scorecardresearch

Premium

भटकंती देवभूमीतील चारधामची

चारधाम यात्रेला आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून धार्मिक महत्त्व आहे.

chardham yatra
चारधामची भटकंती करताना आजूबाजूला निसर्गाची विविध रूपं अनुभवता येतात.

चारधाम यात्रेला आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून धार्मिक महत्त्व आहे. त्यासाठी या परिसरात फिरताना हा अत्यंत रमणीय, नितांतसुंदर परिसर उघडय़ा डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने अनुभवावा असा आहे.

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

हिमालयो नाम नगाधिराज:

पूर्वापरौ तोर्यनिधी वैगाह्य  स्थित:

पृथिव्या इव मानदंड:

महाकवी कालिदास कुमारसंभव या आपल्या अजरामर काव्यात भव्य-दिव्य नगाधिराज हिमालयाचे असे वर्णन करतात. पृथ्वीचा मानदंड असलेल्या या देवतात्मा हिमालयाच्या अंगाखांद्यावर अनेक सुंदर गोष्टी वसलेल्या आहेत. चीड-देवदारसारखे सूचिपर्णी वृक्ष, अनेक तऱ्हेची फुले-फळे, नद्या, त्यांची खोरी, उंचच उंच हिमशिखरे, अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि त्यांच्या सान्निध्यात रुजलेली लोकसंस्कृती. उत्तराखंड राज्य या सर्व निसर्गसंपत्तीने नटलेले आहे. या राज्याचे प्रामुख्याने कुमाऊँ आणि गढवाल असे दोन भाग पडत असले तरी गढवाल हा प्रदेश श्रद्धाळू, पर्यटक आणि गिर्यारोहक या सर्वाच्याच दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. या भूमीला देवभूमी असे नाव मिळण्याचे हेच तर कारण आहे. अतिशय प्रसन्न आणि आल्हाददायक हवा, रम्य निसर्ग आणि त्यात वसलेली सुंदर देवळे. गढवालमधील गंगोत्री-यमुनोत्री-बद्रीनाथ-केदारनाथ या चार तीर्थक्षेत्रांना चारधाम असे संबोधले जाते, त्यांची यात्रा करणे हे पुण्यप्रद मानले जातेच, परंतु त्याचसोबत या चार ठिकाणांची भटकंती ही तिथे असलेल्या निसर्गामुळे अतिशय प्रेक्षणीय होते. या चारधामांची काही एक खास वैशिष्टय़े आहेत. हे चारही धाम हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे बंद असतात. त्या काळात गंगोत्रीची पूजा ‘मुखवा’ इथे, यमुनोत्रीची पूजा ‘जानकीचट्टीला’, बद्रीनाथची पूजा ‘जोशीमठला’ तर केदारनाथची पूजा ही ‘उखीमठ’ या ठिकाणी केली जाते. वर्षांतले सहाच महिने हे धाम उघडे असल्यामुळे त्या काळात इथे भाविकांची आणि पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. िहदू पंचांगानुसार अक्षय्यतृतीयेला, म्हणजे साधारणपणे एप्रिल-मे या काळात या चारही मंदिरांचे दरवाजे उघडतात आणि अधिकृतपणे ही यात्रा सुरू होते. याच काळात आपल्याकडे सुट्टय़ांचा काळ आणि उन्हाळासुद्धा तीव्र असल्यामुळे भटकंतीसाठी हिमालयात चारधामला जाणे अतिशय सोयीचे ठरते. दिवाळीपासून पुन्हा हे चारधाम सहा महिन्यांसाठी बंद असतात.

06-lp-char-dham-yatra

चारधामची भटकंती करताना आजूबाजूला निसर्गाची विविध रूपं अनुभवता येतात. या चार मंदिरांसोबतच त्यांच्या आजूबाजूला असलेल्या विविध ठिकाणांना भेट देणे अत्यंत आवश्यक असते. चारधामची यात्रा अमुक ठिकाणाहून सुरू करावी आणि अमुक ठिकाणी संपवावी असे कोणी सांगत असले तरी त्याला विशेष काही अर्थ नाही. आपल्याला आवडेल तशा मार्गाने ही भटकंती करावी. कुठेही आधी गेले म्हणून काही फरक पडत नाही. या प्रत्येक ठिकाणी निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. गंगोत्री आणि बद्रीनाथ इथे मंदिरापर्यंत गाडीमार्ग आहे, तर यमुनोत्री आणि केदारनाथ या ठिकाणी पायपीट करावी लागते. हिमालयात वातावरणाशी समरस होणे आवश्यक असते त्यामुळे शक्यतो सुरुवातीपासून पायपीट ठेवू नये. मुळात ही यात्रा/भटकंती सुरू होते ती हरिद्वार येथून. राज्य परिवहनच्या बसेस किंवा खासगी वाहन घेऊन आपण ही भटकंती करू शकतो. खासगी वाहन असेल तर हवे त्या ठिकाणी हवा तेवढा वेळ आपल्याला घालवता येतो. हरिद्वार आणि हृषीकेशला अनेक प्रवासी संस्था आपली चारधाम प्रवासाची व्यवस्था करून देतात. प्रत्यक्ष तिथे जाऊन आपल्या प्रवासाची दिशा ठरवणे सोयीचे जाते.

हरिद्वार

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेचं प्रवेशद्वार म्हणून हरिद्वार हे गाव ओळखले जाते. (समुद्रसपाटीपासून उंची २८० मीटर) हरिद्वार किंवा हरद्वार असा उल्लेख होत असलेले हे गाव मंदिरे-धर्मशाळा आणि गंगेचे घाट आणि तिथे संध्याकाळी होणारी गंगेची आरती यासाठी प्रसिद्ध आहे. चंडीदेवी आणि मनसादेवी टेकडय़ांच्या मधून वाहत येणारी भागीरथी गंगा इथे पहिल्यांदा सपाटीवर येऊन वाहू लागते. इथेच एक विष्णूचे मंदिर आहे त्याला म्हणतात हरीची पायरी किंवा हरी की पौडी. इथेच संध्याकाळी नेत्रदीपक अशी गंगेची आरती केली जाते. कनखल, मनसादेवी, चंडीदेवी, बिल्वकेश्वर ही इथली इतर ठिकाणे भेट देण्याजोगी आहेत. हरिद्वारबद्दल एक लोककथा प्रसिद्ध आहे. एकदा पार्वती महादेवाला विचारते की आजारी, वृद्ध, अपंग असे लोक ही कठीण अशी चारधामची यात्रा करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी काय प्रयोजन आहे? यावर महादेव म्हणतात की अशा लोकांनी हरिद्वार इथे गंगेमध्ये स्नान केले तर त्यांना या चारधाम यात्रेचे पुण्य प्राप्त होईल. त्यामुळेच की काय ही चारधाम यात्रा हरिद्वार इथे गंगास्नान करून सुरू होते. सध्या दळणवळणाच्या अनेक सोयी उपलब्ध असल्यामुळे ही यात्रा निश्चितच सुखकर झालेली आहे. परंतु पूर्वी ही सर्व यात्रा पायी केली जायची आणि इतकी खडतर यात्रा पूर्ण होईल का नाही याची खात्री नसल्यामुळेच कदाचित ही दंतकथा आली असावी. कारण काहीही असो हरिद्वार या अत्यंत रम्य आणि पवित्र ठिकाणाहून आजही ही चारधाम यात्रा सुरू होते.

गंगोत्री

आपल्या देशात गंगेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच गंगेच्या उगमाशी जाण्याचा प्रवास हा अतिशय नयनरम्य आहे. हरिद्वारपासून गंगोत्रीचे अंतर २९० किमी इतके भरते. (समुद्रसपाटीपासून उंची ३०४८ मीटर/ ९९९८ फूट) ते एका दिवसात जाऊ नये. हिमालयातील यात्रेमध्ये उंचीमध्ये एकदम फरक पडतो. उंचीवरील ठिकाणी एकदम कधीही जाऊ नये. वातावरणाशी समरस होण्यासाठी कमी उंचीवरील ठिकाणी एक मुक्काम अवश्य करावा. दुसऱ्या दिवशी पुढचा प्रवास सुरू करावा. म्हणून २८० मीटर/९१८ फूटवरील हरिद्वारपासून ३०४८ मीटर/९९९८ फूट उंचीवरील गंगोत्रीचा प्रवास एका दिवसात करू नये. हरिद्वारवरून १९० कि.मी. वर असलेल्या उत्तरकाशी इथे मुक्काम करावा. उत्तरकाशी (उंची ११५८ मीटर/३७९८ फूट) अतिशय रमणीय ठिकाण आहे. तिथे नेहरू गिर्यारोहण संस्थेला अवश्य भेट द्यावी. दुसऱ्या दिवशी उत्तरकाशी ते गंगोत्री हा १०० किमीचा रम्य प्रवास करून गंगोत्री या ठिकाणी पोहोचता येते. वाटेत गंगनानी, हरसील, भटवाडी ही अतिशय सुंदर ठिकाणे मुद्दाम थांबून पाहण्याजोगी आहेत. गंगनानी इथे गरम पाण्याचे कुंड आहे. पूर्वी पायी प्रवास करणारे यात्रेकरू इथे थांबून गरम पाण्याने स्नान करून आपला शिणवटा घालवत असत. या ठिकाणी बसेस थांबत नाहीत परंतु आपले स्वत:चे वाहन असेल तर इथे अवश्य थांबून गरम पाण्याच्या कुंडात स्नान करावे. गंगनानी या ठिकाणी पूर्वी पराशर ऋषींचा आश्रम होता असे सांगतात. पुढे लंका नावाचे गाव लागते. ही रावणाची लंका नाही बरं. पूर्वी लंका इथे पूल नसल्यामुळे नदीपात्रापर्यंत खाली उतरणे आणि परत भरवघाटी चढणे असा द्राविडी प्राणायाम करावा लागायचा, परंतु आता इथे नदीपासून ४१० मीटर उंचीवर पूल झाला आहे. त्यामुळे खूप मोठी सोय झाली आहे. या ठिकाणी जुना यात्रामार्ग अवश्य पाहावा. इथून आपण पुढे येतो ते गंगोत्री इथे. हे अत्यंत रम्य ठिकाण आहे. इथे निवासाची मुबलक सोय आहे. गंगेचे स्वच्छ आणि फरसबंदी प्राचीन मंदिर आणि त्या मंदिरात संध्याकाळी होणारी गंगेची आरती अजिबात चुकवू नये. या मंदिराचा जीर्णोद्धार अमरसिंह थापा या नेपाळच्या गुरखा जनरलने केल्याची नोंद आहे. इथे गंगेचा खळाळता प्रवाह सतत सोबत करत असतो. इथे भाविक होऊन पुण्य लाभत असेलही, परंतु हा सगळा प्रदेश उघडय़ा डोळ्यांनी आवर्जून पाहावा. गंगोत्रीवरून विविध हिमशिखरे आपल्याला दर्शन देतात. भागीरथी, वासुकी, थलयसागर ही त्यातली काही होय. शांत रम्य परिसर आणि आजूबाजूला हिमाच्छादित शिखरे पाहून इथून पाय हलत नाहीत. आपले शारीरिक स्वास्थ्य उत्तम असेल तर गंगोत्री ते गोमुख हा ट्रेक करायला हरकत नाही. दोन दिवसांच्या या ट्रेकसाठी साधनांची उपलब्धता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक सोबत हवा. गोमुख या ठिकाणी गंगेचा उगम पाहता येतो. वाटेत चिडबासा आणि भोजबासा ही ठिकाणे लागतात. पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे आता या ट्रेकवर अनेक र्निबध आलेले आहेत. याची पूर्वतयारी उत्तरकाशी इथूनच करून जावी.

07-lp-char-dham-yatra

यमुनोत्री

गंगेसोबतच नाव घेतले जाणारी नदी म्हणजे यमुना. यमुनेचा उगमदेखील गढवाल या देवभूमीमध्ये आहे. हरिद्वार अथवा ऋषिकेश इथून नरेंद्रनगर-दोबाटा-टेहरी-धारासू-बडकोट माग्रे जानकीचट्टीपर्यंत हा प्रवास मार्ग आहे. गंगोत्री ते यमुनोत्री असा प्रवास करूनसुद्धा आपण उंचावरील यमुनोत्री पाहू शकतो. (समुद्रसपाटीपासून उंची ३०२३ मीटर ९९१५ फूट) गंगोत्रीला राहिल्यामुळे आपले शरीर उंचीला समरस झालेले असते, त्यामुळे यमुनोत्री इथली उंचीवरील पायपीट सुसह्य़ होते. गंगोत्री-लंका-हरसील-गंगनानी-भटवाडी-उत्तरकाशी-धारासू-ब्रह्मखाल-बडकोट-सयानाचट्टी-हनुमानचट्टी-जानकीचट्टी-यमुनोत्री असा हा प्रवासमार्ग आहे. जानकीचट्टी इथे गाडीरस्ता संपतो. इथून यमुनोत्रीला पायी जावे लागते. जानकीचट्टी ते यमुनोत्री हे अंतर सहा कि.मी.चे आहे. एका बाजूला सलग उंच डोंगर आणि दुसरीकडे दरी अशा सुंदर प्रदेशातून आपली पायपीट चालू असते. इथे घोडे, खेचरे भाडय़ाने उपलब्ध होतात. चालणे शक्य नसेल तर घोडे करावेत अन्यथा चालत जाणे केव्हाही उत्तम ठरते. एकतर आजूबाजूचा निसर्ग मनसोक्त न्याहाळत आपण चालू शकतो. आपल्या मनाप्रमाणे वाटेत थांबून फोटोग्राफी करता येते. यमुनोत्रीचे मंदिर टेहरी नरेश महाराज प्रतापशाह यांनी बांधले आहे. काळ्या पाषाणातील यमुनेची मूर्ती साधारण दोन फूट उंचीची आहे. यमुनोत्रीचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेली गरम पाण्याची कुंडे. मंदिराशेजारी असलेल्या कुंडाला सूर्यकुंड असे नाव असून इथे एका पुरचुंडीमध्ये तांदूळ, बटाटे घालून ते त्या गरम पाण्यात सोडतात. दहा ते पंधरा मिनिटांत ते चांगलेच शिजून तयार होतात. यमुनेचा उगम यमुनोत्रीला आहे असे जरी समजले जात असले तरी मूळ उगम तिथून पुढे चार कि.मी. वर आहे. अतिशय अवघड अशी ११०० मीटर उंच चढण चढून गेल्यावर चार हजार ४२१ मीटर उंचीवरच्या कािलद पर्वतावर असलेल्या खऱ्या उगमापाशी पोचणे काहीसे अवघडच समजले जाते.

बद्रीनाथ

चारधाम यात्रेमधील हे विष्णुक्षेत्र. इथे येण्याचा मार्ग हा सर्वात जास्त रमणीय आणि निसर्गसमृद्ध असा आहे. (समुद्रसपाटीपासून उंची ३११० मीटर/ १०२०० फूट) अनेक महत्त्वाची ठिकाणे आपल्याला वाटेत लागतात. तसेच बद्रीनाथ परिसरातसुद्धा खूप निरनिराळी अवश्य बघावीत अशी ठिकाणे आहेत. हृषीकेशवरून इथे येण्याचा मार्ग अतिशय रमणीय आहे. प्रयाग म्हणजे दोन नद्यांचा संगम. या मार्गावर आपल्याला एक दोन नव्हे तर पाच प्रयागांचे दर्शन होते. पहिला देवप्रयाग. भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम देवप्रयाग इथे होतो. इथून पुढे या प्रवाहाला गंगा असे म्हटले जाते. तोपर्यंत तिचे नाव भागीरथी असे आहे. देवप्रयागला रघुनाथाचे प्राचीन मंदिर आहे. याची स्थापना श्रीशंकराचार्यानी केली असून देवशर्मा नावाच्या व्यक्तीने याचा जीर्णोद्धार केलेला आहे. इथून पुढे श्रीनगर (काश्मीरमधले श्रीनगर वेगळे) माग्रे आपण येतो रुद्रप्रयागला. इथे मंदाकिनी आणि अलकनंदा यांचा संगम आहे. रुद्रप्रयाग म्हटले की जिम कॉब्रेट आणि नरभक्षक चित्ता यांची हटकून आठवण होते. इथे असलेल्या गुलाबराय या वस्तीजवळ हा नरभक्षक चित्ता मारला गेला ती जागा आणि आंब्याचे झाड आजही अस्तित्वात आहे. पुढे येतो कर्णप्रयाग. पिंडारी हिमनदीपासून तयार झालेली िपडर गंगा आणि अलकनंदा यांचा इथे संगम आहे. कर्णाने इथेच सूर्याची उपासना करून त्याच्याकडून कवचकुंडले प्राप्त करून घेतली होती अशी कथा आहे. इथून पुढे येतो नंदप्रयाग. नंदाकिनी आणि अलकनंदा यांच्या संगमाचे हे ठिकाण. नंदादेवी परिसरात जाण्यासाठी नंदप्रयागवरून रस्ता आहे. पुढे चमोली-ध्यानबदरी-हेलंग-जोशीमठ माग्रे विष्णुप्रयाग येते. इथे अलकनंदा आणि धौली गंगा यांचा संगम आहे. पुढे देवदेखणी हे सुंदर ठिकाण येते. इथून बद्रीनाथ आणि बदरी गावाचे दर्शन होते म्हणून हे देवदेखणी. इथून पुढे आल्यावर ऋषिकेशपासून सुरू झालेला ३०० कि.मी.चा प्रवास बद्रीनाथ या ठिकाणी येऊन संपतो.

अलकनंदा नदीच्या उजव्या काठावर काहीशा उंचीवर श्रीबद्रीनाथाचे मंदिर आहे. नदीचे पात्र आणि मुख्य मंदिर यांच्यामध्ये गरम पाण्याची कुंडे आहेत. इथे असलेल्या महाद्वाराला सिंहद्वार असे म्हणतात. मंदिराच्या भोवताली असलेल्या प्रकारात गरुड भोगमंडी, लक्ष्मी, गणपती, घंटाकारण नगरपाल यांची छोटी देवळे आहेत. महाद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला वीर मारुतीची मूर्ती असून याची स्थापना समर्थ रामदास स्वामींनी केल्याचे सांगितले जाते. गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर पद्मासनात बसलेल्या विष्णूची चतुर्भूज मूर्ती आहे. बद्री गावापासून एक किलोमीटरवर अलकनंदेच्या उजव्या तीरावर एक खडक आहे. याला ब्रह्मकपाळ किंवा पितृतीर्थ असे म्हणतात. इथे िपडदानपूर्वक श्राद्ध केले की परत िपडश्राद्ध करावे लागत नाही अशी समजूत आहे.

बद्रीनाथपासून माना हे अतिशय देखणे आणि टुमदार असे गाव फक्त पाच कि.मी. अंतरावर आहे. ब्रह्मकपालपाशी अलकनंदा नदी ओलांडून माना गावाला जाता येते. या गावात असणारे भोत जमातीचे लोक हिमवर्षांवाच्या वेळी जोशीमठला येऊन राहतात. माना गावाच्या अलीकडे अलकनंदा नदीच्या डाव्या तीरावर एका उंच जागी एक गुहा आहे. तिला व्यासगुंफा म्हणतात. व्यासांनी इथे बसूनच श्रीगणेशाला महाभारत सांगितले असे इथे सांगितले जाते. त्या गुहेचा खडक पुस्तकाच्या पानासारखा दिसतो. या गुहेच्या खालच्या अंगाला अजून एक गुहा असून इथे गणपतीने मांडी घालून महाभारत लिहिले म्हणून या जागेला गणेशगुंफा असे नाव आहे. इथे गणपतीचे एक मंदिरसुद्धा आहे. मानापासून तीन कि.मी.वर इथला सर्वात उंच आणि अतिशय देखणा असा वसुधारा धबधबा आहे. जवळजवळ १२५ मीटर उंचीवरून कोसळणारा हा धबधबा हा अगदी न चुकता पाहायला हवा. अष्टवसूंनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा वसुधारा धबधबा. वसुधारेपासून ४५ कि.मी. वर आहे माना खिंड. भारत-चीनची ही सीमारेषा. पूर्वी कैलास यात्रा या िखडीतून होत असे. चीनने तिबेट गिळंकृत केल्यावर इथून होणारे दळणवळण थांबले आहे.

जोशीमठ

बद्रीनाथच्या अलीकडे असलेले हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण. ज्योतिर्मठ असे याचे मूळ नाव. त्याचा अपभ्रंश होऊन जोशीमठ असे नाव रूढ झाले. इथे श्रीआद्यशंकराचार्याचा मठ असून त्याचबरोबर इथे प्राचीन कल्पवृक्ष आणि श्रीनृसिंह मंदिर मुद्दाम पाहण्याजोगे आहे. हिमवर्षांवाच्या काळात बद्रीनाथाची पूजा इथेच जोशीमठला केली जाते. कत्युरी सम्राटांची ही राजधानी होती. इथल्या वासुदेव मंदिरात ‘श्रीवासुदे गिरिराज चक्रचूडामणी’ असे एका राजाचे नाव कोरलेले आहे. वासुदेवाची सुंदर अशी मूर्ती इथल्या मंदिरात आहे. याच मंदिराशेजारी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्माण्डा, स्कंदमाता, कल्याणी, काली, गौरी आणि सिद्धी अशा नऊ मूर्तीची नवदुर्गा म्हणून पूजा केली जाते. भारतभरात वैदिक मताची आणि अद्वैत तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना करण्याचे काम आद्य शंकराचार्यानी केले. त्यांनी भारताच्या चार टोकांना चार धाम वसवले. बद्रीनाथ हे त्यातलेच एक धाम होय.  जोशीमठपासून औली या प्रसिद्ध ठिकाणी जाता येते. भारतात फारसा प्रसिद्ध नसलेला स्किईंग हा खेळ इथे मोठय़ा प्रमाणात खेळला जातो. जानेवारी ते मार्च या महिन्यात औली इथल्या डोंगरांवर स्किईंग केले जाते. तसेच इथे स्किईंगचा अभ्यासक्रम देखील घेतला जातो.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड

जोशीमठपासून २० कि.मी.वर येते गोिवदघाट. शिखांचे दहावे गुरू गोिवदसिंह यांनी या ठिकाणी वास्तव्य केले म्हणून याला गोिवदघाट म्हणतात. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे एक गुरुद्वारा बांधलेला आहे. इथे मोफत राहण्या-जेवणाची सोय होते. इथून रस्ता जातो तो व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड या दोन सुंदर ठिकाणांपाशी. जुल-ऑगस्ट महिन्यात या फुलों की घाटी या ठिकाणी असंख्य फुले फुललेली असतात. जगभरातून ती पाहण्यासाठी लोक येत असतात. गोिवदघाटपासून पुलना-भ्युंदर माग्रे घांगरीया हा सगळा पायी चालायचा मार्ग आहे. घांगरीया इथून एक रस्ता पुष्पघाटीला तर दुसरा रस्ता हेमकुंड-लोकपालला जातो. इथे दोन किंवा तीन दिवस राखून ठेवले पाहिजेत. हेमकुंड हे ठिकाण घांगरीयापासून सहा कि.मी. वर आहे. इथे असलेल्या सरोवराला लोकपाल सरोवर म्हणतात. इथे एक लहान लक्ष्मण मंदिर आहे. इथूनच पांडव स्वर्गरोहिणीकडे गेल्याचे सांगतात. या ठिकाणी गुरुद्वारा बांधलेला आहे. हेमकुंड परिसरात खरी ब्रह्मकमळे पाहायला मिळतात. त्यांचा वास अतिशय तीव्र येतो. वाटेत सर्वत्र ही फुले असल्यामुळे कधीकधी त्या वासाने डोके दुखायला लागते.

केदारनाथ

हृषीकेश ते केदारनाथ हे अंतर २२५ कि.मी. इतके भरते. हृषीकेश-श्रीनगर-रुद्रप्रयाग-गुप्तकाशी-फाटा-रामपूर-गौरीकुंड-केदारनाथ असा हा नयनरम्य प्रवास आहे. (समुद्रसपाटीपासून उंची ३५८३ मीटर/ ११७५२ फूट) गाडीरस्ता गौरीकुंडपाशी संपतो. तिथून पुढे चालत जावे लागते. गौरीकुंड ते रामबाडा सात कि.मी., रामबाडा ते गरुडचट्टी चार कि.मी. आणि पुढे गरुडचट्टी ते केदारनाथ तीन कि.मी. असा हा चढाचा रस्ता आहे. या १४ कि.मी. च्या अंतरात आपण १६०० मीटर/ ५२०० फूट इतकी उंची चढून जातो. हा सगळाच परिसर अतिशय देखणा आणि नयनरम्य आहे. इथे पण यमुनोत्रीसारखे घोडे, दंडी, कंडी यांची सोय आहे. वाटेत घोडय़ाची लीद पडलेली असल्यामुळे जपून चढावे लागते. गौरीकुंड इथे राहण्याच्या सोयी केलेल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या महाभीषण पुरामुळे इथला भूगोल काही प्रमाणात बदललेला दिसतो. त्या पुरात प्रचंड मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी झालेली होती. तसेच इथले अनेक रस्ते वाहून गेल्यामुळे काही नवीन पायवाटा आता तयार झाल्या आहेत.

हृषीकेशप्रमाणेच इथे बद्रीनाथवरूनसुद्धा रस्ता आहे. तोसुद्धा तितकाच रमणीय आहे. स्वत:चे वाहन असेल तर वाटेत असणारी तुंगनाथ, मदमहेश्वरसारखी ठिकाणे पाहून मग पुढे जाता येते. बद्रीनाथपासून एक रस्ता रुद्रप्रयाग माग्रे इथे येतो तर दुसरा रस्ता चोपता माग्रे इथे येतो. गौरीकुंडला मुक्काम करावा आणि पहाटे लवकर उठून घोडेपडावाकडून केदारनाथची वाट धरावी. गौरीकुंडला जर लवकर पोहोचलो तर तसेच पुढे रामबाडा इथे जाऊन मुक्काम करावा. तिथेसुद्धा मुक्कामाच्या सोयी आहेत. आणि पहाटे लवकर घोडेवाल्यांची वर्दळ सुरू होण्यापूर्वी केदारनाथकडे प्रयाण करावे. केदारनाथच्या वाटेवर अनेक वेगवेगळी फुले, धबधबे पाहायला मिळतात. केदारनाथला धर्मशाळा आणि हॉटेल्स बरीच आहेत. केदारनाथला दोन दिवस नक्की मुक्काम करावा. भल्या पहाटे केदारनाथ मंदिराच्या पाठीमागच्या हिमशिखरांवर सूर्याचे पहिले किरण पडू लागले की ती शिखरे सोनेरी रंगांनी उजळून निघतात. ते दृश्य केवळ अवर्णनीय असते. त्यासाठी पहाटे लवकर उठण्याची तयारी मात्र हवी. केदारनाथचे मंदिर एका उंच जोत्यावर उभे आहे. मंदिरासमोरच एक नंदी आहे. गाभाऱ्यात नेहमीसारखी शिविपडी नसून एक मोठा पाषाणखंड ठेवलेला आहे. जवळजवळ कंबरेइतक्या उंचीचे हे स्वयंभू शिविलग असल्याचे सांगतात. इथले दुसरे वैशिष्टय़ म्हणजे इथे देवावर दुधाचा नव्हे तर तुपाचा अभिषेक केला जातो.

मंदिराच्या जवळ एक मोठी शिळा असून त्याला भरव असे समजले जाते. इथे आषाढ महिन्यात जत्रा भरते. त्यापुढे हिमानी ग्लेशियर असून मंदाकिनी नदीचा उगम इथेच होतो. तिथे असलेल्या तलावाला चुरावाडी तलाव असे म्हणतात. इथे एक निसर्गनवल दडलेले आहे. या ठिकाणी एक दगडी बांधणीचे कुंड आहे. तिथे ओम असा उच्चार केला की कुंडातील पाण्यातून बुडबुडे निघतात. गंमत अशी की फक्त ओम म्हटले तरच बुडबुडे निघतात. सोम, रोम, कोम असे काही म्हटले तर बुडबुडे निघत नाहीत.

या चारधामच्या भटकंतीशिवाय इथे पंचकेदार, पंचबदरी, त्रिजुगीनारायण अशी धार्मिक आणि निसर्गदृष्टय़ा अतिशय देखणी ठिकाणे भेट देण्याजोगी आहेत. काही ठिकाणी पदभ्रमण करावे लागते तर आता काही ठिकाणे ही रस्त्याने जोडली गेलेली आहेत. या परिसरात फिरताना तीन ते चार दिवस जास्तीचे राखून ठेवावेत. भूस्खलन झाल्यामुळे आपला प्रवास एखाद दिवस वाढू शकतो. तसेच उंचीचा त्राससुद्धा (हाय अल्टिटय़ूड) काही जणांना होऊ शकतो. त्यासाठी भीमसेनी कापूर दाढेत धरून ठेवावा त्याने उंचीचा त्रास होत नाही. हवा कितीही आल्हाददायक असली तरीसुद्धा कपाळ, कान आणि छाती लोकरीच्या कपडय़ाने कायम झाकून घ्यावी. फोटोग्राफीसाठी हा परिसर म्हणजे नंदनवन आहे. परंतु अति थंडीमुळे कॅमेऱ्याची बॅटरी लवकर उतरते. त्यासाठी जास्तीची बॅटरी लोकरीच्या कपडय़ात गुंडाळून घ्यावी म्हणजे ऐनवेळी निराशा होणार नाही.

देवभूमी गढवालमधील चारधाम यात्रा ही नितांत रमणीय आहे. या प्रदेशाबद्दल लिहावे तेवढे थोडे आहे. इथल्या प्रत्येक ठिकाणापासून अनेक ट्रेकिंग मार्ग निघतात. निष्णात ट्रेकर्सचा या भागात कायम वावर असतो. आनंदासाठी ट्रेकिंग करणारे आणि सर्व साधने घेऊन उंचउंच अवघड हिमशिखरे पादाक्रांत करणारे असे सर्व प्रकारचे ट्रेकर्स इथे मोठय़ा संख्येने येतात. हिमालय हा ठिसूळ आहे. सह्य़ाद्रीसारखा टणक, कणखर नाही. त्यामुळे इथे अनेकदा भूस्खलन होत असते. अनेकदा रस्ते बंद होतात. परंतु इथे भारतीय सन्याच्या रस्ते बांधणी विभागाचे जवान अत्यंत कमी वेळात पुन्हा हे रस्ते वाहतुकीयोग्य करून देतात. या सर्व जवानांच्या कामाचे आणि तत्पर सेवेचे कौतुक वाटते. ‘डिफिकल्ट विल बी सॉल्व्ह्ड इमिजिएटली, इम्पॉसिबल विल टेक सम टाईम’ असे ब्रीद वाक्य असलेल्या सन्याच्या दीपक हिमालयासारख्या रस्ते बांधणीच्या तुकडय़ा या खडतर प्रदेशात मोलाचे काम करत असतात. हा सगळा प्रदेश जसा विविध पर्वतशिखरे, गर्द वने यांनी व्यापलेला आहे तसाच तो असंख्य दंतकथांनी भरलेला आहे. इथल्या जवळजवळ प्रत्येक स्थानाशी कोणती ना कोणती कथा जोडलेली दिसते. त्या कथांमध्येसुद्धा पांडवांशी निगडित असंख्य कथा जोडलेल्या दिसतात. मानवी बुद्धीच्या आकलनापलीकडच्या अनेक चित्रविचित्र गोष्टींना कुठल्या ना कुठल्या कथा पुष्टी देण्याचे काम करत असतात. या प्रदेशातील देवभोळी जनता याच कथांच्या आधारावर जगत असते. सतत लहरी निसर्गाशी सामना करावा लागणारा इथला माणूस निसर्गाच्या त्या रौद्र रूपालाच देव मानतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक झालेला दिसतो. आपल्या पर्यटनात या भाबडय़ा लोकांशी समरस व्हावे, त्यांच्या कथा ऐकाव्यात, त्याबद्दल अनादर दाखवू नये. कारण या कथा आणि या श्रद्धा यांच्याच जोरावर इथला माणूस आपले आयुष्य मोठय़ा आनंदाने जगत असतो. शहरी जीवनात रमणाऱ्या आपल्या लोकांना या श्रद्धेमागील शक्ती जाणवणार नाही, पण कधी हिमालयात पदभ्रमण मोहिमेत भाग घ्यावा आणि लहरी वातावरणाचा सामना करावा म्हणजे आपणसुद्धा आपसूक त्या नगाधिराजापुढे नतमस्तक होतो. चारधामच्या भटकंतीमध्ये तो धीरगंभीर हिमालय आपल्या रूपाच्या अनेक छटा रोज उलगडून दाखवत असतो. त्यांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. दाल, चावल, राजमा, आलू, रोटी अशा चविष्ट पदार्थाचा मनमुराद आनंद लुटावा. आपली देवभूमीतली ही चारधामची भटकंती चिरस्मरणीय व्हावी, आपले पर्यटन समृद्ध व्हावे.
आशुतोष बापट – response.lokprabha@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-02-2017 at 01:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×