पर्यटन हे आजच्या काळातलं महत्त्वाचं क्षेत्र. तिथे करिअरच्या भरपूर संधीही उपलब्ध आहेत; पण फक्त भटकण्याची आवड असण्यापेक्षाही सेवाभाव हा मूलभूत गुणधर्म असणाऱ्या व्यक्तींना या क्षेत्रात जास्त चांगल्या प्रकारे वाव आहे.

एके काळी ‘पर्यटन म्हणजे तीर्थाटन’ अशी संकल्पना रूढ होती. त्याव्यतिरिक्त व्यापारउदिमासाठी जी काही भटकंती होत असेल तितपतच आपली देशाटनाची व्याप्ती होती; पण आज अशी परिस्थिती राहिलेली नाही. वर्षांतून एकदा का होईना ठरवून पाच-दहा दिवस भटकायचे हा ट्रेन्ड चांगलाच रुळला आहे. म्हणूनच नव्याने प्रस्थापित होत जाणाऱ्या आणि चलती असलेल्या व्यवसायामध्ये सध्या पर्यटनाचा क्रमांक वरचा लागतो. प्रत्येक देशाचे सरकारदेखील पर्यटन व्यवसायाला पूरक गोष्टी करताना दिसते; किंबहुना पर्यटनातून एकाच वेळी अनेक ठिकाणी व्यवसायाच्या संधी निर्माण होत असल्यामुळेदेखील पर्यटनाला चालना देणारे अनेक निर्णय होताना दिसतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत तर आनंदासाठी भटकंती ही कल्पनादेखील जनमानसात चांगलीच रुजलेली दिसून येते. त्यातूनच करिअरची हमखास संधी म्हणून तरुणांचा पर्यटन क्षेत्राकडील ओढा वाढताना दिसतो; पण नेमकं हे क्षेत्र काय आहे आणि या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर काय करावे लागेल हे पाहणे म्हणूनच महत्त्वाचे ठरेल.

पर्यटन व्यवसाय म्हटल्यावर अनेकांना आकर्षण असते ते अनेक देश भटकायला मिळतील, मज्जा करायला मिळेल याचे. पर्यटन व्यवसायात हे सर्व करता येतेच, पण त्याआधी या व्यवसायाचे मूलतत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा व्यवसाय सेवा क्षेत्रातला व्यवसाय आहे. योग्य वेळी योग्य ती सेवा देणे, तशी सेवा देता येत नसेल तर त्याबद्दल आपली चूक नसतानादेखील दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी असणे, त्याचबरोबर त्वरित दुसरा चांगला पर्याय उपलब्ध करून देणे आणि ग्राहकाला त्या कमतरतेची झळ बसू न देणे हे या व्यवसायाचे मूलतत्त्व आहे. पर्यटन व्यवसायाचा संपूर्ण डोलारा हा हॉस्पिटॅलिटीवर आधारित आहे. कोणताही ग्राहक तुमच्याकडे येतो तेव्हा त्याला केवळ भटकणे इतकेच अपेक्षित नसते. त्या भटकण्यातून आनंद मिळवायचा असतो आणि त्यासाठी त्याला भटकंतीबरोबरच इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे तुमचे कर्तव्य असते. त्यामुळे केवळ संधी आहेत म्हणून या व्यवसायात उतरण्यापेक्षा सेवाभाव हा मूलभूत गुणधर्म तुमच्यात आहे का हे पाहणे सर्वात महत्त्वाचे आहे. अन्यथा केवळ प्रशिक्षण घेतले म्हणून नोकरी मिळेल, पण त्यात प्रगती होणार नाही.

सध्या आपल्याकडे दोन मुख्य प्रकारे पर्यटन व्यवसाय चालवला जातो. मोठय़ा कॉर्पोरेट पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या पर्यटन कंपन्या आणि दुसरे म्हणजे वैयक्तिक पातळीवर छोटय़ा स्वरूपात चालवली जाणारी कंपनी. या दोन्ही प्रकारांमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. कॉर्पोरेट पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या कंपन्यांमध्ये तिकीट बुकिंग, ऑपरेशन्स (हॉटेल बुकिंग, स्थानिक वाहन व्यवस्था इ.), व्हिसा, विक्री, विक्री सपोर्ट, जाहिरात, पर्यटक संपर्क  अशा दहा ते बारा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याची संधी सध्या उपलब्ध आहे. पर्यटन क्षेत्रातील करिअरमध्ये साधारण दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे कार्यालयीन कामकाज आणि दुसरे प्रत्यक्ष टूरमध्ये संपूर्ण ग्रुपचे नियोजन. या सर्व कामासाठी वेगवेगळ्या प्रकाराच्या प्रशिक्षणाच्या सुविधा सध्या आहेत. काही पर्यटन कंपन्या स्वत:चेच अभ्यासक्रमदेखील चालवतात. अंशकालीन किंवा दीर्घकालीन अशा स्वरूपाचे पदवी, पदविका अभ्यासक्रम यासाठी विकसित केले जातात. मुख्यत: तिकीट बुकिंग, विविध देशांचे व्हिसाचे नियम व धोरणे, विमान कंपन्यांचे नियम, प्रवाशांचे हक्क सांभाळणारे कायदे आणि विविध देशांची भौगोलिक व इतर माहिती वगैरे गोष्टी या प्रशिक्षणातून कळू शकतात. पण मुळात एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल. केवळ प्रशिक्षण असणे एवढीच पात्रता असे गृहीत धरता येणार नाही. त्याचा वापर करताना प्रत्यक्ष फिल्डवरील ज्ञान महत्त्वाचे ठरते. तेच जर नसेल तर केवळ कागदोपत्री भरपूर माहिती असूनदेखील कधी कधी त्याचा योग्य वापर होऊ शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्रवेशाचं साधन म्हणून आपण प्रशिक्षणाकडे पाहू शकतो. पण केवळ ते ज्ञान आहे म्हणून तुम्ही पर्यटन क्षेत्रात यशस्वी करिअर करालच असे होत नाही.

पर्यटनातील दुसरा महत्त्वाचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांत चांगलाच रूढ झालाय तो म्हणजे एखाद्या विवक्षित विषयाला धरून आखलेल्या टूर्स. वन्यजीव पर्यटन, साहसी पर्यटन, सामाजिक पर्यटन, हेरिटेज पर्यटन इ. या प्रकारात नेहमीच्या लोकप्रिय पर्यटन स्थळांपेक्षा चाकोरीबाहेरील ठिकाणांना अशा सहली नेल्या जातात. केवळ स्थलदर्शनापेक्षा यामध्ये पर्यटन व्यावसायिकाचे विशिष्ट क्षेत्रातील कौशल्य हा घटक महत्त्वाचा असतो. वन्यजीवांबद्दलचे ज्ञान, पुरातत्त्व क्षेत्रातील अभ्यास, साहसी खेळांमधील कौशल्य या सर्वासाठी अंगी बाणवणे महत्त्वाचे आहे. पण केवळ त्या विषयांवर प्रभुत्व असून उपयोग नाही, तर तुम्ही तुमचं ज्ञान लोकांपर्यंत किती प्रभावीपणे पोहचवता त्याला अधिक महत्व आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही पर्यटकांना तुमच्या ज्ञाना व्यतिरिक्त सेवासुविधा कशा देता हेदेखील महत्त्वाचे असते. अन्यथा तुमची टूर रटाळ होऊ शकते. सध्या अशा प्रकारे एखादा विषय घेऊन त्यानुसार टूर आखण्याचा ट्रेण्ड आपल्याकडे फोफावलाय असे म्हणता येईल. एकंदरीतच ऑफबीट टूर करण्याची मानसिकता वाढताना दिसत असल्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर आहे असा विचार करून अनेक जण या मध्ये शिरकाव करताना दिसत आहेत. पण योग्य त्या तांत्रिक माहितीचा किंवा असलेली माहिती पर्यटकांपर्यंत पोहचवण्यातील कौशल्याचा अभाव आणि सेवा सुविधा देण्यातील कमतरता या कारणांमुळे त्यात म्हणावे तसे यश सर्वानाच लाभत नाही. त्यामुळेच अशा प्रकारचा ऑफ बीट पर्यटनाच्या व्यवसायात शिरण्यापूर्वी हे प्रश्न स्वत:ला एकदा विचारयला हवेत. एक मात्र निश्चित की या प्रकारच्या पर्यटनामध्ये प्रगतीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. एकतर त्यात नावीन्य आणण्यासाठी बरेच प्रयोग करायला वाव आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे लोकांनादेखील चाकोरीबाहेरचे काही तरी हवेच असते आणि त्यासाठी पैसे मोजायची तयारीदेखील असते. वन्यजीव आणि साहसी पर्यटनात बरेच प्रयोग यापूर्वी झाले आहेत. पण नव्याने विकसित होणाऱ्या हेरिटेज पर्यटनाला सध्या चांगलीच मागणी आहे. त्यातही भारताबाहेरील विशेषत: दक्षिण पूर्व अशियाई देशातील वारसा वास्तूंचे आकर्षण भारतीय पर्यटकांमध्ये वाढताना दिसत आहे.

वैयक्तिकरीत्या स्वत:ची छोटी पर्यटन कंपनी असो की एखादी प्रस्थापित कॉर्पोरेट कंपनी, त्यामध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळांची मागणी कायमच असते. अशा वेळी मात्र तुम्हाला उभा आणि आडवा दोन्ही प्रकारे विस्तार करावा लागतो. एखाद्या विवक्षित विषयाला जेव्हा तुमचे पर्यटन वाहिलेले असते तेव्हा पर्यटकांबरोबर बऱ्याच वेळा तुम्हाला स्वत:च जावे लागते किंवा तुमच्या कौशल्याच्या तोडीचा योग्य माणूस तुम्हाला तेथे पाठवावा लागतो. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी टुर्स आयोजित करणे शक्य होऊ शकत नाही; पण तुमचं वैयक्तिक कौशल्य हाच तुमचा सेलिंग पॉइन्ट ठरणारा असतो, अर्थातच तुमचा व्यवसाय एका ठरावीक गतीने वाढत राहतो; पण लोकप्रिय पर्यटनामध्ये विस्ताराला प्रचंड वाव असतो. तुम्हाला कोणत्याही एका विवक्षित मोसमामध्ये एकाच वेळी एकापेक्षा अनेक टुर्स आयोजित कराव्या लागतात. अशा वेळी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असतेच; पण त्याचबरोबर खेळत्या भांडवलाची गरजदेखील वाढते. लोकप्रिय पर्यटनस्थळांच्या टुर्समध्ये सध्या प्रचंड स्पर्धा दिसून येते. कमी खर्चात अधिकाधिक चांगल्या सुविधा देणे, टुरमध्ये अडथळे न येणे आणि जास्तीत जास्त स्थलदर्शन करवणे हे करताना तुमच्या अनुभवाचा कस लागतो. अर्थात कोणत्याही व्यवसायात अशी कमीअधिक आव्हानं असतातच. पर्यटन व्यवसाय हा सेवा क्षेत्रातील व्यवसाय असल्यामुळे एकदा आलेला पर्यटक पुन्हा तुमच्याकडे येण्यासाठी सेवा पुरवण्यात कोणतीही कमतरता राहणार नाही याबाबत तुम्हाला कायमच दक्ष राहावे लागते.

‘आनंदासाठी पर्यटन’ या संकल्पनेपलीकडे गेल्या दहा वर्षांत आणखीन एका संकल्पनेमुळे पर्यटन व्यावसायिकांना व्यवसायाची संधी मिळाली ती कॉर्पोरेट क्षेत्राकडून. मोठय़ा कॉर्पोरेट कंपन्यांच्या व्यावसायिक बैठका, वार्षिक समारंभ हे हल्ली परदेशात करण्याकडे अनेक कंपन्यांचा कल आहे. अशा वेळी केवळ पर्यटन असे या टुरचे स्वरूप न राहता त्या जोडीने व्यावसायिक गरजा पुरवणाऱ्या सुविधांचादेखील विचार करावा लागतो. त्याचे गणित पूर्णत: वेगळे असते. असे ग्राहक मिळवणे व जपणे हे पर्यटन व्यावसायिकाला चांगलीच चालना देणारे असते.

पर्यटन सहली आयोजित करणे हा या व्यवसायाचा मुख्य गाभा असला तरी हल्ली सहली आयोजनापेक्षा त्याच्याशी निगडित सुविधांची सोय करून देणे हादेखील एक व्यवसाय झाला आहे. यामध्ये मुख्यत: तिकीट बुकिंग, स्थानिक पातळीवरील वाहन व्यवस्था, हॉटेल बुकिंग अशा गोष्टींचा समावेश होतो. हल्ली एफआयटी या संकल्पनेत म्हणजे दोन-चार जणांच्या ग्रुपने पर्यटनाला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा अशा सहली आयोजित करून देण्यासाठी अनुभवी व कुशल व्यक्तींची गरज असते. तुमचा अनुभव कसा आणि किती आहे त्यावर अशा प्रकारचे ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतात.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com