ऑलिम्पिक सुरू झाल्यापासून एकेका क्रीडापटूच्या अपयशाचीच बातमी येत होती. साक्षी मलिकने कुस्तीत कांस्य पदक मिळवलं आणि सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं. या पदकाचा आनंद साजरा करण्याच्या मूडमध्ये सगळा देश असताना क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचं ट्वीट आलं, ‘साक्षी मलिक के गले मे मेडल कितना शोभा दे रहा है ना’ हा थेट शोभा डेंना मारलेला बाऊन्सर तमाम भारतीयांना सुखावून गेला. पण सेहवाग फक्त शोभा डेंना फटकावून थांबला नाही. त्याचं पुढचं ट्वीट होतं, ‘पुरा भारत साक्षी है की कोई बात मुश्कील हो तो इस देश की लडकियाही मालिक है।’

साक्षीचं कौतुक करून क्रीडा रसिक थकले नव्हते तोपर्यंत सिंधू अंतिम फोरीत पोहोचली. ती तर कांस्य पदकाच्याही एक पाऊल पुढे गेलेली. पण सगळ्यांना सुवर्णपदकच हवं होतं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून सिलसिला सुरू झाला. ‘सोनं आणि चांदी यात निवड करायची असते, तेव्हा भारतीय स्त्रिया सोन्याचीच निवड करतात.’ पण हा मेसेज सतत फॉरवर्ड व्हायला लागला तसं तो पाठवणाऱ्यांना- ‘सिंधूवर गोल्ड मेडलचं प्रेशर आणू नका. ती खेळाडू आहे, तुमची सून नाही,’ असंही बजावलं गेलं.

सिंधूची मॅच होती, त्या दिवशी ती क्रिकेटपटू नसूनही तमाम क्रिकेटवेडय़ा भारतीयांचा जीव तिच्या खेळात अडकला होता, श्वास थांबला होता. म्हणूनच सोशल मीडियावरून सिंधूचे आभारही मानले गेले, की ‘तुझ्यामुळे आज कोटय़वधी लोकांनी हा खेळ काय असतो ते पाहिलं तरी.’ तर काही जणांना सिंधूला सांगायचं होतं, ‘जगभरातून ट्विटरवर तुला मिळणारा सपोर्ट बघून विश्व सिंधु परिषद सुरू आहे असं वाटतंय.’

कुणी म्हणालं, ‘साक्षीचे कोच कुलदीप, दीपाचे कोच बिश्वेश्वर तर सिंधूचे कोच गोपीचंद.. म्हणजे आता प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष आहे, असं म्हणण्याची वेळ भारतीय पुरुषांवर आली आहे.’ या प्रतिक्रियेवरची पुढची कोपरखळी होती, ‘सगळ्या मुलींचे कोच पुरुष, याचा अर्थ ज्या बायका पुरुषांचं ऐकतात, त्याच यशस्वी होतात.’

साक्षी, सिंधू आणि दीपा यांच्या निमित्ताने सोशल मीडियावरून शेअर झालेल्या विनोदांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. कुणी म्हणालं, ‘भाग मिल्खा भाग’नंतर आता ‘पटक साक्षी पटक’, ‘स्मॅश सिंधू स्मॅश’ या सिनेमांची वाट पाहतोय. तर कुणी पुरुषांना बजावलं, ‘बॅडमिंटन आणि कुस्तीतली मेडल्स बायका आणणार.. गडय़ांनो तुम्ही मंगळागौर खेळायला चला’ कुणी याचीही आठवण करून दिली की, ‘भारतात भाजीपासून मेडलपर्यंत प्रत्येक गोष्ट आणण्यासाठी स्त्रीलाच जावं लागतं.’ आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पदकं का मिळत नाहीत, याची एक मल्लिनाथी होती ‘शाळेत खेळ नको, व्यायाम नको, पीटीच्या तासाला इतर विषयांचे पोर्शन पूर्ण करायला घेतात आणि म्हणे आलिम्पिकमधे मेडल हवे.’

कुणी याचीही आठवण करून दिली की दहावीत मुली टॉपर, बारावीत मुली टॉपर, ऑलिम्पिकमध्येही त्याच पदकं आणणार, मग मुलं काय फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांचे फोटो आणि स्टेट्स बघत बसणार की काय?’

याच दरम्यान रोहित खंडेलवालनं मिस्टर इंडिया स्पर्धा जिंकल्याची बातमी आली आणि आणखी एका मेसेजमध्ये भर पडली की, ‘दिवस बदलत आहेत. पूर्वी स्त्रिया सौंदर्य स्पर्धा जिंकायच्या आणि पुरुष कुस्ती जिंकायचे. उलटं झालंय.’

रिओमध्ये आपल्या वकुबाचं प्रदर्शन करणाऱ्या क्रीडा मंत्र्यांना नेटिझन मंडळी कुठली सोडताहेत. त्यामुळे एक मेसेज फिरत होता, ‘आता क्रीडा मंत्री इश्वर को साक्षी मानते हुए ऐवजी साक्षी को इश्वर मानते हुए अशी शपथ घेतील.’ सोशल मीडियावरून कोणतेही विनोद फिरतात तेव्हा त्या सगळ्यांना आलिया भटला आद्यस्थानी ठेवायचा मोह आवरतच नाही. त्यामुळे मेसेज आला, ‘ऑलिम्पिक पदक मिळवल्याबद्दल आलिया भटने अन्नू मलिक, साक्षी धोनी यांना शुभेच्छा दिल्या.’ ‘शोभा डे स्वत:चं नाव बदलून ‘वाभा डे’ ठेवणार’ असंही सगळ्यांनी सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं.

‘माझ्या एका मित्राच्या बायकोने विचारलं की, पुरुषांच्या ऑलिम्पिक स्पर्धा कधी सुरू होणारेत?’ असं म्हणत एकही पदक न मिळवणाऱ्या पुरुष खेळाडूंना चिमटे काढले गेले, तर ‘रक्षाबंधनाच्या दिवशी एका बहिणीनं मेडलजिंकून सगळ्या भावांची लाज राखली आहे,’ किंवा ‘ज्या देशात सवाशे कोटी लोक मिळून एका मुलीची इज्जत वाचवू शकत नाहीत, तिथे एका मुलीने सव्वाशे कोटी लोकांची इज्जत वाचवली आहे,’ असं म्हणत साक्षीला सॅल्यूट दिलं गेलं. या सगळ्याला देशातली पुरुषप्रधान संस्कृती, साक्षीच्या राज्यात, हरयाणात असलेलं खाप पंचायतीचं प्राबल्य, तिथे सगळ्यात कमी असलेला स्त्रियांचा जन्मदर या सगळ्यांचा आवर्जून संदर्भ दिला गेला. ‘सरकार कधीपासून बेटी बचाओ म्हणतंय, अज दो बेटीयोने बचाही लिया.. देश बेटी बचाओ मिशनवर आहे की मुली देश बचाओ मिशनवर,’ असं विचारत ‘तुझं चांदीचं पदक आमच्यासाठी सोन्यापेक्षाही महत्त्वाचं आहे,’ असं सिंधूला कौतुकाने सांगितलं गेलं. मुलींना गर्भाशयातच मारलं नाही, तर त्या काय करू शकतात, याचं उदाहरण साक्षी आणि सिंधू या दोघींनी घालून दिलं आहे, असं म्हणत नेटिझन्सनी स्त्रीभ्रूणहत्येवरचा आपला रागही व्यक्त केला.

अर्थात अशा शब्दांत साक्षी आणि सिंधूचं कौतुक करतानाच त्या दोघींची जात गुगलवर सर्च केली गेली, हे कटू सत्य विसरता येत नाहीत.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com