जंगलात फिरताना दिसणारी झाडं, प्राण्यांच्या पावलांचे ठसे, ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज आपल्याला त्या जंगलाबद्दल सगळं सांगून टाकत असतात. फक्त आपल्याकडे ती नजर हवी, तो कान हवा आणि जंगल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असलेलं मन हवं.

जंगलात फिरण्याची आवड असलेले लोक जंगलात पाय टाकताच अगदी बदलून जातात. माझा निखळ हसणारा, जोरजोरात हातवारे करून भरपूर गप्पा मारणारा मित्र जंगलात शिरताच अगदी शांत होऊन कान टवकारून पक्ष्यांचे आवाज ऐकण्यामध्ये जास्त रस घेतो. मग सगळी बकबक अगदी चिडीचूप्प. उलट इतर कुणी बडबड करीत असेल तर तो लगेच तोंडावर बोट ठेवून, ‘अरे ऐका ना जरा!’ असं तोंडातल्या तोंडात खेकसतोच! माझ्या मत्रिणीचे टप्पोरे डोळे तर सतत पायवाटांवर भिरभिरायला लागतात आणि एखाद्या प्राण्याच्या पावलांचे ठसे दिसताच मग थांबून त्यांचं विश्लेषण सुरू होतं. मग ‘हे बघ, हा नक्की साप गेलाय रस्त्यावरून रात्री’ किंवा ‘आज काय फारशी हालचाल दिसत नाहीये’ असे निष्कर्ष निघतात. काही लोक तर अगदी मग्न होऊन समाधी लावून फिरत असतात. तासन्तास कुणी कुणाशी बोलत नाही, विशेषत: झाडा-पानांत रस असणारे लोक. हळूच एक पान हातात घ्यायचं, त्याचा आकार निरखायचा, मग कुठं फूल आहे का शोधायचं असं एकूण चाललेलं असतं. एखादं छान मनोरंजक पुस्तक वाचताना कसं मग्न वाटतं.. तसंच हे असतं काहीसं. कारण जंगल बघताना आपण ते फक्त बघत नसतो, तर एखादं पुस्तक उलगडत जावं तसतसं त्या जंगलाला आपण ओळखत जातो आणि त्यातच खरी मजा असते. म्हणूनच आज ‘जंगलवाचन’साठी मी जंगलवाचनाबद्दलच लिहायचं ठरवलंय. म्हणजे, जंगलाबद्दलचं वाचन नव्हे, त्याबद्दल पुढे कधी तरी या सदरात लिहिलं जाईलच, पण आज मात्र आपण जंगल वाचण्याबद्दल बोलू या.

जंगलाचं वाचन ही खरी एक कला असते, सतत सराव करून चांगली ठेवावी अशी. पण सगळ्यांनाच जमेल अशी, कारण त्यासाठी लागते ते फक्त जंगल आणि आजूबाजूला काही या कलेत कुशल असलेल्या व्यक्ती. जसे जसे आपण जंगल वाचत जातो तसे तसे आपल्याला त्या जागेची गोष्ट, त्यातली पात्रं समजू लागतात. पण जंगलवाचन म्हणजे तरी काय? आता समजा, आपण शिवनेरीच्या किल्ल्यावर फिरायला गेलो आणि आपल्याला त्या जागेचा इतिहास ठाऊक नसेल किंवा पुरातत्त्व खात्याच्या माहिती देणाऱ्या पाटय़ाही नसतील, तर आपला ती जागा पाहण्याचा अनुभव फारसा खास किंवा संस्मरणीय होत नाही. किल्ला चढून उतरण्याची कसरतच तेवढी काय ती होईल. मोकळ्या हवेचा आनंद घेता येईल. पण आपल्याबरोबर त्या जागेबद्दल काहीच घेऊन जाता येणार नाही, तिचं वेगळं असं महत्त्व जाणवणार नाही. जंगलाचंही असंच आहे. एखाद्या जंगलात कोणकोणते प्राणी-पक्षी राहतात, त्या जागेचा इतिहास काय आहे, हे आपल्याला पाटय़ांवर वाचायला मिळत नाही किंवा शाळेच्या पुस्तकातही दिसत नाही. प्रत्येक जंगलाची एक गोष्ट असते. आणि ती जाणून घेण्यासाठी स्वतहून थोडे प्रयत्न करावे लागतात.

प्राण्यांच्या पावलांचे ठसे ओळखता येऊ लागले की प्रत्येक रानवाट वेगळी वाटते. पक्ष्यांची ओळख त्यांच्या आवाजावरून होऊ लागली की किर्र जंगलातही त्या रंगीबेरंगी पक्ष्यांचे वास्तव्य जाणवू लागते. झाडं ओळखता येऊ लागली की जंगलाचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच ओळखता येते. आणि या अशा गोष्टी समजायला लागल्या की त्या जागेचे एक वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहते. अचानक डोळ्यावरची झापडं उघडल्यासारखी वाटतात. मला हा अनुभव पहिल्यांदा आला तो कॉलेजात शिकत असताना. दर दिवसाचं तेच चक्र असायचं कॉलेजचं. सकाळी उठा, चहा-नाश्ता करून रेल्वे स्थानकावर जा. मग ठरलेली ट्रेन पकडून, बराचसा वेळ गर्दीत उभ्या-उभ्याच घालवून दादर स्थानकावर उतरा. त्यानंतर १५-२० मिनिटं चालत-चालत अगदी समुद्रकिनारी असलेल्या कीर्ती महाविद्यालयात पोहोचा. मग संध्याकाळपर्यंत वेगवेगळे वर्ग. पुन्हा गर्दी, ट्रेन, घर, जेवण आणि झोप. दादर रेल्वे स्थानक ते कॉलेज हा प्रवास तर एवढा अंगवळणी पडला होता की डोळे बंद केले तरी आपोआप कॉलेजपर्यंत सहज जात येईल. खरं म्हणजे डोळे उघडे असायचे तेही नावापुरतेच, डोक्यात पुढच्या दिवसाचे विचार इत्यादी. त्यामुळे प्रत्येक प्रवास सारखाच.

41-lp-nature

मग एकदा वनस्पतिशास्त्राचे तास सुरू झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये रस येऊ लागला. कमीत कमी शहरातली झाडं तरी ओळखता आली पाहिजेत असं वाटायला लागलं. मग एक ‘मुंबईतील झाडे’ (द ट्रीज ऑफ मुंबई) असा विषय असणारं, नवीनच आलेलं, अल्मेडा आणि चतुर्वेदी यांनी लिहिलेलं पुस्तक घेतलं. हे दोन्ही लेखक वनस्पतिशास्त्रात अत्यंत निपुण आणि पुस्तकही अगदी साधं-सोप्पं, त्यामुळे एक-दोन दिवसांत मुंबईच्या झाडांची ओळख चित्र बघून व्हायला लागली. त्याबरोबरच आजूबाजूला जंगलात रस असणाऱ्या लोकांचा गोतावळाही वाढू लागला होता. गुलमोहोर, आंबा, वड, नारळ हे आपल्याला माहितीच असतं, पण त्याशिवायही अनेक झाडं मुंबईत आहेत हे तेव्हा जाणवलं. आणि अचानक एका दिवशी दादर स्थानकापासून कॉलेजला जायला निघाले तेव्हा जवळच उभ्या असणाऱ्या नागचाफ्याकडे लक्ष गेलं. इतके दिवस तो सुंदर लाल-गुलाबी फुलं असणारा, तोफेच्या गोळ्यासारखी फळं असणारा नागचाफा तिथे उभा आहे हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं. आणि मग पुढे कॉलेजला जाता-जाता कदंब, ताम्रिशबी (कॉपरपॉड), पिचकारी (आफ्रिकन ट्युलिप) अशा झाडांकडे नजर गेली. तो नेहमीचा रस्ता अगदी वेगळाच वाटायला लागला अचानक! इतके दिवस आपण या रस्त्यावर चाललो तो हाच का? असा प्रश्न पडला. अगदी वेगळीच ओळख झाली त्या भागाची. तेव्हा कळलं की, आपण आजूबाजूच्या नि:शब्द गोष्टींकडे जरा दुर्लक्षच करतो आणि त्या वाचता आल्या तर आपले जगच बदलून जाते.

या जंगलवाचनाच्या कलेवरच काही लोक खास अवलंबून असतात, विशेषत: संशोधक, शिकारी आणि स्थानिक लोक. यांना जंगलात वावरताना स्वतच्या रक्षणासाठी किंवा प्राण्यांचा माग काढण्यासाठी प्राण्यांच्या अस्तित्वाचे संकेत ओळखावेच लागतात. आता हेच पाहा ना, रानवाटांवर सापडणारे जंगली प्राण्यांचे ठसे म्हणजे एक प्रकारची लिपीच असते. उदाहरणार्थ, लांडगा, कोल्हा, खोकड, तरस हे तसे थोडेफार सारखे वाटणारे प्राणी. पण प्रत्येकाच्या पावलांची नक्षी वेगवेगळी असते. तरसाची वाकडी चाल त्याच्या ठशांमध्येही दिसतेच! आणि कोल्ह्य़ा-खोकडाचे उभट छोटे पंजे लांडग्याच्या दांडग्या पायांसमोर अगदीच वेगळे दिसतात. सगळ्यात जास्त मजा असते ती अस्वलाच्या पायाच्या ठशांची! त्याच्या मागच्या दोन पायांचे ठसे अगदी माणसाच्या पायांच्या आकाराचे असतात. त्यामुळे जणू काही त्या जंगलात माणूसच अनवाणी फिरत होता असे नवशिक्या जंगल वाचकाला ते ठसे बघून वाटू शकेल!

42-lp-nature

काही प्राण्यांच्या ठशांवरून तर त्यांचा आकार, नर आहे की मादी हेसुद्धा ओळखता येऊ शकतं. सध्याची कॅमेरा किंवा प्रयोगशाळेतील उपकरणांवर अवलंबून असणारी वन्यप्राण्यांची शिरगणती आधी हे पायांचे ठसे बघूनच व्हायची. विशेषत: वाघ आणि बिबटे यांच्या पायांचे ठसे अजूनही घेतले जातात. त्यांचे ठसे जर त्यांच्या गणतीसाठी वापरायचे असतील तर त्याची एक खास पद्धत असते. गणतीच्या काही दिवस आधी जंगलातल्या काही वाटांवर मऊ मातीचा पातळ थर टाकला जातो. मग त्या ठिकाणी प्राण्याचे ठसे आले आहेत का हे बघितलं जातं. चांगले ठसे निवडून त्यांच्या आजूबाजूचा थोडा भाग स्वच्छ केला जातो. त्यानंतर त्यावर एक काचेचा किंवा प्लास्टिकचा पारदर्शक तुकडा धरून त्या पंजाच्या ठशाचा आकार पेन वापरून सावकाशपणे गिरवला जातो, जेवढा तंतोतंत जमेल तेवढाच चांगला. मग प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात मिसळून त्या ठशात ओतलं जातं आणि ते सुकलं की अलगदपणे तेवढा तुकडा बाहेर काढला जातो. अशा प्रकारे त्या प्राण्याच्या पावलाच्या ठशाची एक कायमची अशी प्रत मिळते. हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा ठसा मग तज्ज्ञ लोकांकडे पाठवून प्राण्यांच्या संख्येचा अंदाज बांधला जातो.

यातही एक मजा असते. मातीच्या पोतावर तो ठसा अवलंबून असतो. माती भुसभुशीत असली तर ठसाही बिघडतो. त्यात प्लास्टर नीट सुकलं नाही तर ते काढता काढताच तुटण्याची शक्यता असते. ते मजबूत व्हावं म्हणून बऱ्याचदा त्याच्यात तागाचे तुकडे किंवा गवत मिसळलं जातं. वन खात्यातील लोक या कामाला अत्यंत सरावलेले असतात. मुंबईच्या बिबटय़ांची गणना व्हायची तेव्हा आमच्यासारख्या काही शिकाऊ मुलांना आयतंच प्रशिक्षण मिळायचं याचं. एका पिशवीत प्लास्टर, तागाचा दोर, पाणी आणि काचेचा तुकडा घेऊन आम्ही मदतनीस म्हणून मनसोक्त फिरून घ्यायचो. आणि मग एखादा ठसा प्लास्टरवर अगदी ठसठशीत आणि सुंदर उतरवला की मग काय तो आनंद वर्णावा!

जंगलवाचनातील जरा जास्त प्रयत्नांनी अवगत होणारी कला म्हणजे पक्ष्यांचे आवाज ओळखण्याची क्षमता. विशेषत दाट जंगलांमध्ये पक्षी दिसणं खूपच कठीण असतं. पण त्यांचा आवाज मात्र ऐकू येतो. मग आवाजावरूनच ते पक्षी ओळखावे लागतात. प्रत्येक जातीच्या पक्ष्याचा आवाज निराळा असतो. घुबडाचा अगदी गूढ असा घुमणारा आवाज तर प्रसिद्धच आहे. पण अगदी गजबजलेल्या मुंबई-पुण्यासारख्या शहरातही काही पक्ष्यांचे आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. त्यातला ओळखण्यास सगळ्यात सोप्पा म्हणजे तांबट पक्षी. हा छोटासा, हिरवा-लाल पक्षी सहजासहजी दिसत नसला तरी त्याचा ‘पुक पुक पुक पुक’ असा आवाज अगदी एखाद्या कारागिराने तांब्यावर हातोडा मारल्यावर यावा असाच असतो! आजूबाजूला झाडं असतील तर अगदी पहाटे पहाटे ऐकू येणारा पक्ष्याचा सुमधुर असा ‘ता ता, तारा तारा तारा’ आवाज म्हणजे शेपटी फलकारून नाचणारा नर्तक पक्षी किंवा फॅनटेल फ्लायकॅचर आहे याची खात्री असते.

पण काही पक्षी मात्र आपल्यासारख्या माणसांनाच नाही, तर इतर पक्ष्यांनाही भुलविण्यात पटाईत असतात. काळाकुट्ट असा कोतवाल पक्षी इतर पक्ष्यांच्या आवाजाच्या अशा काही नकला करतो की अगदी फसायलाच होतं. बऱ्याचदा तो आपल्यापेक्षा मोठय़ा अशा शिकारी पक्ष्यांचा म्हणजे गरुड, ससाणे इत्यादींचा आवाज काढतो. अगदी पक्षी ओळखण्याचा भरपूर सराव असलेल्या माणसांचीही गफलत होते. एकदा बराच वेळ शिकारी पक्ष्याचा आवाज येतोय म्हणून तुंगारेश्वरच्या जंगलात आम्ही काही जण तो गरुड नक्की बसलाय तरी कुठे हे शोधत फिरत होतो. शेवटी जिथून आवाज येत होता त्या झाडाखाली पोहोचलो आणि बघतो तर काय, बसलेत आपले कोतवालबुवा नक्कल करीत! काही लोकांनी एका कोतवाल पक्ष्याच्या जातीच्या या नक्कल करण्याच्या सवयीचा अभ्यास केला आहे आणि त्यावरून असे माहिती झाले आहे की त्याचा नकली शिकारी पक्ष्याचा आवाज ऐकल्याने इतर पक्षी घाबरून कधी कधी स्वत: पकडलेलं खाणं सोडून देतात आणि ते आयतंच कोतवालाला मिळतं! काही वेळा एकच पक्षी वेगवेगळे आवाज वेगवेगळ्या गोष्टी व्यक्त करायला वापरतो. काळा-पांढरा दयाळ पक्षी अनेक वेगवेगळी गाणी गाऊन तो रागावलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे की तो घाबरलेला आहे हे व्यक्त करू शकतो.

हे आवाज ओळखण्यासाठी सवय व्हायला थोडा सराव आणि वेळ लागतो. पण एकदा ही कला जमायला लागली की थांबता येत नाही! आज-काल पक्ष्यांचे रेकॉर्ड केलेले आवाज अगदी सहज इंटरनेटवर उपलब्ध असतात. त्यामुळे अगदी वेगाने पक्ष्यांच्या आवाजावरून तो कोणता पक्षी आहे हे शिकता येतं. यासाठी तुम्ही http://www.indiabirds.com  आणि http://www.xeno-canto.org या वेबसाइट्सना भेट देऊ शकता. प्राण्यांच्या पावलाच्या ठशांचीही माहिती तशी मिळते. वनस्पती ओळखायला शिकणं थोडंसं कठीण असतं. पण या सगळ्याची माहिती देणारी अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. पण खरं म्हणजे जंगलाच्या सान्निध्यात जंगलवाचन करणं याला त्याची तोडच नाही! काय मग, व्हायचंय का जंगलाच्या भरगच्च ग्रंथालयाचे सभासद?
ओवी थोरात – response.lokprabha@expressindia.com