आम्ही जेव्हा शाळकरी मुली होतो तेव्हा नाशिकला राहायचो. गणपतीत आईच्या भावाकडे धुळ्याला किंवा काकांकडे अलिबागला (क्वचित) जाण्याची पद्धत होती. आम्ही मुले पंधरा दिवस आधीपासूनच ‘‘मामाच्या गावाला जायचे, गणपती बाप्पा आणायचे.’’ असा धोशा सुरू करीत असू.. गणपतीची तयारी आई दीड महिना आधीपासूनच सुरू करीत असे. घर चकाचक स्वच्छ करून घ्यायचे, ठेवणीतले गालिचे, मखर, झुंबर, फोटोफ्रेम, विणकाम भरतकाम बाहेर काढून ऊन दाखवून ठेवी. खिरापत, नारळाच्या करंज्या, चकल्या, चिवडा हा फराळ पितळी डब्यांत भरून ठेवत असे. नवे कपडे तयार होत. नृत्ये, नकला, छोटय़ा नाटुकल्या ती आम्हा मुलांकडून बसवून घेई.
त्या काळी दूरदर्शन, कार्टुन, मोबाइल असे मनोरंजनाचे पेव फुटलेले नव्हते. त्यामुळे गणेशोत्सव व ते कार्यक्रमही आबालवृद्धांना मोठीच पर्वणी वाटे, सर्वचजण गणपतीची आतुरतेने वाट बघत असत. नुकताच एका मित्राला ‘‘बसला तर गणपती, उभा राहिला तर मारुती’’ असा फिशपाँड मिळाला होता. त्यामुळे गणपती शब्दावरच आम्ही हसून खुशी व्यक्त करीत असू.
त्या काळी दूरदर्शन नव्हते, रेडिमेड फराळ नव्हता त्यामुळे सर्वजण बिझी असत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून समाजावर फार मोठे उपकार केले व त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीला मदत झाली असे आजोबा सांगत.
गणपतीतील कार्यक्रम वैचारिक होते. भाषणे, नाटके, नकला, जादूचे प्रयोग, फॅन्सी ड्रेस, देखावे, किल्ले बनवणे हे कार्यक्रम असत. कार्यक्रम बसवण्याची व ते सादर करण्याची अहमहमिका होती. प्रत्येकाच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळत असे. श्रीमंत, नोकरदार- कामगार स्त्री, पुरुष, मुले, वृद्ध भेदभाव न मानता सर्वजण कार्यक्रमांना हजेरी लावत असत.
मंडळाच्या सजावटीत प्रत्येकाचा खारीचा वाटा असे. एखादा गुप्त प्रायोजक पैसे देई. त्याच्या नावाचा बोर्ड लागत नसे, पण मुलांच्या तोंडी त्याचे नाव असे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांना व सभासदांना तो नाश्ता, चहा, जेवण पुरवी. जमवून मिळवलेल्या वर्गणीतून सिनेमा दाखवला जाई. सिनेमाचा काय थाट विचारता? प्रोजेक्टरवरून पांढऱ्या पडद्यावर दाखवला जाई. आईला ‘‘कशाला ग जाते?’’ म्हणणारे आम्हीही सिनेमाचे नाव ऐकून त्या गर्दीत चित्रपट बघायला दूरवरसुद्धा चालत जात असू. ‘‘गणपती बाप्पा मोरया’’ असे ओरडत गावातले गणपती त्यांचे देखावे बघत फिरायला त्या वेळी खूप आवडे. नाशिक, धुळे, अलिबाग तिन्ही गावी गणपतीची गंमत असे.
या गावांना जाताना टॅक्सी टाइप अ‍ॅम्बॅसॅडरने आम्ही जायचो. रस्त्यावर गाडय़ांची गर्दी असे. शिवाय त्या गाडीला स्पीड फारसा नसे. पांघरूण घेऊन आम्ही मुले झोपून जात असू व आई-वडील पहारा देत असत. जागत बसत. दोन दिवससुद्धा कधी कधी प्रवास चाले. मग दोन दिवस सुका फराळ खायचा किंवा रस्त्याच्या कडेला मोठय़ा पातेल्यात खिचडी शिजवायची व गरम गरम खाऊन जर रस्ता मोकळा मिळाला तर पुढचा प्रवास करायचा. रस्त्यावर तर दिवेही नसायचे. पेट्रोमॅक्सच्या दिव्यांची काच पावसाच्या थेंबाने तडकली, कंदील विझले की आम्ही मुले घाबरून जायचो. मग पहाटे तांबडे फुटायची वाट बघायचे.
पुढच्या दिवसाचा प्रवास छान होई. वाटेत अनेक गावच्या प्रमुख गणपती मूर्ती जाता-येता दिसत. गावी पोहोचल्यावर तर काय मजा विचारायची? सजावट, गप्पा, मस्ती, बाप्पाची भक्ती यांचे मस्त कोलाजचित्र व्हायचे.
रात्री गणपतीची आरास बघायला आमची वरात निघत असे. काही मंडळांच्या मूर्ती बघायला तासन् तास रांगेत उभे राहावे लागे. जेवढी गर्दी जास्त, जेवढा वेळ जास्त लागेल तेवढे मंडळ ‘भारी’ असे आम्ही समजत असू. आमचा तो ‘लई भारी’ गणपती निवडण्याचा मापक असे.
रात्री दाखवायचा सिनेमा ‘‘लई भारी’’ निवडला जाई.
हवशे-नवशे, आबालवृद्ध सर्वाना हे देखावे व ही करमणूक नाटक सिनेमे चर्चा करायला वर्षभर पुरत होते. वेगवेगळे विचार या देखाव्यांतून समाजापुढे येत. रात्रभर चर्चा, कार्यक्रम चालत असत. विचारांची पेरणी या उत्सवात होई.
इव्हेन्ट झाल्याने हल्ली मात्र गणेशोत्सवाची सजावट बघायला जायचे तर तिथे, ‘‘जाऊ द्या ना घरी’’ ‘‘शीला’’ मुन्नी अशी नृत्ये असतात. देखावे पूर्वीपेक्षा अधिक हायटेक झालेले आहेत. चित्रपट मालिका व सीनसिनेरीमुळे नयनरम्य देखावे असतात. वाचन, चर्चेची आवड व बौद्धिक भूक मात्र भागत नाही. गेस्ट गणपतीचे विकतचे अलंकार, हार, मोदक, करंजा, आयती सजावट यांची आर्थिक उलाढाल हल्ली होते. देखावे मात्र खरेच सुखद असतात. रंगांची उधळण असते. पण सगळीकडेच गर्दी व गोंगाट जाणवतो. उत्सव जाणवतो तो त्या आवाजामुळेच. गावी जाण्यासाठी गाडय़ा गणपतीच्या येण्याआधी महिनोन महिने फुल होतात. काळ बदलला. आता पर्यावरणासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही कल्पना आली. चांदीची मूर्ती बसवून घरीच विसर्जन करण्याची पद्धती आली. कोकणातील गणेशोत्सवाची शान वाढती आहे तरी चाकरमान्यांमध्ये तरुण वर्ग कमी असतो. बऱ्याच घरी कुटुंबे परदेशी विखुरली आहेत. कोकणोत्सव अजून गणेशकृपेने शानदार आहेत.
मामाच्या घरी, देखावे मांडायला घर लहान पडते म्हणून पाहुण्यांना बसवायला अंगण नाही म्हणून आता गणेशोत्सवाला सुट्टय़ा जोडून पर्यटनाला जायचे बेत ठरतात. दूरदर्शनवरच्या चित्रफिती वर्तमानपत्रातील फोटोंवरून सजावट निरखून समाधान वाटते. सेलिब्रेटींचे गणपती राजाच्या शेजारचे फोटो डोळे भरून बघते. लाल फुले व दूर्वा हातात घेऊन त्या विघ्नहर्त्यांला मनोभावे हात जोडते. तृप्त मनात अपार शांती दाटते. मी मनाशीच गुणगुणते
मला गणपतीला गावी जायचे
माझा आनंद पोटात मावेना..
शुभांगी पासेबंद –  response.lokprabha@expressindia.com

mithun chakraborty son namashi calls him mithun
मिथुन चक्रवर्तींना नावाने हाक मारतात त्यांची मुलं, कारण सांगत लेक नमाशी म्हणाला, “आम्ही वडिलांना…”
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!