जय पाटील

शेतकऱ्यांनी पिकवलेली ताजी फळे, भाज्या योग्य वेळेत देशभरातील बाजारांत पोहोचाव्यात यासाठी अशा काही विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या-त्या फळे आणि भाज्यांच्या मोसमात या गाड्या चालवल्या जाणार आहेत. ही सेवा देण्यासाठीच्या योजनेवर सध्या रेल्वे आणि कृषी मंत्रालय काम करत आहे.

भविष्यात रेफ्रिजरेटेड कंटेनर्समधून मांस आणि माशांचीही रेल्वे वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू आहे. शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने त्यांच्या पसंतीच्या बाजारात विकण्याची मुभा देणाऱ्या नव्य कृषी कायद्याच्या पार्श्वभूमीवर या सेवेला विशेष महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे. सध्या विचार सुरू असलेले मार्ग पुढीलप्रमाणे…

  • कांदा आणि केळी विशेष – नाशिक आणि जळगावपासून दिल्लीपर्यंत (मार्च ते डिसेंबर दरम्यान)
  • आंबा विशेष – आंध्रप्रदेश ते दिल्ली (एप्रिल ते जून दरम्यान)
  • केळी विशेष (निर्यातीसाठी) – अनंतपूर ते जेएनपीटी मुंबई</li>
  • चिकू विशेष – गुजरातमधील सुरत, वलसाड आणि नवसारी ते दिल्ली (एप्रिल ते नोव्हेंबर)
  • प्रथिन विशेष (हवाबंद मांसासाठी) – उत्तर प्रदेशातील दादरी आणि कानपूर भागांतून गुजरात आणि मुंबईतील बंदरांपर्यंत (ही सेवा आधीपासूनच अस्तित्त्वात आहे.)

आपापल्या राज्यांतील उत्पादनांसाठी नवे मार्ग सुचवण्याचे आवाहन कृषी, पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय विभागांच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. आतापर्यंत चार चाचणी फेऱ्या कोणत्याही विलंबाशिवाय यशस्वी झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच नागपूर-दिल्ली मार्गावरही किसान रेल सुरू करण्यात येणार आहे.

आम्हाला शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. जेव्हा मागणी केली जाईल, तेव्हा तेव्हा या रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिली. काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ट्रक बुक केला तर ते त्यांची उत्पादने सहज रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवू शकतात. उत्पादन कमी प्रमाणात असले, तरी त्याची वाहतूक केली जाते, असे अनंतपूर येथील शेतकऱ्यांच्या गटात सहभागी असलेले मोहम्मद राव यांनी सांगितले.