atul-deoolgaonkarआता गरज सगळ्यांनीच विवेकाची कास धरण्याची
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा मंत्री पर्यावरण खात्याचा कारभार सांभाळण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. खरे तर हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा आहे. हा विषय संपूर्ण देशाचा व राज्याचा अग्रक्रम होणे आवश्यक आहे. संपूर्णपणे ‘हागणदारी मुक्त’ गाव आपल्याकडे अद्याप झालेले नाही. शौचालये नाहीत. बांगलादेश किंवा श्रीलंका यासारखे देशही ‘हागणदारी’च्या पलीकडे गेले आहेत. याबाबतीतही आपण आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे.

सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थापनही बेकार आहे. आपल्याकडे ६० टक्के पाण्याची गळती होत असून परदेशात हेच प्रमाण अवघे दहा टक्के आहे. एकूणच पर्यावरणाचा विचार करताना आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागणार असून सक्रिय लोकशाहीत राज्यकर्त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे देणे आपण भाग पाडले पाहिजे. हवा व माणूस, निसर्ग व पर्यावरण यांचे द्वैत मोडून विचार करायला पाहिजे. जमिनीवरील ६० ते ७० टक्के माती आपल्या देशात वाहून जात आहे. सपाट जमिनीवरून चार ते पाच टन माती वाहून जात आहे. सध्या आपण ज्याला विकास म्हणतोय यातून केवळ आणि केवळ आपत्तींचीच पेरणी आपण करत आहोत. घर बांधणीतूनही पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण होत असून याबाबतीतही प्रत्येक टप्प्यावर नवीन नियम, आचारसंहिता तयार करावी लागणार आहे. पाणी, वीज व घर याविषयी नवीन विचार करावा लागेल. विकास आणि पर्यावरण हे टोकाचे द्वैत असून यांचे संतुलन साधणे गरजेचे आहे. माणसाचे कोणतेही पाऊल हा निसर्गातील हस्तक्षेप ठरतो तेव्हा विकासाबरोबरच पर्यावरण जतन आणि संवर्धन करताना आपण सगळ्यांनीच विवेकाची कास धरण्याची खरी आवश्यकता आहे.
– अतुल देऊळगावकर,
पर्यावरणतज्ज्ञ

dr-vinaya-jungleविकासप्रक्रियेत प्राण्यांचाही विचार व्हायला हवा
गेल्या काही वर्षांमध्ये वन्य प्राणी विरुद्ध मानव, असा संघर्ष सुरू झाला आहे. मुंबईकरांसाठी याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिबळ्या विरुद्ध मानव! दोन-तीन वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळे परिसरातील शाळांमध्ये, महानंद डेअरीत, इमारतीत शिरल्याचे आढळले होते. या घटना वर्षांला १२ ते १५ एवढय़ा सर्रास घडत होत्या. मात्र या विषयावर सुनील लिमये आणि विद्या अत्रेय यांनी अभ्यास केला. ‘मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’ या सेवाभावी संस्थेच्या लोकांनी जनजागृती करत बिबळ्या हादेखील निसर्गाचा भाग असल्याचे आसपासच्या लोकांना पटवून दिले. त्यातून या घटना कमी झाल्या आहेत. त्यामुळे वन्य प्राणी व पर्यावरण संवर्धन यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. कर्नाटकमधून सिंधुदुर्ग-कोल्हापूरमध्ये आलेले जंगली हत्ती व मानव यांच्यातही संघर्षांने हिंसेची किनार गाठली आणि महाराष्ट्राच्या वन्यजीवनाचे आकर्षण ठरू पाहणारे हत्ती पुन्हा हुसकावून लावण्यात आले. माकडे विरुद्ध मानव, रानडुकरे विरुद्ध मानव असा पायीपायी संघर्ष पाहायला मिळतो. गिधाडे व माळढोक सारख्या अनेक वन्यजीव प्रजाती गेल्या काही वर्षांत नष्ट होत आहेत. शहरीकरणामुळे आणि जंगल व शहरे यांच्यातील सीमारेषा नष्ट होत असल्याने त्यातूनही समस्या वाढत आहेत. शहरी जीवनामध्ये प्लॅस्टिकचा होत असलेला अतोनात वापर प्राण्यांच्या जीवावर बेततो आहे. अनेक प्राण्यांच्या शरीरात प्लॅस्टिक मोठय़ा प्रमाणात आढळले आहे. पाळीव प्राण्यांतही ही समस्या आढळते. त्यामुळे वन्यजीव, पाळीव प्राणी, जंगल आणि मानव यांत एक घनिष्ठ साखळी आहे, हे लक्षात घेऊन विकास करताना वन्य प्राणी, पक्षी, पाळीव प्राणी, कीटक, गवत, झुडुपे यांचा विचार व्हायला हवा.
– डॉ. विनया जंगले,
पशुवैद्यक

dr-kamakshi-bhateपर्यावरणीय असंतुलनाचा आरोग्यावर गंभीर परिणाम
‘पर्यावरणीय असंतुलनाचा आरोग्यावर परिणाम’ हा विषय आतापर्यंत अभ्यासला गेलेला नाही. खरे तर या विषयाचा अत्यंत पद्धतशीरपणे अभ्यास व्हायला हवा. रोग होण्यासाठी तीन महत्त्वाचे घटक कारणीभूत असतात. रोग प्रसारक घटक, रोग होतो असे लोक आणि वातावरण; या तीन महत्त्वाच्या घटकांचा विचार करावा लागतो. त्यात पर्यावरणीय असंतुलन, म्हणजेच वातावरण बिघडले की, रोग होणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तर रोगप्रसारक घटकांची तीव्रता वाढते. गेल्या २०० वर्षांत शहरीकरणाचे प्रमाण दहा पटींनी वाढले आहे. मात्र आरोग्यावर फक्त २.५ टक्के खर्च होतो. सार्वजनिक आरोग्य सेवांचा अभाव आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे रोग होत आहेत. तसेच दाटीवाटीने राहिल्याने श्वसनाचे विकारही होत आहेत. क्षयरोगदेखील महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत पसरण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरातील पर्यावरणाच्या ढासळत्या संतुलनामुळेच मलेरिया, डेंग्यू हे आजार पसरत आहेत. जागतिक तापमानवृद्धी हा पर्यावरणीय असंतुलनाचा भाग असून त्यामुळेही अनेक रोग पसरत आहेत. पर्यावरणीय असंतुलनाचा विचार केला असता हे असंतुलन आणि ढासळते आरोग्य, यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असल्याचे लक्षात येते. वाढत्या शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणाच्या समस्या, त्यातून ढासळणारं पर्यावरण संतुलन आणि या सर्वाचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत कधीतरी सजगपणे अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी, वैद्यकीय अधिकारी अशा सर्वानी  एकत्रितपणे या समस्येचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
– डॉ. कामाक्षी भाटे,
केईएम रुग्णालयाच्या सामाजिक वैद्यकीय विभाग प्रमुख
response.lokprabha@expressindia.com