lp47समाजात एखादा प्रसंग घडतो, आणि जिथे तिथे त्याबद्दलची चर्चा रंगते. ट्रेनमधील मित्र मंडळ असो किंवा घरातली मंडळी. विशेष करून, घरात होणाऱ्या चर्चेत घरातली सगळी मोठी मंडळी सहभागी होतात, पण तरुणांचा सहभाग यात कितीसा असतो? काही वेळा तरुणांचा सहभाग असेलही, पण किती वेळा तरुणांची मतं लक्षात घेतली जातात? याबद्दल असं म्हणता येईल की तरुण पिढीला फक्त घरातल्यांसमोरच नाही तर बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचणं, आपली मतं मांडणं शक्य झालं आहे आकाशवाणीच्या ‘युववाणी’मधील कॉफी हाउस या कार्यक्रमामधून. युवकांना आपलं मत मांडण्यासाठी हे एक चांगलं व्यासपीठ आहे. ‘युववाणी’मार्फत युवकांसाठी विविध कार्यक्रम केले जातात. वाचन केलेल्या पुस्तकावर चर्चा करणं आणि पुस्तकं वाचायला प्रोत्साहन देणारा कार्यक्रम म्हणजे वाचन कट्टा, स्वत:नी शब्दबद्ध केलेल्या कवितांचं वाचन म्हणजे शब्द माझे, दायित्व समाजाचे या कार्यक्रमाद्वारे सामाजिक भानाची जाणीव करून दिली जाते, ध्यास नवा, उद्योग मंत्र, रंगीले राग, विचार गप्पा, लेट अस् मिट, म्यूझिकल टॉक इत्यादी विविध विषयांवर आधारित अनेक कार्यक्रम इथे होतात.

कॉफी हाउसच्या निवड प्रक्रियेविषयी सांगताना युववाणीच्या कार्यक्रम अधिकारी नेहा खरे म्हणतात, काही वेळा मुलं स्वत:हून आमच्याकडे येतात तर काही वेळा आम्ही कॉलेजमध्ये जाऊन मुलांना याविषयी माहिती देतो. त्यामधून ज्यांना असे कार्यक्रम करण्यात रस असतो ते पुढे येतात. त्या मुलांना नाटकाबद्दल किती माहिती आहे याचा अंदाज आम्ही घेतो. त्यांनी आधी काही लिहिलं आहे का? कविता असतील, काही लेख असतील किंवा अजून काही याबद्दल विचारतो, मुलांचं लेखन पाहून आम्हाला समजतं की ही मुलं कितपत लिहू शकतील.

मुलांची इथली सुरुवात कॉफी हाउसपासून होत नाही. आधी त्यांना टॉक शोज, मुलाखती, वाचन कट्टा यांसारखे कार्यक्रम करायला देतो. त्यानंतर कॉफी हाउस. हा कार्यक्रम चालू घडामोडींवर आधारित आहे. कॉलेज विश्वात, युवा पिढीच्या घडामोडींवर प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम आहे. बरेच र्वष हा कार्यक्रम सुरू आहे. देशभरात सगळ्या स्टेशनवर हा कार्यक्रम होतो. अर्थात नावं सगळीकडे वेगवेगळी आहेत, पण संकल्पना हीच. कार्यक्रम मराठी, पण नाव इंग्रजी. यामागे कारण इतकंच की तरुणांना जवळचं वाटावं.

lp69आठवडय़ातून तीन दिवस हा कार्यक्रम असतो. मंगळवार, गुरुवार आणि रविवार रात्री नऊ ते साडेनऊ या वेळेत. लक्ष्मीकांत बेर्डे, इला भाटे, सुनील तावडे ही नावारूपाला आलेली बरीच मंडळी त्यांच्या आधीच्या काळात कॉफी हाउसमध्ये सहभागी झाली होती.

हा कार्यक्रम करताना बऱ्याच गमती-जमती घडतात. वाचताना कधी मुलं चुकीचा उच्चार करतात आणि मग पोट धरून हसत सुटतात, मग अशा वेळी त्यांना थांबवून परत काम सुरू करावं लागतं. आहे त्या वेळेत कार्यक्रम पूर्ण होणं गरजेचं असतं.

कॉफी हाउसमध्ये सहभागी झालेली भक्ती आठवले सांगते की आमच्या रुईया कॉलेजमध्ये नेहा (खरे) मॅडम आल्या होत्या. कॉलेज मिट या कार्यक्रमाचं रेकॉर्डिग करायला त्या आल्या होत्या.   मला याबद्दल कळलं तसं मी त्यांना भेटायला गेले. सगळे मिळून आम्ही २०-२५ जणं होतो. प्रश्न-उत्तरांचा हा कार्यक्रम पार पडला, मग मॅडम म्हणाल्या की ज्या कोणाला आकाशवाणीमध्ये कार्यक्रम करण्याची इच्छा असेल त्यांनी नावं द्या. म्हणून मी नाव नोंदवलं आणि अशा तऱ्हेने आकाशवाणीचा जवळुून परिचय झाला. अगदी सुरुवातीला वाचन कट्टा हा कार्यक्रम मी केला. त्यानंतर कॉफी हाउस. कॉफी हाउसचा फॉरमॅट असा आहे की त्यात मुलं-मुली मिळून तीन किंवा चारजण असतात. कॉफी हाउसकरता लिहिताना थोडं दडपण होतं. डायलॉग रायटिंगसारखं स्क्रिप्ट लिहायचं असतं. मी त्याआधी असं काही लिहिलं नव्हतं. आम्ही तिघांनी असं ठरवलं की एकत्र येऊन विषय ठरवायचे आणि मग लिहायचं. पण असं करताना आमचा खूप वेळ जात होता आणि लिहून फारसं होत नव्हतं. म्हणून त्यानंतरच्या वेळी आम्ही ठरवलं की आपण प्रत्येकानी तिघांचे डायलॉग लिहून आणायचे. मग असं झालं की स्क्रिप्ट तयार करून भेटलो त्यामुळे फक्त स्क्रिप्ट एकत्र करणं आणि सुरुवात व शेवट ठरवणं इतकंच काम उरायचं. याचा फायदा आमच्या स्वत:च्या विकासासाठी झाला. आपली आणि समोरच्याची वाक्यं कशी लिहायची हे समजलं. कारण मी माझ्यासारखा विचार करणार, पण दुसऱ्याची विचार करण्याची पद्धत, बोलताना काही ठरावीक शब्द वापरणं या गोष्टींचा विचार करावा लागतो हे कळलं.

या सगळ्या गोष्टी अगदी सुरुवातीच्या, पण मग जसजशी लिहायची सवय व्हायला लागली तसा आत्मविश्वासदेखील वाढला. ज्या दिवशी रेकॉर्डिग असेल त्या दिवशी थोडं लवकर भेटायचो आणि स्क्रिप्ट लिहायचो. रेकॉर्डिगच्या वेळची एक मज्जा सांगते. आपणच स्क्रिप्ट लिहिल्याने त्यातले जोक्स अर्थातच आपल्याला माहीत असतात, त्यामुळे रेकॉर्डिगच्या वेळी त्या जोक्सवर खरं हसू येत नाही, पण ते खोटं वाटूनदेखील उपयोग नाही. यावर उपाय म्हणजे आमच्या तिघांच्या ग्रुपमधला एक मित्र खूप छान खोटं हसू शकतो. मग आम्ही त्याला सांगायचो की हसायला सरुवात तू कर म्हणजे तुझं बघून आम्हाला हसू येईल.

अनुश्री फडणीस तिचा कॉफी हाउसचा अनुभव सांगताना म्हणाली की फार छान अनुभव होता तो. या कार्यक्रमामुळे सहभागी झालेल्या आमच्या तिघांची छान मैत्री झाली. स्क्रिप्टपण आपणच लिहायची हे समजल्यार नाही म्हटलं तरी थोडं दडपण होतच. हळूहळू जमायला लागलं. हा कार्यक्रम करताना एक गोष्ट जाणवली की सहभागी होणऱ्यांची केमिस्ट्री चांगली पाहिजे तर सादर करताना मजा येते.

स्क्रिप्टिंग करण्याकरता आम्ही एकत्र बसायचो. कधी कधी काहीच समजायचं नाही. काय लिहावं, सुरुवात कशी करावी? मग आम्ही वेगळ्याच विषयावर गप्पा मारायचो. थोडय़ा वेळानी लक्षात यायचं की अरे आपल्याला स्क्रिप्ट लिहायची आहे. आमचं टय़ुनिंग चांगलं असल्याने कधी जर काही कारणामुळे संपूर्ण लिहिणं मला जमत नसेल तर ग्रुपमधले सांभळून घ्यायचे.

हातात लेखणी आणि तोंडासमोर माइक, या दोन गोष्टींनी चाचपडत शिकणाऱ्या तरुण मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. कॉफी हाउस या कार्यक्रमामुळे मुलांना सहजतेने या दोन्ही गोष्टी वापरायला पाठबळ मिळालं आहे.
ग्रीष्मा जोग-बेहेरे – response.lokprabha@expressindia.com