४४-वर्धापनदिन विशेष अंक

मुंबईच्या अनेक आकर्षणांपैकी एक म्हणजे ‘गेट वे ऑफ इंडिया. त्याच्या कायमस्वरूपी, पक्क्या बांधकामाची पायाभरणी  झाली ती ३१ मार्च १९१३ रोजीनिमित्त..

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
kolhapur, Two Arrested in scam, India Makers Agro Scam, Rs 2 Crore Assets Seized, shridhar khedekar, suresh junnare, lure, crore scam, police, scam news, kolhapur news, marathi news,
कोट्यवधीचा गंडा; इंडिया मेकर्स ऍग्रो इंडियाशी संबंधित आणखी दोघांना कोल्हापुरात अटक
image and signature of Dr Babasaheb Ambedkar, pen, writing wonders of pune
घटनाकारांची छबी, स्वाक्षरी आता लेखणीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर पेनच्या आवृत्तीचे अनावरण

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मध्यवर्ती स्थान आणि येथून तत्कालीन ज्ञात जगाशी सहज साधता येणारा संपर्क या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या सात बेटांच्या समूहाचे पूर्वीपासून राज्यकर्त्यांना आकर्षण होते. इ.स. ११४० पासून राणा प्रताप बिंबाची हिंदू राजवट, नंतर १३४८ पासून मोगल प्रभाव व १५३४ पासून पोर्तुगीज राज्य मुंबईने पाहिले. मात्र नंतर पोर्तुगीजांनी राजघराण्यातील सोयरिकीमुळे मुंबई बेट ब्रिटिशांना १६६१ मध्ये आंदण दिले व ते १६६५ मध्ये प्रत्यक्ष हस्तांतरित झाले. अशा पद्धतीने मुंबईच्या भूगोलावर व कारभारावर ब्रिटिशांचा चंचुप्रवेश झाला व त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवत १९४० मध्ये भारतावरील सत्ता सोडावी लागेपर्यंत मुंबईचे भौगोलिक व आर्थिक स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले.

15-gate-way-of-india

येथे एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की हे सर्व करताना ब्रिटिशांचे धोरण व भूमिका ही तात्पुरत्या वास्तव्याची नव्हती. या खंडप्राय विशाल देशाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला आकाशातील पित्यानेच पाठविले आहे व येथे कायमचे राहून आपल्याला सुधारणा करून उत्तम राज्य करायचे आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे येथे राहून त्यांनी जे जे केले ते ते सर्व अभ्यासपूर्ण आणि उत्तमच केले. या सर्व खटाटोपाची सुरुवात करताना त्यांनी निव्वळ स्थानिकांच्या माहितीवर अवलंबून न राहता, आपली यंत्रणा राबवून सर्व भूभागाची बारकाईने पाहणी केली व काटेकोर मोजमापे घेऊन असे सुरेख नकाशे तयार केले की जे साडेतीनशे वर्षांनंतर आजदेखील संदर्भासाठी वापरता येतात.

मुंबईची मूळची जी सात बेटे आहेत. त्यांचे उत्तरेकडील टोक हे मुख्य जमिनीस जोडलेले व तेथून दळणवळणास सोयीचे होते. मात्र अरबी समुद्रातून पश्चिमेकडून येणाऱ्या सर्व होडय़ा, मचणे, जहाजे व गलबते यांना नांगरण्यासाठी तसेच मालसामानाची चढ-उतार करण्यासाठी जी बंदरे आवश्यक होती, ती सर्व या बेटांच्या पूर्वेकडील किनारपट्टीचा जो भाग आहे, तेथे बांधली गेली होती. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला जराशी बगल देऊन ही सात बेटे अरबी समुद्रांत शिरलेली असल्यामुळे समुद्राची दक्षिणोत्तर चिंचोळी पट्टी येथे निर्माण झालेली आहे व पूर्वीच्या गलबतांपेक्षा अवाढव्य अशा व्यापारी नौका, लढाऊ जहाजे अशा सर्वाचा येथे नंतरच्या काळात सोयीस्कर वावर होता. अजून आहे व या सर्वाच्या देखभालीचे व दुरुस्तीचे काम करणाऱ्या गोदी म्हणजे डॉक्स येथे निर्माण केल्या गेल्या. बेटांच्या पश्चिमेकडील उथळ खडकाळ किनाऱ्यापेक्षा येथील ही चिंचोळी समुद्रपट्टी सखोल आहे.

हजारो वर्षांपासून या बेटांचे त्या त्या काळातील राज्यकर्त्यांना आकर्षण होते. दक्षिणेकडून तिसरे व पश्चिमेच्या मलबार हिलपासून पूर्वेच्या गिरगावातून या चिंचोळ्या समुद्रपट्टीतील बंदरांपर्यंत पसरलेले मुंबई बेट हे आकाराने व विस्ताराने सर्वात मोठे बेट होते. (याच बेटावर मुंबई देवीचे देऊळ असल्याने, एकत्रित सर्व बेटांचे नाव ‘मुंबई’ असेच पडले. सर्व बेटांची नावे दक्षिणेकडून उत्तरेकडे अशी- कुलाबा, धाकटा कुलाबा, 16-yashvant-desaiमुंबई, माझगाव, परळ, वरळी व माहीम.

या मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर सम्राट अशोकाच्या काळापासून बंदर होते व त्याचे नाव त्या काळात ‘पल्लव’ असे होते. हजारो वर्षांच्या वापराने व चर्चेने या ‘पल्लव’चे ‘पालव’ असे नाव झाले. मुंबईची वस्ती वाढल्यानंतर गिरगावापासून दक्षिणेकडच्या भागाला ‘पालव’ असे अजूनही म्हटले जाते व दक्षिणेच्या रस्त्याला ‘पालवाचा रस्ता’ म्हणतात. या ठिकाणी १६६५ नंतर ब्रिटिशांनी बंदर भक्कम केले व त्याला ‘अपोलो बंदर’ असे नाव दिले. मुंबई बेटावर ब्रिटिशांनी बांधलेल्या किल्ल्याचा जो दक्षिण दरवाजा होता. तो या बंदराजवळ होता. त्यामुळे त्या दरवाजाला ‘अपोलो गेट’ असे नाव दिले. (संदर्भ- ब्रिटिशांचे उच्चार. वाराणशीचे बनारस, वडोदरचे बरोडा तसेच मुंबईचे बॉम्बे झाले. शिवाय अपोलो हे त्यांच्या देवतेचे नाव आहे.)

या अपोलो बंदराच्या पश्चिमेकडचा प्रशस्त मोकळा भाग हा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वापरण्यास ब्रिटिशांनी सुरुवात केली. सैन्यदल, नाविकदल व विमानदल यांच्या कवायती, जनतेसाठी करमणुकीचे कार्यक्रम येथे होऊ लागले. मोठी जागा व सतत आल्हाददायक हवा यामुळे फिरावयास जाण्याचे हे जनतेचे अतिशय प्रिय ठिकाण होते, अजूनही आहे.

अशामध्येच ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पाचवे व क्वीन मेरी यांनी मुंबईस भेट देण्याचे ठरविले. त्यांचे आगमन बोटीने होणार व ते अपोलो बंदरात होणार हे ठरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अपोलो बंदरावर कमान उभारावी असे सरकारने ठरविले व त्याप्रमाणे भारतीय कमान वाटेल असे एक बांधकाम समुद्रकिनारी उभे केले. या कमानीची शैली मुगल पद्धतीची होती. इ.स. १९११ मध्ये उभारलेल्या या स्वागत कमानीने सम्राटाचे स्वागत केले. राजेशाही कवायती केल्या गेल्या व सोहळा पार पडला. नंतर मात्र तेथे कायमस्वरूपी देखणी कमान उभारावी असे सरकारने ठरविले. त्यासाठी १९०४ मध्ये मुंबईस बदलून आलेल्या जॉर्ज विटेट या सरकारी आर्किटेक्टची नेमणूक केली. या जॉर्ज विटेननी सर्व बांधकाम शैलींचा सखोल अभ्यास केलेला होता व त्यांच्या कारकीर्दीत मुंबईमधील खानदानी गॉथिक शैली व भारतातील विविध प्रादेशिक शैली यांचे मिश्रण करून त्याचा ते गरजेनुसार वापर करीत. या शैलीला त्यांनी इंडो सारॅसीनिक स्टाइल असे नाव दिले होते. गेटवेच्या डिझाइनसाठी त्यांनी हीच स्टाइल वापरली आहे.

१९११ मध्ये उभारलेली स्वागत कमान पाडून टाकली गेली व तेथे समुद्रकिनारी भराव घालून जमीन तयार केली. किनाऱ्यात भक्कम भिंती बांधल्या व ३१ मार्च १९१३ रोजी गेटवेची पायाभरणी केली गेली. मात्र त्यापूर्वी, विटेट यांनी १९१२-१३ मध्ये गेटवेसाठी वेगवेगळी डिझाइन्स तयार केली. त्यांची ड्रॉइंग्ज व मॉडेल्स तयार करून प्रदर्शन भरविले व जनतेला आवाहन केले की हे सर्व पाहून यावर सूचना कराव्यात. त्या सूचनांची दखल घेऊन त्यांनी डिझाईन निश्चित केले व ऑगस्ट १९१४ मध्ये डिझाईन मंजूर झाले. नंतर भक्कमपणासाठी ३६ फूट खोल आर सी सी पाइल फाऊंडेशन्स  भरली व ते काम झाल्यानंतर प्रत्यक्ष गेटवेचे बांधकाम मे १९२० मध्ये सुरू केले. हे डिझाइन गुजरातमधील १६ व्या शतकातील बांधकाम शैलीवर आधारित आहे. त्यासाठी चिकित्सा करून राजस्थानमधील खरोडी या ठिकाणाहून मुद्दाम यलो बेसॉल्ट दगड मागविण्यात आला. हा सॅण्डस्टोन असून पावसाने तो जितका भिजतो तितका अधिक मजबूत होत जातो असे त्याचे वैशिष्टय़ आहे. गेटवेच्या तीन कमानी आहेत. त्या तिन्हीवर घुमट आहेत, जे बाहेरून दिसत नाहीत. पैकी मधला घुमट हा ४८ फूट व्यासाचा असून, फरशीपासून ८३ फूट उंच आहे. हे घुमटही आरसीसीचे आहेत. या बांधकामाला त्या काळी २१ लक्ष रुपये खर्च आला व या रकमेत मध्यवर्ती सरकार, सर जेकब ससून, मुंबई महापालिका व पोर्ट ट्रस्ट यांचा सहभाग होता. काम पूर्ण झाल्यावर तत्कालीन व्हाइसरॉय अर्ल ऑफ रीडिंग यांच्या हस्ते ४ डिसेंबर १९२४, गुरुवार या दिवशी उद्घाटन करण्यात आले.

गेटवेचे बांधकाम करण्यासाठी रावबहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई या मराठी इंजिनीअरची नेमणूक झाली होती. त्यांचा मोठा बंगला गावदेवी येथे होता. पूर्ण झाल्यावर गेटवे कसा दिसेल याची कल्पना येण्यासाठी त्यांनी बंगल्याच्या आवारात तशाच दगडाचे छोटे मॉडेल बांधले, तेदेखील अजून टिकून आहे. देसाई यांच्या बांधकामाचा गौरव करण्यासाठी बृहन्मुंबई म.न.पा.ने हॉटेल ताजच्या मागील चौकास त्यांचे नाव दिले आहे, असे त्यांचे नातू सुहास देसाई यांनी सांगितले.

16-gate-way-of-india

मुंबईचे दर्शन घेण्यास उत्सुक असलेल्या कुणाही पर्यटकाचे समाधान ‘गेटवे ऑफ इंडिया’ला भेट दिल्याशिवाय कधीच होत नाही!

‘गेटवे ऑफ इंडिया’ या विषयावर मी जेव्हा जेव्हा विचार करते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षांने माझ्या लक्षात येते. १९४० मध्ये हिंदुस्थानातील कारभार गुंडाळून ब्रिटिश त्यांच्या मायदेशी म्हणजे इंग्लंडला परत गेले. त्यांनी कारभाराला लावलेली शिस्त, सातही बेटे एकमेकांना जोडून निर्माण केलेली सलग मुंबई व तिचा उत्तरेकडील विस्तार, जनतेच्या आरोग्यासाठी उपयोगी येणारी उद्याने, वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटल्स, प्रशस्त रस्ते व देखण्या भक्कम इमारती, सेंट्रल व वेस्टर्न रेल्वे व त्यांची स्टेशन्स हे सारे इथेच राहिले.

मात्र नंतरच्या काळात, वर उल्लेख केलेल्या बहुतेक आस्थापनांची मूळ नावे बदलून त्यांना स्वदेशी व्यक्तींची नावे देण्याचा प्रकार सुरू झाला. आस्थापना तीच, स्वरूप तेच, सुधारणा काही नाही, मात्र नाव बदलले, यातून काय साध्य होते? कोण जाणे!

असे असूनही या लोकप्रिय व बालिश खेळांतून गेटवे ऑफ इंडिया मात्र वाचला आहे! कारण ‘हिंदुस्थानाचे प्रवेशद्वार’ या त्याच्या स्वरूपाला व कार्याला कोठेही धक्का लागत नाही. गेटवे ऑफ इंडिया हा एकमेव व अद्वितीय आहे!

उज्ज्वला आगासकर – response.lokprabha@expressindia.com