शैलजा तिवले – response.lokprabha@expressindia.com
करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही लाटांमध्ये संसर्गाने आधी शहरांमध्ये विळखा घातला आणि नंतर त्याचा प्रसार ग्रामीण भागांमध्ये होत गेला. तिसऱ्या लाटेमध्येही हेच चित्र कायम आहे. मुंबई आणि परिसरात वेगाने पसरत चाललेल्या ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेची पावले आता ग्रामीण भागाकडेही वळू लागली आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. ओमायक्रॉनचे स्वरूप सौम्य असले तरी झपाटय़ाने वाढणारे रुग्णसंख्येचे आकडे ग्रामीण भागात कोणती स्थिती निर्माण करतील, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबरपासून राज्यात सुरू झालेल्या ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेने मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये उच्चांक गाठला आहे. मुंबईत तर दैनंदिन रुग्णसंख्येने याआधीचे सर्व उच्चांक मोडत २० हजारांचा टप्पा गाठला. राज्यात सध्या २ लाख २१ हजार उपचाराधीन रुग्ण असून यातील सुमारे ८९ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे केवळ मुंबई, ठाणेच नव्हे तर जवळील रायगड, पालघर येथेही संसर्गाचा प्रसार वाढत आहे.

राज्यातील सध्या उपचाराधीन रुग्णांपैकी सर्वाधिक

१ लाख ५२३ रुग्ण (४५ टक्के) मुंबईत आहेत. याखालोखाल ठाणे (२३ टक्के), पुणे (१२ टक्के), रायगड (४ टक्के) आणि पालघर (४ टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आठवडाभरात रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यासोबतच रायगडमध्येही उपचाराधीन रुग्णांची संख्या आठवडाभरात १ हजार २३५ वरून ९ हजार १४७ वर गेली आहे, तर पालघरमध्ये ती १ हजार ६०५ वरून ८ हजापर्यंत वाढली आहे.

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मागील दोन दिवस घट होत असली तरी या महिन्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे २८ हजारांवर गेली आहे. डिसेंबरमध्ये हे प्रमाण सुमारे १ हजार ४१२ होते. बारा दिवसांत रुग्णसंख्या अनेक पटींनी वाढली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आठवडाभरात जवळपास तीन पटीने वाढली आहे.

४ जानेवारीपर्यंत राज्यात ६६ हजार ३०८ रुग्ण उपचाराधीन होते. ११ जानेवारीपर्यंत ही संख्या २ लाख २१ हजारांवर गेली आहे. या लाटेची व्याप्ती आता वाढत असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. यात प्रामुख्याने नाशिक, नागपूर, सातारा, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या आठवडाभरात जवळपास पाच पटीहून अधिक वाढून ५ हजार ३४४ वर गेली आहे, तर नागपूरमध्ये आठ पटीने वाढून ५२६ वरून ४ हजार १४७ वर गेली आहे. सातारा आणि नगरमध्येही उपचाराधीन रुग्णांच्या संख्येमध्ये जवळपास तीन पटीने वाढ झाली आहे.

सर्वाधिक बाधित ठाण्यामध्ये

राज्यभरात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सर्वाधिक मुंबईत असला तरी बाधितांचे प्रमाण ठाण्यामध्ये सर्वात जास्त आहे. ठाण्यात बाधितांचे प्रमाण सुमारे ३० टक्के तर मुंबईत २८ टक्के आहे. याखालोखाल पालघर (२५ टक्के), रायगड (२३ टक्के) आणि पुणे (२० टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाणही १० टक्क्यांच्या वर गेले आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त नाशिक, अकोला, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांच्याही वर गेले आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात तिसऱ्या लाटेचा उच्चांक?

राज्यात आता अन्य जिल्ह्यांमध्येही तिसरी लाट हळूहळू पसरत असल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत तिसऱ्या लाटेचा प्रभाव जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात कमी होण्यास सुरुवात होईल, परंतु राज्यात मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात तिसरी लाट उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यभरात खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

ओमायक्रॉनसह डेल्टाचाही प्रादुर्भाव

ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी मुंबईसह राज्यात अद्याप डेल्टाचाही प्रादुर्भाव आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग सौम्य असला तरी डेल्टामुळे झालेला संसर्ग धोकादायकच आहे. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ५० वर्षांवरील व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. राज्यात ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी डेल्टा अजून संपलेला नाही. काही रुग्णांमध्ये डेल्टाची लक्षणे प्रामुख्याने दिसत आहेत. त्यांना प्राणवायूची गरज भासते आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये लसीकरण पूर्ण न झालेले किंवा एकच मात्रा घेतलेले आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. आपल्याला प्रत्येक जीव वाचवायचा आहे. त्यामुळे जोखमीच्या गटातील व्यक्तींनी ओमायक्रॉन हा सौम्य असल्याचे मानून लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांमध्ये डेल्टाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. ओमायक्रॉनमुळे बाधित झालेले रुग्ण लगेचच बरे होऊन घरी परतत आहेत, अशी माहिती कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी दिली.

रुग्णालयात काही रुग्णांमध्ये अजूनही रक्तामध्ये गुठळय़ा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, फुप्फुसांवर परिणाम होणे असे रुग्ण आढळत आहेत. यांचे प्रमाण तुलनेने फार कमी असले तरी रुग्ण येत आहेत. त्यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी बाधित झाल्यास लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.

तरीही परिस्थिती नियंत्रणात

आयआयटी कानपूरने गणिती प्रारूपानुसार केलेल्या अंदाजानुसार देशभरात तिसरी लाट फेब्रुवारीच्या उत्तरार्धात ओसरायला सुरुवात होईल आणि मार्चमध्ये कमी होईल. यानुसार, राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे या भागांमध्ये तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात उताराला लागण्याची शक्यता असून राज्यात मात्र ती फेब्रुवारीच्या शेवटी कमी होईल. सध्या राज्याच्या अन्य जिल्ह्यांमध्ये प्रसार वाढत असला तरी रुग्णालयातील जवळपास ९० टक्के खाटा रिक्त आहेत, तसेच केवळ सात टक्के कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे प्रसार वाढला तरी खाटांची कमतरता भासणार नाही. याशिवाय राज्यामध्ये सध्या प्राणवायूचा वापर ४०० मेट्रिक टनवर गेला तरी रुग्ण वेगाने बरे होत असल्यामुळे मुंबई-पुण्यातील लाट ओसरल्यावर याचा वापरही कमी होईल. अन्य जिल्ह्यांमध्ये थोडा वापर वाढला तरी आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही. याव्यतिरिक्त राज्यात सुमारे ३५० प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प कार्यरत असल्यामुळे दुसऱ्या लाटेप्रमाणे प्राणवायूचा तुटवडाही भासणार नाही. त्यामुळे अन्य जिल्ह्यांमध्ये प्रसार झाला तरी परिस्थिती नियंत्रणात असेल, असे मत राज्याचे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.

तिसऱ्या लाटेमध्ये मुंबई-ठाण्यातील बहुतांश लोक सर्दी, खोकला आणि तापाने बेजार होते. यातील अनेकांनी चाचण्यादेखील केल्या नाहीत. मात्र तरीही अनेक रुग्ण घरीच बरे झाले आणि मृतांचे प्रमाणही अजून फारसे वाढले नाही. ग्रामीण भागातही हीच स्थिती असल्यास तिसऱ्या लाटेमुळे अर्थचक्राला फारशी खीळ बसणार नाही, अशी आशा आहे.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus covid 19 third wave towards rural area special report dd
First published on: 15-01-2022 at 11:41 IST