लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक, संशोधक, विश्लेषक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. या पद्धतीच्या संशोधनाची पायवाट चोखाळणारा, त्यांचा वारस ठरेल असा नवा संशोधक निर्माण होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

महाराष्ट्रात अनेक नामवंत विद्वान इतिहाससंशोधक होऊन गेले. इतिहास-भारतविद्येच्या विविध उपक्षेत्रांमध्ये त्यांनी आपली अमिट अशी छाप सोडली आहे. पण महाराष्ट्रातील आणि पर्यायाने भारतातील इतिहासलेखनाच्या कार्यपद्धतीतच मूलगामी बदल करणारे असे तीन थोर इतिहासकार या मांदियाळीत प्रामुख्याने उठून दिसतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रामचंद्र चिंतामण ढेरे. तिघेही ‘प्रस्थापित’ संशोधनव्यवस्थेच्या बाहेरचे!

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

राजवाडेंनी राष्ट्रवाद जोपासतानाही इतिहासलेखनासाठी सबळ लिखित पुराव्यांचा आग्रह धरला आणि अशी अस्सल कागदपत्रे जमवून, संपादित करून, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्य वेचले. मात्र कालांतराने लिखित कागदोपत्री पुराव्याच्या चौकटीतच बरेचसे इतिहास संशोधन अडकून पडले. या झापडबंद दृष्टिकोनातून इतिहास संशोधन-लेखनाला बाहेर काढलं ते कोसंबी आणि ढेरे यांनी. कोसंबींनी लोकधर्म, लोकदेवता यांचा अभ्यास करताना कागदपत्रांची कास न धरता पुरातत्त्वीय अवशेष, मिथक कथा, अर्वाचीन लोकपरंपरा अशा विविध पुराव्यांच्या स्रोतांची मदत घेऊन अभिजात परंपरेच्या बाहेरच्या, सहसा क्षुद्र समजल्या जाणाऱ्या देवतांच्या आणि त्यांच्याशी निगडित समाजांचा अभ्यास केला, मात्र यात अभिजात आणि लोकधर्म असे दोन वेगळे भाग गृहीत धरून हे विश्लेषण केलेले आढळते.

ढेरे यांनी मात्र कुठल्याही एका सैद्धांतिक दृष्टिकोनात अडकून न पडता इतिहास संशोधन कसे सर्वागीण पद्धतीने करता येऊ  शकते त्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. फक्त प्रस्थापित वर्चस्ववादी विचारसरणीतून आलेल्या संस्कृत/प्राकृत अभिजात ग्रंथ-विचार परंपरेचे परिशीलन करून लोकधर्म-देवता यांचा इतिहास लिहिता येत नाही हे तोपर्यंत भारतीय इतिहासलेखनात मान्य होत होते. परंतु दैवतविज्ञान सर्वागीण पद्धतीने आकळून घ्यायचे असेल तर लोकधर्म आणि वर्चस्वी अभिजात धर्मपरंपरा असा विच्छेद गृहीत धरून संशोधन करून उपयोग नाही, तर अगदी वैदिक परंपरेपासून सुरू करून सर्व प्रकारची स्थलपुराणे/स्थलमाहात्म्ये, देवतामाहात्म्ये, मिथककथा, मध्ययुगीन काव्ये, शिलालेख, ताम्रपट मंदिरे-शिल्पे, इतर पुरातत्त्वीय पुरावे, दंतकथा, अर्वाचीन उपासना परंपरा आणि याचबरोबर कधीही कुठेही ग्रथित न झालेल्या लोक-कलाकारांच्या मौखिक परंपरा, काव्ये, त्यांच्याकडच्या विविध दंतकथा/मिथके अशा सर्व प्रकारच्या पुराव्यांचे सटीक विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे हे प्रथम ढेरे यांच्या इतिहासलेखनातून दिसून आले. हे सगळे पुरावे-त्यांची सत्यासत्यता-तपासून घ्यायच्या पद्धती वेगवेगळ्या. सहसा इतिहासकार एका पद्धतीच्या पुराव्यावर, बहुतांशी लिखित आणि कालदृष्टय़ा पक्का करता येण्यासारखा पुरावा, जास्त भर देऊन इतर पुरावा-स्रोतांचा पुरवणीसारखा वापर करतात. मात्र ढेरे यांच्या लेखनात प्रत्येक पुराव्याला सारखेच महत्त्व देऊन काटेकोर चिकित्सा केलेली आढळते.

तसे बघायला गेले तर ढेरे यांच्या अनेक पुस्तकांचे विषय आपल्या रोजच्या धर्मजीवनाशी, आपल्याला माहीत असलेल्या किंवा ऐकलेल्या लोकपरंपरांशी निगडित त्यांची सुरुवातीची पारंपरिक लोककला, लोकदैवते, शक्तिपीठे यावरची पुस्तके व लेख म्हणजे नंतर विस्तृतपणे लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची बैठक व झलक होते हे लक्षात येते. या विषयांवर इतके मोठे संशोधनात्मक ग्रंथ होऊ  शकतात हे मराठी समाजमनाला त्यांच्यामुळेच बहुधा प्रथम लक्षात आले असावे. आपल्याला इतक्या जवळून परिचित असलेल्या या देवतांचा इतिहास म्हणजे महाराष्ट्र आणि संलग्न आंध्र-कर्नाटक या प्रदेशाचे भाग यांच्या सांस्कृतिक ताण्याबाण्याचा, सामाजिक अभिसरणाचा गेल्या दीड-दोन हजार वर्षांचा लेखाजोखा आहे, फक्त धर्मेतिहास नव्हे, हेही ढेरे यांनीच आपल्याला प्रथम दाखवून दिले. विठ्ठल, लज्जागौरी, खंडोबा, दत्तात्रेय, तुळजाभवानी, शिखर शिंगणापूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, नाथ संप्रदाय यांचे इतिहास लिहून ढेरे यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या गेल्या हजार वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासालाच पालाण घातले आहे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.

सर्व प्रकारच्या पुराव्यांची काटेकोर चिकित्सा, त्याला धरून उमजलेल्या तथ्याचा निर्भीड पाठपुरावा याशिवाय त्यांच्या लेखनाचा, संशोधनाचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे अभिनिवेश-रहित लिखाण. कुठल्याही एका वैचारिक, सैद्धांतिक चौकटीत स्वत:ला बंदिस्त न करून घेता कितीही सनसनाटी वाटणारे निष्कर्ष लिहितानाही ढेरे अतिशय तटस्थपणे, कुणालाही दुखवणार नाही अशा भाषेत लिहीत. मग ते विठ्ठलाच्या मूळ मूर्तीविषयी असो, किंवा भोसले कुळाचे लागेबांधे गोपसमाजाशी जवळच्या होयसळ-यादव कुळाशी आहेत हा निष्कर्ष असो. सध्याच्या नाजूक अशा प्रांतीय-जातीय-सांस्कृतिक अस्मितांच्या काळात हे तटस्थ, वस्तुनिष्ठ लिखाण संशोधक आणि वाचक या दोन्ही गटांनी आदर्श घेण्यासारखे असेच आहे. ढेरे यांच्या संशोधनामुळे आतापर्यंतच्या सांस्कृतिक इतिहासलेखनातील अनेक गृहीतके बदलावी लागली. आज महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना त्यांचे कुठलेच संशोधन वगळून चालणार नाही इतके मूलगामी आणि इतके अफाट काम त्यांनी केले आहे.

ढेरे यांच्या लेखनावर सहकारी संशोधक, इतिहासकार यांचा एक बारीक आक्षेप आहेच. आणि तो म्हणजे ढेरे यांनी फार सखोलपणे सैद्धांतिक मांडणी केली नाही. सर्व प्रकारचे पुरावे मांडणे, काटेकोर चिकित्सा करणे आणि त्यातून येणारे निष्कर्ष मांडणे यावर त्यांचे बहुतांशी संशोधन थांबते. त्या निष्कर्षांचे समाजशास्त्रीय  विश्लेषण काही ठिकाणी येते, काही ठिकाणी नाही. तसेच या सर्व संशोधनातून एक सलग सैद्धांतिक मांडणी करण्याची त्यांची ताकद नक्कीच होती, पण ती दृश्य स्वरूपात वेगळेपणे मांडली गेली नाही हे खरे!

याचे एक कारण कदाचित हेही असावे की ढेरे यांनी कायमच जनसामान्यांना सहज आकलन होईल अशा सोप्या मराठीत त्यांचा ग्रंथप्रपंच केला. गेली बरीच दशके नवे, उल्लेखनीय, मूलगामी संशोधन हे प्रस्थापित व्यावसायिक इतिहासलेखनाच्या चौकटीत होते व परिभाषेत लिहिले जाऊन एका ठरावीक वर्तुळासाठीच प्रकाशित होते. त्यातील खूप कमी भाग सोप्या स्थानिक भाषांमध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. ढेरे यांनी मात्र कायमच या प्रस्थापित चौकटीबाहेर काम केले. ज्या समाजाच्या परंपरांवर काम केले त्या समाजातील सर्वाना कळेल अशा भाषेत लिहून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवले याबद्दल आपण सर्वच त्यांचे कायमचे ऋणी आहोत. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की मराठीत लिहिल्याने खऱ्या अर्थाने ढेरे महाराष्ट्राबाहेरच्या संशोधकांपर्यंत फारसे पोहोचले नाहीत. त्यांच्या फक्त    ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या पुस्तकाचे डॉ. अ‍ॅन फेल्डहाउस यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर केले आहे. बाकी पुस्तके भाषांतराची वाट बघत आहेत.

हे सगळे विषय आडवाटेचे, एकांडे, झगमग ग्लॅमर नसणारे! यासाठी लागणारी बौद्धिक कौशल्ये, विविध नव्या-जुन्या भाषा अवगत असणे, त्यांच्यातील सांस्कृतिक परंपरांचे सखोल ज्ञान असणे, अगणित जुन्या ग्रंथांमधले संदर्भ आणि इतर विविध पुराव्यांचे वर्षांनुवर्षे परिशीलन करण्याची चिकाटी असणे- सहजासहजी आत्मसात करता येण्यासारखी नाहीत आणि त्यातून ज्ञानानंद सोडून लौकिकार्थाने इतर फारसे काही मिळण्यासारखेही नाही. ढेरे यांसारखी प्रज्ञा आणि प्रतिभाही दुर्मिळच असते. तेव्हा ढेरे यांच्या निधनानंतर या शोधवाटांचं भवितव्यही अंधारलेलं आहे असं आता या क्षणी तरी वाटतं आहे. ते तसं राहू नये, या वाटांवर चालणारा कुणी नवा तोलामोलाचा वारसदार तयार व्हावा अशी इच्छा आहे. तीच ढेरे यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल!
वरदा खळदकर – response.lokprabha@expressindia.com