मुख्य धारेतील सिनेमे आणि सरधोपट टीव्ही मालिकांच्या निर्धारित कक्षांना पार करत प्रेक्षकांकडूनच मनोरंजनाची व्याख्या बदलत आहे. यंदा शोध पत्रकारिता दाखविणाऱ्या ‘स्पॉटलाइट’ चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. यानिमित्ताने सिनेमातील लक्षवेधी पत्रकारितेची दखल घेत फिरणारी सिने-मनोरंजन चर्चा.

सालाबादाप्रमाणे नेहमीच ‘रंगणाऱ्या’ ऑस्कर सोहळ्यात गेल्या आठवडय़ामध्ये ‘स्पॉटलाइट’ या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. यंदा बदल एकच झाला त्यामुळे. आडाखे चुकलेल्या समीक्षक  आणि सिनेपत्रकारांच्या जागतिक जथ्थ्यांमध्ये पुरस्कारप्राप्त चित्रपट कसा योग्य होता, हे सांगण्याचा सालाबाद होणारा ऑस्करोत्तर काथ्याकूट झाला नाही. पत्रकारितेतील अकथनात्मक गोष्टी घेऊन ऑस्कर पटकावणाऱ्या अलीकडच्या ‘आर्गो’, ‘हर्ट लॉकर’ सिनेमांची आठवणही काढली गेली नाही. पण गेल्या शतकभरामध्ये ‘सिटीजन केन’पासून ‘ऑल द प्रेसिडेण्ट मेन’पर्यंत पत्रकारितेमधील सिनेमे मोक्याच्या क्षणी ऑस्कर मिळविण्यापासून वंचित का राहिले, याची चर्चा मोठय़ा प्रमाणावर झाली. पत्रकार आणि पत्रकारिता यांविषयी पिढीजात अढी असलेल्या अमेरिकी समाजामुळे पत्रकारांचे चित्रपट ऑस्करमधून बाद का होत गेले, यावर त्या चर्चेचा मुख्य रोख होता.

खरे तर सुलभ संगणक, स्मार्टफोन आणि वृत्तवाहिनींच्या सुळसुळाटाद्वारे आज जगभरामध्ये सर्वसामान्य माणसांमध्येच अधिक स्वयंघोषित पत्रकार निपजू लागलेत, इतकी पत्रकारिता जनमनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रुजली आहे. त्यामुळे या व्यवस्थेतील अंतर्बाह्य़ घटक चित्रपटाचा विषय न होण्याचे काहीच कारण नाही. अन् यंदा चर्चमधील धर्मगुरूंकडून होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषणाचे रूप बाहेर काढणाऱ्या पत्रकारांवर बेतलेल्या ‘स्पॉटलाइट’ला ऑस्कर मिळणे, हे पत्रकारिता या विषयाला या घडीला आलेल्या महत्त्वाचे रूपच तर दर्शवत आहे.

दरवर्षी पत्रकारितेच्या कहाण्या घेऊन काही ठरावीक चित्रपट सगळीकडेच दाखल होत आहेत. बॉलीवूडच्या आजच्या चित्रपटांत नायिका बंडखोर विचारांची असणे, म्हणजे ती ओघाने पत्रकारच असणे, असे काहीसे दिसू लागले आहे. (आठवा फिर भी दिल है हिंदुस्थानीपासून सत्याग्रह, पेज थ्री, लक्ष्य, वेकअप सिध, नो वन किल्ड जेसिका, पी. केपर्यंतचे पत्रकारितेला ग्लॅमर देणारे सिनेमे) ऑस्करच्या सवरेत्कृष्ट चित्रपटांच्या स्पर्धेत राहूनही पीछेहाट झालेले सिटीजन केनपासून ब्रॉडकास्ट न्यूजपर्यंत पत्रकारितेच्या थेट व्यवहारावर प्रकाश टाकणारे उत्तम चित्रपट अमेरिकेत आलेत. अलीकडच्या काळात सोलोइस्टपासून नाइटक्रॉलर, श्ॉटर्ड ग्लास, हाऊ टू लूज फ्रेण्ड्स अ‍ॅण्ड एलिनेट पिपल, अँकरमनपर्यंत विषयांची वैविध्यपूर्णता असलेले पत्रकारितेवरचे चित्रपट लक्षवेधीही ठरले आहेत. पण मुख्य धारेतील या सिनेमांना काही थेट, ठळक मर्यादा आहेत. पत्रकारितेतील उद्दात्त ध्येय आणि त्याप्रती एकनिष्ट पत्रकारांच्या एकसुरी आवृत्त्याच अशा चित्रपटांमधून पुन:पुन्हा पाहायला मिळू शकतात. कथानके कितीही वेगळी असली, तरी भल्या-बुऱ्याचा संघर्ष व अंतिमत: सत्याचा विजय या घटकांभोवतीच त्यांची आवर्तने होत राहतात. त्यामुळे विषयांचे वैविध्य असले, तरी निर्धारित कक्षांच्या आतच ते अडकलेले दिसतात.

रुळलेल्या वाटा टाळून पत्रकारितेवर काही पाहायचे असल्यास हॉलीवूडच्या प्रवाहातील चर्चिल सिनेमांना वगळून सिनेशोध घेत राहणे गरजेचे असते. यात जगभरच्या इण्डिपेण्डण्ट चित्रपटांमधील भरपूर पर्याय सापडू शकतात. त्या शोधात अनेकदा गाजणाऱ्या चित्रपटांहून अधिक चांगले आशयघन मनोरंजन हाती लागू शकते. या शोधातील पत्रकारितेवरील तीन चित्रपट अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला नमुना आहे वृत्तवाहिनीच्या पत्रकारितेमध्ये दृश्यशोषणाचा जडलेला रोग अप्रत्यक्षरीत्या दाखविणारा स्पेनचा ‘रेक’ (२००७). वृत्तवाहिनीची प्रतिनिधी अग्निशमन दलाची डॉक्युमेण्ट्री करण्यासाठी जाते. अग्निशमन दलाच्या एका बचावकार्याचा आँखोदेखा अहवाल टिपण्याच्या नादात हाती असलेल्या कॅमेराद्वारे झॉम्बीकरणाचे भीषण चक्रव्यूह सिनेमा पाहणाऱ्यांच्या अंगावर घेऊन जाते. हा भयपट वरवर झॉम्बी सिनेमातील रक्ताळलेली िहसाही स्पष्ट करतो. दुसरा नमुना पत्रकारितेमध्ये रुजू घातलेल्या विचित्राच्या आकर्षणाचे रूप मांडणारा आहे. ‘सेफ्टी नॉट गॅरेण्टेड’ नावाच्या या चित्रपटात तथाकथित ‘टाइम मशीन’चा शोध लावणारी एक व्यक्ती आपल्यासोबत या यंत्रामधून प्रवास करण्यासाठी सोबती हवा असल्याची जाहिरात करते. या व्यक्तीमधील वृत्तमूल्य हेरून एका मासिकाचे तीन पत्रकार त्या जाहिरात देणाऱ्या व्यक्तीची टेहळणी सुरू करतात. पुढे गोष्टी इतक्या गंभीर गंमतीदार घडत जातात, की शोधपत्रकारितापटाच्या वळणाने हा चित्रपट सुंदर प्रेमकथेच्या रूपात परावर्तीत होतो.

16-lp-hollywood

यातील तिसरा सर्वात ताजा ‘लकी देम’ हा चित्रपट कुठल्याही पत्रकारिता सिनेमांच्या पंगतीतून वेगळा काढावा असा असला, तरी त्यात पत्रकार आणि शोध आहेच. पण तो चित्रपटाच्या कुठल्याही प्रचलित वाटांना न जुमानता आयुष्यातील साध्या समीकरणांशी कथानकाद्वारे खेळू पाहतो. चित्रपटातील मुख्य धागा संगीत असला, तरी संगीतपटांसारखा त्यात फार गाण्यांचा अतिरिक्त सोस नाही. रोड मुव्हीसारखा यात प्रवास असला, तरी हा चित्रपट रोड मुव्हीदेखील नाही. या सगळ्यांना सामावूनही त्याचे निर्धारित कक्षांच्या बाहेर असणे चित्रपट आवडण्यासाठी महत्त्वाचे आहे.

चित्रपटाची नायिका आहे एली क्लूग (टोनी कोलेट). ही एका लोकप्रिय संगीत मासिकाची ‘रॉक म्युझिक विभाग’ हाताळणारी, चाळिशीच्या उंबरठय़ावर पोहोचलेली पत्रकार. सुंदर, कठोर, करारी आणि आपल्या क्षेत्रात अग्रेसर असली, तरी रॉक संगीतावर लिहिता लिहिता त्यातील सेलिब्रेटींची जीवनशैली तिच्या अंगवळणी पडली असते. त्यामुळे पार्टी आणि पुरुष यांच्या प्रवाहात तिची पत्रकारिता वाममार्गावर वळत असतानाच तिच्या आयुष्यात एक बदल घडतो. यशाच्या शिखरावर असताना दहा वर्षांपूर्वी एकाएकी गायब झालेल्या मॅथ्यू स्मिथ नामक रॉकस्टारला अज्ञातवासातून शोधून काढून त्यावर एक मोठी ‘कव्हर स्टोरी’ करण्याचा आदेश तिला संपादकांकडून येतो. आता फुटकळ स्टोऱ्यांत समाधान मानणाऱ्या एलीला ही स्टोरी करण्यामागे पहिली अडचण असते मॅथ्यू स्मिथ तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असण्याची. शिवाय हा मॅथ्यू स्मिथ दहा वर्षांपूर्वी तिला सोडून गेला त्याच दिवशी त्याचा कार अपघातात मृत्यू झाल्याच्या ऐकीव दंतकथाही शहरात पसरलेल्या असतात. त्यामुळे त्याला शोधून काढण्याचा कुठलाच मार्ग अस्तित्वात नसतो. मात्र मासिकाच्या बदललेल्या प्रवाहामध्ये गाडून टाकलेल्या भूतकाळाला पुन्हा उकरून काढण्यासाठी नाखुशीने एली तयार होते. मग इंटरनेटवर मॅथ्यू स्मिथ जिवंत असल्याच्या दाव्यांचा मागोवा घेत एलीचा प्रवास सुरू होतो. एका अपघाताने तिच्या आयुष्यात परतलेल्या चार्ली (थॉमस हेडन क्लर्क) नावाच्या एका विक्षिप्त श्रीमंत मित्राची या शोधामध्ये मदत होते. आपल्या विक्षिप्तपणाचा एक  भाग म्हणून चार्ली एलीकडून सुरू झालेल्या वृत्तशोधाची डॉक्युमेण्ट्री करायची ठरवितो. कॅमेरा हाताळण्याची फारशी माहिती नसताना आणि संगीताचे जुजबी ज्ञान नसतानाही चार्ली व एलीच्या भूतकाळातील प्रियकर शोधाचा असांगीतिक गप्पांनी भरलेला प्रवास कधी थांबत, कधी विविध आयुष्य वळणांनी सुरू राहतो.

पूर्णपणे विरोधी आयुष्य असलेल्या चार्लीकडून या प्रवासात एलीशी चालणारा संवाद हा चित्रपट गमतीशीर करतो. येथे मॅथ्यू स्मिथला शोधण्याच्या सर्व शक्यतांना पडताळले जातेच. पण प्रेक्षकांना त्या शोधापेक्षा त्यांच्या गप्पांमधील अनपेक्षित वळणे आवश्यक वाटू लागतात. या दरम्यान, चार्ली आणि एली या दोघांची स्वतंत्र प्रेमप्रकरणेही वेगात सुरू असतात. पण त्यांचा मॅथ्यू स्मिथला शोधून काढण्याचा गमतीशीर प्रवासही प्रगती न करता कायम राहतो.

एलीच्या संगीत मासिकाची लोकप्रियता टिकून असली, तरी जागतिक अर्थकारणाच्या बळावर जगभरातील वृत्तपत्रसंस्थांनी डीजिटल होण्याच्या तडजोडीचा स्वीकारलेला मार्ग तिच्याही मासिकाने स्वीकारलेला आहे. तिचा संपादकाशी चालणारा संवाद आणि मॅथ्यू स्मिथवरील स्टोरीचा माग यामागे आजच्या जगभरातील मासिकांच्या अर्थ आणि कर्म कारणांचा खराखुरा संदर्भ येत राहतो. पटकथा लेखिका आणि दिग्दर्शिका मेगन ग्रिफिथ्स यांनी या संदर्भाना कथेच्या अवतीभवती खुबीने पेरले आहे. ज्या शोधाच्या निमित्ताने एली-चार्लीचा प्रवास चालतो, त्यापेक्षा या दोन्ही व्यक्तींना लागणारा आत्मशोध हा चित्रपटाचा प्रमुख गाभा ठरतो. बरे हा आत्मशोधही गीमिकचा वापर न करता सहज आल्याने खूप आवडून जातो.

17-lp-hollywood

चित्रपटाचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे टोनी कोलेट या अभिनेत्रीने उभी केलेली एली. अभिनयात ‘दादा व्यक्तिमत्त्व’ म्हणून ओळखली जाणारी कोलेट हिच्या कोणत्याही चित्रपटामधील खणखणीत भूमिकांप्रमाणे येथे रॉक पत्रकार म्हणून जिवंत झाली आहे. या अभिनेत्रीचे मध्यवर्ती भूमिकेत असलेले ‘म्युरेल्स वेडिंग’पासून ‘जापनीज स्टोरीज’पर्यंत आणि ‘सिक्स्थ सेन्स’पासून ‘लिटिल मिस सनशाइन’पर्यंतच्या भरपूर साहाय्यक भूमिकेतील चित्रपट पाहिलेल्यांना तिच्या अभिनय दर्जाबाबत शंकाच उरू शकत नाही. पण या सिनेमांव्यतिरिक्त काही वर्षांपूर्वी तिने ‘युनायटेड स्टेट्स ऑफ टॅरा’ ही टीव्ही मालिका केली होती. ती पाहिल्यास या अभिनेत्रीच्या खऱ्या ताकदीचा अंदाज येऊ शकेल. या मालिकेत मानसिक आजारामुळे दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वांत जाण्याचा तिचा शिरस्ता प्रचंड गमतीशीर बनला आहे. १९५० सालातील कुटुंबवत्सल चर्चप्रेमी पत्नी, व्हिएतनाम युद्धातून परत आलेला काऊबॉय सैनिक, पौगंडावस्थेतील अगोचरपणा पुरेपूर असलेली तरुणी आणि खुद्द आजच्या काळातील कथेचे टॅरा आदी अनेक रूपांत ती आलटूनपालटून दिसते. अभिनयाच्या परफेक्ट टायमिंगने धमाल उडवून देणाऱ्या या टीव्ही मालिकेत अमेरिकेच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेची सर्व बाजूंनी चिरफाड करण्यात आली आहे. या मालिकेने टोनी कोलेटच्या कारकीर्दीला नवी झळाळी दिली. या मालिकेनंतरच्या तिच्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये ‘लकी देम’ चित्रपटाचा समावेश होतो. त्यातला सहज साधेपणा प्रत्येकाला आवडेलच असे नाही. पण अनपेक्षितरीत्या वेगळे काहीतरी सापडल्याचा आनंद येईल, हे खरे.

गेल्या काही वर्षांमध्ये वाहिन्यांमुळे आणि इंटरनेटमुळे आपल्या देशात विदेशी चित्रपट आणि टीव्ही मालिका मोठय़ा संख्येने प्रेक्षकांना अंकित करीत आहेत. आज त्याचा वेग इतका वाढला आहे की, देश-भाषांच्या अडचणी पूर्णत: दूर झाल्या आहेत. मुख्य धारेतील सिनेमे आणि सरधोपट टीव्ही मालिकांच्या निर्धारित कक्षांना पार करत प्रेक्षकांकडूनच मनोरंजनाची व्याख्या बदलत आहे. पत्रकारिता असली, तरी ‘लकी देम’ हा चित्रपट पत्रकारितेवरील सिनेमांच्याच नव्हे, तर इतर सगळ्याच कक्षेबाहेर सापडणारी सुंदर निर्मिती आहे.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com