चल मेरी सायकल

या वर्षात जगभरात सायकल विक्रीमध्ये ६.९ टक्क्यांनी वाढ झाली.

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

-सुनिता कुलकर्णी

करोनाकाळात सगळं जग ‘बॅक टू बेसिक्स’ चाललं आहे. जगण्यातली चमकधमक बाजूला ठेवून सगळ्यांनाच अगदी मुलभूत गोष्टींसाठी झगडावं लागतं आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इतर माणसांचा स्पर्श टाळावा लागतो आहे. त्यामुळे गर्दी टाळायची असेल तर विशेषत आपल्याकडे तरी सार्वजनिक वाहतूक टाळणं अपरिहार्यच. त्यामुळे जवळच्या अंतरांसाठी तरी सायकल हा उत्तम पर्याय आहे. नाहीतरी आता सगळं जगच ‘बॅक टू बेसिक्स’च्या गोष्टी करतं आहे, तर मग पेट्रोलवर चालणारी दुचाकी टाळून ‘चल मेरी सायकल’ म्हणायला काय हरकत आहे.

पैशापरी पैसे वाचतील, प्रदूषण होणार नाही आणि व्यायामही होईल. आणि तसंचही युरोप अमेरिकेत एखादी गोष्ट सुरू झाली की तिचं लोण आपल्याकडे येतंच. तिथे सध्या लोक सायकल या वाहनाच्या प्रचंड प्रेमात पडले आहेत. मग आपणही पडायला हरकत नाही, नाही का?
शिवाय पाश्चिमात्य देशात सार्वजनिक वाहतूक टाळण्यासाठी लोक सायकलला प्राधान्य देत असल्यामुळे सायकलला मागणीही खूप वाढली आहे. आणि या देशांमध्ये सायकलचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारा देश आहे, चीन. आताच्या काळात भारतालाही ही संधी साधता येऊ शकते.

सगळ्या जगभरात मिळून २०१९ या वर्षात सायकलची बाजारपेठ होती ५४ बिलियन डॉलर्सची. या वर्षात जगभरात सायकलविक्रीमध्ये ६.९ टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकेत तर मार्च २०१९ ते मार्च या काळात सायकल विक्रीत ५० टक्के वाढ झाली. तर या वर्षात जगभरात सायकलविक्रीत ३५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. २०२० या काळात युरोपात आणि अमेरिकेत टाळेबंदीच्या काळातही सायकलविक्री करणारी दुकानं सुरू होती. कारण तिथे सायकलची वर्गवारी जीवनावश्यक व्यवसायात केली गेलेली आहे.

टोरांटोमध्ये सायकलींसाठी वेगळ्या मार्गिका असाव्यात या मागणीला ८० टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. इटलीमध्ये ५०० युरोच्या वर ज्यांच्या किंमती आहेत, अशा सायकलींच्या खरेदीसाठी जवळजवळ ७० टक्के अनुदान दिलं जातं. इंग्लंडमध्ये जुन्या सायकली दुरूस्त करून वापरण्यासाठी आवाहन केलं जातं. न्यूयॉर्कमध्ये सायकलस्वारांसाठी आणि पायी चालणाऱ्यांसाठी १६० किलोमीटरच्या वेगळ्या मार्गिका आहेत. तर पॅरिसमध्ये सायकलींसाठी ६४० किलोमीटरच्या वेगळ्या मार्गिकांचं नियोजन करण्यात आलं आहे.

खरं तर व्यायाम होणं, प्रदूषण टाळणं, खर्च टाळणं, कुठेही नेता येणं यामुळे सायकलसारखं स्वस्त आणि मस्त वाहन नाही. आपल्याकडेही एकेकाळी पुण्यासारखं शहर सायकलींचं शहर म्हणून ओळखलं जायचं. पण जगण्याचा वेग वाढला, वेळ कमी पडायला लागला, हातात पैसा आला, मोठ्या वाहनांची गर्दी वाढल्यामुळे रस्त्यावरची सुरक्षितता कमी झाली, सायकल चालवणारा जास्तीतजास्त काळ रस्त्यावर वावरत असल्यामुळे त्याच्या वाट्याला हवेतलं प्रदूषण जास्त येतं तर ते टाळणं अशा कारणांमुळे मधल्या काळात इतर दुचाकींचं प्रमाण वाढलं. पण आता पुन्हा एकदा सायकलला प्रतिष्ठा यायला लागली आहे. याचा अर्थ आपल्याकडे लगेच सगळेजण इतर दुचाकी वाहनं बाजूला ठेवून सायकली चालवायला घेतील असं नाही. ते शक्यही नाही, पण आवडीने सायकलं विकत घेणं, जवळची आणि सुरक्षित अंतरं सायकलवरून पार करणं, सायकल मोहिमा आखणं अशा गोष्टी लोक पुन्हा करायला लागले आहेत, हेही नसे थोडके. कारण तुमच्याकडे कितीही अद्ययावत वाहन असलं तरी सायकलवर टांग मारून वाऱ्याशी स्पर्धा करत सुसाट जाण्याची मजा काही औरच असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Come on my bicycle msr

Next Story
मोबाइल नव्हते तेव्हा… बोलायचं तरी कसं…?
ताज्या बातम्या