फेस्टिव्हल : त्यांच्या जगण्याचं सार

‘कशिश’ फिल्म फेस्टिव्हलने सात वर्षांत प्रचंड मोठी झेप घेतली आहे.

09-lp-studentsएलजीबीटी समुदायाच्या चळवळीतून सुरु झालेल्या ‘कशिश’ फिल्म फेस्टिव्हलने सात वर्षांत प्रचंड मोठी झेप घेतली आहे. चित्रपटांची संख्याच वाढली नाही तर त्यातील आशयातदेखील बदल होत आहेत. केवळ स्वत:च्या समुदायापुरतेच मर्यादित न राहता तो आता सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यत पोहचत आहे.

सामाजिक समस्येशी निगडित विषय घेऊन फिल्म फेस्टिवल करायचा तर एक तर त्यात आक्रोश वाढण्याची भीती असते किंवा आपलीच टिमकी सातत्याने वाजवली जाण्याचा प्रकार होऊ शकतो, किंवा केवळ आपणच आपल्यासाठी तयार केलेलं मनोरंजनात्मक प्रबोधनाचं साधन निर्माण होण्याची शक्यता असते. असं झालं की मग त्यात चळवळीचा भाग वाढतो आणि इतर समाजघटक दूर जातो. असा विषय सर्वच स्तरांपर्यंत नेताना हे सर्व संभाव्य धोके टाळावे लागतात. आणि चित्रपटाचा म्हणून जो कलात्मक मार्ग निवडलेला असतो, त्यातून अगदी सहजपणे व्यक्त होतं विषय पोहोचवावा लागतो. तेव्हाच तुमची वाढ होते. कशिश एलजीबीटीक्यू फिल्म फेस्टिवलमधील या वर्षीच्या फिल्म पाहताना नेमकं हेच जाणवतं. त्यांनी हे सारे धोके टाळले आहेत. किंबहुना केवळ त्या समुदायाची ओळख या पलीकडे जात त्यांच्या जगण्याचं सार आता चित्रपटातून उतरू लागलं आहे. यंदाच्या वर्षांतील चित्रपट पाहताना प्रकर्षांनं जाणवलेला हा मुद्दा.

चित्रपटातून आलेले एलजीबीटीक्यू समुदायाचे विषय आहेतच, पण इतर प्रेक्षकांनीदेखील आवर्जून पाहावे असे चित्रपट या वर्षी होते. चित्रपट हे सर्वच स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी आणि लोकप्रिय माध्यम. त्यातून केवळ आक्रोश मांडून चालत नाही. एकसूरीपणादेखील टाळावा लागतो. यंदाच्या वर्षी सहभागी झालेल्या तरुण दिग्दर्शकांची अभिव्यक्ती पाहता हे सारं टाळून आता एका वेगळ्या वाटेवरून वाटचाल सुरू झाल्याचं लक्षात आलं.

यंदाच्या वर्षी जगभरातून तब्बल ८०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी निवडक १५३ चित्रपट (५३ देशांचे) महोत्सवात दाखवण्यात आले. आकडेवारीतच मोजायचं तर ही संख्या कशिशची जागतिक स्तरावरील लोकप्रियता अधोरेखित करणारीच आहे. पण या वर्षी जाणवलेला सर्वात महत्त्वाचा बदल होता तो विषयांमध्ये. केवळ व्यक्त होणं, आपली ओळख सांगणं इतपतच आता हे चित्रपट मर्यादित न राहता कुटुंब आणि समाजाला एकत्र बांधणारे विषय हा महत्त्वाचा बदल दिसून आहे. दुसरी जाणवलेली बाब म्हणजे भारतीय दिग्दर्शकांनी हाताळलेले विषय.

यावर्षी असलेला पूर्ण लांबीच्या चित्रपटांचा सहभाग अधिक जाणवणारा होता. त्यातही भारतात तयार झालेल्या प्रादेशिक चित्रपटांची दखल घ्यावी लागेल. मराठी, तामिळ, मल्याळम्, कन्नड भाषिक दिग्दर्शकांनी थेट फीचर फिल्मलाच हात घातला होता. एलजीबीटी हे प्रकरण शहरी लोकांचं खूळ आहे आणि त्यांच्यापुरतचं मर्यादित आहे, असं समजणाऱ्या वर्गाला या भाषिक चित्रपटांनी थेट उत्तर दिलं आहे. ‘दारवठा’(मराठी), ‘कोती’ (मराठी), ‘आयएम नॉट ही, शी’ (केरळ) आणि ‘गे’ (तामिळ) या चित्रपटांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

इंग्रजी चित्रपटात विशेषकरून पूर्ण लांबीच्या चित्रपटांनी आता बराच पुढचा पल्ला गाठल्याचं दिसून आलं. अ‍ॅक्रॉन आणि बेटर हाफ या दोन चित्रपटांमध्ये हे विशेषत्वाने जाणवलं. टोनी आणि लिओ या गे जोडप्यातील टोनीला मुलं दत्तक घेण्याची, वाढवण्याची असोशी असते. पण लिओला ते फारसं रुचललेलं नसतं. तरीदेखील जोडीदाराच्या प्रेमापोटी ते मूल दत्तक घेतात. पण नंतर खऱ्या संसाराला सुरुवात होते. मुलाचं हवं नको करण्यात त्यांची तारांबळ उडू लागते. टोनी प्रेमानं सारं करीत असतो. पण लिओसाठी हे सारं त्रासदायक होऊ लागतं. त्यातची लिओची नोकरी फिरतीची. तर टोनीला दवाखान्यातील नोकरीबरोबरच सामाजिक कामात प्रचंड रस. एका शाळकरी मुलाला सतत छळवणूक करणाऱ्या वडिलांपासून तो पोलिसांच्या मार्फत मुक्त करतो. त्या वडिलांचा त्याच्यावर राग असतो. तुरुंगातून सुटल्यावर ते टोनीवर हल्ला करतात. त्यात टोनीचा जीव जातो. दत्तक घेतलेल्या मुलाचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो? लिओची एकंदरीत दत्तक मुलाबाबतची मानसिकता, त्याचा व्यवसाय, त्याचं अर्धवट वैवाहिक जीवन या सर्वातून चांगलंच मानसिक वादळ निर्माण होतं, त्यातून तो तरून कसा जातो ह्य़ाचं अगदी सुंदर चित्रीकरण केलं आहे. स्ट्रेट व्यक्तीच्या वैवाहिक आयुष्यातील प्रश्न गे जोडप्याबाबतदेखील कसे असू शकतात त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून या चित्रपटाकडे पाहायला हवं.

‘अ‍ॅक्रॉन’मध्ये एक वेगळाच कौटुंबिक तिढा दिसून येतो. बेन्नी आणि ख्रिस्टोफर या दोघा गे व्यक्तीला घरून कसलाही विरोध नसतो. ते दोघेही हळूहळू एकमेकात गुंतू लागलेले असतात. बेन्नीचा लहान भाऊ अगदी रांगता असतानाच एका महिलेच्या गाडीखाली येऊन अपघाती मृत्यू झालेला असतो. आणि ती गाडी असते ख्रिस्टोफरच्या आईची. एकदा ख्रिस्टोफर, बेन्नीकडे आलेला असताना त्याला हा उलगडा होतो. आणि दोघांचे संबंध ताणले जातात. त्यातून दोन्ही घरांमध्ये अशांतता माजते. हे सारं मांडताना चित्रपटीय भाषेचा अगदी परिणामकारक वापर केलेला आहे. चित्रपटाचा फोकस हा संपूर्णपणे एका गे जोडप्याच्या कुटुंबातील संबंध कसे ताणले जाऊ शकतात, ते जुळणं कितपत शक्य असत याभोवती राहतो. ही शैली नवीन म्हणावी लागेल.

महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषक मिळवणारा ‘हाऊ टू विन चेकर्स (एव्हरी टाइम्स) हा चित्रपट म्हणजे तर एकदम ट्विस्टच म्हणावा लागेल असा होता. संपूर्ण चित्रपटात मोजून दहाएक मिनिटंच फक्त गे आणि समलैंगिकतेवर भाष्य आहे. थायलंडमधील हा चित्रपट फिरतो तो गे व्यक्तीच्या धाकटय़ा भावाभोवती. एक हा गरीब कुटुंबातील, तर श्रीमंत कुटुंबातील जाय हे दोघे नातेसंबंधात असतात. थायलंडमधील कायद्यानुसार वयाच्या एका ठरावीक वर्षी तुम्हाला सैन्यदलात काही काळ काम करणं बंधनकारक असतं. ही निवड लॉटरी पद्धतीने केली जात असते. एकला काळजी असते की, जर त्याची निवड झाली तर धाकटा भाऊ ओत याचे काय होणार?   जाय आणि एक याचे संबंध आजीला मान्य नसतात. तिचा समलैंगिकतेला विरोध नसतो, पण तो श्रीमंत कुटुंबातील आहे म्हणून तिला ते नको असते. तर जायचे वडील तेथील एका स्थानिक दादाला पैसे चारून आपल्या मुलाचा नंबर या लॉटरीत येणार नाही याची व्यवस्था करायला लावतात. हे सारं ओतला समजते. तो त्या स्थानिक दादाच्या गाडीतून ते पैसे चोरतो आणि पुन्हा त्या दादालाच देतो. कशासाठी तर आपल्या भावाला सैन्यात जावं लागू नये म्हणून. त्यावर चिडून मग तो स्थानिक दादा एकला थेट वेश्या व्यवसाय करायला भाग पाडतो.. संपूर्ण कथानक असं अनेक वळणं वळणं घेत जात असतं. तसं पाहिलं तर एखाद्या हिंदी चित्रपटातदेखील असं कथानक सापडेल. पण येथे गे जोडपं आणि त्यांच्या कुटुंबीयातील ताणेबाणे अगदी ठळकपणे दाखवून एलजीबीटी विषयाला एका वेगळ्या वाटेने नेलं आहे. अर्थातच सवरेत्कृष्ट कलाकाराचं बक्षीसदेखील याच चित्रपटासाठी ओतचे काम करणाऱ्या इंगकरात दॅम्रोंग्सकूल या छोटय़ा कलाकाराला मिळालं आहे.

अलिगढ चित्रपटगृहात प्रसिद्ध होऊन बराच काळ झाला असला तरी या समुदायाला बळकटी देणाऱ्या या चित्रपटाचा महोत्सवात खास खेळ आयोजित करण्यात आला होता. अर्थातच त्याला सर्वानीच मनापासून दाद दिली. यंदाच्या महोत्सवात माहितीपटांसाठी मॅक्स मुल्लर भवन येथे विशेष योजना करण्यात आली होती. तर ऑलिएन्स फ्रान्सिस येथे बहुतांशपणे लघुपट होते. अर्थात सारंच काही एका वेळी पाहणं शक्य नव्हतं. गेल्या एक-दोन वर्षांत भारतीय माहितीपटांचा दर्जादेखील चांगलाच सुधारला असल्याचं जाणवतं ते उत्कृष्ट माहितीपटाचे बक्षीस मीरा दार्जी या तरुण सिनेमाकर्तीला ‘ट्रान्सइंडिया’ या माहितीपटासाठी देण्यात आलंय. गुजरातमधील ट्रान्सजेंडर समूहाचं वास्तव टिपणारा हा माहितीपट तांत्रिक तसेच आशयाच्या दृष्टीनेदेखील उत्तम होता.

माहितीपटाच्या विषयावरदेखील एक दर्जेदार फीचर फिल्म करता येते हे दाखवून दिलं ते ‘आय एम नॉट ही, शी’ या कन्नड चित्रपटाने. बी. एस. लिंगदेवरू  यांच्या या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. मदेशा या ट्रान्सजेंडर व्यक्तीला पुरुषाच्या शरीरात होणाऱ्या मानसिक घुसमटीपासून मुक्ती हवी असते. मुळात त्याला गावात कसलीच किंमत नसते. शहरात ट्रान्सजेंडर मित्रांशी ओळख होते. शिक्षण पूर्ण होतं. पण तोपर्यंत शरीर बदलण्याची तीव्र इच्छादेखील बळावत असते. अखेरीस तो तसा बदल करून घेतोच. आणि त्याचं नाव बदलून विद्या होतं. हिजडय़ांबरोबर राहू लागते. पण त्यांची कामाची शैली तिला रुचत नाही. घरचे आता तरी स्वीकारतील म्हणून पुन्हा गावी येते, पण तेथेही नकारच पदरी पडतो. अखेरीस ती स्वत:च अनेक संकटांना तोंड देत पुढे जाते. ही सारी कथा अगदी थोडक्यात असली तरी ही सत्यकथा आहे. पण दिग्दर्शकाने त्याची अप्रतिम अशी गुंफण करून एक उत्तम फीचर फिल्म तयार केली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष लोकेशनवर चित्रीकरण झालं आहे. कोठेही आशयाशी तडजोड नाही की तंत्राशी. ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या आयुष्यातील सारे बारकावे टिपत सर्वानाचा पाहता येईल असा उत्तम चित्रपट म्हणावा लागेल.

शरीरातील बदलाचं दुसरं एक उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू सोनाली. खरं तर केरळ हे एलजीबीटी समुदायासाठी अतिशय त्रासदायक असं राज्य म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे सोनालीने थेट बेंगलोर गाठलं आणि स्वत:वर शस्त्रक्रिया करवून घेतली. अशा प्रकारची अनेक उदाहरणं झाली आहेत. पण ‘दॅट्स माय बॉय’ या कमी लांबीच्या महितीपटातून इतकं सफाईदारपणे मांडलं आहे की, आपण एक चित्रपटच पाहतोय असं वाटतं. अखिल सथ्या या नवोदित दिग्दर्शकाची ही कलाकृती अनेकांची प्रशंसा मिळवून गेली आहे.

पाकिस्तान, इराण येथील लघुपट हे महोत्सवाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. तर ट्रान्सजेंडर नेपाळी मॉडेल अंजली हिच्यावरील लघुपट अनेकांना भावला. मराठीने एक उत्तम फीचर फिल्म आणि एक उत्कृष्ट माहितीपट अशी कामगिरी बजावलीच, पण ‘दॅट वन नाइट’ या मराठी-हिंदूी मिश्रित लघुपटातून एक आई आपल्या मुलांसाठी कशी खंबीरपणे थेट पोलिसांशी हुज्जत घालते हे पाहायला मिळालं.

गेल्या दोन-तीन वर्षांत कशिशमध्ये प्रादेशिक चित्रपटांची हजेरी वाढली आहेच, पण त्याचबरोबर तरुण दिग्दर्शकांचं प्रमाण लक्षणीय आहे. महोत्सवात या तरुण दिग्दर्शकांशी झालेल्या संवादातून प्रादेशिक भाषेत एलजीबीटी विषय घेऊन चित्रपट, लघुपट साकारण्यातील अनेक अडचणी जाणवल्या. संपूर्ण साक्षर असणाऱ्या केरळात आजही एलजीबीटी विषय घेऊन लघुपट चित्रपट करणं अवघड असल्याचं मलिक सथ्या नमूद करतात. इतकंच काय तर त्यांनी केलेल्या मल्याळम् माहितीपटातील नायक बंगलोरमध्ये असतो. मात्र आजही एलजीबीटी कम्युनिटीसंदर्भातील अगदी मूलभूत घटकांबद्दलदेखील अनभिज्ञता असते, म्हणूनच हे स्पष्टीकरण करणारा माहितीपट केल्याचे तेजश्री जोशी सांगते. तर तामिळ दिग्दर्शक मणिशंकर अय्यर सांगतात, तामिळमध्ये तर कलाकाराच उपलब्ध होत नाहीत. दक्षिणेकडील अनेक राज्यांत अजूनही या संकल्पनेवर फारसं बोललं जात नाही. आणि घरूनदेखील फारसा पाठिंबा मिळत नाही.’’ तुलनेनं मराठीत बऱ्यापैकी सुसह्य़ परिस्थिती आहे. मात्र एलजीबीटींशी संबंधित मुख्य धारेतील पूर्ण लांबीच्या चित्रपटांची निर्मिती एखाद्या वेळी शक्य होईल. पण लघुपट म्हटलं पैसे कोठून आणायचे, हा आजही मोठा प्रश्न असल्याचे संतोष रॉय बोंबार्डे सांगतात.

कशिश या एलजीबीटीक्यू फिल्म फेस्टिव्हलचं हे सातवं वर्ष. ‘सेव्हन इयर्स इच’ अशी ही संकल्पना इंग्रजीत मांडली जाते. सात वर्षांच्या सहवासानंतर, नात्याचा काच वाटू लागतो. पण येथे तर प्रेमाच्या सप्तछटाच उलगडल्या होत्या. आम्ही कोण हे आता त्यांचं सांगून झालंय, समस्यादेखील मांडल्यात. तशा अजून बऱ्याच शिल्लक आहेत. आता ते प्रेमाचं पुढचं पाऊल टाकताहेत. आमच्या जगण्यातदेखील तुमच्यासारखेच ताणेबाणे आहेत. पण प्रेमाचे सप्तरंग असतील त्या सर्वाना टाळता तर येईलच, पण सात वर्षांच्या सहवासानंतर नातं अधिकच गहिरं होईल. कशिशनं ही वेळ अचूक साधली आहे.

कशिश २०१६ पुरस्कार

कशिश रेनबो वॉरियर अ‍ॅवॉर्ड – रुथ वनिता आणि सलीम किडवाई

सवरेत्कृष्ट नॅरेटिव्ह फीचर फिल्म – हाऊ टे विन चेकर्स (एव्हरी टाइम) – जोश किम

सवरेत्कृष्ट मुख्य भूमिका – इंगकरात दॅम्रोंग्सकूल (हाऊ टू विन चेकर्स (एव्हरी टाइम))

नवोदित फिल्ममेकरसाठी रियाद वाडिया पुरस्कार –

श्रीकांत अंथाक्रिष्णन आणि विक्रांत धोते – अ‍ॅनी ऑदर डे

क्यूदृष्टी फिल्म ग्रॅट एक लाख रुपये – व्ही रामनाथन (शॉर्ट नॉर्मसी)

सवरेत्कृष्ट नॅरेटिव्ह शॉर्ट – सॅन क्रिस्टोबल

सवरेत्कृष्ट लघू माहितीपट – ट्रान्सइंडिया

मराठी आणि एलजीबीटी चित्रपट

नवनव्या विषयांवरील चित्रपटाचे प्रयोग करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीने एलजीबीटी हा विषयदेखील अगदी लीलया पेलला आहे. त्यात काही ठिकाणी चळवळीचा भाग आहेच, पण मनोरंजनाचा धागा पकडून अगदी सहजपणे मूळ विषयाकडे लक्ष्य वेधण्याचे यशस्वी प्रयोग या वर्षी पाहायला मिळाले. सुहास भोसलेंचा ‘कोती’ आणि निशांत रॉय बोबांर्डेचा ‘दारवठा’ ह्य़ा दोन्ही मराठी कलाकृतींनी यंदाचं कशिश चांगलचं गाजवलं. दोन्ही चित्रपट ग्रामीण पाश्र्वभूमीवर घडतात. त्यामुळे विषयाची व्याप्ती वाढते.

कोती ही एका छोटय़ाशा गावातील श्याम आणि बब्रुवाहन (बब्य्रा)या दोन आठ-दहा वर्षांच्या भावांची कथा. मोठा श्याम अभ्यासात हुशार, चुणचुणीत पण ट्रान्सजेंडर. मुलींचे कपडे घालून बांगडय़ा, कुंकू, दागिने असा सारा साजशृंगार करायची त्याला आवड. वडील कॉन्ट्रॅक्टर, गावात बऱ्यापैकी मानमरातब असणारे. श्यामचं हे वागणं जसंजसं वाढू लागतं तसतसं गावात चर्चा होऊ लागते. पण या दोघा भावंडांना त्याबद्दल नेमकं काहीच माहीत नसते. श्याम हा आपल्या समाजात वाढणारा नाही, त्याला हिजडय़ांच्या समुदायात सोडण्याची तयारी वडीलांनी सुरु केलेली असते. पण बब्य्राला हे मान्य नसते. त्याला हा प्रकार नेमका काय आहे हेदेखील कळत नसते. हा आपला भाऊ आहे, त्याला जसं वागायचं तसं त्यानं वागावं आणि वडिलांनी त्याला कोठेही नेऊन सोडू नये इतकच त्याला अपेक्षित असते. त्यासाठी जे काही करतो ते म्हणजे हा चित्रपट.

‘दारवठा’ हा लघुपटदेखील अशाच सफाईदारपणे केला आहे. महत्त्वाचं म्हणजे तो एक लघुपट आहे. अर्थातच कमी बजेट असलं तरी त्यातील तांत्रिक सफाई वाखाणण्यासारखी आहे. बदली होऊन एका मध्यम शहरात राहायला आलेलं टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब. सातवी आठवीत शिकणारा एकलुता एक मुलगा पंकजचं वागणं ट्रान्सजेंडरसारखं. साहजिकच गावात चर्चा होणं, त्यावरून टोमणे पडणे सुरू होतं. पंकजला स्नेहसंमेलनात नृत्य करायचं असतं. स्त्रीवेशातील पात्र तो साकारत असतो. वडिलांना हे पटत नाही. पण आई त्याच्यामागे उभी राहते. अगदी सहज आणि खंबीरपणे. कसलाही अभिनिवेश न मांडता.

दोन्ही घटना म्हटल्या तर थेट भाष्य करणाऱ्या. पण कोतीमध्ये चित्रपटीय मांडणीत हे गांभीर्य पाश्र्वभूमीला ठेवून संपूर्ण चित्रपटाला ह्यूमरस टोन दिला आहे. एक छोटा भाऊ आपल्या मोठय़ा भावाला वडिलांनी घेऊन जाऊ नये म्हणून काय काय करू शकेल हे डोळ्यांसमोर ठेवून केलेली ही मांडणी. त्यामुळे त्यात कोठेही आविर्भाव डोकावत नाही. ठरवून संदेश देण्यापेक्षा चित्रपटाच्या रचनेतूनच तो सहजपणे पोहोचवण्याची व्यवस्था. आणि व्यावसायिक दृष्टिकोन असल्यामुळे तांत्रिक बाबतीत कसलीच तडजोड नाही. दारवठा तांत्रिक बाबतीत आणखीनच उजवा आहे. २४ मिनिटांच्या लघुपटात कोठेही हा आपला मुलगा आहे, कसाही असला तरी त्याला सांभाळायला हवं, असा साधा संवाददेखील न घेता, सार काही कृतीतून मांडलं आहे. सूचक असे प्रसंग, सूचक स्वप्नदृश्य अशातून नेमकं जे पोहोचवायचंय ते सहजपण पोहोचून जातं.

या दोन्ही चित्रपटांची उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्य धारेतील कलाकारांचा सहभाग. एक वेळ तांत्रिक सफाई आणता येते, पण कसलेले कलाकार नसतील तर विषय चांगला असूनदेखील तितकासा पोहचू शकत नाही. ‘दारवठा’मध्ये नंदिता पाटकरची भूमिका अगदी अप्रतिम म्हणावी लागेल. तर निशांत भावसार याने लहान मुलाची भूमिका साकारली आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kashish mumbai international queer film festival

ताज्या बातम्या