scorecardresearch

Premium

करोना राक्षसाचा धडा

सकाळची उन्हं रजईच्या आत येऊन लख्ख प्रकाश निनादच्या चेहऱ्यावर पडला. तसं रजईचं मोठ्ठालं भेंडोळं बाजूला सारून तो तसाच, आईच्या हाकेची वाट पाहत पांघरुणात डोळे मिटून बसून राहिला.

kid boy corona
आईबाबा पूर्ण दिवस त्यांच्या कामात, आज्जी टीव्हीसमोर. निनादसुद्धा मनसोक्त गेम्स खेळला, खूप झोपला. कोणीही त्याला अडवले नाही, ना अभ्यास करायला सांगितले.

प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com
बाल विशेष
सकाळची उन्हं रजईच्या आत येऊन लख्ख प्रकाश निनादच्या चेहऱ्यावर पडला. तसं रजईचं मोठ्ठालं भेंडोळं बाजूला सारून तो तसाच, आईच्या हाकेची वाट पाहत पांघरुणात डोळे मिटून बसून राहिला. पाच मिनिटं झाली तरी आईचा तो रोजचा ‘निना, ऊठ पटकन, ब्रश कर, चला, नाही तर शाळेत जायला उशीर होईल,’ असा आवाज काही त्याच्या कानावर पडला नाही. आई विसरली वाटतं, असं म्हणून त्याने डोळे किलकिले करून पाहिले. आई-बाबा, आज्जी कोणीच समोर दिसेना. ना कोणाचा आवाज ऐकू येत होता. कुठे गेलेत सगळे? रात्री जे स्वप्नात दिसलं ते खरं तर नाही ना झालं.. तसं त्याला रात्रीचं ते स्वप्न आठवलं. त्याने पटकन आईला हाक मारली. तशी दचकत आई तिथे आली. ‘‘अरे, इतक्या लवकर कशाला उठलास तू? झोप बरं.’’ आज सुट्टी आहे शाळेला? मला कसं माहीत नाही. निनाद विचारात पडला. काही तरी गडबड आहे. त्याने समोर भिंतीवर असलेलं कॅलेंडर पाहिलं. नाही, आज तर सोमवार आहे, कालच नाही का रविवार होता, वैभव, मी, कैवल्य, आशीष आम्ही सगळे क्रिकेट खेळलो.

डोळे चोळतच तो दिवाणखान्यात आला. तशी टी.व्ही.कडे टक लावून पाहणारी आज्जी त्याला दिसली. बाबा मोबाइलवर ऑफिसमधल्या कोणाशी तरी बोलत होते, आई तिच्या लॅपटॉपमध्ये एकदम सीरियस होऊन काही तरी वाचत होती. अरे, चाललंय काय.. हे दोघं आज कामावर कसे नाही गेलेत, एरवी मला उठवण्याच्या आधीच आईची तयारी झालेली असते आणि बाबा तर त्याच्याही आधीच ऑफिसला गेलेले असतात आणि नेहमी सकाळी सकाळी रेडिओ लावून गाणी गुणगुणणारी आज्जी आज इतकी शांत बसून टी.व्ही. का पाहतेय? काय गडबड आहे? पुन्हा त्याला त्याचं ते स्वप्न आठवलं. तसा तो आईला जाऊन बिलगला. ‘‘निना, दोन मिनिटं थांब, आईची मीटिंग सुरू आहे.’’ त्याला थोडं बाजूला सारून आई पुन्हा लॅपटॉपमध्ये पाहू लागली. तसा तो आज्जीच्या शेजारी जाऊन बसला. ‘‘आज्जी, काय झालं गं, ट्रेन बंद पडल्यात?’’ टीव्हीवरचं ट्रेनचं चित्र पाहून त्याने आज्जीला विचारलं.

rape case filed against the boyfriend
प्रेम प्रकरणाची कुणकुण पोहचली घरात… अन् प्रियकराविरुद्ध गुन्हा
lokrang
आदले । आत्ताचे: निर्थकाच्या झुल्यावर..
girish kuber chat with actor pankaj tripathi in loksatta gappa event
सुमारांच्या सद्दीमुळे साधारण कलाकारही इथे थोर..
Jejuri Crime News
धक्कादायक! खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर कडेपठारच्या डोंगरावर अत्याचाराचा प्रयत्न

‘‘नाही रे, करोना आलाय.’’

‘‘कोण आलाय?’’ गोंधळून त्याने पुन्हा आज्जीला विचारलं.

‘‘करोना रे, साथीचा रोग. भारतात आलाय तो, आता आपल्या सगळ्यांना घरातच राहावं लागणार आहे काही दिवस, कुठ्ठेच बाहेर जाता येणार नाही.’’

‘‘म्हणजे?’’ निनादचे डोळे एकदम मोठ्ठे झाले. ‘‘खेळायलाही नाही? आज आमची मॅच होती.’’

‘‘कुठेच नाही. घराच्या बाहेर पडायचंच नाही. घरीच राहायचं. तुझी शाळासुद्धा बंद आहे आज.’’ आत्ता कुठे निनादला सकाळपासून सुरू असलेल्या गडबडीचा उलगडा झाला. ‘शाळा नाही वॉव.. आज खूप टीव्ही बघणार मी आणि संध्याकाळी वैभव, मी, कैवल्य, आशीष खूप खेळ.. अचानक त्याला आठवलं, अरे यार, खेळायला तर जाऊच नाही शकणार; पण ठीकेय ना, खूप गेम तर खेळेन. नो शाळा.. याहू!’ निनादला कळलंच नाही त्याचं याहू जरा जोरातच बाहेर आलं. आईबाबा दोघांनीही डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं. तसा तो भानावर आला.

आता काय करायचं? गेम खेळायचा का? असा विचार करत असतानाच आईने त्याला हाक मारली. ‘‘निनाद, आंघोळ करून घे. जा पटकन आणि आज दूधच आहे फक्त नाश्त्याला. सुमनताई नाही आल्या.’’ आईने लॅपटॉपमधून डोकं वर न काढता निनादला सांगितलं.

त्याचा तो पूर्ण दिवस घरातच टंगळमंगळ करत गेला. आईबाबा पूर्ण दिवस त्यांच्या कामात, आज्जी टीव्हीसमोर. निनादसुद्धा मनसोक्त गेम्स खेळला, खूप झोपला. कोणीही त्याला अडवले नाही, ना अभ्यास करायला सांगितले. असा दिवस रोज येऊ दे, अशी मनोमन प्रार्थना करत त्याने आज्जीला दबकतच विचारले, ‘‘आज्जी, उद्या मला शाळेत जावं लागेल ना गं, तो साथीचा रोग फक्त आजच येणार होता ना..’’ तसं त्याच्याकडे हसून पाहत आज्जी म्हणाली, ‘‘नाही रे, किमान एक आठवडा बंद असणार तुझी शाळा अन् हा रोग काय असा एका दिवसात जात नसतो, आत्ताशी कुठे सुरुवात आहे.’’ तसा निनाद आनंदला. ‘व्वाह! म्हणजे अजून एक आठवडा मी गेम्स खेळू शकणार आणि त्यात अभ्यासही नाही. याच खुशीत तो झोपायला गेला, तर बघतो तो काय, पलंगावर बसून आईबाबा अजूनही कामच करत होते. त्याला समोर पाहून आई म्हणाली, ‘‘निना, आज प्लीज आज्जीच्या खोलीत झोपतोस का, मला आणि बाबांना हे ऑफिसचं काम उरकायचंय.’’

काहीशा नाराजीनेच तो आज्जीच्या खोलीत जाऊन झोपला. झोपताना त्याला एकच भीती सतावत होती. काल रात्री पडलेल्या स्वप्नाची. ते स्वप्न होतंही तसं भयानकच म्हणा. आई-बाबा तो आणि आज्जी सगळे मस्त गाडीतून फिरायला गेले होते आणि एका सूमसाम रस्त्यावर त्यांची गाडी बंद पडते. समोर अचानक एक भलामोठा राक्षस येतो. तो गाडीत हात घालून आई-बाबांना बाहेर काढतो आणि त्याच्याकडे असलेल्या एका खोक्यात बंद करून टाकतो. निनाद खूप गयावया करतो; पण राक्षस काही केल्या ऐकत नाही. निनादचे आईबाबा मग कायमस्वरूपी त्या खोक्यात बंद होतात.

सकाळी कावकाव करणाऱ्या कावळ्याचा आवाज कानी पडला तसा निनाद दचकून जागा झाला. पुन्हा तेच स्वप्न. तो घामाघूम होऊन आईला शोधायला लागला. दिवाणखान्यात येऊन पाहतो तर काय, पुन्हा कालचंच चित्र. आई-बाबा दोघं कामात आणि आज्जी टीव्हीसमोर. तिसऱ्या दिवशीसुद्धा तेच, हळूहळू तर हा रोजचाच कार्यक्रम झाला. निनादशी बोलायला आईबाबांना वेळच नसायचा. जेवायला बसल्यावरसुद्धा दोघं मोबाइलवर काम करत बसायचे. आईला निनादच्या आवडीचे पदार्थ तयार करायलासुद्धा वेळ नसायचा. निनादलासुद्धा आता व्हिडीओ गेम्स खेळून कंटाळा आला होता. त्याला त्याच्या मित्रांची आठवण यायला लागली. संध्याकाळचे खेळ तो मिस करायला लागला. घरात असूनसुद्धा आईबाबांना त्याच्यासाठी वेळ नव्हता. एका आठवडय़ाचे १० मग १५ दिवस झाले. होता होता एक महिना होत आला.

अचानक शाळा सुरू झाल्या, पण त्याही ऑनलाइन. मग निनादसुद्धा त्याच्या आई-बाबांसारखाच लॅपटॉपसमोर बसू लागला. त्याचे सगळे मित्र त्याला आता फक्त ऑनलाइन दिसू लागले. शाळा सुरू झाल्या खऱ्या, पण आधीसारखी मजा मात्र येईनाशी झाली. मधल्या सुट्टीची धमाल बंद झाली. पीटीच्या तासाला मैदानात वेगवेगळे खेळ खेळताना एकमेकांना चिडवणं बंद झालं. सुरुवातीला वाटलेली मजा आता मात्र निनादला सजा वाटायला लागली. ‘मला नाही राहायचं घरी, मला खेळायला जायचंय कैवल्यबरोबर..’ तो सतत आईबाबांकडे हट्ट करायला लागला; पण ते बिचारे तरी काय करणार? कोणीच बाहेर जाऊन कोणाला भेटू शकत नव्हतं करोनामुळे. निनादची एव्हाना पक्की खात्री झाली होती की, त्याच्या स्वप्नात येणारा तो राक्षस दुसरातिसरा कोणी नसून करोनाच आहे. मग त्याने एक प्लान आखला, करोनापासून सगळ्यांची सुटका करण्याचा. त्याने ठरवलं, की थेट त्या राक्षसाचीच भेट घ्यायची, न घाबरता आणि सांगायचं त्याला की, ‘आम्ही तुला घाबरत नाही. तू प्लीज, आता आम्हाला सोडून तुझ्या घरी परत जा.’ आज रात्री स्वप्नात करोनाला भेटायचं ठरवून तो लवकरच झोपी गेला. पुन्हा तेच स्वप्न पडलं, पण या वेळी मात्र निनाद अगदी तयारीत होता, तो मोठ्ठाला राक्षस त्याच्यासमोर आल्यावरही तो डगमगला नाही, घाबरला नाही. उलट त्याच्यासमोर हिमतीनं उभा राहिला. मोठय़ा आवाजात त्याने राक्षसाला विचारलं, ‘‘तू इथे का थांबलायेस.. तुझ्या घरी जा की आता परत. आम्हाला घरी कोंडून तू मात्र मोकळा फिरतोयस. ही चिटिंग आहे. आम्हालाही खेळायचंय. कधी जाणार तू तुझ्या घरी?’’

त्याचा प्रश्न ऐकून राक्षस खाली वाकला. त्याचं मगाशी दिसणारं ते अक्राळविक्राळ रूप अचानक गायब झालं. आता तो निनादएवढाच पिटुकला दिसायला लागला. त्याचा तो कर्णकर्कश आवाज बंद होऊन एकदम छान आवाजात तो निनादला म्हणाला, ‘‘तुम्हीच बोलावलंय मला इथे. मी खूश होतो माझ्या घरी, पण तुम्ही चुकीचं वागायला लागलात, मग निसर्गदादाने इथे पाठवलं. निसर्गदादा म्हणजे आमच्या सगळ्यांचा मोठा भाऊ. तो म्हणाला की, तुम्ही माणसं त्याला खूप त्रास देताय. मग मला, चक्रीवादळाला, ज्वालामुखीला, त्सुनामीला, वणव्याला अजिबात राहावलं नाही. आम्ही ठरवलं तुम्हाला धडा शिकवायचा चांगलाच. मग आम्ही सगळे एकत्रच आलो.’’

निनादला कळेना की, आपण निसर्गाला काय त्रास दिला. तो गोंधळून करोनाकडे पाहायला लागला. तसा करोना पुढे म्हणाला, ‘‘अरे, तुम्ही तुमच्या आनंदासाठी, स्वार्थासाठी झाडे कापता, जंगलं तोडता, मग आमच्या प्राणिमित्रांनी, पक्ष्यांनी जायचं कुठे, तुमची घरं अशी तोडली तर चालेल का? आणि किती प्रदूषण करता रे तुम्ही.. पृथ्वीताई तर रडकुंडीला आलीये तुमच्यामुळे. नाकातोंडात सततचा धूर जाऊन ताप येतो तिला, तिचं तापमान किती वाढलंय माहितेय?’’

‘‘पण हे सगळं मी कुठे केलंय, आम्हाला का त्रास देतोस तू? ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा दे ना.’’ निनाद रडवेला होऊन म्हणाला.

‘‘तुम्ही सगळे करता. मला सांग निनाद, बाबांबरोबर गाडीतून फिरायला जातोस तेव्हा गाडीतून बाहेर पडणारा धूर प्रदूषणच असतं ना? चॉकलेट खाऊन त्याचं रॅपर रस्त्यावरच टाकतोस, तो कचरा समुद्रात जातो आणि बिचाऱ्या आमच्या मासेदादांच्या गळ्यात अडकतो. तुझ्या आनंदासाठी बघ तू किती जणांना त्रास देतोस.’’

हे ऐकून निनाद विचारात पडला. ‘‘पण मी तर किती लहान आहे अजून. मी हे सगळं कसं थांबवू? माझं कोणी ऐकणार सुद्धा नाही. आई-बाबांना तर आत्तापण वेळ नसतो माझं ऐकायला, माझ्याकडे केवढय़ा आयडियाज असतात, माहीतेय. मी तर जास्तीत जास्त माझ्या मित्रांना सांगू शकेन.’’ काहीसा हताश होत निनाद म्हणाला.

‘‘तुला माहितेय निनाद, तुझ्याच वयाची काही मुलं जगाच्या दुसऱ्या टोकाला पर्यावरण वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. मोठय़ा माणसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायचा खूप प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला त्यांनाही लहान मुलं आहेत म्हणून फारसं मनावर घेतलं नाही, पण या मुलांनी त्यांच्या प्रयत्नांनी निसर्गावर होणाऱ्या दुष्परिणामांची दखल अख्ख्या जगाला घ्यायला लावली. तू सुरुवात केलीस तर हळूहळू ऐकतील तुझंही, पण तू मात्र अगदी मनापासून प्रयत्न केले पाहिजेस. तयार आहेस तू?’’

करोनाचा प्रश्न ऐकून निनाद बुचकळ्यात पडला खरा, पण काहीसा विचार करत त्याने पुन्हा कोरोनाला विचारलं, ‘‘पण तू आधी मला सांग, आमच्या काही करण्याने सगळं ठीक होईल का? निसर्गदादा ठणठणीत बरा होईल? तू कायमचा निघून जाशील?’’

करोना हसत त्याला म्हणाला, ‘‘तू आणि तुझ्या आजूबाजूच्या सर्वानीच जर निसर्गदादाला मनापासून जपायचा प्रयत्न केला, प्रदूषण कमी केलेत तर निसर्गदादाच काय, तुम्हीसुद्धा एकदम सुदृढ व्हाल, हेल्थी, फिट अ‍ॅण्ड फाइन! मग तर तू तो समोरचा भलामोठा डोंगरसुद्धा असा चुटकीसरशी चढून जाऊ शकतोस. सुपरहिरोज सारख्या सुपरपॉवर्स येतील मग तुझ्याकडे आणि तुझ्या मित्रांकडे.’’

‘‘खरंच?’’ हे ऐकून निनादचे डोळे चमकले. त्याने एकदम उत्साहाने कोरोनाला विचारले, ‘‘मग आता काय करू आम्ही जेणेकरून तुमचा राग शांत होईल.’’

 ‘‘निनाद, तू खूप विचारी मुलगा आहेस. या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीताई सतत आजारी पडतेय. किमान तू आणि तुझे मित्र हे कमी कसं करता येईला याचा विचार करा. कचरा करू नका. आपल्या इतर प्राणिदोस्तांना त्रास होईल असं वागू नका आणि कोणालाही वागू देऊ नका. तुझ्या आईबाबांनाही सांग. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येऊन निसर्गदादा आणि पृथ्वीताईची काळजी घ्याल तेव्हाच मी परत जाईन, नाही तर हा मी इथेच उभा आहे,’’ असं म्हणत करोनाने पुन्हा त्याचं ते विक्राळ रूप धारण केलं.

दुसऱ्या दिवशी निनाद उठला तोच मनाशी काहीतरी ठरवून. सकाळी खिडकीशी कावकाव करणाऱ्या कावळ्याला एक छानशी स्माईल देऊन त्याने आईला वैभव, कैवल्य, आशिष सोबत झूम मिटींग तायार करायला सांगितली. कोरोनोला घरी पाठवायचं आणि निसर्गदादा आणि पृथ्वीताईला बरं करायचं सोपी गोष्ट नव्हती, त्यासाठी त्याला त्याच्या ‘फॅण्टास्टिक फोर’चं मिशन आखायचं होतं. आता निनादला राक्षसाची भिती वाटत नव्हती, कारण खरा राक्षस कुठे लपलाय आणि त्याला कसं पकडायचं हे त्याला चांगलंच कळलं होतं!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokprabha kids special issue corona kids dd

First published on: 13-11-2021 at 07:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×