स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com
सध्या पावसाळा संपला असला तरी सणासुदीनिमित्ताने सवलतीत खरेदीचा, त्यातही ‘ऑनलाइन सेल’चा पाऊस पडतोय. अनेक नामांकित कंपन्या आणि वेबसाइट्सचे सेल्स सुरू झाले आहेत किंवा सुरू होत आहेत. त्यामुळेच या सेल्समध्ये खरेदी करताना गोंधळ उडणे, ‘हे घेऊ की ते’ असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. म्हणूनच या लेखामधून आपण या सेलच्या कालावधीमध्ये काय काळजी घ्यावी याबद्दल बोलणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षांच्या शेवटच्या तिमाहीमध्ये ऑनलाइन सेल्सची रेलचेल पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून ‘ऑनलाइन सेल’चे प्रमाण अगदी मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. खास करून नवरात्रीपासून सुरू होणारे हे ऑनलाइन सेल अगदी नवीन वर्षांत जानेवारीच्या मध्यापर्यंत म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत सुरू असतात. सणासुदीच्या दिवसांत शॉपिंग वेबसाइट्सकडून ऑनलाइन सेलचा धडाकाच सुरू केला जातो. या ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर यामध्ये असलेले धोकेही याच वेळेस लक्षात घेणे गरजेचे आहे. अगदी ऑनलाइन व्यवहारांपासून ते खरेदी करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील काही खास टिप्स जाणून घेऊयात, कारण नवरात्री, दसरा सेल संपल्यानंतर लगेच दिवाळी सेल, नंतर ‘इयरएण्ड सेल’, ख्रिसमस आणि नवीन वर्षांनिमित्त सेल सुरू होतील. त्यामुळे या सेलमध्ये स्मार्टपणे शॉपिंग करण्याच्या टिप्स आतापासूनच समजून घेतल्या तर ते फायद्याचं ठरेल.

उगाच सेल आहे म्हणून गरज नसताना वस्तूंची खरेदी टाळा. म्हणजे अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर खरोखरच गरज असेल तरच अशा सेलमधून शॉपिंग करावे. या सेलच्या कालावधीमध्ये सामान्यपणे एखाद्या वस्तूची किंमत वाढवून- चढवून सांगून त्यावर फुली मारून अमुक टक्के सूट वगैरे सांगत मूळ किमतीलाच वस्तू विकली जात असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे या कालावधीमध्ये अनेकदा मानसिक स्तरावर आपण सेलमधून शॉपिंग करतोय किंवा मोठी सूट मिळतेय असे समजून खरेदी करण्याचा प्रकार अनेकदा होतो. त्यामुळेच सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू घेताना थोडे धीराने घ्या, गरज आहे का एकदा खात्री करून घ्या आणि त्यानंतरच वस्तू खरेदी करा.

या सणासुदीच्या कालावधीमध्ये लहानमोठय़ा जवळपास सर्वच वेबसाइट्सवर मोठे सेल असतात. त्यामुळे अनेक जण ठरावीक मोठय़ा वेबसाइट सोडून अशा काही वेगळ्या वेबसाइट्सवरूनही खरेदीला पसंती देतात. मात्र अशा वेबसाइट्स किती विश्वासार्ह आहेत हे आधी जाणून त्यानंतर त्यावर ऑनलाइन व्यवहार करा. अनेकदा या वेबसाइटवर ऑनलाइन व्यवहारांसंदर्भात अडचणी आल्याचं दिसून येतं. त्यामुळे फार नामांकित वेबसाइटवर खरेदी न करता अशा नव्या किंवा फारशा लोकप्रिय नसणाऱ्या वेबसाइटवरून घेऊन तर बघू म्हणत प्रायोगिक खरेदी करण्याचा विचार असेल तर ऑनलाइन व्यवहाराऐवजी ‘सीओडी’ म्हणजेच ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ अर्थात वस्तू हातात पडल्यावर रोख रक्कम देण्याचा पर्याय निवडा.

नामांकित वेबसाइट्सवरूनही व्यवहार करताना आलेला ओटीपी किंवा लिंक आधी तपासून घ्या आणि त्यानंतरच ऑनलाइन व्यवहार करा. तसेच या वेबसाइट्सवरून जेव्हा ओटीपी येतो तेव्हा वेबसाइटसंदर्भातील काही अक्षर मेसेज जिथून येतो त्या सेण्डरच्या नावामध्ये दिसतो. नको त्या लिंकवर क्लिक करून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने मेसेज कुठून आलाय हे आधी तपासून मगच ओटीपी टाइप करा.

वेबबाइटवरून एखादी वस्तू घेताना विक्रेत्याने वस्तूसंदर्भात दिलेल्या माहितीबरोबरच त्याबद्दलची वाचकांची मते, रेटिंग्ज जाणून घ्या. अनेकदा रेटिंग्ज फायद्याची ठरतात. तसेच कमेंट वाचताना पहिल्या काही कमेंट सोडून थोडं स्क्रोल करून खालील कमेंट वाचाव्यात. अनेकदा विक्रेत्या त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून कमेंट करून घेत त्या ‘पीन टू टॉप’ करत असल्याने चांगल्या कमेंटवर दिसतात. मात्र उत्पादनाबद्दल काही तक्रार आणि खरी माहिती हवी असल्यास थोडं स्क्रोल करून कमेंट वाचण्याचे कष्ट घेणं फायद्याचं ठरू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता अनेक वेबसाइट्सवर ग्राहक त्यांनी विकत घेतलेल्या वस्तूंचे फोटो पोस्ट करत असतात. तर खरोखर वस्तू जाहिरातीमध्ये किंवा वेबसाइटवर दाखवल्याप्रमाणे न दिसता कशी दिसते हे पाहण्यासाठी आणि त्याचा अंदाज घेण्यासाठी हे फोटो उपयोगाचे ठरू शकतात.

शिपिंग चार्जेस पकडून वस्तूची किंमत आहे की वगळून हे तपासून घ्या. अनेकदा आपण खरेदी केल्यानंतर- वस्तू निवडल्यानंतर शेवटी व्यवहार करायला जातो तेव्हा डिलिव्हरी चार्जेस अतिरिक्त लावले जातात. त्यामुळे आधी वस्तूंच्या डिलिव्हरीसंदर्भात नक्की काय धोरणं आहेत? किती रकमेची खरेदी केल्यावर मोफत डिलिव्हरी आहे? यांसारख्या गोष्टी तपासून घेणं फायद्याचं ठरतं.

हल्ली अनेक वेबसाइट्सवर एकाच प्रकारच्या वस्तूंची तुलना करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे एखादी वस्तू घेताना तिची त्याच प्रकारच्या वस्तूशी तुलना करण्याची सोय वापरा. यामुळे आपण मोजत असणाऱ्या पैशांच्या मोबदल्यात आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंपैकी सर्वोत्तम दर्जा आणि जास्त रिव्ह्य़ू असणाऱ्या कंपनीची वस्तू घेण्याचा निर्णय घेणं सोपं होतं.

या सेलच्या कालावधीमध्ये सध्या मोठय़ा वेबसाइट्सबरोबरच फॅशनसंदर्भातील वेगवेगळ्या वेबसाइट्सही फार सूट देतात. मात्र कपडे, बूट अशा गोष्टी घेताना त्या वेबसाइटवरील साइजसंदर्भातील नियम, ते कोणत्या पद्धतीचं प्रमाण आकार मोजण्यासाठी वापरतात हे समजून घ्या. कपडे, बूट घेताना रिटर्न पॉलिसी काय आहे, हे आवर्जून तपासून पाहा, कारण अनेकदा वेबसाइटवरील रंग आणि वस्तूचा प्रत्यक्षातील रंग किंवा रूप यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. म्हणूनच या गोष्टी जास्त काळजीपूर्वक घ्या. सेलमध्ये विकलेल्या वस्तू बदलून मिळतील का हे वस्तू घेण्याआधी तपासून पाहा.

वेबसाइटच्या सेल्ससाठी काही अटी नियम आहेत का जाणून घ्या. अनेकदा या सेलच्या कालावधीमध्ये वेबसाइट्स सूट देत असल्या तरी विक्रेते हे छुप्या पद्धतीने अटी-शर्तीच्या माध्यमातून ग्राहकांना अडचणीत आणू शकतात. ऑर्डर रद्द केल्यास रिफण्ड न करणे, अमुक एक रक्कम कापून घेणे, छुप्या पद्धतीने अतिरिक्त पैसे आकारणे अशा वेगवेगळ्या विक्रेत्यांसंदर्भात घडल्याची उदाहरणं आहेत. अनेकदा मोठय़ा वेबसाइट्स म्हणजे विक्रेता आणि ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेला मंच असतो. त्यामुळे या माध्यमातून वस्तू विकणाऱ्याच्या अटी आणि शर्ती या वेबसाइट्सच्या धोरणांपेक्षा वेगळ्या असू शकतात.

वस्तू घरी आल्यानंतर ती देणाऱ्यासमोरच उघडून मागवलेलीच वस्तू आलीय ना हे तपासून पाहा. अनेकदा मागवला मोबाइल आणि आली साबणाची वडी किंवा मागवली महागडी वस्तू आणि आलं भलतंच असे काही प्रकार घडल्याचीही उदाहरणे आहेत. म्हणूनच वस्तू डिलिव्हरी करणाऱ्याकडून घेतल्यानंतर आधी ती त्याच्यासमोरच उघडून पाहा. अनेकदा अशा प्रकारे फसवणूक झाल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याची प्रकरणे समोर आल्याने ‘दुर्घटना से देर भली’ असा विचार करणं योग्य ठरतं.

या सेलमध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर काही खास ऑफर्स आहेत का तपासून घ्या. या ऑफर्स लागू करताना काही विशिष्ट रकमेपर्यंत खरेदी आवश्यक आहे का? ऑफरअंतर्गत मिळणारी रक्कम ही कॅशबॅक प्रकारातील आहे की थेट वस्तूवर सूट आहे यांसारख्या बारीकसारीक गोष्टी तपासून पाहा आणि मगच या ऑफर्सच्या माध्यमातून खरेदी करा.

वस्तू खरेदी केल्यानंतर काही समस्या आली तर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा. हे फोन कॉल रेकॉर्ड केले जात असल्याने रागाच्या भरामध्ये प्रतिक्रिया नोंदवण्याऐवजी संयमी पद्धतीने आपलं म्हणणं मांडण्याला प्राधान्य द्या. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तक्रार क्रमांक दिला जातो. त्याच्या आधारे तक्रारीचं पुढे काय झालं याची माहिती वेळोवेळी घेता येते.

फोन कॉलवरूनही तक्रारीचं निवारण झालं नाही तर या कंपन्यांची ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ट्विटर हॅण्डल्स असतात. तिथे आपली समस्या ट्विटरवरून मांडा. अशी समस्या मांडताना वस्तूचा फोटो किंवा बिल किंवा इतर पुरावे जे वस्तूसंदर्भातील तक्रारीचा दावा योग्य असल्याचं दाखवू शकतात ते शेअर करा. या अशा तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते, कारण ती सार्वजनिकरीत्या म्हणजेच मोठय़ा संख्येने लोक किंवा वापरकर्ते असणाऱ्या माध्यमातून शेअर केली जाते. त्यामुळेच असं ट्वीट किंवा पोस्ट केल्यानंतर तातडीने मेसेंजरच्या मदतीने ग्राहकांचा क्रमांक घेऊन त्यांची तक्रार सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. साचेबद्ध कस्टमर कॉलच्या पर्यायापेक्षा सध्या हा तक्रार निवारणाचा मार्ग अधिक वेगवान आणि ग्राहकांच्या फायद्याचा तसेच समजण्यास सोपा आहे. एकंदरीत सांगायचं झाल्यास या तीन महिन्यांच्या काळामध्ये ऑनलाइन शॉपिंगच्या अ‍ॅप्सवरून किंवा वेबसाइटवरून खरेदी करण्याची फार इच्छा झाली तरी गरज, किंमत आणि सूट या साऱ्यांचं गणित योग्य पद्धतीने बेरीज-वजाबाकी करून सकारात्मक वाटत असेल तरच खरेदीचा निर्णय घ्या. हॅव अ हॅपी शॉपिंग..!

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara special online purchasing precautions dd
First published on: 15-10-2021 at 21:24 IST