ऋतू पर्यटन
प्राजक्ता पाडगावकर – response.lokprabha@expressindia.com

सृष्टी आपला हिरवा पर्णभार हलका करत असताना युरोपात भटकंती करणे हा एक आगळावेगळा अनुभव ठरतो. पर्यटकांची गर्दी सरलेली असते आणि निसर्गाचे रंग बदलत असतात. हाती आलेल्या नव्या धनधान्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध सण-उत्सव साजरे करण्यात येतात. या काळात युरोपाचा एक वेगळा चेहरा पाहण्याची संधी मिळते.

Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा

ऋतुचक्राचा प्रवास निरंतर सुरूच असतो. प्रत्येक ऋतूत होणारा सृष्टीचा कायापालट अतिशय मनभावन आणि लक्षणीय ठरतो. भारतात साधारण सर्वत्र हिवाळा सौम्य आणि सुखद असला तरी जगातील काही प्रांतांत तो संपूर्ण आयुष्य गोठवणारा ठरतो. सृष्टिचक्र जणू काही काळासाठी गोठून जाते. त्याआधी उन्हाळ्याचा सुरेख खेळ मांडल्यावर अतिशय समर्पक आणि काव्यात्मक अशी एक्झिट घेणाऱ्या एखाद्या उमद्या कलाकारासारखे समस्त जगाला वाकून अभिवादन करत सृष्टी सगळ्या चैतन्यमयी जीवांचा निरोप घेते तो लोभस काळ म्हणजे, ऑटम किंवा फॉल!

हिवाळ्यासाठी आपला हिरवागर्द पर्णभार सहज हलका करण्याआधी जो एक शेवटचा सलाम सृष्टी पृथ्वीला करते तेव्हाचे रंग, छटा आणि संपूर्ण परिसरातचा एक आगळाच बाज निश्चित अनुभवण्यासारखा असतो. जगातील अनेक देशांत सृष्टीची ही मोहक अवस्था, वर्षांतील काही विशिष्ट महिन्यांत आवर्जून अनुभवता येते! अमेरिके या पूर्व आणि उत्तर पूर्व भागांतील चित्त खिळवून ठेवणारे दिलखेचक रंग अनेकांना ठाऊक असतात, मात्र युरोपातही अनेक देशांत फॉलची निरनिराळी लोभसवाणी रूपे पाहायला मिळतात, त्यातील वैविध्य जाणून घेणे आणि सौंदर्याचा आनंद घेणे रंजक ठरेल.

युरोप म्हणजे केवळ उन्हाळ्यात जाण्याचे थंड हवेचे ठिकाण किंवा युरोप म्हणजे केवळ फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्र्झलड एवढाच विचार न करता आता अनेक प्रवासी युरोपाच्या कानाकोपऱ्यांत नव्या दृश्यांचा आणि अनुभवांचा माग काढत फिरताना दिसतात. युरोप हा भूखंड अनेक वर्षांचा इतिहास, संस्कृती आणि भाषावैविध्याने नटलेला आहे. इथे प्रत्येक प्रांतागणिक जीवनाविषयीचा दृष्टिकोन पूर्णत: निरनिराळा आहे. तरीही भारतातील काही मूलभूत चालीरीतींचे इथल्या जीवनचक्राशी साधम्र्य आहे.

भारतातील सर्व प्रमुख सण हे कृषिप्रधान संस्कृतीला धरून आखण्यात आले आहेत, तसेच युरोपातही अनेक सण, समारंभ आणि लोकांना एकत्रित आणणारे सोहळे हे तेथील शेतीच्या चक्रावर आधारित आहेत! साधारण शरद ऋतूत शेतीची सर्व कामे संपत आलेली असतात. मुबलक धनधान्य हाती आलेले असते. अशात काही सण नवे धान्य साठवण्यासाठी साजरे केले जातात, तर काही सणांतून नवे पीक हाती आल्याचा आनंद व्यक्त केला जातो. कुठे अतिरिक्त पीक साठवण्यासाठी काही प्रक्रिया सुरू होते तर कुठे लोक एकत्र येऊन या संपदेविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. या सर्व परंपरागत कार्यक्रमांत भर पडते ती निसर्गाच्या बदलत्या सौंदर्याची! युरोपात चेस्टनट, अस्पेन, बीच ही झाडे हळूहळू पानांतील हिरवाई सोडून सुवर्णरंग धारण करू लागतात. कुठे काही झाडे हलकेच केशरी वस्त्र परिधान करतात आणि काही किंचित गुलाबी, तपकिरी होऊन झळाळू लागतात.

नद्यांमध्येही याचे लोभसवाणे प्रतििबब पडते. अवचित रंग बदलणाऱ्या पानांतून केसरी कोवळे ऊन ओघळून जमिनीवर रांगू लागते, तर कुठे दूरवरचे डोंगर तपकिरी, गडद झब्बे घालून दिमाखात उभे ठाकलेले आढळतात. अवचित उष्मा जाणवतो तर कधी अगदी हलकी गार झुळूक, कधी उन्हाळ्याची आठवण तर कधी येणाऱ्या थंडीची चाहूल असे शिवणापाणी खेळत निसर्ग प्रत्येक दिवस नव्याच अंदाजात पेश करत असतो. अशा मोसमाशी आणि निसर्गसौंदर्याशी  अधिक जवळीक साधायची असेल तर ऑटममध्ये युरोप सफर करणे इष्ट!

उन्हाळ्यातील उत्साही आणि सरळधोपट प्रवाशांची गर्दी संपलेली असते. निवासांचे दर घसरू लागतात आणि हंगाम ओसरल्याने रहिवासीदेखील थोडे सलावून वागू लागतात. विमानभाडे, युरोरेलचे भाडे आणि राहण्याच्या ठिकाणांचे भावदेखील कमी होऊ लागतात. त्यामुळे अधिक सौंदर्य, कमी गर्दी आणि मनमिळाऊ रहिवासी अनुभवायचे असल्यास फॉलमध्ये युरोप गाठणे उत्तम!

क्रोएशियातला फॉल म्हणजे आगळाच नजारा असतो. नािरगी, तपकिरी आणि सोनेरी पानांची गर्द वनराई आणि जुने किल्ले, मऊसूत वाळूचे समुद्रकिनारे आणि शांत लयीतील जीवन अनुभवायला दुबरवनीक या एड्रियाटिक समुद्रकिनारी वसलेल्या गावी नक्की जायला हवे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेला क्रोएशिया हा देश नेत्रसुखद आहेच, मात्र उन्हाळ्यानंतर हा परिसर अधिकच आल्हाददायक होऊ लागतो. दुबरवनीक, स्प्लिट इथले प्रवासी पांगलेले असताना. ऑक्टोबरमध्ये इथे येणाऱ्या प्रत्येकाला इथल्या वाइनचा आस्वाद घेत ७९ बेटांवर आणि जवळपास पाच हजार किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर मनसोक्त फिरता येते.

सर्बयिात तारा राष्ट्रीय उद्यानात फॉलचे रंग बघणाऱ्याला बेभान करतात. २२० चौरस किलोमीटरचा विस्तीर्ण भूभाग आणि त्यातील अनेक घळी आणि दीनारिक आल्प्स पर्वतांच्या काही भागांतली ही मोठी किमयागार जागा! द्रीना नदीची अतिशय जीवघेणी दरी या उद्यानाला विभागत जाते. येथील दोन तलावांचे पाणी शांत आणि कायाकिंगसाठी देखील योग्य असे आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये इथली हवा ही तितकीशी गार झालेली नसते आणि झाडांनी मोहक सोनेरी रंग धारण केलेला असतो.

इटलीत वाल दी नोन हे खोरे चवदार सफरचंदांसाठी सुप्रसिद्ध आहे. मेझोकोरोना आणि अडिगे खोऱ्यात पसरलेला हा भाग इटलीतील प्रवासी गोंधळापासून अलिप्त आहे. इथे निवांतपणे फिरत, निसर्गाचा आस्वाद घेता येतो. ट्रेंटिनो प्रदेशातले हे खोरे शेजारच्या दक्षिण तिरोल या लोकप्रिय पर्यटन स्थळापेक्षा निराळे आणि सुस्तावलेले आहे. इथले अनेक तलाव, नद्या आणि घळी नयनरम्य आहेत. इथले निळे, हिरवे आणि सोनेरी रंग प्रत्येकाने येऊन आपापलेच वेचावेत इतके मनोवेधक आहेत. इथे अनेक छोटे मोठे कॅसल आणि वाडे आहेत. छोटी गावे, दऱ्याखोऱ्यांतले चढ-उतारांचे रस्ते आणि नॉवेल्ला दरी ही प्रत्येकाने एकदा तरी बघावी अशीच आहे. इथले छोटे-मोठे चर्च आणि संथ गतीचे आयुष्य जगल्यावर प्रत्येकाला स्वतची अंतर्गत लय सापडल्याशिवाय राहणार नाही!

अशीच अगदी भन्नाट जागा म्हणजे रोमेनियातील ट्रान्सलॅवानिया! ट्रान्सलॅवानियाचा लॅटिन भाषेतील अर्थ- जंगलापलीकडची जागा/ जमीन! त्यामुळे अर्थात येथील जंगले, झाडे  मनाला वश केल्याशिवाय राहणार नाहीत. येथील ब्रासोव हे मध्ययुगातील गाव अतिशय व्यवस्थित जपलेले आहे. जपलेली गिरिजाघरे, उत्तम असे किल्ले आणि वाडे अगदी लक्षणीय आहेत. ब्रान हा व्हॅम्पायर कॅसल म्हणून प्रसिद्ध आहे, तर १५व्या शतकातील कोरविनिलोर कॅसलदेखील नावाजलेला आहे. इथल्या अपुसेनी पर्वतरांगा, तिथली निसर्गसंपदा आणि जैवविविधता ही अलौकिक आहे. इथे पर्वतांमध्ये गुहा आढळतात, त्यांना अनेक आख्यायिकादेखील जोडल्या गेल्या आहेत. स्कारीसोआरा हिमनदी ही येथील दुसरी सर्वात मोठी भूगर्भातील हिमनदी आहे. या भागातून फिरताना साकळलेली सुवर्णवर्णी पत्री सर्वत्र नजरेस पडते. पिवळेधम्मक सौंदर्य जणू अवघ्या रानावर अवतरल्यागत भासत राहते.

असेच सुंदर स्वप्न जागवणारे आणखी एक ठिकाण म्हणजे पोर्तुगालमधील डुओरो खोरे! या खोऱ्यातून वाहत नदी सागरात विलीन होते आणि येथील दऱ्यांमधून जेवढे पाणी वाहते त्याहून कांकणभर अधिक सौंदर्य वाहते! येथे सुप्रसिद्ध डुओरोवाईन्स, टेबल आणि पोर्ट वाइन्सची निर्मिती होते. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये या डुओरो खोऱ्याचा समावेश जगातील सर्वात जुना वाइननिर्मिती प्रदेश म्हणून करण्यातआला आहे. इथल्या द्राक्षलागवडीचा आणि वाइननिर्मितीचा इतिहास हा सुमारे दोन हजार वर्षांचा आहे. डुओरो खोरे हे जेवढे प्रेमी युगुलांसाठी आकर्षक, वाइनशौकिनांसाठी रंजक आहे त्याहून अधिक ते पक्षिप्रेमींसाठी महत्त्वाचे आहे. काळा बगळा, इजिप्शियन घुबड, बोनेली गरुड, सुवर्ण गरुड, लाल आणि काळ्या घारी इथे आढळतात. या भागात ज्याला जे हवे ते मिळेल अशी स्थिती आहे. प्रत्येकाने इथले सौंदर्य, वाइनमध्ये मुरणारी अलवार जादू आणि दुर्मीळ निसर्गाचा नजारा एकदा तरी अवश्य अनुभवायला हवा!

जर्मनीतील बव्हेरिया हा प्रांत आणि डॉइश वाइनस्ट्रास हा परिसर फॉलमध्ये अतिशय अप्रतिम दिसतो. लेक कोमो हा इटलीतील भागदेखील सुंदर हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या छटा परिधान करतो. स्वित्र्झलडमधील प्रमुख शहर झुरिच वर्षभर सुंदर दिसतेच, शिवाय ब्लेनिओ खोरेही फॉलसाठी प्रसिद्ध आहे! सर्बयिाचे बेलग्रेडदेखील फॉलच्या मनमोहक रंगात न्हाऊन निघते आणि स्लोव्हेनियातला लेक ब्लेड हा परिसरदेखील स्वत:ची निराळीच छाप पर्यटकांवर पाडतो! फ्रान्समध्ये फॉलचे पडसाद जेवढे पॅरिसच्या रनवेवर उमटतात त्याहून अधिक मोहक पडसाद लॉईरे खोऱ्यात उमटलेले दिसतात. प्रोव्हेन्स हा फ्रेंच प्रदेशदेखील रंगीत पानांनी नटलेला असतो! स्कॉटलंडचा एिडबर्ग हा प्रांतही एका निराळ्याच दिमाखात ऑटमची किमया दाखवतो! आयरिश शहर काँनेमारा हेही फॉलमध्ये बेधुंद करून टाकते!

निसर्ग जेवढय़ा उदारपणे, मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण करत असतो तेवढय़ाच उत्साहाने युरोपीयदेखील या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी विविध उत्सव साजरे करत असतात. जर्मनीतील ऑक्टोबर फेस्ट जगप्रसिद्ध आहेच, त्याचबरोबर आयरिश लोकांचा गॅलवे इंटरनॅशनल ऑईस्टर अँड सी फूड फेस्टिव्हलही लोकप्रिय आहे. स्पेनमध्ये नृत्याचे बिनाल दे फ्लॅमेन्को दे सेविला असते तर जिनेव्हात वेनेईर सूर रॉक फेस्टिव्हल सुरू होतो. अनेक लहान-मोठय़ा प्रांतांगणिक जत्रा, महोत्सव आणि यात्रा सुरू असतात. हिवाळ्याची अगदी ओकंबोकं करणारी थंडगार मिठी या सुंदर प्रदेशाला पडायच्या आधी जे-जे म्हणून भरभरून जगता येईल ते सर्व इथला निसर्ग आणि स्थानिक जगत असतात. त्यांच्यात सामील होऊन निसर्गाचे हे निराळे सौंदर्य आपणदेखील एकदा अनुभवायला हवे!