भविष्य विशेष : निवडणुकांचे भाकीत

नव्या वर्षांत- २०२२ मध्ये काही महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यांची रणधुमाळी आत्तापासूनच सुरू झाली आहे.

voting
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि या वर्षांअखेरीस गुजरातमध्ये निवडणुका होत असल्याने, या वर्षांला राजकीय स्तरावर प्रचंड महत्त्व आहे.

उदयराज साने – response.lokprabha@expressindia.com
नव्या वर्षांत- २०२२ मध्ये काही महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यांची रणधुमाळी आत्तापासूनच सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि या वर्षांअखेरीस गुजरातमध्ये निवडणुका होत असल्याने, या वर्षांला राजकीय स्तरावर प्रचंड महत्त्व आहे. कोणत्या राजकीय पक्षांच्या पाठीशी जनता उभी आहे, याचा उलगडा होणार असून त्याआधारे २०२४च्या लोकसभा निवडणुकांचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे. या पाश्र्वभूमीवर फलज्योतिषाच्या माध्यमातून, या निवडणुकांचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न..

सर्वप्रथम आपण उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असेल, हे पाहूया..

उत्तर प्रदेश: उत्तर भारतातील सर्वात महत्त्वाचे राज्य अशी उत्तर प्रदेशची ओळख आहे. देशातील राजकारणावर या राज्याने स्वतंत्र ठसा उमटवला असल्याने, तिथे सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष धडपडत असतात. तिथल्या विधानसभेच्या ४०३ जागांचे भवितव्य २०२२ ला ठरणार असल्याने, आपण प्रथम या राज्याची पत्रिका पाहणार आहोत. या राज्याच्या पत्रिकेत, सध्या सुरू असलेले गोचर राहूचे कृतिका नक्षत्रातील भ्रमण राज्याला अत्यंत तापदायक ठरू शकते. १६ मार्चपर्यंत नेपच्यून- बुध- शनी- प्लूटो यांच्या अशुभ योगातून हे राज्य जात असल्याने, नैसर्गिक आपत्तींचा मोठा धोका आहे.  समाजामध्ये तीव्र संघर्ष हाण्याची शक्यता आहे. निवडणुका मार्चनंतरच होणार असल्याने, ग्रहांमधील महत्त्वाचा बदल म्हणजे गोचर गुरूचे १३ एप्रिल २०२२ ला मीन राशीत येणे. त्यामुळे या राज्याच्या पत्रिकेत चांगले गुरू बळ मिळणार आहे. सर्व राजकीय पक्षांचा विचार करता, असे दिसून येते की जनता दलाला गुरू बळ मिळणार असल्याने त्यांच्या कामगिरीत थोडी सुधारणा निश्चितपणे दिसेल, पण १६ मार्चपासून गोचर राहूचे भ्रमण मेष राशीतून सुरू होणार आहे. परिणामी त्यांच्या मूळ कुंडलीतील राहू-चंद्र व राहू-रवी यांच्या षडाष्टकात, गोचर राहू असल्याने हाच योग परत होत आहे. यामुळेच त्यांचा पारंपरिक मतदार पक्षापासून दुरावणार आहे.

बहुजन समाज पक्षाच्या कुंडलीत गोचर राहू हा रवीवर येत असल्याने, शनीचे सप्तमातून होणारे भ्रमण आणि गोचर गुरूचे भ्रमण मात्र अनुकूल आहे. त्यांच्या स्थितीत सुधारणा होणार आहे.

काँग्रेसच्या कुंडलीत १३ एप्रिलपासून गोचर गुरू १२ वा होत आहे आणि त्याच सोबत १६ मार्चपासून राहू मेष राशीत येत आहे. हा राहू काँग्रेसच्या कुंडलीतील चंद्रावर येत असल्याने, त्यांचा पारंपरिक मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचेच दिसून येईल. मकर राशीत गोचर शनी असून, याच ठिकाणी काँग्रेसच्या मूळ पत्रिकेतील मंगळ असल्याने, मेष राशीतील गोचर हर्षल व मंगळावरून भ्रमण करणारा गोचर शनी यामुळे गलितगात्र झालेल्या काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडू शकते आणि तशा बातम्याही येतील.

भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या सरकारला १३ एप्रिलच्या गोचर गुरूची चांगली साथ मिळणार आहे. सोबतच गोचर राहूसुद्धा १६ मार्चपासूनच चांगली साथ देण्यास सुरुवात करेल. गोचर शनीचे भ्रमण भाजपाच्या पत्रिकेतील चंद्राच्या पराक्रमातून सुरू असून, हा गोचर शनी भाजपाच्या मूळ कुंडलीतील शनीच्या षडाष्टकातून जात आहे. तिकीट वाटपात गोंधळ राहतील. या असंतोषामुळेच त्यांच्या जागांचे प्रमाण थोडे घटणार आहे. एकंदरच उत्तर प्रदेशातील मतदार लाटेवर स्वार होत असल्याचे आजवर सिद्ध झाले आहे. राम मंदिराचा मुद्दा भाजपाने असाच चर्चेत ठेवला, तर त्यांना सत्तेपासून कोणीही रोखू शकणार नाही. एखादा मुद्दा गाजवत ठेवणारा पक्षच उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेत यशस्वी ठरत असल्याचेच आजवर दिसून आले आहे. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत.

पंजाब : पंजाबमधील ११७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आत्तापासूनच रंग भरले जाऊ लागले आहेत. अमिरदर सिंग या माजी मुख्यमंत्र्यांचा आता भाजपाला आधार मिळणार असून, या पक्षाला पंजाबमध्ये निवडणुकीच्या िरगणात उतरण्याची संधी मिळाली आहे. आम आदमी पक्ष- काँग्रेस- अकाली दल- भाजपा असे चार पक्ष निवडणूक िरगणात असतील, असे दिसते. म्हणूनच आपण फल ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन मत नोंदवणार आहोत. या राज्याच्या पत्रिकेत कृतिका नक्षत्रातील गोचर राहू हा आणखी बराच गोंधळ घालणार आहे, अनेक पक्षांत फूट पाडून, नवे मित्र शोधण्याचा घाट घातला जाईल. गोचर राहू हा सर्व गोंधळ घालून १६ मार्चपासून मेष राशीतून भ्रमण करेल. गोचर शनीचे भ्रमण मकर राशीतून सुरू असून, हा गोचर शनी ही फूट वाढवेल. गोचर गुरूचे कुंभ राशीतील भ्रमण पंजाबला अनुकूल राहील, पण एप्रिलमध्ये मीन राशीत प्रवेश करणारा गोचर गुरूसुद्धा पंजाबसाठी चांगला ठरेल.

आम आदमी पक्षाच्या कुंडलीतील कृतिका नक्षत्रातील राहू आणि नंतर मेष राशीत प्रवेश करणारा राहू समानच फळे देतील असे दिसते. आम आदमी पक्षाच्या कुंडलीत शनी-बुध युतीच्या प्रतियोगात गोचर हर्षल येणार असल्याने, त्यांचे सत्तेवर यायचे मनसुबे उधळून लावेल. पक्षाच्या कुंडलीत हर्षल-राहू व चंद्र-हर्षल षडाष्टक योग असल्याने, निवडणुकीच्या रणधुमाळीला एक वेगळी कलाटणी मिळेल आणि पक्षाचे सत्तेवर येण्याचे स्वप्न अपूर्ण राहील. मकर शनीच्या अशुभ योगात पक्षाच्या मूळच्या कुंडलीतील शनी-बुध युती येत असल्याने, त्यांना हे यश मिळणार नाही. या बरोबर गोचर गुरू, पक्षाच्या कुंडलीतील चंद्राला आठवा राहणार आहे. या सर्व कारणांमुळे, आम आदमी पक्ष पंजाबच्या सत्तेपासून लांबच राहिलेला दिसेल.

काँग्रेसच्या कुंडलीतील ग्रहमान पक्षाला अनुकूल नसून, पक्षातील दुही वाढविणारे आहे. गोचर मेष राशीत येणाऱ्या राहूचे भ्रमण चंद्रावरूनच होणार असल्याने आणि मंगळावरून शनीचे भ्रमण होत असल्याने, तसेच १३ एप्रिलपासून मीन राशीमध्ये येणारा गुरूही मूळ कुंडलीतील चंद्राला बारावा राहणार असल्याने काँग्रेस पक्ष या निवडणुकीत बहुमतापासून बराच दूर राहणार आहे.

अकाली दलाची सर्व ताकद पंजाब व हरियाणा या दोन राज्यांमध्ये दिसून येते. त्यांनी आता भाजपपासून फारकत घेतली असल्याने त्यांना एकटय़ाने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. पक्षाच्या मूळ कुंडलीतील रवी समोरून गोचर शनीचे भ्रमण होत असल्याने, त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे. २०२२मध्ये मेष राशीत प्रवेश करणारा राहू आणि मेष राशीत भ्रमण करत असलेला हर्षल, अकाली दलाच्या कुंडलीतील मूळ रवीच्या केंद्रात राहणार असल्याने या निवडणुकीत या पक्षाची फारशी छाप पडणार नाही. त्याचप्रमाणे या पक्षातदेखील नव्या नेतृत्वाचा शोध घेण्याचा जोरदार प्रयत्न केला जाणार आहे आणि आगामी काळात त्याला चांगली गती येईल.

भाजपाला कुंडलीतील गोचर ग्रहमानाचा पािठबा मिळणार असल्याने त्यांच्या जागा अमिरदर सिंग यांच्या सहकार्यामुळे निश्चितच वाढणार आहेत. रवीवरून गोचर मीन राशीतील गुरुभ्रमण पंजाबमधील भाजपची स्थिती सुधारणार असल्याचे दाखवत आहे. फक्त गोचर शनी भाजपाच्या  मूळ कुंडलीतील शनीच्या षडाष्टकात राहणार असल्याने, हे गठबंधन किती काळ टिकणार हाच मुख्य प्रश्न राहणार आहे. एकूणच महत्त्वाच्या पक्षांच्या पत्रिकेचा अभ्यास करता पंजाबची निवडणूक विलक्षण चुरशीची होणार आहे. निवडणुकीनंतर सत्तेवर येण्यासाठी घोडेबाजार चांगलाच रंगणार आहे.

मणिपूर: मणिपूर हे ईशान्य भारतातील अत्यंत लहान राज्य! अनेक लहान पक्ष आपले नशीब अजमावणार असले तरी, भाजपाने या राज्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. या राज्याच्या पत्रिकेचा विचार करता मकर राशीतील शनी-प्लूटो आणि मेष राशीतील हर्षल यांचा केंद्रयोग नव्या वर्षांत होत असून, २०२३ सालापासून या राज्याला साडेसाती सुरू होत आहे. पण मीन राशीत प्रवेश करणारा गुरू हा फायदेशीर ठरणार आहे. अनेक लहान पक्षांचे आपल्या पक्षात विसर्जन करून ही निवडणूक लढवावी लागणार असल्याने भाजपा व काँग्रेस यांचा कस लागणार आहे. ६० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत, भाजपचे पारडे जड असल्याचे आणि गोचर ग्रहमानाचा त्यांना पािठबा मिळणार असल्याचे दिसून येते. काँग्रेसला लहान पक्षांना झुकते माप देऊनही अपेक्षित कामगिरी करता येणार नाही.

गुजरात : पश्चिम भारतातील एक प्रमुख राज्य असलेल्या गुजरातची निवडणूक डिसेंबर २०२२ ला होणार आहे. विधानसभेच्या १८७ जागांचे भवितव्य फलज्योतिष शास्त्राच्या साहाय्याने जाणून घेऊयात. या राज्याच्या पत्रिकेत गोचर शनी भ्रमण षष्ठ स्थानातून सुरू होत असून, गुजरातच्या मूळ कुंडलीतील हर्षलच्या प्रतियोगातून व रवीच्या केंद्रातून होत असलेले हे  भ्रमण गुजरातला चांगलेच तापदायक ठरणार आहे. १६ मार्च २०२२पासून मेष राशीत प्रवेश करणारा राहू, हा गोचर शनीच्या व हर्षलच्या केंद्रात लगेच दीड-दोन महिन्यानंतर येत आहे. प्रत्यक्ष डिसेंबरच्या महिन्यात हा केंद्रयोग राहणार असल्याने या निवडणुका नैसर्गिक आपत्तीमुळे पुढे ढकलाव्या लागण्याचा धोका असेल. असे झाले नाही, तर मात्र मीन राशीतील गोचर गुरूमुळे निवडणुका व्यवस्थित पार पडतील. या राज्यात प्रारंभापासूनच काँग्रेस व भाजपा अशा दोन पक्षांमध्ये निवडणूक होत असल्याने आपण या दोन पक्षांचा विचार करणार आहोत.

भाजपा: भाजपाच्या डिसेंबर २०२२मधील कुंडलीचा विचार करता, गोचर गुरूचा भक्कम पािठबा, भाजपच्या कुंडलीतील रवीला मिळणार असल्याने त्यांना  फायदा होईल. गोचर हर्षल-राहू युती भाजपच्या कुंडलीत लाभस्थानात होत असून, मुस्लीम समाजाचा पािठबा मिळवण्यात पक्षाला यश मिळणार आहे. गोचर शनीचे भ्रमण भाजपाच्या अष्टमस्थानात व भाजपाच्या मूळ कुंडलीतील शनीच्या षडाष्टकातून होत असल्याने कष्टकरी समाजातील मते खेचण्यात पक्षाला घवघवीत यश मिळणार नसल्याचे दिसते. राश्याधीपती गोचर मंगळ व गोचर बुध यांचे भ्रमण पक्षाला अनुकूल ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेचा कारक रवीचे वृश्चिक व धनू राशीतून होणारे भ्रमण पक्षाला चांगलेच अनुकूल ठरणार असल्याने, पक्षाची रणनीती जरी सफल होणार असली, तरी २०२४च्या  लोकसभा निवडणुकीचा विचार करता महत्त्वाच्या बदलांबरोबरच, सर्वसमावेशक धोरण राबवावे लागणार आहे.

काँग्रेस : काँग्रेसच्या कुंडलीत गोचर मीन राशीतील गुरूची त्यांच्या मूळच्या कुंडलीतील रवीला चांगली साथ मिळणार आहे. पक्षाच्या मूळ कुंडलीतील चंद्राला, हा गोचर गुरू बारावा राहणार आहे. गोचर शनी हा काँग्रेसच्या मूळ कुंडलीतील शनीच्या केंद्रात राहणार आहे. तर गोचर राहू-हर्षलचा युती योग आणि शनी-हर्षल केंद्रयोग सातत्याने परत परत होत राहणार असल्याने, काँग्रेसला निकराचा सामना करावा लागणार आहे. काँग्रेसच्या पत्रिकेतील गोचर व राश्याधीपती मंगळ हा वक्री स्थितीत पक्षाच्या मूळ कुंडलीतील बुधाच्या प्रतियोगात राहणार असल्याने निवडणुकीत भरपूर आरोपांची चिखलफेक एकमेकांविरुद्ध केली जाणार आहे. या महत्त्वाच्या ग्रहस्थितीचा विचार करता काँग्रेसला यश हुलकावणी देणार असले, तरी राज्यातील त्यांच्या स्थितीत सुधारणा घडवून दाखवणार आहे.

आत्तापर्यंत आपण मणिपूर, उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड, गुजरात यांच्या पत्रिकांचा  फलज्योतिषाच्या माध्यमातून ऊहापोह केला. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची असते, ती निवडणुकीची तारीख. ही तारीख आज जरी आपल्याकडे नसली, तरी पुढील वर्षांतील महत्त्वाचे ग्रहयोग आपण विविध पक्षांच्या कुंडलीतून पाहिले आहेत. फक्त गोचर निवडणुकीच्या दिवसांचा रवी आणि चंद्र आज आपल्याला माहीत नसल्याने, आपण वर्तविलेल्या भाकितात १० टक्के फरक पडू शकतो. पण यावरून वाचकांना निवडणुकांच्या भवितव्याचा अंदाज निश्चितपणे येऊ शकतो.

गोवा : गोव्याच्या  निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून ४६ जागांसाठी नव्या वर्षांत मतदान होणार आहे. पश्चिम भारतातील शेवटचे राज्य म्हणून गोव्याचे महत्त्व असल्याने, या राज्याच्या पत्रिकेचा विचार प्रथम करूयात. गोव्याच्या कुंडलीत मकर राशीतील शनी आणि १६ मार्चला मेष राशीत प्रवेश करणारा राहू यांचा केंद्रयोग होणार आहे. गोवा राज्याच्या कुंडलीत रवी प्रतियोग शनी हा योग असल्याने हे राज्य सातत्याने अस्थिरतेचा सामना करत आले आहे. अलीकडे भाजपने इथे पाय रोवले आहेत. त्यामुळे अस्थिरता असली, तरी या वर्षांत काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात काँग्रेस व भाजपा हेच दोन प्रमुख पक्ष असून इतर पक्ष नशिबाची साथ मिळते का, हे पहात असले तरी त्यांचे अस्तित्व नगण्य असणार आहे.

२०२२चे ग्रहमान काँग्रेससाठी पुरेसे अनुकूल नसून, गोव्यावर राज्य करता येण्यासारखी त्यांची परिस्थिती नाही. काँग्रेसला इतर पक्षांची साथ मिळण्याची शक्यता नाही.

भाजपाला गोचर ग्रहमानाचा जोरदार पािठबा असल्याचे दिसून येते. या सर्वच राज्यांच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मतदानाची तारीख आणि महिना. या घटकाचा परिणाम सुमारे १० टक्के होणार असल्याने, भाकितात थोडा फरक पडू शकतो.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope special election prediction dd

Next Story
भविष्य विशेष : समाजमाध्यमे आणि आपण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी