lp36उद्योग क्षेत्रातला आजचा परवलीचा शब्द आहे, स्टार्ट अप. या स्टार्ट अप कंपन्या घर शोधणे, जेवण मागवणे आदी गोष्टी व्यवसाय म्हणून करतात.

पेटीएम, फ्लिपकार्ट, स्नॅपडील हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. या वेबसाइट्स बघितल्याशिवाय आपला एक दिवसही पुढे जात नाही. काय आहे ही जादू? इतकी कशी भुरळ घेतली या ईकॉमर्स वेबसाइट्सनी? कधी सुरू झाले हे वेड? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. २०१५ साल हे या सगळ्या ईकॉमर्स वेबसाइट्ससाठी मोलाचं ठरलं. स्टार्ट अप म्हणून नावारूपाला आलेल्या ह्य वेबसाइट्सनी कधी आपल्या मनात घर केलं कळलंच नाही. आणि ईकॉमर्स वेबसाइट्सची जणू लाटच भारतात उफाळून आली. स्टार्ट अप यशस्वी व्हावं यासाठी प्रत्येक जण ईकॉमर्सची कास धरू लागलं. २०१५ हे वर्ष अशा ईकॉमर्स स्टार्ट अप्सनी तुडुंब भरून गेलं.

ह्यला कारणीभूत ठरली ईकॉमर्समध्ये झालेली गुंतवणूक आणि भारतीय नागरिकांची बदललेली जीवनशैली. खरं तर या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. भारतीयांचा ऑनलाइन शॉपिंगकडे झुकता कल पाहून अनेक देशी-विदेशी कंपन्यांनी भारतीय ईकॉमर्स क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्या वेळी आत्ताच्या मोठय़ा ईकॉमर्स कंपन्या स्टार्ट अप स्वरूपात तग धरत होत्या. त्यांना मोठं करण्याचं काम या गुंतवणूकदारांनी केलं. त्यामुळे ईकॉमर्स स्टार्ट अप म्हणजे यश असं एक समीकरण तयार झालं आणि ते योग्य होतं, कारण आज बरेचसे यशस्वी स्टार्ट अप्स ईकॉमर्सवर आधारित आहेत.

टॉप ईकॉमर्स स्टार्ट अप्स :

१. पेटीएम : अलिबाबा या मोठय़ा विदेशी कंपनीने पेटीएममध्ये मोठी गुंतवणूक केली. पेटीएममध्ये आत्तापर्यंत युएस डॉलर ८९० मिलियन इतकी गुंतवणूक झाली आहे.

२. फ्लिपकार्ट : स्नॅपडील आणि अमेझॉनशी झुंज देत फ्लिपकार्टने आत्तापर्यंत युएस डॉलर ७५० मिलियन इतकी गुंतवणूक पदरात पाडून घेतली आहे.

३. स्नॅपडील : परदेशी कंपनी सॉफ्टबँकने स्नॅपडीलमध्ये  ५०० दशलक्ष युएस डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली. शिवाय रतन टाटा यांनीसुद्धा ह्यत खाजगी गुंतवणूक केल्याची चर्चा खूप रंगली.

४. पीपरफ्राय (pepperfry) : ऑनलाइन फर्निचर विकण्याची नावीन्यपूर्ण कल्पना भारतात आणत, पीपरफ्रायने १०० दशलक्ष यूएस डॉलपर्यंतची गुंतवणूक आकर्षित केली.

५. शॉपक्ल्यूज (shopclues) : अतिशय स्वस्त दरात वस्तू विकून शॉपक्ल्यूजने भारतीय ईकॉमर्स  जगतात एक वेगळे स्थान निर्माण केले आणि जवळजवळ  १०० दशलक्ष यूएस डॉलर मिळवले.

या आणि अशा अनेक स्टार्ट अप्सची नावं या ईकॉमर्सच्या भवसागरात तरली आणि किनाऱ्यास लागली. पण याचे मूळ कारण ठरले भारतीय समाजाची बदललेली मानसिकता आणि जीवनशैली. आजच्या शर्यतीच्या जगात काम सहज आणि सोप्पे करणारे ईकॉमर्स क्षेत्र लोकांना हवेहवेसे वाटू लागले. नुकत्याच झालेल्या नास्कॉमच्या ‘मारटेक’ या परिषदेत ईकॉमर्स क्षेत्रावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात हे क्षेत्र फोफावण्यामागची कारणे शोधण्यात आली.

मोबाइलचा आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर हे यामागचे एक मुख्य कारण ठरले आहे. शिवाय घरबसल्या पुरवल्या जाणाऱ्या सेवा, वेळेची बचत ह्य फायद्यांमुळे ईकॉमर्स क्षेत्राचे आकर्षण वाढत गेले. आणि हीच संधी तरुणांनी ओळखून अनेक प्रकारचे ईकॉमर्स स्टार्ट अप्स सुरू केले.

lp39ईकॉमर्स म्हणजे फक्त इंटरनेटच्या साहाय्याने वस्तू विकत घेणं इतकंच होत नाही. त्यात मोबाइल रिचार्ज करण्यापासून ते गाडी विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार येतात. प्रवासाचे, सिनेमाचे तिकीट काढणे, आपल्या घरात नको असलेल्या वस्तू विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधणे, एवढंच काय तर टॅक्सीसुद्धा आरक्षित करता येते! आणि हे इथेच थांबत नाही. जेवण मागवणे, घर शोधणे अशा ‘प्राथमिक’ गरजांची पूर्तीसुद्धा या ईकॉमर्स वेबसाईट्स करतायेत. आणि या सगळ्या सुविधा पुरवणाऱ्या कोणी विदेशी कंपन्या नाहीत. तर तरुणांनी सुरू केलेले स्टार्ट अप्स आहेत. अशा या विविधरंगी, विविधढंगी ईकॉमर्स क्षेत्राकडे तरुण मंडळी वळली नसती तरच नवल होतं!

भारतीय स्टेट बँकेने काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये असं स्पष्ट लिहिलंय की ईकॉमर्स क्षेत्र सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. आणि याचे सर्व श्रेय या स्टार्ट अप्सना व तरुणांच्या जिद्द आणि कल्पकतेला जाते.

पण ह्य सगळ्यात कुठेतरी दूरवर धोक्याची घंटाही ऐकू येत आहे. कारण सगळेच जर ईकॉमर्स स्टार्ट अप्स काढू लागले तर स्पर्धा वाढणार आहे आणि गुंतवणूक वाटली जाणार आहे. यामुळे कार्यक्षमता कमी होण्याची भीती उद्भवू शकते आणि चक्रं उलटी फिरू शकतात. अर्थात इतक्यात असं काही होणं अपेक्षित नाही, कारण ईकॉमर्स क्षेत्रातील स्टार्ट अप्सच्या प्रगतीची ही फक्त सुरुवात आहे. अजून बराच मोठा पल्ला त्यांना गाठायचा आहे आणि ह्य ई-सेवांपासून वंचित भारतीयांपर्यंत पोचायचे आहे. अर्थात, या वेगाने ते लवकरच तो पल्ला गाठतील यात शंका नाही!

‘स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया’..

भारतातील स्टार्ट अप्सना प्रोत्साहन आणि सहयोग देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जानेवारीला ‘स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया’ या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवणार आहेत. या कार्यक्रमात स्टार्ट अप्सच्या भविष्याबद्दल चर्चा होणार असून त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची आखणी करण्यात येण्याची शक्यता आहे.

संपूर्ण दिवस चालणाऱ्या या कार्यकमात स्टार्ट अप्सपुढील संधी आणि आव्हाने, स्टार्ट अप्समधील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यास काय प्रयत्न करता येतील, तंत्रज्ञानाचा वापर करून स्टार्ट अप्स कसे समृद्ध करता येतील आणि गुंतवणूक वाढवून स्टार्ट अप्स आर्थिकदृष्टय़ा सक्षम कसे बनवता येईल या विषयांची सविस्तर चर्चा होणार आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली आणि जयंत सिंहा तरुण उद्योजकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत तर मोदी स्वत: तरुणांना प्रोत्साहन देणार आहेत. अनेक सरकारी संस्था तरुणांना आपला पाठिंबा दर्शवण्यास उपस्थित राहणार आहेत. तर अनेक मोठे उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित राहून तरुणांचा आत्मविश्वास वाढवणार आहेत.
तेजल शृंगारपुरे – response.lokprabha@expressindia.com