scorecardresearch

चर्चा : तहानलेल्या महाराष्ट्राचे वास्तव

मुंबई महानगर पालिकेचे स्वत:चे पाणीपुरवठा करणारे तलाव आहेत.

चर्चा : तहानलेल्या महाराष्ट्राचे वास्तव

या वर्षीची दुष्काळाची तीव्रता सुल्तानी संकटाची झलक दाखवणारी आहे. भरपूर पाऊस पडूनही नियोजनाच्या, दूरदृष्टीच्या अभावी ही वेळ आपल्यावर आली आहे.

माझ्या लहानपणापासून म्हणजेच पन्नासच्या दशकापासून मनमाड, भुसावळ, जळगाव, अकोला, सोलापूर, अहमदनगर या शहरांमधल्या पाणीटंचाईबाबत  ऐकत आलो आहे. ६० वर्षांनंतरही या शहरांचा पाणीपुरवठा सुधारलेला नाही, यावर शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय उपाययोजना आखलेली आहे हे कळत नाही. आता यामध्ये औरंगाबाद, लातूर व अकोला या शहरांची भर पडलेली आहे.

मुंबई महानगर पालिकेचे स्वत:चे पाणीपुरवठा करणारे तलाव आहेत. तसेच ही महानगरपालिका नेहमी पाण्याचे स्रोत शोधण्यात प्रयत्नशील असते. ठाणे व काही महानगरपालिका वगळता बाकीच्या शहरांची स्वत:ची पाणीपुरवठा योजना आहे का याचा शोध घ्यायला हवा. ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ व जीवन प्राधिकरणाकडूनच इतर मोठय़ा शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या शहरांनी स्वत:ची पाणीपुरवठा योजना अजूनही तयार केलेली नाही, ती होणे गरजेचे आहे. मोसमी वाऱ्यांचा पाऊस

15-lp-well

महाराष्ट्रात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात कोकण विभागात पाऊस सुरू होतो. मोसमी पावसाचे भरलेले ढग सह्य़ाद्री पर्वताच्या उंचीमुळे अडविले जातात. त्यामुळे कोकणात मुसळधार पावसाची सुरुवात होते. पर्वताच्या उंचीमुळे काही ढग या उंचीवर जाऊन देशावर प्रविष्ट होतात व तेथे पाऊस सुरू होतो. पाण्याचे ढग जसजसे पूर्वेकडे जाऊ लागतात तसतसे त्यातील बाष्पयुक्त हवा कमी होऊ लागते. परिणामी ढगातील पाणी कमी कमी होऊ लागते, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी कमी होत अत्यल्प होऊन जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील सह्य़ाद्री पर्वतापासून पूर्वेकडे असलेल्या प्रदेशावर पाऊस कमी कमी होत जाऊन तो अत्यल्प व अपुरा (scanty) बनतो. मराठवाडा याच प्रकारात येतो.

राज्यातील नद्या

महाराष्ट्रातील बहुतेक नद्या सह्य़ाद्री पर्वतात उगम पावतात व पूर्वेकडे वाहत जातात. यातील अनेक नद्या पावसाळ्यात फुगतात व जसजसा उन्हाळा जवळ येत जाईल त्या रोडावतात. पाणी संपते व त्या कोरडय़ा बनतात. नदीच्या उगमापासूनच गावांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते व परिणामी तेथे पाण्याचा दुष्काळ सुरू होतो.

मराठवाडय़ाचे विशिष्ट स्थान

मराठवाडा हा प्रदेश पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ यांचे सॅण्डविच बनला आहे. अरबी समुद्रात पावसाचे ढग निर्माण होतात त्यानुसार गोवा, कोकण देशावरच्या पर्वतानजीकच्या भागात पाऊस पडतो. परंतु हे ढग पाणी घेऊन मराठवाडय़ापर्यंत पाहोचू शकत नाहीत तेथे अत्यल्प (scanty) पाऊस पडतो.

ज्यावेळी बंगालच्या उपसागरात पावसाळी ढग निर्माण होतात ते ढग नैर्ऋ त्य मोसमी वाऱ्यामुळे मध्य प्रदेश, ओरिसा, विदर्भ येथपर्यंत येतात व तेथे पाऊस पाडतात, पण मराठवाडय़ापर्यंत येत असताना त्यातील बरेचसे पाणी संपते व मराठवाडय़ात अत्यल्प पाऊस पडतो. अशा विशिष्ट व विचित्र रचनेमुळे या भागात पावसाचे पाणी व नद्यांचे पाणी देखील अत्यल्प प्रमाणात प्राप्त होते. त्याचप्रमाणे या भागातील विशिष्ट खडकांमुळे पावसाचे नदीचे पाणी जमिनीमध्ये झिरपत नाही. पाझरत नाही. त्यामुळे या भागात बारमाही झरे आढळून येत नाहीत. तसेच या भागातील पाण्याची पातळी खूप उपसा झाल्याने खाली खाली जात आहे. याचा गांभीर्याने विचार व्हावा.

महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा अहमदनगर, सोलापूर, लातूर, नाशिक, मनमाड या भागांत अवर्षण असून यांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून रहावे लागते. असे असताना राज्य शासनाने यावर काही उपाय योजिले नाहीत वा कार्यवाही केली नाही.

आजपर्यंत महाराष्ट्रात धरणांचे नियोजन व्यवस्थित झालेले दिसत नाही. सर्वत्र पाहता बरेचसे प्रकल्प अपुरे वा अर्धवट पडलेले दिसतात. यात राजकारण्यांचा स्वार्थ, कंत्राटदाराचा स्वार्थ आढळून येतो. प्रकल्पाची जागा बदलणे, खर्च वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. निकृष्ट प्रतीचे बांधकाम करण्यात येते. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. यामध्ये अनेक नेत्यांचा हस्तक्षेप असतोच.

पाण्याचे नियोजन

पाणीवाटपाच्या नियोजनाचा सर्वत्र अभाव आहे. या कामाकरिता नियोजन यंत्रणा मजबूत हवी आहे ती नाही. काही ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, परंतु प्रभावी यंत्रणेअभावी पाणी उचलता येत नाही.

पाणी गळती

अनेक महानगरपालिका पाणीपुरवठा करातात, परंतु पाइपलाइन जुनी असून फुटणे किंवा मुद्दाम पाइपलाइन फोडल्याने बरेचसे पाणी वाया जाते.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना त्रास

सर्वत्र राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना काम करणे त्रासदायक होते. त्यांनी आपली कर्तव्यदक्षता दाखविल्यावर राजकारण्यांचा दबाव त्यांच्यावर येतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. ३०- ३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात अरुण भाटीया नामक भारतीय प्रशासनसेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांची त्यांच्या शासनसेवेतील कालावधीत अनेक वेळा बदली झाली होती. अशोक खेमका हे भारतीय प्रशासन सेवेतील हरयाणाचे अधिकारी त्यांना असाच अनुभव येतो आहे. अगदी जवळची गोष्ट. डॉ. अश्विनी जोशी या कर्तव्यदक्ष ठाण्याच्या जिल्हाधिकारी. यांची रेती, बिल्डर माफियांच्या दबावामुळे सरकारला डॉ. जोशी यांची ठाणे जिल्हाधिकारी पदावरून उचलबांगडी करावी लागली.

महाराष्ट्रात पाण्याची कमतरता दरवर्षी वाढत आहे. अपुरा पाऊस, नद्यांचे अपुरे पाणी, उथळ धरणे यामुळे पाणीसाठा अपुरा ही मुख्य कारणे आहेत.

पाऊस कमी होण्याची कारणे

१      मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचे वाढत चाललेले तापमान

२      जंगलतोड

३      नद्या, तळी यातील पाण्याचे जलद बाष्पीभवन

४      जंगलातील जमिनीची धूप

सरकारने पुढील अनेक वर्षांकरिता पाण्याचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस, पावसाच्या पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. जगामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष सुरू झाल्यावर सरकार टँकरने पाणी पुरविण्याची मलमपट्टी लावणे सुरू करते. या दरवर्षांच्या टँकरपुरवठय़ावरील खर्चात अनेक धरणे बांधून झाली असती.

पाऊस पडणे ही निसर्गाची देणगी आहे. त्या देणगीचा व्यवस्थित वापर करणे मानवाचे कर्तव्य आहे. कमीत कमी सर्वाना स्वच्छ व र्निजतुक पिण्याचे पाणी मिळावे ही सर्वसाधारण इच्छा. याकरिता खालील गोष्टी कटाक्षाने सर्वानी पाळणे जरुरीचे आहे.

१.     पाण्याचा व्यवस्थित वापर.

२.     पाणी गळती होऊ नये यासाठी दक्ष राहणे.

३.     कोठे पाणी चोरी होत असेल तर योग्य त्या संस्थेला तसे कळविणे.

सरकारने करावयाच्या गोष्टी

१      विंधन विहिरी बांधणे. पाण्याचे कृत्रिम तलाव तयार करणे.

२      गाळाने भरलेल्या विहिरी, कालवे, खोल करणे.

३      धरणातील गाळ काढून धरणे खोल करणे.

४      पाण्याच्या वापराचे व्यवस्थित नियोजन करण्याकरिता मजबूत यंत्रणा कार्यान्वित करणे.

५      जमिनीची धूप थांबवण्याकरिता सार्वजनिक वनीकरण करणे. सर्वत्र झाडे लावून त्यांच्या व्यवस्थित वाढीकरता प्रयत्न करणे.

६      कोकणातील नद्यांना फक्त चार ते पाच महिने पाणी असते, नंतर त्या कोरडय़ा पडतात. त्यातील पाणी वाया जाते व समुद्रास मिळते. त्यावर छोटे, छोटे बंधारे आवश्यक आहेत.

७      कोकणात जांभा दगड आढळतो तो सच्छिद्र असल्याने पाणी धरून ठेवतो. त्यावर बंधारे बांधल्याने पाण्याची पातळी वाढू शकते.

८      अवर्षण भागातील लहान नद्या, ओढे, नाले यावर बांध बांधणे आवश्यक व अनिवार्य झालेले आहे हे करणे आवश्यकच आहे. कारण भविष्य भयावह आहे. बंधारे बांधल्याने जमिनीतील पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढेल.

यंदा पाण्याच्या दुíभक्षाने कळस गाठला आहे. लोकसंख्या अतिवेगाने वाढत आहे. शहरे, महानगरे, गावांची झपाटय़ाने वाढ होत चालली आहे. भूमाफियांचे राज्य आहे. अनेक मजली इमारती बांधत आहेत. वेगवेगळ्या जाहिरातीत अनेक आश्वासने व लालूच दाखवली जाते पण प्रत्यक्षात भ्रमनिरास होतो. ज्यावेळी पाण्याचा पुरवठा मर्यादित प्रमाणात आहे तेव्हा हे अनेक मजली इमारतीत पाणी कोठून आणणार? टँकर माफिया हा आणखी एक प्रकार आहे. हे पाणी पुरवतात. पण पाणी कोठून आणतात याचा विचार, सोसायटीवाले करतात का? आरोग्यास हानी पोहोचणारे पाणी असेल का याचा विचार होणे आवश्यक आहे. पाण्याचा स्रोत मर्यादित आहे तो देखील दरवर्षी कमी होत चाललेला आहे. भूमाफियावाले नागरिकांना, सरकारला फसवत आहेत. शहरात, महानगरांत अनेक मजली इमारतींना बंदी घालावी.

भारताचे हवामान सर्वत्र एकसारखे नाही. उत्तरेस नद्यांना दोनदा पूर येतात. एक मोसमी पावसात आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने या पुरामुळे जीवितहानी तसंच वित्तहानी होतेच. आसाम, बिहार, पश्चिम बंगाल येथे दोनदा पूर येतात. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू यांना उन्हाळ्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागतो.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे भांडणतंटे वाढत आहेत हे एक दिवस उग्र स्वरूप धारण करेल. जमावाचे मानसशास्त्र ही अत्यंत गंभीर बाब आहे. जोपर्यंत नागरिक शांतपणे जीवन जगत आहेत तोपर्यंत ठीक आहे. परंतु त्यांना चिथावणारे एखादे नेतृत्व उभे राहिले तर काय होते ते आपण गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या रुपाने, तसंच हरयाणात पाहत आहोत. सरकारला हा संदेश आहे. पाण्याच्या प्रश्नावर कधी जनआंदोलन सुरू होईल हे भविष्यात सांगता येत नाही. या प्रश्नाची दखल घेऊन सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. ठोस उपाय योजले पाहिजेत.

पूर्वी अनेक शहरांत जिवंत पाण्याच्या विहिरी होत्या, तळी होती. ती बुजवली गेली असतील तर परत सुरू करणे आवश्यक आहे. पाझर तलाव, विंधन विहिरी, छोटे छोटे बांध, लहान नद्यांवर धरण बांधून थेंब थेंब पाणी वाचविले पाहिजे.

धरणातील गाळ काढून ती खोल करावयास हवीत. गरम हवेमुळे तळ्यातील, धरणातील, कालव्यातील पाण्याचे जलद बाष्पीभवन होते यावर देखरेख व विशिष्ट यंत्रणा हवी. कालवे बुजवून त्यातील पाणी मोठय़ा पाइपद्वारे पुरविल्यास काही प्रमाणात पाणी वाचवता येईल. पाण्याचे नवीन स्रोत शोधले पाहिजेत. नवीन नवीन धरणे बांधणे आवश्यक आहे.

जंगले

जंगलतोडीमुळे मातीची धूप होते. त्यामुळे धरणे, नद्या, ओढे उथळ होतात. त्यामुळे वनीकरण होणे आवश्यक आहे. अनेक झाडे लावण्यापेक्षा कमी झाडे लावून त्यांची देखभाल केल्यास ती जगतील. पाण्याचा अपव्यय वाचवायचा असेल तर उत्तम यंत्रणा कार्यान्वित केल्यास पाण्याची चोरी, व्यर्थ जाणारे पाणी वाचेल याचा विचार सर्वानी करावयाचा आहे. नुसत्या सरकारवर प्रत्येक योजनेसाठी अवलंबून राहून सध्याच्या युगात चालणार नाही. प्रत्येकाने यात हातभार लावणे आवश्यक आहे.

गारलॅण्ड कॅनाल

ही योजना व तत्सम योजना कार्यान्वित करणे ही काळाची गरज आहे. ही चालू करणे अशक्यप्राय व स्वप्नातील गोष्ट आहे. हे जरी खरे असले तरी भविष्यात त्याचा उपयोग होईल हे ध्यानी ठेवावे.

आपल्या देशांत प्रत्येक विषयात पारंगत असलेल्या शास्त्रज्ञांची संख्या कमी नाही. त्यांचा उपयोग करून घ्यावा. कुठलीही योजना, धरणे, इमारती, रस्ते वगैरे बांधताना राजकीय हस्तक्षेप नको. कामात अडथळा नसावा मुख्य म्हणजे भ्रष्टाचारी राजकारणी, अधिकारी, कंत्राटदार यांना या  कामापासून दूर ठेवावे. व फक्त पारंगत शास्त्रज्ञ यांच्याकडे सोपवावे. नद्या, धरणांची खोली वाढविणे, ठिबक सिंचन पद्धती सक्तीचे करणे व समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे या तीन पद्धतींमुळे महाराष्ट्र वाचेल.

महाराष्ट्राची जडणघडण (Topography)
महाराष्ट्राचा बराचसा भाग डेक्कन ट्रॅप या नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा बराच भाग पठार या स्वरूपाचा आहे. हा डेक्कन ट्रॅप ज्वालामुखीने बनलेला आहे. त्यात मुख्यत: बसाल्ट नावाचा खडक आहे. पिरामिडासारख्या  शंकूच्या आकाराच्या टेकडय़ा आढळून येतात. हा बसाल्ट खडक अच्छिद्र आहे. इतर खडकही आढळून येतात ते म्हणजे जांभा दगड. ग्रॅनाइट, नीस, क्वार्टाझाइट. क्वार्टाझाइट खडक हा कोकणातील नद्यांच्या तळामध्ये आढळून येतो. नांदेड आणि काही भागांत गुलाबी ग्रॅनाइट आढळून येतो.

महाराष्ट्राच्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांत जांभा (Laterite) नावाचा मऊ व सच्छिद्र खडक आढळून येतो. याच्यामधून पाणी झिरपते.

महाराष्ट्राचा उत्तर पूर्व भाग नागपूर, चंद्रपूर व इतर भाग दगडी कोळशाने समृद्ध आहे. येथे कोळशाच्या बऱ्याच खाणी आहेत. बसाल्ट खडक अच्छिद्र असल्याने त्यात पाणी झिरपत नाही. त्यावरून वाहते.

महाराष्ट्राचे सह्य़ाद्री पर्वतामुळे देश आणि कोकण हे दोन भाग पडतात. सह्य़ाद्री पर्वत हा उत्तर दक्षिण पसरलेला आहे. या पर्वताच्या पश्चिमेला सुमारे १०० किमी. रुंद व सुमारे ७२० कि.मी. इतकी किनारपट्टी असलेल्या प्रदेशाला आपण कोकण म्हणतो. सह्य़ाद्री पर्वताच्या पूर्वेस असलेल्या भागास आपण देश असे संबोधतो. भौगोलिकदृष्टय़ा महाराष्ट्राचे चार भाग पडतात.

(१) कोकण (२)पश्चिम महाराष्ट्र (३) विदर्भ (४) मराठवाडा.

महाराष्ट्र राज्याचा विस्तार १५ ३५ह्ण ४६ह्व उत्तर ते २२ ०२ह्ण १३’’ उत्तर अक्षवृत्तापर्यंत व ७२ ३८ह्ण ४५ह्व पूर्व ते ८० ५३ह्ण १७ह्व पूर्व रेखावृत्तापर्यंत आहे. महाराष्ट्राचे  पूर्व पश्चिम अंतर सुमारे ८६० कि.मी. असून उत्तर दक्षिण अंतर ७३० कि.मी.चे आहे.

महाराष्ट्रात उत्तर दक्षिण सह्याद्री  पर्वत पसरलेला आहे. त्याच्या पूर्वेला प्रथम महादेव डोंगररांग, हरिश्चंद्र डोंगर, त्याच्या उत्तरेला सातमाळा डोंगर, अजिंठा डोंगर व अगदी उत्तरेला सातपुडा पर्वत आहे.

महाराष्ट्राचे हवामान
किनारपट्टीचे हवामान उष्ण व दमट आहे. येथे खूप पाऊस पडतो. इतर भागाचे हवामान उष्ण व कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण व हिवाळ्यात खूप थंड असते.

महाराष्ट्रात नैर्ऋ त्य मोसमी वाऱ्यांचा पाऊस पडतो. या पावसाचा काळ मध्य जून ते सप्टेंबर. कधी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पाऊस लांबतो. हा पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही. काही ठिकाणी अति, काही ठिकाणी मध्यम व काही ठिकाणी अल्प अत्यल्प (स्कॅन्टी) या रूपात पडतो.

महाराष्ट्रात पावसाळा सर्वसाधारणपणे चार महिन्यांचा असतो. कोकण भागात खूप प्रमाणात पाऊस पडतो. त्या मानाने पश्चिम महाराष्ट्रात साधारणपणे मध्यम स्वरूपाचा व जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी होत जाते.

मोसमी पावसाचे ढग सह्य़ाद्री पर्वताला अडवले जातात. त्यामुळे कोकणात भरपूर पाऊस पडतो. जे ढग उतरतात ते सह्याद्री पर्वत ओलांडून पूर्वेकडे जातात. तेव्हा नाशिक धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. सोलापूर, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, जळगाव यवतमाळ येथे अत्यल्प पाऊस पडतो. नागपूर, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर व गडचिरोली या भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. कारण या भागांत जंगले आहेत.

महाराष्ट्रात कमी पावसाचा पर्यायाने पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश म्हणजे सातारा जिल्ह्यतील खटाव व माण तालुका, अहमदनगर जिल्हा व सोलापूर.

महाराष्ट्रातील नद्या
महाराष्ट्रातील बहुतेक नद्या पश्चिम घाटात उगम पावतात व पूर्वेकडे वाहत जातात. काही नद्या महादेव डोंगर, हरिश्चंद्र डोंगर तर काही नद्या सातपुडा डोंगरात उगम पावतात. व त्या पूर्वेकडे वाहत जातात. फक्त दोनच नद्या, नर्मदा व तापी या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात. महाराष्ट्रातील काही नद्या चारमाही, काही सहामाही आहेत. तर बरोबर मोजता येणाऱ्या नद्या बारमाही आहेत. चंद्रपूर व गडचिरोली भागांतील काही नद्या बारमाही आहेत, त्या अपवादापुरत्या.

मोठय़ा नद्या, कृष्णा, भीमा, गोदावरी, कोयना, पूर्णा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता या नद्यांची खोरी बनलेली आहेत. या सर्व नद्या उगमापासून पूर्वेकडे वाहतात, त्या वेळी त्या रोडावतात.

महाराष्ट्रातील देशावरील नद्या लांब, हळूप्रवाही आहेत. त्याउलट कोकणातील नद्या लांबीला कमी, उथळ, जोराने वाहणाऱ्या अशा आहेत. त्या उन्हाळ्यात कोरडय़ा ठणठणीत पडतात.

नदीच्या खोऱ्यात वसलेली शहरे

१)     वैनगंगा – पैनगंगा हिंगोली यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

२)     तापी पूर्णा – नंदुरबार, जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला वाशिम

३)     गोदावरी, नाशिक, औरंगाबद, जालना, बीड, लातूर, परभणी नांदेड

४)     भीमा- पुणे उस्मानाबाद, सोलापूर

५)     कृष्णा – सातारा, सांगली, कोल्हापूर
जयंत कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-05-2016 at 01:26 IST

संबंधित बातम्या