lp21‘आयएनएस गोदावरी’ ही स्वयंपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका तिचे नियत आयुष्यमान पूर्ण करून शिवाय सात वर्षे अधिक व्यवस्थित काम करते; याचाच दुसरा अर्थ या क्षेत्रात जागतिक दर्जाचे यशस्वी उत्पादन देण्याची क्षमता भारतीय राखतात, असा होतो. म्हणूनच ‘आयएनएस’ गोदावरीची निवृत्ती ही भारताच्या स्वयंपूर्ण बनावटीच्या जागतिक यशस्वितेवर शिक्कामोर्तब करणारी ठरते.
भारतीय सैन्यदलांमध्ये प्रत्येक गोष्टीला तिचा स्वत:चा असा एक मान देण्याची चांगली परंपरा आहे. भारतीय नौदल हे देखील त्याला अपवाद नाही. म्हणूनच नौदलातील पाणबुडी किंवा युद्धनौका दलामध्ये दाखल होते किंवा ती निवृत्त होते तेव्हा; प्रत्यक्षात ती निर्जीव असली तरी एखाद्या व्यक्तीप्रमाणेच तिच्या कार्याचा गौरव केला जातो. नौदलातील युद्धनौका आणि पाणबुडय़ांना ती (इंग्रजीमध्ये  HER) असे संबोधले जाते. मग स्त्रीप्रमाणेच तिचा मानसन्मानही राखला जातो.. म्हणूनच तर कोणतीही महिला भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर आली की, युद्धनौकेवरील पूल पार करून नौकेत प्रवेश करताना सन्मान म्हणून तिला एक कडक सॅल्यूट केला जातो. हा ‘ती’ला दिलेला मान असतो! अशीच परंपरा नौदलातील युद्धनौका आणि पाणबुडय़ांबाबतही पाळली जाते. म्हणूनच सेवा बजावून निवृत्त होणाऱ्या युद्धनौकेच्या निवृत्तीचाही सोहळा होतो. आजवर अशा अनेक युद्धनौका आणि पाणबुडय़ांच्या निवृत्ती सोहळ्यांना उपस्थित राहण्याचा योग आला. त्यात भारतीय नौदलाच्या इतिहासात गौरवशाली कारकीर्द बजावणाऱ्या ‘आयएनएस विक्रांत’च्या निवृत्ती सोहळ्याचाही समावेश होता. परंतु गेल्या आठवडय़ात २३ डिसेंबर रोजी झालेला ‘आयएनएस गोदावरी’चा सोहळा निश्चितच इतरांपेक्षा वेगळा होता. कारण हा केवळ एक निवृत्ती सोहळा नव्हता तर भारताच्या स्वयंपूर्णतेवरचे ते शिक्कामोर्तबच होते!
एखादे उत्पादन आपण तयार करतो किंवा एखादी कंपनी तयार करते, त्याच्या नावीन्यपूर्णतेमुळे जगभरात त्याचे कौतुकही होते. पण त्याचे खरे यश असते ते त्या नावीन्यपूर्ण उत्पादनाने त्याचे नियत आयुष्यमान पूर्ण करण्यामध्ये. या अर्थाने पाहायचे तर ‘आयएनएस गोदावरी’ची ही निवृत्ती अनेक अर्थानी वेगळी होती. कारण हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आपल्या नौदलाचे पहिलेच उत्पादन होते. त्यापूर्वी सर्व युद्धनौका या आपण इतर कोणत्या तरी देशाकडून तयार करून किंवा विकत घेतलेल्या होत्या. ही भारतीय नौदलाची स्वयंपूर्ण बनावटीची पहिलीच युद्धनौका होती. कोणत्याही युद्धनौकेच्या बांधणीमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिले म्हणजे डिझाइन आणि दुसरे तिची प्रत्यक्ष बांधणी. या दोन्हींमध्ये भारताने आपले अस्तित्व जगासमोर सिद्ध केले ते ‘आयएनएस गोदावरी’च्या निमित्ताने!
आजही युद्धनौकांचे डिझाइन आणि बांधणी करणारे जगभरात मोजकेच देश असून त्यात भारताचा समावेश होतो. गोदावरीची बांधणी ही १९८४च्या सुमारास झालेली आहे. त्या वेळची केवळ कल्पना केली तरी या बांधणीचे महत्त्व सहज लक्षात येऊ शकेल. भारतीयांना कोणतीही फारशी चमक किंवा कौशल्य न दाखवता त्या वेळेस जगभरात अस्तित्वात असलेल्या युद्धनौकांसारखीच तिची बांधणी केली असती, तरी त्यांचे कौतुक सहजच झाले असते. पण भारतीय डिझायनर्स आणि बांधणीकारांनी दोन पावले जगाच्याही पुढे टाकली आणि म्हणूनच मग जगप्रसिद्ध ‘टाइम’ साप्ताहिकाने थेट ‘आयएनएस गोदावरी’च्या निमित्ताने १९८९ साली एप्रिल महिन्यात भारतीय नौदलाच्या वाढत्या सामर्थ्यांवर ‘कव्हरस्टोरी’च प्रसिद्ध केली.
‘जागरूक, सजग व निर्भय’ असे घोषवाक्य असलेली ‘आयएनएस गोदावरी’ ही पूर्णपणे भारतीय बनावटीची पहिलीच युद्धनौका १० डिसेंबर १९८३ रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. मुंबईच्या माझगाव गोदी लिमिटेडने तिची निर्मिती केली होती. आजही जगातील अद्ययावत अशा स्टेल्थ फ्रिगेटस् आणि स्टेल्थ विनाशिकांच्या निर्मितीमध्ये माझगाव गोदीच आघाडीवर आहे. गोदावरी हे नाव धारण करणारी भारतीय नौदलातील ती तिसरी युद्धनौका होती. नौदलामध्ये निवृत्त झालेल्या युद्धनौकेच्या नावाची नवीन नौका काही वर्षांनी पुन्हा दाखल होते, अशी परंपरा आहे. पहिल्या युद्धनौकेचे नाव ‘एचएमआयएस गोदावरी’ असे होते, त्या वेळेस देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. स्वातंत्र्याच्या वेळेस झालेल्या फाळणीनंतर ती युद्धनौका आपण पाकिस्तानला दिली. त्यानंतर २७ एप्रिल १९५३ साली नवीन युद्धनौका ‘आयएनएस गोदावरी’ या नावाने दाखल झाली, तिने प्रशिक्षण युद्धनौका म्हणून २३ मार्च १९७६ पर्यंत सेवा बजावली. ती निवृत्त झाल्यानंतर ही ‘आयएनएस गोदावरी’ १० डिसेंबर १९८३ रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. तिचे आगमन हे भारतीय नौदलासाठी शक्तीप्रदर्शनाचे निमित्तच ठरले!
निर्मितीनंतर १९८६ साली स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त अमेरिकेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनामध्येही ‘आयएनएस गोदावरी’ सहभागी झाली. १९८८ साली ऑस्ट्रेलियन नौदलाच्या द्विशताब्दी सोहळ्यातील सहभागानंतर तर संपूर्ण जगभरात तिची चर्चा झाली. तत्पूर्वी मालदीवच्या ‘ऑपरेशन कॅक्टस’सह नंतरच्या अनेक प्रमुख कारवायांमध्येही ती सहभागी झाली होती. ऑपरेशन कॅक्टसमध्ये प्रत्यक्ष सागरी कारवाई नौदलाने केली होती. बंडखोरांना पकडून मालदीव सरकारच्या ताब्यात देण्यासाठी मालदीवचा किनारा गाठला तेव्हा तेथील तत्कालीन राष्ट्रपतींनी ‘आयएनएस गोदावरी’वरील नौदल अधिकाऱ्यांचे स्वत:हून जातीने उपस्थित राहून कौतुक केले. १९९१ साली ‘एमव्ही सुभानअल्लाह’ या व्यापारी बोटीवरील सहा कोटी रुपयांची चांदीची तस्कारी रोखण्यात ‘आयएनएस गोदावरी’ने मोलाची कामगिरी बजावली. १९८८ साली ऑपरेशन ज्युपिटर, १९९४ साली ऑपरेशन बोल्सटर यात सहभाग घेतला. सागरी चाच्यांना कारवायांना प्रतिबंध करण्याच्या ‘पेट्रोल ऑफ गल्फ’ या मोहिमेतही तिने मोलाची भूमिका बजावली होती. गेली तब्बल ३२ वर्षे या युद्धनौकेने देशाची सेवा बजावली. या काळात तब्बल ७ लाख सागरी मैल अंतराचा प्रवास केला आणि ती निवृत्त झाली.
lp22कोणत्याही युद्धनौकेचे आयुष्य हे साधारणपणे २० ते २५ वर्षांचे असते. ‘आयएनएस गोदावरी’ या स्वयंपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका तिचे नियत आयुष्यमान पूर्ण करून शिवाय सात वर्षे अधिक व्यवस्थित काम करते, याचाच दुसरा अर्थ या क्षेत्रात जागतिक दर्जाचे यशस्वी उत्पादन देण्याची क्षमता भारतीय राखतात, असा होतो. म्हणजेच आयएनएस गोदावरीची निवृत्ती ही भारताच्या स्वयंपूर्ण बनावटीच्या जागतिक यशस्वितेवर शिक्कामोर्तब करणारी होती; म्हणून त्या सोहळ्याला वेगळे अनन्यसाधारण असे महत्त्व होते!
युद्धसमाप्तीच्या वेळेस किंवा शहिदांना सलामी देताना वाजविली जाणारी बिगुलाची धून, तिचे वातावरणात भरून राहिलेले सूर.. युद्धनौकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फडफडणारी निवृत्तीची विशेष पताका, युद्धनौकेची धुरा सांभाळलेल्या आजवरच्या १९ कमांडिंग अधिकाऱ्यांची खास उपस्थिती अशा वातावरणात; तब्बल ३२ वर्षे भारतीय नौदलाची अविरत सेवा बजावलेल्या ‘आयएनएस गोदावरी’ला २३ डिसेंबर रोजी अरबी समुद्रामध्ये अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. सायंकाळच्या सूर्यकिरणांबरोबरच नौदल गोदीतील वातावरण अधिकाधिक भावपूर्ण झाले होते. सायंकाळच्या सूर्याला साक्षी ठेवून राष्ट्रध्वज असलेला भारतीय नौदलाचा ध्वज समारंभपूर्वक उतरवून युद्धनौकेचे कमांिडग अधिकारी कमांडर विशाल रावल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर निवृत्तीची विशेष पताकाही समारंभपूर्वक उतरवण्यात आली. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कार्मिक अधिकारी व्हाइस अ‍ॅडमिरल हरी कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यांच्याच हस्ते ‘आयएनएस गोदावरी’च्या निवृत्तीच्या निमित्ताने एका विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात आले.
या युद्धनौकेचे आता काय करणार, या प्रश्नावर व्हाइस अ‍ॅडमिरल हरी कुमार म्हणतात.. कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. तिच्यावर संग्रहालय उभारण्याचा एक पर्याय असतो, मात्र त्यासाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. उर्वरित दोन पर्यायांमध्ये तिच्यावरील सर्व सामग्री काढल्यानंतर ती भंगारात काढणे किंवा एखाद्या क्षेपणास्त्राच्या प्रत्यक्ष चाचणीसाठी लक्ष्य म्हणून वापरणे असे दोनच पर्याय शिल्लक राहतात. आयएनएस गोदावरीवरील क्षेपणास्त्रांची बराक ही यंत्रणा या पूर्वीच काढून आयएनएस विक्रमादित्य या नव्या विमानवाहू युद्धनौकेवर बसविण्यात आली आहे. इतर सामग्रीचा वापरही पूर्णपणे करण्यात येईल. कदाचित त्यानंतर क्षेपणास्त्र चाचणीसाठी लक्ष्य म्हणून तिचा वापर केला जाऊ शकतो!
आयएनएस गोदावरी ते स्कूटी!
कॅप्टन एनएस मोहन राम हे ‘आयएनएस गोदावरी’चे प्रमुख डिझाइनकर्ते! तेही तिच्या निवृत्ती सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. ते म्हणतात, ‘‘केवळ पूर्णपणे भारतीय बनावटीची म्हणून नव्हे तर इतरही अनेक अंगांनी ती जगातील एकमेवाद्वितीय अशी युद्धनौका होती. दोन सीकिंग हेलिकॉप्टर्स एकाच वेळी वाहून नेऊ शकेल, अशी ती जगातील पहिली युद्धनौका ठरली होती. म्हणूनच तर अमेरिका आणि रशिया या तत्कालीन दोन्ही प्रगत देशांनाही ही युद्धनौका पाहून त्या वेळेस आश्चर्याचा धक्काच बसला होता.
१९७२ साली तिच्या डिझाइनला सुरुवात झाली. १९७४ साली डिझाइनचे काम माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. त्या पाठोपाठ मी माझगाव गोदीत आलो आणि तिची बांधणीही पूर्ण होऊन १९८३ साली ती नौदलात दाखलही झाली. तिच्या अनेक वैशिष्टय़ांमुळे जगभरातील प्रगत देशांच्या नौदलांचेही लक्ष तिच्याकडे वेधले गेले. त्यापूर्वी भारतीय नौदलात दाखल झालेल्या युद्धनौकांचा वेग फारसा नव्हता. त्या तुलनेत वजन वाढल्यानंतर आयएनएस गोदावरीचा वेग आणखी कमी होणे अपेक्षित होते, पण हिचा वेग मात्र वाढला होता. ते कसे काय साध्य केले याचे सर्वानाच कोडे पडले होते.’’
जुन्या आठवणींना उजाळा देत कॅप्टन मोहन राम म्हणाले, ‘‘शीतयुद्ध ऐन टिपेला असताना तिची निर्मिती झाली. त्या वेळेस युद्धनौकेच्या खालच्या डेकवर अमेरिकन तर वरच्या डेकवर रशियन शस्त्रास्त्रे मिरवणारी ती जगातील एकमेव अशी युद्धनौका होती. यामुळे अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश चकित झाले होते. महत्त्वाचे म्हणजे एका डिफेन्स मासिकात आलेला फोटो पाहून युद्धनौकेवरील शस्त्रास्त्रांच्या ठेवणीतील अंतर किती असेल याचे गणित करून त्यावरून प्रत्यक्षात युद्धनौकेतील शस्त्रास्त्रांच्या अंतराचा अंदाज घेत याचे डिझाइन करण्यात आले होते. २१ व्या शतकापर्यंत ते पुरून उरले हे मोठेच यश होते. त्यानंतर मात्र मी नौदलातून निवृत्ती घेतली आणि टीव्हीएस मोटर्समध्ये ऑटोमोबाइल डिझायिनगमध्ये शिरलो. तिथे भारतात गाजलेल्या स्कूटीसह इतरही अनेक वाहनांचे डिझाइन केले. यातील स्कूटी महिलांसाठी डिझाइन केलेली होती. गोदावरीचे डिझाइन कठीण होते की, स्कूटीचे असा प्रश्न विचारला तर मी सांगेन की, स्कूटीचे! कारण महिलांना नेमके काय हवे, हे कळणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे’’.. हसत हसत कॅप्टन मोहन राम म्हणाले!