅलमसमध्ये, यात २० हजार न्युरॉन्स एकत्रितपणे हे अद्भुत घडय़ाळ चालवत असतात.

त्यानंतर आले साल १८७९! एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला आणि दिवस-रात्र एकदम बदलून गेले. नैसर्गिकरीत्या पडणारा अंधार नाहीसा झाला, करता आला! त्याची जागा अव्याहत सुरू असलेल्या दिव्यांनी घेतली आणि मग रात्रीचा अभ्यास असो, पार्टी असो की अजून काही, जागरण सहज शक्य झाले! आणि या अद्भुत सिरकॅडिअन रिदमची गती गडबडून गेली!

रात्री नाही झोपले तर होते काय?

रात्री न झोपल्याने नेमके काय होते,  यावर संशोधनदेखील अनेक वर्षे सुरू आहे, आणि आता त्याचा विस्तार केवळ शारीरिक हानीपर्यंत मर्यादित न राहता, मानसिक आरोग्याची होणारी हानी इथवर झाला आहे.

मुळात रात्री एखाद वेळी जर झोप कमीजास्त झाली तर फारसा फरक पडणार नाही, असा समज असतो, मात्र केवळ एक रात्र नीट झोप झाली नाही तर शरीरातील वर उल्लेख केलेली संपूर्ण गती विस्कळीत होते! आता विचार करा, अनेक रात्री, अनेक वर्ष जागरण करण्याची सवय असेल तर त्याचा शरीरावर किती मोठा आणि घातकी परिणाम होऊ शकेल?

सिरकॅडिअन रिदम विस्कळीत झाला, सात तासांपेक्षा कमी झोप  सातत्याने घेतली तर त्याने हृदयरोग आणि संलग्न तक्रारी संभवतात, डायबेटिज, वजनवाढ, कॅन्सर, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, एडीएचडी इतक्या प्रकारचे अनेक आजार संभवतात. (संदर्भ:  International review of Psychiatry २०१४ मधील एका अभ्यासातून)

हे सगळे रोग आपल्याला होणार नाहीत, किंवा आजवर झाले नाहीत, असे वाटत असेल तर सामान्यत: झोप सातत्याने कमी होत असल्यास काय होऊ शकते ते विस्ताराने पाहू या:

विस्मृती : रोज रात्री झोपल्यावर, मेंदू दिवसभरातील सगळय़ा घटना, आठवणी, यांची छाननी करतो, त्यांचे वर्गीकरण करून त्यांची योग्य जागी जपणूक करतो, काही घटना शरीराला, मनाला भविष्यात मदत करणाऱ्या असल्यास त्यांचे तसे वर्गीकरण करून साठवतो. हे काम करण्याची वेळ, मेंदूला रात्रीच मिळते जेव्हा शरीराचे नियंत्रण करण्याचे काम जरा कमी झालेले असते. मात्र जेव्हा आपण सातत्याने जागरण करतो तेव्हा मेंदूच्या या कामात व्यत्यय येतो आणि त्या कामात गोंधळ होऊ लागतात, जेणेकरून घटना, माणसे, त्यांची नावे, रस्ते इत्यादी आपल्याला विसरायला होऊ लागते. अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही स्मृतींवर ह्याचा विपरीत परिणाम जाणवतो.

लक्ष केंद्रित करण्यात अडचणी : मेंदूला थोडी विश्रांती गरजेची असते, त्याचे स्वत:चे तापमान आणि इतर डागडुजी करण्यासाठी झोपेची गरज आपल्याला असते. मेंदूची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता ही झोपेत विकसित होते. झोप जर सातत्याने कमी झाली तर रोजच्या कामात गरजेची अशी  लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वेगाने कमी होते, इतर विचार, इतर व्यवधाने, यामागे लक्ष जाते, दुर्लक्ष करण्याची सवय वाढते आणि कोणतेही काम अथवा नवीन काही शिकण्यासाठी लागणारी जी एकाग्रता आहे ती कमी झोपेमुळे वाढीस लागते.

मनोवस्थेत बदल ( मूड स्विंग) : रात्री अपुऱ्या झोपेमुळे पचनक्रियादेखील बिघडते, तसेच त्यातून मनोवस्था, मूडदेखील बदलतो. सतत जर झोप अपुरी होत असेल, तर स्वभावात बदल होऊन, चिडचिडेपणा, अचानक अनावर राग येणे आणि स्वत:च्या भावभावनांवर ताबा न राहणे असे होऊ लागते. ही मनोवस्था तात्पुरती ढासळू लागली तर त्यातून पुढे जाऊन नैराश्य, एकाग्रतेचा अभाव आणि एकूण मेंदूच्या कार्यक्षमतेत लक्षणीय घट दिसून येते.

प्रतिकारशक्तीत घट : सातत्याने होणाऱ्या अपूर्ण झोपेमुळे मानवीय प्रतिकारशक्तीत घट होताना आढळते. सर्दी, पडसे तसेच इतर साथीचे रोग अगदी सहज शरीरावर हल्ला करू शकतात आणि त्यातून प्रतिकारशक्ती नव्याने लढण्यास सज्ज न होता, तिची हानी संभवते. शरीराला अपूर्ण विश्रांती मिळाल्याने शरीराच्या प्रतिकाराचा ज्या यंत्रणा असतात त्यांच्यात देखील बदल होतो आणि त्यांचे नुकसान होते.

उच्च रक्तदाब : सातत्याने जर तुम्ही पाच तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमचे रक्ताभिसरण, रक्तदाब ह्या सर्व गतींमध्ये व्यत्यय येऊ लागतो. सिरकॅडिअन ऱ्हिदम बिघडल्याने, रक्तदाबात बदल होऊन कायमस्वरूपी उच्च रक्तदाबाची व्याधी कमी झोपेमुळे होऊ शकते.

मधुमेहाची शक्यता : अवेळी आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीरात स्रवणाऱ्या इन्सुलिनच्या वेळा आणि गतीदेखील बिघडते, ह्यातून शरीरात साखरेचे प्रमाण असंतुलित होत राहते. सातत्याने असे असंतुलन होत राहिले तर टाईप २ डायबेटिज होण्याचा संभव असतो.

वजनात वाढ : जेव्हा पुरेशी झोप होते, तेव्हा शरीरातील सर्व कार्य नीट होत असते, जसे की आपल्याला किती भूक लागली आहे, केव्हा पोट भरले आहे, हे दर्शवणारी यंत्रणादेखील व्यवस्थित काम करत असते, मात्र जेव्हा झोपेची लय बदलू लागते, तेव्हा पोट भरले आहे, कितपत भरले आहे, हे सांगणारी यंत्रणा मोडकळीस येते, त्यातून कितीही खाल्ले तरी पोट न भरल्यासारखे वाटणे, खूप भूक लागणे, सतत खावे वाटणे असे सुरू होते, ज्याने वजन वाढू लागते.

हृदयरोगाची सुरवात : सातत्याने कमी झोप घेतल्याने  रक्ताभिसरण आणि रक्तदाब कमी जास्त होऊ लागतो, तसेच शरीरातील उष्णता आणि पित्त वाढीस लागते. दोन्हीचा विपर्यास म्हणजे हृदयरोगाची नांदी! कमी झोपेमुळे हृदय रोग होण्याची शक्यता वाढते.

कमी कामेच्छा : झोप अपुरी अथवा सातत्याने कमी झाल्यास, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये स्त्रवणारे हॉर्मोन्सदेखील बदलू लागतात. पुरुषांत टेस्टोस्टोरॉनचे स्रवणे मंदावते आणि यातून कामवासना कमी होते. तर स्त्रियांमध्ये पाळीचे अनियमित होणे, कामवासना पूर्णत: मंदावणे आणि पीसीओएस आणि इतर संलग्न आजार होऊ शकतात.

तोल सांभाळणे : शरीरातला तोल सांभाळायला मेंदूला सतत सतर्क असणे अपेक्षित असते. जर मेंदूला योग्य अशी विश्रांती नाही मिळाली तर मेंदूची शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता खालावू लागते, त्यातून तोल जाणे, चक्कर येणे आणि पडणे असे काही घडू शकते.

दुर्घटना : कमी झोपेमुळे शरीराला एक निराळी सवय जडू लागते, वेळीअवेळी डुलकी काढण्याची! काही लोकांना त्यांच्या नकळत पेंग येते, अचानक डोळे मिटतात आणि छोटीशी झोप येते. ही सवय निश्चित घातक ठरू शकते, विशेषत: कोणतेही वाहन चालवताना अथवा वाहनातून प्रवास करताना. कोणतेही अवजड यंत्र वापरताना अथवा कोणत्यातरी ठिकाणी अनपेक्षितपणे वावरताना.

या परिणामांच्या यादीवरून नजर फिरवली तरी आपल्याला आपल्या सध्याच्या समस्या आणि झोपेच्या सवयी यांच्यातील नाते कळू लागेल. वरवर निरुपद्रवी वाटणारी ही सवय शरीराला आतून अक्षरश: पोखरून काढते.

आणि हे सर्व जाणूनदेखील जेव्हा एखादी कंपनी हे ठरवू पाहते की मानवी झोप कसेही करून  चोरावी, लोकांना वेबसिरीज किंवा एकंदर स्क्रीन पाहण्याचे व्यसन कसे लावावे, तेव्हा पुन्हा एकदा हेच वाटतं की आता कोणी आपल्या अज्ञानाचा फायदा घेत असेल तर कदाचित हे अज्ञान दूर केले तर लोक पुन्हा वेळेवर झोपायचा प्रयत्न तर करतील, कदाचित कोणाची तब्येतही सुधारेल!

अर्थात ही झोपेची गोष्ट सगळय़ाच लोकांची आहे, मात्र स्त्रीदेहावर याचे  आणखी जास्त परिणाम होतात, कारण स्त्रियांच्या शरीरात केवळ एक अद्भुत घडय़ाळ नसून दोन असतात, सिरकॅडिअन ऱ्हिदम आणि इन्फ्राडियन ऱ्हिदम! जाणून घेऊ या त्याबद्दल, पुढील भागांतून!

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about sleep benefits of sleep sleep disorder zws

ताज्या बातम्या