scorecardresearch

कथा : जानकीची गोष्ट

जानकी माझ्या कारखान्यात कामाला होती. ती माझ्याकडे कामाला लागली, तीसुद्धा मोठय़ा विचित्र प्रकारे.

जानकी माझ्या कारखान्यात कामाला होती. ती माझ्याकडे कामाला लागली, तीसुद्धा मोठय़ा विचित्र प्रकारे. त्यावेळी मी माझा नवीन उद्योग नुकताच चालू केला होता. नवीन जागा घेण्याजोगी परिस्थिती नव्हती. एका मित्राचा व्यवसाय होता. त्याची जागा मोठी होती. त्यातल्याच एका कोपऱ्यात पार्टिशन घालून मी माझा व्यवसाय चालू केला होता. जानकी त्यांच्याकडे नोकरीला होती. पॅकिंगचे काम करायची. काही वेळा असेंब्ली कामावर पण बसायची. दिसायला रंगरूप सामान्यच होते. पण बोलणे-चालणे सुसंस्कृत शहाणपणाचे होते. नवीन गोष्टी शिकायची आवड होती. स्वच्छता, नीटनेटकेपणा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवायचा.

दुर्दैवाने माझ्या मित्राचे अल्पशा आजाराने निधन झाले आणि त्याच्या पत्नीने तो व्यवसाय बंद करायचे ठरवले. पण त्यांना ती जागा विकायची नव्हती. त्यामुळे मी माझा व्यवसाय तिथे चालू ठेवायला त्यांची हरकत नव्हती. माझा व्यवसाय सुरू करून २-४ महिने झाले होते. त्यामुळे तो अगदीच प्राथमिक अवस्थेत होता. कॉटेज इंडस्ट्रीज म्हणा ना, त्यावेळी नुकतीच भिंतीवर लावायची, बॅटरीवर चालणारी घडय़ाळे बाजारांत आली होती. मी बाजारांतून तशा घडय़ाळांची मशीन्स, केसेस, डायल वगैरे सुटे भाग बाजारातून आणायचो, जोडायचो आणि बाजारातील होलसेलरला विकायचो. सुरुवातीला मी एकटाच काम करत होतो. दुपारी जेवायला घरी गेलो की, माझी पत्नी माझ्याबरोबर यायची. दुपारी ती घडय़ाळांच्या काचा पुसून ठेवायची. आदल्या दिवशी जोडलेली घडय़ाळे नीट चालत आहेत ना, हे तपासूंन खोक्यात पॅकिंग करणे, लेबल लावणे इ. कामे करून मला मदत करत असे. संध्याकाळी आम्ही दोघे एकदमच घरी परतत असू. कारण त्यांचा कारखाना ५ वाजता बंद होत असे. माझ्या व्यवसायाचा जम हळूहळू बसत होता. सतत मागणी असणारी स्वस्तातली ‘जनता’ मॉडेल्स, तर खास डिझाइनची आकर्षक मॉडेल्स् दोन्ही प्रकारच्या घडय़ाळांना मागणी होती. हा व्यवसाय मी पुढे ५- ६ वर्षे केला. वर्षांला जवळजवळ ५००० घडय़ाळे मी बनवत असे. माझ्यासारखेही अनेक जण या व्यवसायांत होते. कारण एका खोलीत हा व्यवसाय चालू शकतो. वीज किंवा इतर मशीन्सची गरज नसते. आवाज नाही, घाण कचरा नाही. शेजाऱ्यांना कळणारही नाही की काय चालू आहे ते. कालांतराने अजंठा, समय यांच्यासारखे मोठे लोक या व्यवसायांत शिरले अणि मग हे छोटे उद्योग बंद पडले.

या व्यवसायाची एक गंमत आहे, म्हटलं तर हा व्यवसाय सीझनल आहे. अगदी गणपती किंवा छत्रीसारखा जरी नाही तरी वर्षांतले कांही महिने चढ- उताराचे असतात. असं पाहा या मालाचा ‘सीझन’ सुरू होतो इतर गोष्टींप्रमाणे गणपती, दसरा- दिवाळीबरोबर. तो सीझन साधारणपणे डिसेंबपर्यंत चालतो. नववर्षांच्या भेटीनिमित्त काही कंपन्या पण अशी घडय़ाळे देतात किंवा सुवर्ण महोत्सव वगैरे प्रसंगी पण कंपनीच्या नावाचे घडय़ाळ भेट म्हणून दिले जाते. पण सर्वसाधारणपणे नंतर परीक्षांचे वेध लागतात. त्यामुळे अशी खरेदी आवश्यक असेल तेव्हाच केली जाते. एप्रिल- मे सुटी- सहलींचे दिवस. जून- जुलै शाळा-कॉलेज वगैरेची नवीन वर्षे सुरू होतात; तेव्हा छत्र्या, रेनकोट, वह्य पुस्तके यांचा खर्च असतो. थोडक्यात ६ महिने चलती, ६ महिने मंदी असे चक्र असते. मी आता या व्यवसायात नाही म्हणून आणखी एक गुपित सांगून टाकतो. ते म्हणजे तुम्ही १०० रु. वाले स्वस्तातले घडय़ाळ घ्या किंवा ५००- ६०० रु. वाले घडय़ाळ घ्या. त्यामध्ये एकाच प्रकारचे यंत्र वापरलेले असते. वरचे पैसे तुम्ही नक्षीदार डायल, केस व काटे यांच्यासाठी मोजत असता. त्यामुळे या सर्व घडय़ाळांची गॅरेंटी, परफॉर्मन्स् किंवा आयुष्य सारखेच असते. हल्ली तर अशी बिघडलेली मशीन्स् दुरुस्त पण करत नाहीत. नवीन मशीन ३०-३५ रुपयाला मिळते. मग जुने मशीन उघडा, जोडा हे कशाला करायचे? त्या मेहनतीमध्ये नवीन मशीन टाकले की गिऱ्हाईक पण खूश. जाऊ दे, हे विषयांतर झाले. थोडक्यात, सांगायचे झाले तर त्यावेळी मी आणि माझी अर्धवेळ काम करणारी पत्नी असे दोघेच व्यवसाय सांभाळत होतो.

माझ्या मित्राच्या पत्नीने व्यवसाय बंद करायचे ठरवल्यावर सगळ्या कामगारांना रीतसर नोटिसा वगैरे दिल्या आणि एके दिवशी ही जानकी माझ्या खोलीत येऊन म्हणाली,

‘‘साहेब, बाईसाहेबांनी आमचा कारखाना बंद करायचे ठरवले आहे.’’

‘‘हो, मला कळले आहे.’’ मी म्हणालो.

‘‘पण तुमचें काम चालू राहणार आहे असे ऐकते.’’

‘खरं आहे. माझी दुसरी काही व्यवस्था होईपर्यंत तरी मला इथे काम करायची परवानगी त्यांनी दिली आहे.’’ मी.

‘‘मला घ्याल?’’

‘‘अगं? माझ्याकडे कुठे आहे काम? तू इतके दिवस बघतेच आहेस. आहे ते काम आम्ही दोघेंच करतो आहोत. त्यातूनही ऑर्डर्स वाढल्या तर बघूं.’’ मी.

‘‘तसं नाही साहेब, माझी अडचण जरा वेगळी आहे. बाकीचे लोक इकडे तिकडे लागतील. मी पण दुसरे काम बघितले असते किंवा घरी बसले असते. पण माझे लग्न ठरू आहे. मला नोकरी आहे म्हणून पसंत केली आहे. पण जर का नोकरी गेली तर एखादे वेळेस माझे लग्न पण मोडेल, म्हणून म्हणते. फार दिवस नाही पण पुढचे ३-४ महिने म्हणजे लग्न होईपर्यंत तरी मला ठेवा. नंतर पाहिजे तर मला काढून टाका.’’ जानकी म्हणाली.

‘‘म्हणजे थोडक्यांत तिकडच्या लोकांना फसवण्यापुरतीच नोकरी हवी आहे तर.’’ मी.

‘‘तसं नाही साहेब, फसवण्याची इच्छा नाहीये. पण ज्या वेळेस त्यांच्याकडच्यांनी बघितले होते, त्या वेळेस मला खरोखरच कायम स्वरूपाची नोकरी होती. आता हे असे अचानक घडले आणि माझी नोकरी गेली. या परिस्थितीत मी बाईसाहेबांना तरी काय सांगणार? मी इथे या जागेत नोकरी करते आहे हे त्यांना माहीत आहे. नोकरी बदलली तरी नवीन जागा हे सगळं त्यांना कळणारच. म्हणून म्हणते ३-४ महिन्यांकरता बघा पाहिजे तर लग्नाच्या वेळी रजा घेऊन गावांला जाईन. मग परत तुमच्याकडे येणार नाही.’’ जानकी कळवळून सांगत होती.

‘‘ठीक आहे. मी विचार करून उद्या सांगतो.’’ मी तो विषय संपवला.

दुपारी बायकोबरोबर चर्चा केली. जर ती कामाला चांगली असली तर ठेवायला तिची हरकत नव्हती. कारण नाही म्हटले तरी काम आता थोडे वाढले होते. तिच्या ‘अर्ध’ वेळापेक्षा ‘पूर्ण’ वेळ काम करणाऱ्या हाताची आवश्यकता होतीच. आणि एकूण ३-४ महिन्यांचाच तर प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी मी जानकीला होकार दिला. पहिली नोकरी संपल्यानंतर तिने इकडे रुजू व्हायचे ठरले. त्यानुसार जानकी माझ्याकडे कामाला लागली.

जानकीला पॅकिंग वगैरे कामाची माहिती होतीच. हळूहळू तिने घडय़ाळ जोडणीचे कसब पण शिकून घेतले. त्यामुळे लेबल छापणे, माल तपासणे, रेकॉर्ड ठेवणे वगैरे कामे ती सांभाळू लागली. मग माझ्या बायकोने पण तिचे येणे हळूहळू बंद केले. व्यवसाय पण हळूहळू वाढत होता. आणखी १-२ जण हाताखाली घेतले. मध्यंतरीच्या काळात दुसरी जागा पण मिळाली होती. जरा स्थिरस्थावर झाल्यावर आणखी वेगळा व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायासाठीसुद्धा आणखी २-३  माणसे घेतली. जानकी जरी मूळ कामातच व्यस्त होती, तरी दोन्ही व्यवसायांचे हिशेब ठेवणे, पगारांचा हिशेब ठेवणे वगैरे कामे ती आपणहून करीत होती. त्यातही गंमत म्हणजे जानकी स्वत: अशिक्षित म्हणजे इंग्रजी लिहिता वाचता न येणारी, म्हणून प्रत्यक्षांत हजेरी लावणे, माझ्या गैरहजेरीत चलन बनवणे यासारख्या कारकुनी कामाची जबाबदारी दुसरा कामगार बघायचा. तो एसएससी होता. प्रत्यक्ष लिखापिढी तो करायचा. पण सगळा व्यवहार जानकीच्या तोंडावर असायचा. अगदी दर महिन्याला घेतला जाणारा स्टॉकसुद्धा बरोबर सांगायची. हे जानकीच्या बाबतीतच होते असे नाही. मी बऱ्याच छोटय़ा छोटय़ा कारखान्यांतून हा प्रकार बघितलेला आहे. अशा प्रकारच्या सुपरवायझरची कामे बायकाच करतात. व्यसनाधीनता, अफरातफर किंवा गैरव्यवहार करताना पुरुषमाणूस बिचकत नाही. पण बहुधा जात्याच पापभीरू असल्याने त्या जास्त विश्वासपात्र ठरत असाव्यात. (दिवसेंदिवस स्त्रिया पण धीट (?) होऊ लागल्या आहेत. परवाने वगैरे देताना आता त्यापण चिरीमिरी मागताना दिसतात.)

जानकीचे लग्न होऊन ४-५ वर्षे झाली होती. मी एक दिवस कामावर आलो तो, जानकी मुसमुसून रडत होती. मी तिला त्यावरून विचारले तर तिचा बांध फुटला. सांगण्याचा मथितार्थ असा होता की, काही कामगारांनी कारण नसता तिच्या वर्मावर आघात केला होता. लग्न होऊन इतकी वर्षे झाली तरी जानकीची कूस अजून उजवली नव्हती.

मी त्या कामगारांची कानउघाडणी केली. अर्थातच त्यांनी पण आमचा तसा उद्देश नव्हता, सहज बोललो होतो वगैरे सारवासारव केली. पण वार केला गेला होताच आणि गहरी जखम पण झाली होती.

काही दिवसांनंतर जानकीने माझ्यासमोर काही कागदपत्रे ठेवली.

जानकीने व तिच्या नवऱ्याने अनाथालयातून मूल दत्तक घ्यायचे ठरवले होते. त्यानिमित्त कॅरेक्टर सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला वगैरेचे कागदपत्र होते. असे मूल दत्तक घ्यायचे म्हणजे ते सज्ञान होईल त्यावेळी त्याला मिळू शकतील अशी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. त्याच्या भावी आयुष्याची तरतूद करावी लागते. कागदपत्रांचा खर्च पण असतो. जानकीला काही आर्थिक मदतीची अपेक्षा पण होती.

मी सुखात होतो. लौकिक अर्थाने घरसंसार चांगला चालला होता. पण जानकी? हातावर पोट भरणारी एक कामगार. भले स्वत:ची मातृत्वाची भूक भागवण्यासाठी तरी एका अनाथ मुलाची जन्मभराची जबाबदारी घ्यायची आणि निभावायची जिद्द बाळगत होती. मी जन्माचा पत्कर जरी घेऊ शकत नव्हतो, तरी किमान तिला उभे राहायला तरी आधार देऊ शकत होतो; नव्हे, त्या निमित्ताने सामाजिक ऋ ण फेडण्याची एक संधीच माझ्यासमोर चालून आली.

मी आजही सांगतो, की तशा तऱ्हेची हिंमत मी दाखवू शकलेलो नाहीये. एक अनाथ मूल घरी आणणे तर सोडाच, पण अनाथाश्रमातील एखाद्या मुलाचा खर्च पण मी उचललेला नाहीये.

माझ्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मी दिले. सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि जानकीने एक दीड वर्षांचा मुलगा- ‘राम’ घरी आणला.

खरं म्हणजे ही गोष्ट इथेच संपायला हवी होती. पण नियतीला अजून परीक्षा घ्यायची होती. अज्ञान, योगायोगासारखी अस्त्रे नियतीच्या हातांत होती. तिने त्याचा वापर केला.

जानकी राहात होती शिवडीला एका चाळीत. नवरा-बायको दोघेच होती. सासू गावाला, विवाहित नणंद गोरेगांवला राहात होती. नणंदेने प्रस्ताव मांडला. जानकीला मुलांचे करायची सवय नाही. शिवाय नवरा-बायको दोघेही कामावर जाणार मग मुलाने काय करायचे? तेव्हा काही दिवसांसाठी तरी त्या सर्वानी गोरेगावला राहावे. सासूबाई मुंबईला आल्यावर मग ‘राम’ला त्यांच्याकडे ठेवून कामावर जाता आले असते. प्रस्ताव व्यवहार्य होता म्हणून तो अमलात पण आणला गेला. जानकी, तिचा नवरा व राम तिघेही शिवडीचे घर बंद करून गोरेगांवला राहायला गेली.

सुरुवातीच्या काळात जानकीने मुलासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नावे नोंदवली होती. एका ठिकाणी अगदी लहान मुले होती तर दुसऱ्या ठिकाणी जरा जाणती मुले होती. या सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते अधूनमधून एकमेकांच्या संपर्कात राहतात. अशाच एका बैठकीत जानकीचा विषय निघाला. जानकीने आपण मुलाची निवड केल्याचे दुसऱ्या संस्थेला कळवलेच नव्हते. याला अज्ञान म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा. आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात पण असेच वागतो नाही का? आपले काम झाले की ‘त्या’ व्यक्तीला तसे कळवायचे भान आपण ठेवतच नाही.

या संस्था अतिशय जबाबदारीने काम करतात. त्यांनी आपला एक प्रतिनिधी कार्यकर्ता जानकीच्या घरी, म्हणजे तिने नोंदवलेल्या शिवडीच्या पत्त्यावर पाठवला. जानकीने बहुधा तिचा गोरेगावचा पत्ता दिलेला नसेल. त्यांनी शेजारीपाजारी चौकशी केली. शेजाऱ्यांना त्या माणसांबद्दल खात्री वाटली नसेल किंवा दुसरे काही कारण असेल. पण शेजाऱ्यांनी उत्तर दिले, ‘‘घर बंदच असते. ते जोडपे किंवा लहान मुलगा कोणीच इथे राहात नाही.’’ कार्यकत्यार्ंनी संस्थेकडे अहवाल पाठवला, ‘‘मुलगा किंवा आईवडील कोणीच भेटू शकले नाहीत.’’ चौकशीची चक्रे फिरू लागली आणि वडिलांच्या ऑफिसच्या पत्त्यावर समन्सवजा निरोप मिळाला.

‘‘अमुक अमुक दिवशी मुलाला संस्थेत सुपूर्द करा.’’

निरोप मिळताच जानकीचा जीव अर्धा झाला. त्याच रात्री तिने मला घरी फोन केला, ‘‘आता काय करायचे? मी माझा ‘राम’ त्यांना परत देणार नाही.’’

मी तिला समजावले, ‘‘आपण असे करू या, त्या दिवशी मुलाला न घेता फक्त आपणच संस्थेकडे जाऊन भेटू या. बघू काय होते ते.’’ मी माझ्या एका परिचित वकील मित्रांना फोन केला आणि त्यांचा सल्ला विचारला. ‘‘त्याच्या मते तसे करणे योग्य झाले नसते. मुलाचा ताबा संस्थेकडेच जाईल. उगाच कोर्ट-कचेऱ्या मात्र होतील.’’

ठरलेल्या दिवशी मी तिथे पोहोचलो. तेव्हा जानकी पण तिच्या नवऱ्या व मुलासह तेथे आलेली होती. केंद्रातील आयांनी लगेचच मुलाचा ताबा घेतला. आतल्या खोलीत विश्वस्त मंडळींपैकी काहीजण बसलेली होती. आम्ही तिघेच त्यांच्या खोलीत गेलो. गंमत म्हणजे त्यांच्यापैकी कोणीच मराठी नव्हते. त्यांना मराठी कळत होते. मी त्यांचा दुभाषी झालो.

मी त्यांना सगळा प्रकार कसा गैरसमजावर आधारित आहे, हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी विचारलेले प्रश्न व या जोडप्याने दिलेली उत्तरे एकमेकांना सांगत होतो. एवढेच नवहे तर मी वैयक्तिकरीत्या जामीन रहायला पण तयार आहे असे सुचवले. जानकीच्या सचोटीपणाबद्दल खात्री दिली. बहुधा ते त्यांना पटले असावे. त्यांनी जानकीला बाहेर जायला सांगितले आणि मला समजावण्याचा प्रयत्न केला, ‘‘आता या प्रश्नावर विश्वस्त मंडळच अंतिम निर्णय  घेईल. त्यांची मीटिंग पुढच्या महिन्यात होईल. तोपर्यंत मुलगा इथेच राहील.’’ त्यावेळेस मी हजर राहू शकेन का? या प्रश्नाला त्यांनी ‘नाही’ असेच उत्तर दिले. कारण ती फक्त विश्वस्तांचीच मीटिंग असते. तेव्हा मी त्या बाईंना भावनिक आवाहन केले. ‘‘जानकी अडाणी आहे. तिला तुमच्या मंडळापुढे उत्तरे देता येतीलच असे नाही. मला पण हजर राहता येणार नाही, तेव्हा आता तुम्हीच तिचे वकील व्हा आणि तुमचीच केस आहे असे समजून युक्तिवाद करा.’’ मी जानकीला आत बोलावून तो निर्णय तिला सांगितला. आणि जानकीच्या अश्रूंचा पूर सुरू झाला. तिने त्यांची परत परत विनवणी केली. शेवटी त्यांनी आम्हास एक सविस्तर अर्ज लिहून द्यायला सांगितले. आम्ही बाजूच्या खोलीत बसून त्यांनी सांगितल्याप्रमाणे सविस्तर अर्ज लिहून दिला. तेवढय़ा वेळात ‘राम’ त्या संस्थेतील आयांबरोबर खेळत होता. जानकी पण जमेल तेवढा वेळ त्याच्याबरोबर घालवत होती. आम्ही जवळजवळ ४ तास तिथे होतो. त्यांच्या सूचनेप्रमाणे अर्जात बदल करत होतो. शेवटी ३ रा अर्ज त्यांच्या मनाप्रमाणे झाला. अर्ज घेताना बाई मला म्हणाल्या, ‘‘तुम्हाला कल्पना नसेल, पण इतका वेळ मी त्या मुलाला आणि जानकीला एकत्र खेळताना पाहत होते. मला असे वाटते की जर मुलाला जानकीपासून तोडले तर, तो मुलगा पण हाय खाईल. मला खात्री वाटते की तो मुलगा जानकीकडे सुरक्षित राहील. म्हणून मी मुलाला जानकीबरोबर पाठवण्याचा निर्णय घेत आहे. तरी पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अंतिम निर्णय विश्वस्त मंडळाचाच राहील. देव करो आणि विश्वस्त मंडळाचा निर्णय अनुकूल होवो.

तुम्ही जानकीला याची कल्पना द्या. कारण जर दुर्दैवाने निर्णय विरुद्ध गेलाच तर तिला फार मोठा धक्का बसेल. आमचे कार्यकर्ते अधूनमधून भेट देतीलच. त्या दुसऱ्या संस्थेत पण तुम्ही तुमची मागणी रद्द केल्याचे अधिकृतरीत्या कळवून टाका.’’

त्यांचे आभार मानून आम्ही बाहेर आलो. संस्थेतील दायांनी पण ‘राम’ची तब्येत सुधारली असल्याचे मत दिले होते. नाही म्हटले तरी ‘राम’ त्यांच्या अंगाखांद्यावर खेळला होता, वाढला होता. त्याचा वियोग त्यांना जाणवणार होताच. पण त्यांना आता सवय झाली होती. हे औटघटकेचे पाहुणे सतत येत-जात असतात. त्यांत काही विशिष्ट मर्यादेपलीकडे गुंतून चालणार नसते. जानकीच्या जीवनातले एक वादळ तात्पुरते का होईना शमले होते.

यथावकाश ‘राम’ कायमचा अधिकृतपणे जानकीकडे सुपूर्द केला गेला. राम २॥ वर्षांचा झाल्यावर त्याला चांगल्या (?) मिशनऱ्यांच्या शाळेत घातले गेले. कारण इतर शाळांतून ‘डोनेशन’ची अपेक्षा होती. त्या शाळेत ती नव्हती. त्यानंतर जानकीने कामावर येणे बंद केले. नवऱ्याला रात्रपाळी असेल तेव्हा ती कारखान्यावर येऊन घरी काम घेऊन जात असे. मुलांकरता म्हणून ती इंग्रजी पण शिकली. मुळाक्षरे, रनिंग लिपी. उअळ, फअळ वगैरेसारखे रामनें लिहिलेले कित्ते ती कौतुकाने आणून दाखवीत असे. मुलाबरोबरीने ती पण अभ्यास करीत होती. काही दिवसांनी मंदी आली. काम कमी झाले. हळूहळू जानकीचे येणे पण बंद झाले. त्यानंतर जानकीचा आणि माझा संपर्क पण सुटला तो कायमचाच. कारण मी पण आता माझा व्यवसाय बंद केल्याला १२-१३ वर्षे झाली आहेत.

जानकीला मी म्हटले होते की, रामच्या वाढदिवशी माझ्यातर्फे संस्थेला रु. १०००/- देण्याची माझी इच्छा आहे. काही दानशूर लोक त्याच्या घरच्या एखाद्या कार्यानिमित्त मिठाई किंवा जेवण वगैरे देत असतात. पण त्याऐवजी काही कपडे वगैरे उपयुक्त वस्तू देऊ. पण जानकी असताना तरी तो योग आला नाही. तसं पाहिलं तर मी पण परस्पर चेक त्या संस्थेकडे पाठवू शकलो असतो. तरी पण मी तसे केले नाही.

माझ्यासारख्या सुशिक्षित (?) आणि अशिक्षितांमध्ये हाच मोठा फरक असतो. आम्ही साधकबाधक विचार (?) करत राहतो. ते कृती करून मोकळे होतात.
शशिकांत काळे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jankis story

ताज्या बातम्या