सुनिता कुलकर्णी

बस्तरमध्ये दसऱ्याच्या उत्सवासाठी दरवर्षी आठ चाकांचा नवीन लाकडी रथ तयार करण्याची प्रथा आहे. त्या रथाचं नंतर काय होतं, त्याची कल्पना नाही, पण तो तयार करण्यासाठी दरवर्षी परिसरातल्या जंगलातून शंभरेक झाडं कापली जातात. कोण्या एका राजवटीत निर्माण झालेली ही प्रथा राजेशाही संपली तरी सुरूच राहिली आहे.

पण आता त्याविरोधात क्षीण का होईना, आवाज उठायला सुरूवात झाली आहे. यंदा काकलगुडच्या ग्रामसभेने ठराव संमत केला की ते त्यांच्या गावाभोवतीच्या जंगलातून एकही झाड कापू देणार नाहीत. इंडियन एक्स्प्रेसच्या गार्गी वर्मा यांनी हे वृत्त दिले आहे.

छत्तीसगढच्या जिराम घाटीत दाट जंगल आहे. तिथे असलेलं सालाचं एकेक झाड १५० फूट उंच आहे. तिथलं जैववैविध्य लक्षणीय आहे. काकलगुडच्या रहिवाशांनी विरोध केल्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी तिथून काही अंतरावर असलेल्या जिराम घाटीमधली १०८ झाडं बस्तरच्या दसऱ्याला होणाऱ्या पारंपरिक रथयात्रेसाठी कापण्यात आली, असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

काकलगुडभोवती असलेल्या जंगलाला ‘गडिया मलंग’ असं पारंपरिक नाव आहे. ‘गड’ म्हणजे स्थानिक भाषेत घर. जंगल हे जणू तिथल्या स्थानिकांचं घरच आहे. जगदलपूरच्या दसऱ्याच्या रथयात्रेच्या परंपरेसाठी या जंगलामधून गेल्या अनेक वर्षांपासून झाडं कापली जात. ती कापली जाऊ नयेत यासाठी स्थानिकांनी २०१७ मध्ये वन विभागाकडे अर्ज केला होता. पण त्याची दखल घेतली गेली नाही.

दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही झाडं कापण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी २३-२४ ट्रक भरून माणसं आली तेव्हा काकलगुड गावातला प्रत्येक माणूस रस्त्यावर होता. ‘तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्या गावाच्या परिसरातलं जंगल कापलं जाणार नाही’, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं. पण तरीही लोकांच्या मनात भीती होती. त्यांनी या ट्रक्सचा पाठलाग केला. शिवाय आठ तास स्त्रीपुरूष- लहान मुलं झाडांभोवती पहारा देत होते. त्यामुळे काकलगुड वगळता इतर परिसरातून शंभरेक झाडं कापून लाकूड नेण्यात आलं.

गावातल्या लोकांच्या निर्णयाचा मान राखण्यासाठी बस्तरच्या दसरा समितीने या गावाच्या सीमांपलीकडच्या जंगलातली, जिराम घाटीमधली झाडं कापायचा निर्णय घेतला होता. ती कापताना एखाद्या मोठ्या झाडाबरोबर दहा लहानलहान झाडं सफाचट करून तिथेच टाकून दिली गेली. या रथचक्रासाठी त्यांना झाडाचं खोड पोकळ लागतं. एक १५० फूट उंचीचं झाड कापलं पण त्याचं खोड पोकळ नव्हतं. त्यामुळे ते तिथेच टाकून दिलं गेलं. ते बघून गावकरी हळहळत होते. त्यांच्या मते हे कापलेलं झाड आणखी कितीतरी वर्ष जगलं असतं.

‘सालाचं झाड हळूहळू वाढतं. हे झाडं वाढायला किती दशकं लागली असतील. आम्ही झाडांची पूजा करतो. त्यांना असं कुणीतरी तोडून टाकतं हे बघणं वेदनादायी आहे. ते झाडं कापतात, त्यांना आवडलं नाही तर तसंच टाकून निघून जातात. आमच्या जंगलाचा असा नाश आम्ही का काळ सहन करायचा?’ गावकरी विचारतात.

‘या आदिवासींचं जंगलाशी नातं असतं. जंगलाबरोबरच ते वाढतात. खरंतर त्यांच्यामुळेच जंगलं टिकली आहेत. ते जंगलाकडून त्यांना हवं ते आणि तेवढंच घेतात. आणि जंगलाला परत काहीतरी देतात. ककलगुड परिसरातली झाडं संबंधित समितीकडून गेली कित्येक वर्षे तोडली जात आहेत. पण त्यांनी एकही झाड लावलेलं नाही.’ आदिवासी कार्यकर्ते अर्जुन नाग सांगतात.

बस्तरचे काँग्रेस खासदार दीपक बाजी मात्र ५०-६० झाडंच कापली गेली असा दावा करतात. पण ककलगुडचे स्थानिक विचारतात की जर ५०-६० झाडंच कापली जात असतील तर एवढे २३-२४ ट्रक कशाला येतात? आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ते खोटं बोलताहेत आणि इथून पुढे आम्ही त्यांना आमची झाडं कापू देणार नाही. त्यांना हवं तर त्यांनी उत्सवासाठी रथ तयार करायला झाडं तोडावीत पण दहा वर्षातून एकदा. दर वर्षी नाही. झाडं वाढायला थोडा वेळ तर द्या.

आठ चाकांचा रथ तयार करण्यासाठी शंभरहून जास्त झाडं लागतात. फक्त चाकांसाठीच २५ झाडांचं लाकूड लागतं. हा रथ तयार करणाऱ्यांना त्या कामासाठी पैसे दिले जात नाहीत. त्यांना कामाच्या काळात दोन वेळचं जेवणखाण, झोपायला जागा दिली जाते. आणि नंतर सगळ्या गावाला बोकड किंवा काही हजार रुपये दिले जातात. खरं तर त्यांना त्यांच्या गरजांसाठी कामाचे पैसे हवे असतात. पण परंपरेचा भाग म्हणून त्यांना ही कामं विनामूल्यच करावी लागतात.

मधु रामनाथ या वनस्पतीशास्त्रज्ञाने गदिया मलंग जंगलावर अनेक वर्षे काम केलं आहे. ते सांगतात, ‘दरवर्षी ही झाडं कापली जात असल्यामुळे तिथलं जैववैविध्य कमी होत चाललं आहे. गावकऱ्यांना हे नुकसान समजणं आणि त्यांनी त्या विरोधात उभं राहणं ही गोष्ट फार आवश्यक आणि महत्त्वाची होती. आता त्याला सुरूवात झाली आहे ही चांगली गोष्ट आहे.