dr-avinash-kubalपाण्यावरील समग्र सृष्टीचा समान हक्क
डंपिंग ग्राऊंडवर महाराष्ट्र निसर्ग उद्यान हा  जगातील पहिलाच उपक्रम होता. त्यासाठी नियोजन करताना पिण्याच्या पाण्याचा झाडांसाठी वापर केला जात असल्याचे लक्षात आले. हे पाणी वाचविण्यासाठी उभारलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पातून आज वर्षांला दोन कोटी लिटर पाणी साठवले जाते. हे करताना योग्य नियोजनतून मुंबईतही पाण्याची बचत करता येते हे लक्षात आले म्हणून आम्ही विविध उपक्रमांमधून लोकांना जागृत करू लागलो.

निसर्गात पाण्याची एक व्यवस्था असून त्याचे नियोजन योग्य प्रकारे केलेले असते. प्रत्येक सजीवाला आपल्या वृद्धीसाठी पाणी लागते. जीवसृष्टीत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून माणसाने चंचुप्रवेश केला आणि तेव्हापासून पाण्यावर केवळ आपलाच हक्क असल्याच्या आविर्भावात माणूस वागू लागलाय. मात्र हे करीत असताना आपले जगणे सुसहय़ केलेल्या निसर्गातील वनस्पती, प्राणी आदी अनेक सजीवांचाही पाण्यावर आपल्याइतकाच हक्क आहे, हे आपण विसरलोय. प्राणी, वनस्पती त्यांना हवे तेवढाच पाण्याचा वापर करतात. माणूस मात्र पाण्याचा सर्वाधिक साठा, नासाडी आणि प्रदूषणही करतो. त्यामुळे प्राणी, पक्षी, वनस्पती यांची रोडावणारी संख्या ही आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे. निसर्गाची व्यवस्था कोलमडत असून त्याचा थेट परिणाम आपली शेती, आरोग्यावर होत आहे. हे रोखण्यासाठी पाण्यावर समग्र सृष्टीचा समान हक्क आहे हे मान्य करून त्या हक्कानुसार आपली कृती बदलायला हवी. सजीव सृष्टीचा पाण्यावरील हक्क अबाधित ठेवून त्यांना त्याचा वापर योग्य प्रकारे करण्याची मुभा दिली, तर सृष्टीचे चक्र कायम राहू शकते. त्यासाठी लोकसहभागातून पाण्याचे नियोजन केल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात.
– अविनाश कुबल,
उपसंचालक, महाराष्ट्र निसर्ग उद्यान

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके
Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
“गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, आम्ही..”; संजय राऊत यांची महायुतीवर टीका
Ajit Pawar Statement about Baramati
“बारामतीचा सस्पेन्स थोडा राहू देत, जे नाव तुमच्या मनात..”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य

dr-sachin-vasalkarआता तरी नद्यांचे पाणी वाचवायला हवे
आजवर सगळी मानवी संस्कृती नद्यांच्या तीरावर पोसली विकसित होत गेली आहे. त्यामुळे नद्या टिकल्या तरच आपली संस्कृतीही टिकेल. मात्र, सध्याची परिस्थिती भिन्न आहे. नदीकिनाऱ्यांवर झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. त्याचा ताण जलस्रोतांवर येतो आहे. नागरीकरणाच्या नादात नद्यांचे पाणी पळवण्याचा आणि वळवण्याचा प्रयत्न होतो. जंगलांचा नाश झपाटय़ाने होतो आहे. अशा परिस्थितीत गरज आहे भान राखण्याची. नद्यांचे पाणी वाचवायला हवे. जंगलांचा ऱ्हास थांबवणे गरजेचे आहे. नद्या जगल्या तरच आपली संस्कृती टिकणार आहे याचे भान बाळगले गेले पाहिजे. नागरीकरणाच्या झपाटय़ात विस्थापितांचे लोंढे वाढत आहेत. आíथक पॅकेज दिले की, विस्थापन होतेच असे नाही. विस्थापितांचे भावनिक आणि सामाजिक विस्थापनही होत असते. प्रत्येक गोष्ट पशांत मोजता येत नाही. त्यामुळे नागरीकरणाचा झपाटा कमी करून पाणी वाचवले पाहिजे. नद्या जगवल्या पाहिजेत. चंद्रपूर जिल्हय़ाला लागून गडचिरोली जिल्हा आहे. या दोन्ही जिल्हय़ांच्या सीमेवर प्राणहिता नदी वाहते. या नदीवर मोठा बॅरेज बांधून तिचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळवण्याचा आंध्र सरकारचा प्रयत्न होता. याबाबत महाराष्ट्र सरकारला मात्र अंधारात ठेवण्यात आले होते. या प्रकल्पात महाराष्ट्रातील एक पूर्ण अभयारण्य नष्ट तर होणारच होते, शिवाय आदिवासींच्या जीवनावरही दुष्परिणाम होणार होता. आम्ही या संपूर्ण प्रकल्पाला विरोध केला. प्राणहिता नदीचा प्रवाहच वळवण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकल्पांना प्रखरपणे विरोध व्हायला हवा. पाणी वाचवायला हवे. मंगळ ग्रहावर पाणी सापडल्याने आपल्याला जे कुतूहल वाटते ते वैज्ञानिक तहान भागवण्यासाठी पुरेसे आहे. अशीच काळजी आपल्या भूतलावरील पाणी वाचवण्यासाठी घेतली तर अनेक प्रश्न सुटतील.
– डॉ. सचिन वझलवार,
जल अभ्यासक

dr-prasanna-patilपाणी टिकवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
मराठवाडय़ाकडे कायमच दुष्काळी प्रदेश म्हणून पाहिले जाते. मात्र, या दुष्काळी प्रदेशात लोकसहभागातून पाणी वाचवण्याचे, शेती फुलवण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. औरंगाबाद आणि जालना अशा दोन जिल्हय़ातील १०२ गावे याचे उत्तम उदाहरण आहे. दुष्काळी भागातील लोकांची मानसिकता समजून घेतली गेली पाहिजे. तिथे केवळ आत्महत्याच होतात असे नाही. सकारात्मक गोष्टीही घडत असतात. त्यांचीही दखल घेतली जाणे गरजेचे आहे. दुष्काळामुळे लोकांमध्ये जागरूकता येते. पाण्याचे महत्त्व कळू लागते आणि मग त्यातून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे मनापासून प्रयत्न होऊ लागतात. पाणी वाचवण्याची ही गरज ओळखूनच आमचे कार्य सुरू आहे. जलसंधारणाच्या, पाणी वाचवण्याच्या आमच्या प्रयत्नांना आता लोक प्रतिसाद देऊ लागले आहेत. लोकांचा सहभाग वाढतो आहे. लोकसहभागातून अनेक कामे मार्गी लागत आहेत. तीन वर्षांपूर्वी जालना जिल्हय़ातील १५ गावांमधील ६०० शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी कर्जवाटप करण्यात आले होते. पहिल्यांदा कर्ज घेतल्यानंतर दोन वष्रे दुष्काळाचा सामना करावा लागला; परंतु त्याचा कर्जफेडीवर काहीही परिणाम झाला नाही. लोकसहभागातूनच हे शक्य झाले. पाणी असेल तरच जगणे सोपे होईल, ही जाणीव दुष्काळामुळे लोकांमध्ये निर्माण झाली आहे. लहानसहान कामांमधूनच स्थानिकांचा विश्वास निर्माण व्हावा, माणूस जागा व्हावा, सरकार व पाऊस यांच्यावर विसंबून राहण्याची मानसिकता बदलावी या दिशेने प्रयत्न सुरू असतो. आजच्या काळात साक्षर होण्याबरोबरच जलसाक्षर होणे ही गरज आहे. पाणी अडवण्याचे आणि जिरवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी लोकसहभाग वाढायला हवा.
– डॉ. प्रसन्न पाटील,
जल कार्यकर्ता.
response.lokprabha@expressindia.com