फॅशन शोच्या रॅम्पवरून दिमाखात चालणाऱ्या तरुणी बघताना अनेकांचे डोळे विस्फारले जातात. पण याच रॅम्पवरून गाढवासारखा प्राणी चालणार असेल तर या कल्पनेनंच कुणालाही हसायला येईल. पण हसू नका, अकोटमध्ये नुकताच असा गाढवांचा फॅशन शो झाला..
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फॅशन शो हे नित्याचेच झाले आहेत. साहजिकच फॅशन शोचं ग्लॅमर हे अनेकांचं स्वप्न असतं. पण हाच झगमगाट, वलय गाढवांच्या वाटय़ाला आलं तर?
donkey-fashion-showतुम्ही म्हणाल कुठे फॅशन शो आणि कुठे गाढव.. तुलना तरी होऊ शकते का? पण मानवाला मदत करणाऱ्या गाढवांबद्दलचं प्रेम म्हणून, त्याच्या उपयोगितेचं महत्त्व पटावं म्हणून, गाढवांबद्दलची अनास्था, गरसमज दूर करून त्याला समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून कुणी गाढवांचा फॅशन केला असेल तर? नुकताच अकोट शहरात जेसीआय सिल्वर या संस्थेच्या वतीने अनोख्या अशा गाढवांच्या फॅशन शोचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. गाढवांच्या या अनोख्या फॅशन शोसाठी जवळजवळ ८२ नर-मादी गाढवं नटूनथटून आपल्या मालकांसह वाजतगाजत कार्यक्रमस्थळी आली होती. गधा पन्नालाल, हिरालाल या नावांव्यतिरिक्त मालकांनी जिव्हाळ्याने, प्रेमाने लाडाची नावं असलेली असंख्य गाढवे या अनोख्या फॅशन शोमध्ये दिमाखात, ऐटीत वावरत होती. या नावांमध्ये जग्गू, राजकुमार, भुऱ्या, प्रिन्स, रॅन्चो, मॅडी, आनंदो, चेतक, तेजा ही नर गाढवांची नावं होती. तर मादी गाढवांमध्ये जुही, लज्जो, परी, चमेली, सनी, ईशा, रीतू या गाढव सुंदऱ्या झोकात जोशपूर्ण सहभागी झाल्या होत्या. हा फॅशन शो तीन राउंडमध्ये झाला. प्रत्येक गाढवाला एक विशिष्ट नोंदणी क्रमांक दिला गेला होता. पहिला राउंड गाढवांच्या कॅटवॉककरता आखण्यात आला होता. तर दुसरा राउंड गाढवांच्या सजावटीतून सामाजिक संदेशाच्या मूल्यांकनातून गुण ठरवणारा होता. तिसरा राउंड हा गाढव मालकांची वेशभूषा, गाढवांवरच नियंत्रण, आज्ञापालन आदींसाठी ठेवण्यात आला होता. प्रत्येक राउंडसाठी १० गुण आखत एकूण ३० गुणांची स्पर्धा ठेवण्यात आली होती. म्यूझिकच्या दणदणाटात एकेका क्रमांकाच्या गाढवाचं आखून तयार केलेल्या रॅम्पवरती तेवढय़ाच दणक्यात आगमन होत होतं. एखाद्या सुंदरीलादेखील लाजवेल अशा वेशभूषा, साजशृंगारासहित गाढवांची ही अनोखी वरात फॅशन शोचा रॅम्प गाजवत होती. जे गाढव आपल्या बेसुऱ्या ओरडण्यासाठी परिचित आहे, जे गाढव आपल्या कुरूपतेसाठी प्रसिद्ध आहे, ज्या गाढवाला आपण कारण नसताना मूर्खाची उपमा दिलेली आहे, तेच गाढव जर ऐटीत, विविध वेलीफुलांच्या, नक्षींच्या रंगबिरंगी झुली पांघरून विविध रंगांत रंगून आपल्या सौंदर्याचा जलवा सादर करताना पाहून प्रेक्षकांनादेखील आनंदाचा सुखद धक्का बसत होता. एरवी माणसाला गाढवावरून शिव्या घालणारे सामान्यजनसुद्धा ह्याच गाढवाचं रॅम्पवर आगमन होताच शिट्टय़ा, टाळ्या वाजवून स्वागत करत होते. मोठय़ा संख्येने आलेल्या गाढवांनी अनेक रूपरंग, वेशभूषा धारण करत प्रेक्षकांचं झक्कास मनोरंजन केलं. यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या महादेव चौरे यांच्या गाढवाने तर डोक्यावर चक्क शाहरुखच्या डॉन स्टाइलप्रमाणे गॉगल चढवत प्रेक्षकांची वाहवाह लुटली. तर हीर-रांझा या गाढवांच्या जोडप्याने हृदयाच्या आकारासह अंगावर विविध प्रेमचिन्हे चढवून दिलवाले दुल्हनीया ले जायेंगेची आठवण करून दिली. मोरपिसांपासून तर चुनरीपर्यंत दागदागिन्यांपासून तर विविध फुलझाडांसह गाढवांच्या सौंदर्याचे अनेकाअनेक सौंदर्याविष्कार, सुबक सादरीकरण हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. गाढवांच्या या सुंदराविष्कारावर चाहते नोटा, नाणे, उधळून स्वागत करत होते. गाढवांसह गाढव मालकही या फॅशन शोच्या स्पध्रेकरता विविध रंगभूषेत, पेहरावात, दिमाखात गाढवांसोबत सहभागी झाले होते. कोणी मावळ्याच्या वेशात गाढवाबरोबर रॅम्पवर चालले तर कोणी साहेबाच्या वेशात. कुणी दरोडेखोराच्या वेशात तर कुणी नायकाच्या वेशात. रीतू नावाची एक गाढवीण तर नवऱ्याच्या प्रेमाखातर गळ्यात प्रेमसूत्र.. (मंगळसूत्र..?) घालून येताच प्रेक्षकांमध्ये हास्याचे प्रचंड फवारे उडाले. या स्पध्रेत सगळ्यात लहान स्पर्धक म्हणून सहा महिन्यांचं गाढवाचं पिलू हेदेखील आपल्या सहा वर्षांच्या गाढव पालकासोबत सहभागी झालं होत. कॅटवॉक राउंडच्या धमाल एंट्रीनंतर गाढवांच्या वेशभूषेसह गाढव सजावटीतून सादर केलल्या सामाजिक संदेशांच्या सादरीकरणाचा राउंड घेण्यात आला. यात गाढव मालकांनी आपल्या सामाजिक संवेदनशीलतेचं दर्शन घडवत अनेक विषयांवर प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडले. या वर्षी महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडय़ासह उर्वरित भागात पडलेल्या भीषण कोरडय़ा दुष्काळावर भाष्य करणारे संदेश हे प्रेक्षकांसह सर्वसामान्यांच्या मनाला चटका लावून गेले. शिवाय यातील अनेक संदेश हे धमाल कोटय़ा करणारे होते. तर काही संदेश हे राजकीय संदेश देणारे, काही स्त्री भ्रूणहत्या, मुलगा-मुलगी समानता, वृक्षारोपण आदींविषयी जनजागृती करणारे होते.
स्पध्रेतील लज्जो या गाढविणीच्या पाठीवर लिहिले होते, ‘मुझे न छुना म इनकी हूँ ..! ’ परी या गाढविणीने तर ‘म डॉन की बेटी हूँ ..! ’ असा दमच भरला होता. प्रिन्स या गाढवाच्या पाठीवर ‘प्रेम.. प्रेम नाम है मेरा..! ’ असं लिहिलं होतं तर राजकुमार या गाढवाने ‘औंदा लगीन करणारच..! ’ अशी दवंडी पिटली. याशिवाय मांसविक्रीसाठी होणाऱ्या गाढवांच्या कत्तलींवर भाष्य करणारं ‘मला मारू नका.. मला वाचवा.! ’ हा संदेशदेखील अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. तर काही गाढवांनी गाढवांवरून होणाऱ्या वाळू वाहतुकीच्या समस्येवर भाष्य करत ‘पाऊस नाही.. वाळू नाही. मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं..’ अशी कैफियत मांडली होती.
या स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर शासनाने गाढवपालनाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी, झपाटय़ाने कमी होणारी गाढवांची संख्या या चिंताजनक प्रस्तवाकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली.

गाढव लीला…
कुठल्याही जत्रेत गधा पन्नालाल, हिरालाल यांच्या हुशारीने होणाऱ्या मनोरंजनाचे किस्से ऐकायला मिळतात. मराठी चित्रपटांमध्येपण ‘गाढवाचं लगीन’सारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून आपण गाढव चरित्रातले मनोरंजन अनुभवले आहेत. त्याशिवाय सामाजिक निषेध म्हटला की आपल्या डोळ्यासमोर गाढवावर बसवून काढलेली एखाद्याची िधड पटकन आठवते. महाराष्ट्राच्या काही भागांत तर पाऊस लांबला किंवा पाऊस आला नाही तर गाढवाचं लग्न लावून द्यायची एक प्रथा आहे. गाढवाचं लग्न लावून दिल्यास पाऊस हमखास बरसतो अशी ग्रामीण भागात काही लोकांची श्रद्धा आहे.

four people drowned, died, Vasai, Mira Road
वसई आणि मिरा रोड मध्ये दुर्घटना, एकाच दिवशी ४ जणांचा बुडून मृत्यू
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
India, Manufacturing Sector, Surges, 16 Year High, in March, HSBC PMI, production sector, finance, finance knowledge, financial decision,
निर्मिती क्षेत्राचा १६ वर्षांचा उच्चांकी जोम; मार्चचा ‘पीएमआय’ निर्देशांक विक्रमी ५९.१ गुणांवर
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

गाढवाची उपयुक्तता
गाढव हा प्राणी अतिशय कष्टाळू व लाजाळू प्राणी आहे. ओझी वाहून नेण्यासाठी गाढव हे सर्वात स्वस्त साधन आहे. ते ५० किलोपर्यंतचे ओझे सहज वाहून नेऊ शकते. १५ ते १८ हजारांपर्यंत मिळणारं गाढव हे कुठल्याही ऋतूत काम करतं. गाढवांचा आहारपण इतर प्राण्यांसारखाच असतो. भोई, कुंभार, वडार, बेलदार आदी समाज वर्षांनुवष्रे गाढवपालन करत आले आहेत. यातील भोई समाजाने मात्र गाढवपालनाचा परंपरागत व्यवसाय आजही टिकवून ठेवला आहे. गाढव हे आपलं ठिकाण हे कधीच विसरत नाही. अलीबाबा-चाळीस चोर या कथेतही आपल्याला गाढवांची उपयुक्तता दिसतेच. ते मुळीच विसराळू नाही. ते कुणालाही चावत नाही. फारतर चिडून लाथ मारतं. एवढंच काय ते त्याचं उपद्रवमूल्य. गाढवाला एका वेळी एकच पिलू होते. साधारण तीन वर्षांत गाढवाच्या पिलाची वाढ पूर्ण होऊन गाढवात रूपांतर होते.. गाढविणीचे दूध हे मोठय़ा प्रमाणावर पौष्टिक व ताकदवान असल्यामुळे त्याला विशेष मागणी आहे.. तिच्या दुधात रोगप्रतिकारशक्ती खूप असते. गाढवीण एका वेळी जास्तीतजास्त पाव लिटर दूध देऊ शकते. गाढवाला असणाऱ्या विक्रीमूल्यामुळे गाढव प्रजननातून मोठे उत्पन्न मिळवता येते. गाय, म्हैस, बल यांच्यानंतर गाढवाचं विक्रीमूल्य जास्त आहे. गाढवाची विष्ठा शेतीसाठी उत्तम खत म्हणून वापरण्यात येते. कुंभार कामातदेखील गाढवाच्या विष्ठेला मोठी मागणी असते. गाढवांचा कृषिसंलग्न व्यवसायात होणाऱ्या मोठय़ा वापरामुळे गाढवांच्या खरेदी-विक्रीचे काही बाजार नावाजलेले आहेत. गाढवांचा बाजार प्रामुख्याने घोडे माळेगाव (नांदेड), सोलापूर, जेजुरी, िहगोली (मालेगाव), अकोट, देऊळगाव राजा (बुलढाणा), सारंगखेडा (धुळे), मढी (नगर जिल्हा) तर महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशात उज्जन, महू तर गुजरातमध्ये बडोदा येथे गाढवांचा बाजार भरतो.
संतोष विणके – response.lokprabha@expressindia.com