वैशाली चिटणीस

करोनाच्या वाढत्या प्रसाराचे आकडे जसजसे येताहेत तसंच करोनाला वेगवेगळ्या पद्धतीने तोंड देणारी उदाहरणंही पुढे येताहेत. केरळमध्ये पथनमथित्ता इथं सुरूवातीपासूनच फक्त हवाईमार्गेच नाही तर रेल्वे आणि रस्तामार्गे शहरात प्रवेश करणाऱ्यांची चाचणी केली गेली. प्रत्येक करोनाबाधित रुग्णाचा तो कुणाकुणाला भेटला याचा माग घेतला गेला. तो प्रसिद्ध केला गेला. त्यामुळे रुग्ण होता त्या वेळेला आपण तिथे होतो का, हे लोकांनाही तपासता आलं. ंत्यातून आणखीही काही लोक स्वत:ला तपासून घेण्यासाठी पुढे आले. करोना पसरण्याची शक्यता असलेल्या साखळीतील एकही कडी सुटणार नाही याची काळजी घेतली गेली. देशात इतरत्र फक्त परदेशातून येणाऱ्यांची तपासणी केली गेली असली तरी इथे शहराबाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाची तपासणी केली गेली.

तर ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या नागरिकाला करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यावर आग्य्रामध्ये त्याच्या घराभोवतीचा तीन किलोमीटरचा परिसर सीलबंद केला गेला. दोन जणांचा एक असे आरोग्य कर्मचाऱ्यांचे २५९ गट तयार केले गेले. त्यांनी एक लाख ६३ हजार घरांमध्ये जाऊन तपासण्या केल्या. एक हजार आजारी माणसांचे घशातल्या द्रावाचे नमुने घेतले. करोनाग्रस्त सापडू शकेल अशी कोणतीही शक्यता पडताळून पाहण्याचे सोडले नाही. नागरिक लहानलहान कारणांसाठी घराबाहेर पडत असले तरी सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने जीवावर उदार होऊन काम करते आहे. तेव्हा घरी रहा, सुरक्षित रहा.