तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत एका प्रशस्त व्हिलाच्या वऱ्हांडय़ात बसला आहात. समोर मस्त स्वत:पुरता स्विमिंग पूल आहे. हा व्हिलादेखील असा जुन्या वाडय़ांचा फील देणारा, मस्त डेकोरेटिव्ह असा. वाडय़ाचा दरवाजा लावला की इतर विश्वाशी संपर्क बंद. अगदी हवा तसा एकांत. मागे लांबवर पसरलेली भातशेती, पुढे दूरवर अथांग सागर. हे सारं एका जागी हवं असेल तर बालीसारखं दुसरं ठिकाण नाही. ड्रीम डेस्टिनेशन म्हणावं असं हे ठिकाण. जगातील प्रत्येक हनिमूनर्सना येथे जायची इच्छा असते. पण हे आहे थोडं महागडं. पण पूर्ण समाधान देणारं. त्यामुळेच संपूर्ण जगातून हनिमूनर्स येथे येत असतात. अर्थात त्यामुळेच जगातील यच्चयावत सर्व ब्रॅण्ड्सची हॉटेल्स येथे आहेत. थोडा खिसा सैल करावा लागेल. पण बजेट हॉटेल्सदेखील आहेत. दिवसाला पन्नास-साठ डॉलरपासून ते अगदी ४०० डॉलर्सपर्यंत राहण्याची सुविधा येथे मिळू शकते.

इंडोनेशियातलं पाच हजार चौरस किलोमीटरचं हे बेट जावा आणि लोंबाक बेटाच्या मध्ये वसलेलं आहे. चारीही बाजूंनी निळाशार समुद्र, मस्त आखीव रेखीव बीच आणि आतल्या भागात पसरलेली मैलोन्मैल अशी भातशेती. मध्येच उंचच उंच डोंगर, घनदाट जंगले असे हे परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन म्हणावं असं सारं  येथे नैसर्गिकरीत्याच उपलब्ध आहे.

बाली हे केवळ निसर्ग-सौंदर्याकरताच प्रसिद्ध नाही, तर ते सर्वसमावेशक आहे. प्राचीन संस्कृती, हजारो वर्षांपूर्वीची पुरातन वारसास्थळे यांनी बालीला समृद्ध केले आहे. तर तेथील भौगोलिक व नैसर्गिक उपलब्धींमुळे कैक प्रकारचे साहसी खेळावर आधारित पर्यटनाचे प्रकार तेथे मोठय़ा प्रमाणात विस्तारले आहेत. टेम्पल टूर, मंकी फॉरेस्ट टूर, किंतामणी हा जिवंत ज्वालामुखी, सनसेट डिनर अशी किमान पाच-सहा दिवसांची हनिमून टूर अगदी सहज करता येते. बालीबरोबरच तुम्हाला इंडोनेशियातील अंतर्गत भागांत भटकायचे असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योगकर्ता हे नव्या जोडप्यांसाठी अगदी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बोरुबुद्दर हे जगातील सर्वात मोठे आणि प्राचीन असे बौद्ध मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. तर दक्षिण बालीतील लेगिन, सानुर, सेमीनायक हे बीचेस निवांतपणे पहुडायला एकदम योग्य ठिकाण म्हणावे लागेल. म्हणूनच हनिमूनसाठी पर्यायांचा विचार करत असाल, देशापासून फार लांब जायचं नसेल, तर बाली बेटांसारखा सुंदर पर्याय नाही.

केव्हा जावं : मे ते ऑगस्ट हा योग्य कालावधी.
कसे जावं : सध्या बाली येथे जाण्यासाठी सिंगापूरमार्गे जावे लागते. पण लवकरच थेट विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

(छायाचित्र सौजन्य – इंडोनेशियन टुरिझम )
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com