राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com
म्हटले तर सगळेच सणवार दरवर्षी येतात. वर्षांमागून र्वष उलटत राहातात. तरीही या सणांमुळे आपल्या मनात किंचितसा का होईना आनंदाचा ठेवा निर्माण होतो. त्यापैकीच एक म्हणजे गुढीपाडवा.  

डायरीत आठवडय़ाभराची कामं लिहीत होते. तितक्यात २ एप्रिल लाल रंगात दिसला. मग पाहिल्यावर कळलं की, त्या दिवशी गुढीपाडवा आहे. वाटलं, आपण रोजच्या कामात इतके बुडालो आणि समाजमाध्यमांत इतके रमलो की चक्क साडेतीन मुहुर्तापैकी एक, म्हणजे म्हटलं तर अतिमहत्त्वाचा दिवसही विसरून गेलो. आपण स्वत:तच एवढे व्यग्र झालेले असतो, की या साऱ्याकडे दुर्लक्षच होतं.

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
yashoda jayanti 2024, shri krishna, puja, god, story, trending, vidhi,
आज यशोदा जयंती! काय आहे महत्व, आख्यायिका…
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
sankashti ganesh chaturthi 2024 shubh muhurat puja vidhi and mantra dwipriya falgun ganesha chaturthi
सर्वार्थ सिद्धी योगातील संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ

मनाला लागलेली ही रुखरुख वर्तमानपत्रांतील पुरवण्यांनी दूर केली. जवळपास दोन वर्षांनी करोनाचं सावट तूर्तास दूर झाल्याचं दिसत असल्याने जाहिरातींनी नटलेल्या भरगच्च पुरवण्या आणि अर्थात त्यातले सणावारांना वाहिलेले लेख. त्यांचा सारांश असा की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मदेवांनी या विश्वाची निर्मिती केली होती, असं मानलं जातं. १४ वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा पराभव करून राम अयोध्येत परतले ते याच दिवशी. त्या वेळी आनंदित झालेल्या अयोध्यावासीयांनी त्यांच्या स्वागतासाठी गुढय़ा उभारल्या होत्या. तेव्हापासून गुढी उभारायची पद्धत सुरू झाली, असं मानलं जातं. शालिवाहन शकाचा आरंभ या दिवशी होतो, त्या मागे शालिवाहन नावाच्या कुंभाराने मातीचं सैन्य घडवून, त्यात प्राण फुंकले आणि त्या सैन्याच्या मदतीने शकांचा पराभव केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे.

सकाळी दारात, खिडकीत किंवा गॅलरीत गुढी उभारण्याआधी दरवाजासमोर रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावावं. बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर कलश ठेवावा. गुढीला हार, साखरेची गाठी, कडुिनबाची डहाळी बांधावी. गंध, फूल, अक्षता वाहून तिची पूजा करावी. नेवैद्य दाखवावा. पूजा झाल्यानंतर कडुिनबाची पानं जिरं, मिरं, िहग, ओवा, साखर एकत्र वाटून ते मिश्रण प्रसाद म्हणून खावं. सूर्यास्ताच्या वेळी गुढीची पूजा करून ती उतरवण्याची प्रथा आहे. थोडासा विचार केला तर गुढी अनेक गोष्टींचं द्योतक आहे. गुढीसाठी बहुसंख्य ठिकाणी उपलब्ध असलेला बांबू किंवा कळकाची काठी वापरली जाते. त्यामुळं वृक्षांचं महत्त्व अधोरेखित होतं. गुढी आकाशाच्या दिशेनं उभारणं म्हणजे आपली महत्त्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अमर्याद असावी, अशी मनीषा. कडुिनब, साखरेची माळ, रेशमी वस्त्र, बांबू ही माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची प्रतीकं म्हणता येतील. घरोघरी गुढी उभारल्यानंतर एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या जातात.

लेख वाचून संपले आणि काम सुरू झालं. पण त्या लेखांमधले काही मुद्दे मनातच रेंगाळत राहिले. आता शुभेच्छांचंच घ्या ना. शुभेच्छा पूर्वी प्रत्यक्ष भेटून दिल्या जात. मग एकेक करत दूरध्वनी, ई-मेल, एसएमएस आणि समाजमाध्यांवर शुभेच्छा द्यायचा प्रघात रूढ झाला. या प्रघातामुळे करोनाकाळ कणभर सुसह्य झाला, मात्र या गोष्टीला कोणता टॅग लावावा, ते कळत नाही. गेल्या काही वर्षांत सणांचा इव्हेंट झाला आहे. त्याचं प्रतििबब म्हणा किंवा लोकांना एकत्र यायचं निमित्त म्हणा, अनेक ठिकाणी नवीन वर्षांनिमित्त स्वागतयात्रा काढल्या जातात. शिवाजी पार्क, ठाण्याचा राममारुती रोड, डोंबिवलीचा फडके रोड आदी ठिकाणच्या यात्रा प्रसिद्ध आहेत. इतरही अनेक ठिकाणी या यात्रांमुळे रस्ते गर्दीने फुलून जातात. करोनाचं प्रमाण कमी झाल्यामुळे यंदा स्वागतयात्रा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. नटूनथटून, झोकदार फेटे बांधून, महारांगोळय़ा काढून, बाईकवर स्वार होऊन आणि देखावे सादर करून अनेक जण या उत्साहात सहभागी होतात. या निमित्ताने अनेकांच्या व्यवसायाला थोडी चालना मिळते. यात्रेत सहभागी होणारी हौशी मंडळी पुष्कळदा फक्त समाजमाध्यमांवर लाइव्ह, अपडेट, पोस्ट करत राहतात. तर काही स्वयंसेवक यात्रेतल्या सगळय़ांची आपुलकीनं विचारपूस करत त्यांना हवं-नको बघत त्यांची काळजी घेतात. कधी काही गट एकत्र येऊन समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी काम करतात. कधी गरजूंना आर्थिक मदत करतात. कधी वैद्यकीय शिबिरं भरवतात. कधी अनाथालय किंवा वृद्धाश्रमांत जाऊन तिथल्या लहानग्यांशी किंवा आजी-आजोबांशी गप्पा मारून, त्यांना खाऊ देऊन गुढीपाडवा साजरा करतात. अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये अनेक संस्था आणि मान्यवर सहभागी होत असल्याने आपोआपच विविध कल्पना, योजना, विचारांची देवाणघेवाण होऊन जणू नवसंकल्पनांची अमूर्त गुढी उभारली जाते. काही ठिकाणी स्वागतयात्रांची स्पर्धा आयोजित केली जाते. त्यासाठी एक संकल्पना दिली जाते आणि त्यानुसार सहभागींनी आपापले सादरीकरण करायचे असते. पर्यावरण, प्लास्टिकबंदी, कचऱ्याचं नियोजन आदी विषय यात हाताळलेले दिसतात.

सुरुवातीला म्हटलं तसा, गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा मुहूर्त. तो साधून सोनं, वाहन, घर आदी मोठी खरेदी केली जाते. त्यानिमित्त भरगच्च जाहिरातींच्या पुरवण्या काढल्या जातात. दूरचित्रवाणीवरील बातम्यांत सेलेब्रेटींना आमंत्रित केलं जातं आणि मालिकांमध्येही गुढीपाडवा साजरा केला जातो. नवीन प्रकल्प, व्यवसायांचा शुभारंभ केला जातो. नवीन लग्न झालेले जोडपी तर हा सण अगदी झोकात साजरा करतात. हल्ली कोणीही कितीही कामात असलं आणि त्या नादात सणवारांचा विसर पडला, तरी समाजमाध्यमं त्यांची आठवण हमखास करून देतात. तिथे काही दिवस आधीच सणाची चाहूल लागते. दोन जणांना पुरेल इतक्या पक्वान्न व जेवणापासून ते जिलेबी-श्रीखंडांच्या ऑर्डरी द्या इथपर्यंत, गुढीसाठी वस्त्र निवडा, मिनी गुढी घेऊन विशेष मुलांना मदतीचा हात द्या, प्रत्येक सणात पर्यावरणस्नेह जपा अशा आशयाचे संदेश किंवा पोस्ट किमान १५ दिवस आधीच दिसू लागलेल्या असतात.

अद्याप न संपलेला करोना, रशिया-युक्रेन युद्धाचे ढग, एकूणच भोवताली घडणाऱ्या नकारात्मक घटनांचं सावट सणांवर आहेच. शिवाय या साऱ्याचे सामान्यांच्या क्रयशक्तीवरही दुष्परिणाम  झाले आहेत. त्यामुळे छोटय़ा-मोठय़ा खरेदीचा उत्साह काहीसा ओसरलेलाच दिसतो. मनात असो वा नसो, सगळय़ांना सण साजरा करता येणार आहे की नाही, हा विचार मन कुरतडत राहतो. कामाहून परताना उगीचच नजर सभोवताली भिरभिरते. दिसतात ती िपपळ, कुसुम वृक्षांची पिवळसर, तांबूस पानं. मन जरा निवांत होतं त्यांना बघून. मग नजर वेडय़ासारखी शोधू लागते मधुमालती, घाणेर, बदाम, बहावा, सोनमोहर, चाफा, अशोकाची झाडं.. आठवत राहातात. गावातली पळस, कडुिनब, काटेसावर, पांगारा अशी झाडं. इथल्या आसपासच्या झाडांवरच्या हळद्या, कोकिळा, सनबर्ड, बुलबुल, सुतार पक्षी, तांबट यांचे आवाज ठरतात मूड बुस्टर. त्यांना बघताना-ऐकताना थोडा वेळ का होईना, बाकीच्या व्याप-तापांचा विसर पडतो. विचारांची जळमटं दूर होऊन आशेचा एखादा क्षण दिसू लागतो. असा एखादा तरी आशेचा क्षण लाभणं, हीच खरी नवीन वर्षांची करेक्ट सुरुवात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!