scorecardresearch

सेलिब्रिटी लेखक : पॅन केक

परवा सेटवर सीनसाठी गेले, तेव्हा मॉनिटरपुढे एकाचा मोबाइल होता, आणि त्यासमोर सगळ्यांची गर्दी.

सेलिब्रिटी लेखक : पॅन केक

सेलिब्रिटींचं आयुष्य असतं तरी कसं, कुटुंब- मित्रपरिवाराशी असलेलं त्यांचं नातं, त्यांच्या आवडीनिवडीं, त्यांच्या मनातल्या गोष्टी आणि बरंच काही.! हे सगळं वाचा नव्या वर्षांत नव्या कोऱ्या सदरातून ‘सेलेब्रिटी लेखक’.
परवा सेटवर सीनसाठी गेले, तेव्हा मॉनिटरपुढे एकाचा मोबाइल होता, आणि त्यासमोर सगळ्यांची गर्दी. काय चाललंय विचारल्यावर कुणी तरी म्हणालं, शाहरुखचा ‘दिलवाले’ पाहतोय. एकाने मोबाइलवर डाऊनलोड केलाय; कमाल आहे! आज रिलीज झालेला सिनेमा तिसऱ्या दिवशी उपलब्ध आहे मोबाइलमध्ये.. ‘शोले’ दशकभर चालला आणि आजच्या पिढीलाही माहीत आहे; हीच आमची पिढी शाहरुखचा ‘दिलवाले’आधीचा सिनेमा विचारल्यावर काही क्षण घेते हो आठवायला. नाही! आमचा शाहरुख खूप मोठा आहे बरं का! पण एन्टरटेनमेंटची साधनंच इतकी वाढली आहेत की आम्हालाच आमच्या या एन्टरटेनमेंट फिल्डबद्दल धास्ती निर्माण झालीए. आता तुम्हीच बघा ना, विचार न करता पटकन डोक्यात येणारी पाच गाणी सांग म्हटल्यावर जुनीच गाणी येतात ओठांवर; का? आजची गाणी वाईट आहेत? नाही हो! पण माध्यमांचा स्फोटचं आज एवढा झालाय की, एखादी कलाकृती पूर्ण कळवून घ्यायच्या आतच दुसरी हजर आहे.. म्हणूनच असेल कदाचित, ‘आभाळमाया’मधली ‘सुधा जोशी’ आम्हाला आजही आठवते. पण तीच ‘जुळून येती रेशीमगाठी’मधली ‘माई’ बनते तेव्हा सीरियलसारखीच कधी ऑफ मेमरी होते कळतच नाही. आर्टिस्ट तीच, कष्टही तेच आणि हुशारीही तीच, पण आजच्या काळासाठी ती ऑप्शन झाली आहे (पर्याय). तुमचीसुद्धा चूक नाही म्हणा. आज रिपिट टेलिकास्ट आणि रेकॉर्डिगची सुविधा उपलब्ध आहे. आणि प्रत्येकाचीच सतत अपडेटेड राहण्याची धडपडही आहेच.
आताचं उदाहरण सांगते, फेब्रुवारी २०१६ मधला माझ्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाचा दुबई दौरा थोडा आणखी पुढे गेलाय. का, तर मराठीतले ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ आणि ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’, हे तीन सुंदर सिनेमेही दुबईत असणारेत त्याचदरम्यान. पुन्हा मुद्दा ऑप्शनचाच.. पण मला या गोष्टीचा आनंदच आहे. आपली मायबोली सातासमुद्रापलीकडे ऑप्शन देऊ शकण्याइतपत मोठी झालीए.
आजचा काळच असा झालाय की, दिवसागणिक नव्याने उगवण्याची धडपड सुरू असते आमची, पण तितकीच रात्री मावळण्याची भीतीसुद्धा आहेच. म्हणूनच तर आज हिंदी-मराठी भाषांमधल्या सिनेमांमध्ये दिसणारे आम्ही कलाकार, सिनेमात दिसतो त्यापेक्षा त्याच्या प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटिझ्मध्ये जास्त दिसायला लागलोय. आता हा बाजीराव नाही का, चंदेरी पडद्यावर दिसतोय त्यापेक्षा जास्त फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, मॉलस्, कॉलेजेसमध्ये धडपडतोय. माध्यमांचा डोलाराच इतका की तो तरी काय करेल बिचारा. पण असं धडपडताना आमच्यातली एक्स्क्ल्युझिव्हिटी टिकून राहील का? बरं, हेही नाकारता येत नाहीच की, पूर्वीसारखी सिनेमाची एका छोटय़ा चौकटीमधली पेपरात येणारी अ‍ॅड आज माध्यम म्हणून पुरेनाशी झालीए. मुळात सकाळी चहाबरोबर वृत्तपत्र वाचण्याच्या निवांतपणालाच मुकलोय ना आपण. आज आई-बाबांची पिढी पटकन म्हणून जाते.. ‘‘आमच्या काळाची बातच और होती!’’ अहो, आम्ही हे नाकारत नाहीच आहोत, पण तुम्हीही समजून घ्या ना; ऋ षी कपूरला तो कोणत्या ‘जिम’मध्ये जात होता हे विचारलं नाही गेलं हो कधी! आमच्या रणबीरला ते सांगण्यावाचून आज गत्यंतर नाहीए. ‘प्रेक्षक मायबाप’ थेट पोहोचू शकतायत आमच्यापर्यंत म्हटल्यावर आम्हाला उत्तरं तर द्यावीच लागतात. माझ्या असं एकंदर लक्षात आलं की, आज आम्हा कलाकारांसमोर दोनच पर्याय उरलेत.. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून स्वत:ला रितं करून टाकणं (‘ओव्हर एक्सपोझड्’ म्हणू या की आपण), किंवा वेळ घेत- घेत स्वत:ला पुरवून खूप काळ टिकवून वापरणं, अर्थात असं करतानाही २५ वर्षांनंतर आमचा ‘करियर ग्राफ’ कुठे असेल याचा हवाला दैवावरच.
किती वेगाने धावतंय आज जग! पूर्वीच्या काळातले नाटकाचे दौरेही महिना-महिना चालायचे. आजचे दौरे ३ किंवा ४ दिवसांवर आलेत. त्या काळासारख्या नाटकाच्या तालमी तरी कुठे करू शकतोय आज? थोडक्यात आणि संक्षिप्त रूपात मिळेल ते आपलं असं मनात समाधानाचा आव आणत जगतोय आम्ही. काय गंमत आहे ना! लहानपणी वाचनात आलेली छानशी, मनाला भावलेली एखादी गोष्ट माझ्या वहीत उतरवायचे मी. काही वेळा खोलवरचा अर्थही नाही समजायचा. व. पु. काळेंच्या अशाच उतरवलेल्या दोन ओळींचा तोच खोल अर्थ आज उलगडतोय.. ‘रेडीमेड’ उत्तर म्हणजे ‘शॉर्टकट’, आयुष्य सोपं होईल कदाचित, पण समृद्ध होणार नाही.. अशीच काहीशी गत झालीए आमच्या पिढीची.
‘लाइफ हॅज बिकम् अ रेस्..’ मी लहान होते ना, तेव्हा माझ्या अंगणात पारिजातकाचं झाड दिमाखात डोलायचं आणि रोज सकाळी त्याच्या भोवतालची जमीन शुभ्र झालेली दिसायची. त्या वेळी मी सकाळी उठून नित्यनियमाने देवघरातल्या पूजेसाठी फुलं वेचून आणायला जायचे आणि त्या सुवासात काही क्षण जास्तचं रेंगाळायचे. आज स्वत:च्या नवीन जागी राहायला येऊन वर्ष होत आलं. परवा वॉकला गेले तेव्हा अचानक जाणवलं या ‘लाइफ रेस’मध्ये स्वत:ला टिकवून ठेवण्याच्या धडपडीत तोच लहानपणचा सुगंधी अनुभव तुडवला जातोय. वर्षभर पायाखाली. खरं सांगते, त्या क्षणी ते पारिजातकाचं झाड जितकं केविलवाणं वाटलं त्यापेक्षा जास्त स्वत:चीच कीव केली मी.. आज देव्हाऱ्यातला आमचा देवबाप्पाही किती समंजस झालाय, ब्रँडेड् अगरबत्त्यांमधून येणाऱ्या सुवासानेचं समाधान मानून आम्हाला सांभाळण्याची ग्वाही देतोय.
आता तुम्ही म्हणाल, मघापासून मी फक्त माझं क्षेत्र, त्यातून येणारं रितेपण, माझी धडपड, तेजश्री प्रधानबद्दल बोलते. पण तुम्हाला लक्षात येतंय का? आज चेहरा हरवण्याची भीती ही फक्त मलाच नाही आहे.. तुम्हालाही आहेच की, आता हेचं बघा ना, पूर्वीचं १५ पैशाचं पोस्टकार्ड आपल्याला किती आनंद द्यायचं! मग त्या वेळी पोस्टमनची वाट पाहण्यापासून त्यावरचा मजकूर वाचून एखाद्या आवडत्या पुस्तकात किंवा डायरीत जतन करू ठेवेपर्यंत सगळं करायचो आपण. आजही जुनं एखादं कागदाचं चिटोरं आवराआवरीत अचानक समोर येऊन ‘स्मित’ उमटवतंच की आपल्या चेहऱ्यावर. ती मजा आजच्या फॉर्वर्डेड मेसेजेसमध्ये खरंच आहे का? अहो, मुळात आपण रिसिव्ह करतो त्या मेसेजेसमधले किती शब्द समोरच्याच्या मनातून आलेले असतात आणि तुम्ही पाठवता ते तरी किती तुमच्या स्वत:चे असतात? यावरून एक गोष्ट आठवली की दिवाळीच्या दरम्यान एका मैत्रिणीने मेसेज पाठवला, ‘अण्णा आज सकाळी दगावले’ असा. त्या मेसेजला रिप्लाय म्हणून कित्येकांनी ‘विश यू द सेम’, ‘हॅपी दिवाली’, ‘मे धिस दिवाली..’ असे रिप्लाय केले. चूक कोणाचीच नाही. कारण सणावारांना मेसेज बॉक्स इतका तुडुंब भरून वाहत असतो की कधी तरी आपणही मेसेजेस् न वाचता रिप्लाय करून मोकळे होतो आणि जिथे मेसेजस् वाचून रिप्लाय करतो, त्या रिप्लायमधल्या शब्दांवरूनच आजकाल आपल्या आयुष्यात ‘त्या’ व्यक्तीच असलेलं स्थान ठरायला लागलय. म्हणजेच अत्यंत जवळच्या माणसाला ‘इट मीनस् अ लॉट’, ‘थँक्यू सो मच्’ अशापासून ळ.. किंवा ३८ इतकंच रिप्लाय करण्यापर्यंत.
आज वेग इतका वाढलाय की, मीडियामार्फतही कळलेल्या एखाद्या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त करेपर्यंत दुसऱ्या चॅनेलवर एक नवी घटना उभी राहते. व्यक्त होण्यासाठी वेळ कुठे उरलाय? आपण निबरपणे सामोरे जातोय सगळ्याला. अहो, या माध्यमांच्या स्फोटानेच भाबडेपणाही हरवायला लागलाय. आज आपल्या आजूबाजूची आपली माणसंही कुठे तरी टीव्हीतल्या पात्रासारखीच भासायला लागीलयेत. घरातलं लहान मूल नाही का, ‘‘ममा, तुला कळत नाही गं’’ असं म्हणत सोशल मीडियावरचं अनुकरण करीत आपल्या आई-वडिलांना शहाणपण शिकवण्याइतपत मोठं होऊन गेलंय आणि दुर्दैवी गोष्ट अशी आहे, त्याचं बालपण हरवतंय हे त्याच्या गावीच नाहीए; कारण मुळातच आपल्याजवळची एखादी गोष्ट लांब जाते हे कळण्यासाठीही, ती गोष्ट कधी तरी जवळ होती ही ‘जाणीव’ गरजेची असते.
माझ्या कामाचा आवाका थोडाफार वाढल्यावर आणि मूलभूत गरजा भागवल्या जाऊन पैसे हातात उरायला लागल्यावर मी माझी पहिली मेकअपची व्हॅनिटी घेतली. ‘लेक लाडकी या घरची’ नावाची मालिका नुकतीच सुरू झाली होती माझी. नवीन आणलेल्या गोष्टींवर, मग ती निर्जीव असली तरीही, ‘आपली आहे’ या भावनेने माया करण्याची सवय मला पूर्वीपासूनच आहे; त्यामुळे माझ्या व्हॅनिटीमधल्या मेकअपच्या छोटय़ा-मोठय़ा सगळ्या सामानावर मी प्रेम करते; तर या सामानात एक ‘पॅनकेक’ असतो. मेकअप पूर्ण होत आल्यावर ब्रश थोडासा पाण्यात भिजवून या पॅनकेकवरून फिरवून चेहऱ्यावर फायनल टच् देतात मेकअपला. क्रायलॉन नावाच्या ब्रॅण्डच्या या पॅनकेकवर मध्यभागी क्रायलॉनचाच सिम्बॉलिक एक चेहरा असतो; मला आठवतोय मेकअप दादांनी पहिल्यांदा तो पॅनकेक वापरायला काढला तेव्हा मी त्यांना म्हणाले होते, ‘‘दादा, त्या चेहऱ्याच्या आजूबाजूनेच ब्रश फिरवा. तो चेहरा डिस्टर्ब होणार नाही असं बघा’’ आणि मग ‘लेक लाडकी..’ची तीन वर्षे मी आणि मेकअप दादांनी मिळून तो चेहरा सांभाळला.
आता हा विषय तुमच्यासमोर काढण्याचं कारण अचानक काही तरी जाणवलं, ‘‘तो पॅनकेकवरचा चेहरा जपू पाहणारी ‘मी’ कदाचित नकळत तेव्हापासूनच स्वत:चा चेहरा जपण्याची धडपड करत्येय आणि कायम करीत राहीन.’’

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2016 at 00:37 IST

संबंधित बातम्या