विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
बाल विशेष

तुम्हाला काय वाटलं? वही म्हणजे फक्त पांढरा कागद आणि काळी अक्षरं? अज्जिबात नाही! तुमच्या आमच्या शाळेसारखी वहीतसुद्धा रोज शाळा भरते. त्या पांढऱ्याशुभ्र शाळेतल्या पाना-पानांवर अक्षरं, शब्दं, वाक्यं, परिच्छेदांचे वर्ग भरतात. आपल्या वर्गात बाकांच्या जशा रांगा असतात ना, वहीत पण तशाच रेघांच्या रांगा असतात. प्रत्येक रांगेतल्या शब्दांच्या बाकांवर बसलेली असतात खूऽऽऽप सारी अक्षरं. तुम्हाला विश्वास नाही बसणार. पण ही अक्षरं आपल्याचसारखी चालतात-बोलतात-गाणी गातात. खूश आणि सॅडपण होतात. कधी त्यांची मैत्री होते तर कधी भांडणं. एवढंच काय, अक्षरं एकमेकांशी मारामारीसुद्धा करतात, अगदी आपल्याचसारखी. चिंटय़ाच्या वहीत झाली होती अशी मारामारी. एकदम दे दणादण. खर्रच!

चिंटय़ा नाही माहीत तुम्हाला? माझ्या मागच्या म्हणजे एकदम शेवटच्या बेंचवर बसतो चिंटय़ा. नाही, तो अज्जिबात चिंटुकला नाही. चौथीतच त्याची उंची चार-साडेचार फूट झालीये. आमच्यात एकटाच जिराफासारखा दिसतो. बाईंनी त्याला शिक्षा म्हणून बाकावर उभं केलं की वर्गात स्ट्रीट लाइटचा पोल उभारल्यासारखं वाटतं. मी त्याच्याशी बोलायला जातंच नाही. पाच मिन्टं बोललो, तरी मान दुखायला लागते. त्याचे हात पण एवढे लंबेचौडे आहेत की बाई त्यालाच रोज फळा पुसायला सांगतात. अरे हो, एवढा लंबूटांग मुलगा ‘चिंटय़ा’ कसा झाला हे सांगायचंच राहिलं.. तर झालं असं, की त्याच्या आईबाबांनी त्याचं नाव ठेवलं चिंतन. चिंतनचं झालं चिंटय़ा. लहानपणी त्यांना कुठे माहीत होतं की तो एवढा लंबू होणारेय.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
falgun purnima 2024
फाल्गुन पोर्णिमेला निर्माण होतेय दुर्मिळ युती! या ३ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल! प्रगतीसह मिळेल बक्कळ पैसा

त्या जिराफापुढे आम्ही सगळे एकदम उंदीर! पण तो कध्धी म्हणजे कध्धीच कोणाला त्रास देत नाही. उलट त्याच्यामुळे आमची टीम खो-खोमध्ये कोण्णाला पण हरवून टाकते. कबड्डीचं तर विचारूच नका! आमच्या वाटेलाच कोणी जात नाही. धावण्यात आमचा चिंटय़ा नेहमीच फर्स्ट असतो. पण अभ्यास मात्र कायम लास्ट. नाही, नाही! तो ढ नाहीये हा अज्जिब्बात. गणितं सोडवण्यात तो कॉम्प्युटरला पण हरवून टाकेल. डोळे आहेत, की स्कॅनर काय माहीत. एकदाच पुस्तक वाचतो. काम तमाम! पाढे, कविता, स्पेलिंग्ज एवढंच नाही, अख्खे धडेच्या धडे तोंडपाठ! पण लिहायला सांगू नका. त्याचं अक्षर म्हणजे राक्षसाला टफ कॉम्पिटिशन!

त्या दिवशी वाडय़ाने- म्हणजे आमचा राज वाडेकर, त्याने चिंटय़ाची वही पाहिली आणि आठवडाभर शाळेत आलाच नाही. का माहितीये? त्या रात्री म्हणे चिंटय़ाची अक्राळविक्राळ अक्षरं त्याच्या स्वप्नात आली. त्याच्या आजुबाजूला, वर-खाली सगळीकडे अक्षरंच अक्षरं. आजुबाजूला तरंगणारी, कानात, नाकात, डोळ्यांत गेली. एकदम डेंजर, डरावनी! ती अक्षरं पाहून त्याला जो ताप भरला, तो आठवडाभर उतरेनाच! तुम्हाला खोटं वाटत असेल, तर या एकदा आमच्या चौथी अ मध्ये.

चिंटय़ाच्या वहीत ना एका अक्षराच्या डोक्यावरची वेलांटी दुसऱ्या अक्षराच्या उकाराशी बांधलेली असते. कधी दोन अक्षरं एकमेकांच्या पायात पाय अडकून पडलेली दिसतात. एखादं अक्षर एकदम त्याच्याएवढं – उंच जिराफासारखं आणि त्याच्या अगदी बाजूचंच चिंटुकलं – आमच्याएवढं मुंगीसारखं. काही काही अक्षरं रेघेविरोधात युद्धच पुकारतात, तर काही तिच्याशी कट्टी घेऊन अधेमधेच तरंगत राहतात. कोणी ढकलाढकली करून एकमेकांना चेंगरून टाकतात तर कोणी एकमेकांना ओळखतंच नसल्यासारखी दूर दूर बसतात. कधी एका बेंचवरची (म्हणजे एका शब्दातली हो..) अक्षरं दुसऱ्या बेंचवर घुसखोरी करतात, तर कधी एखादं अक्षर बेंच सोडून पळूनच जातं. थोडक्यात सांगायचं, तर चिंटय़ाची वही म्हणजे बाई नसलेला वर्ग!

परीक्षेच्या पेपरमध्ये पण तेच होतं ना त्याचं. मागच्या परीक्षेत मराठीच्या पेप्रात बाईंनी जत्रेतल्या पाळण्याएवढा मोठ्ठा भोपळा काढला होता. म्हणजे, खरं तर बाईंना माहीत आहे, की चिंटय़ाला सग्गळं तोंडपाठ असतं. अभ्यास करतो तो. हुशार खूप आहे. पण त्या मरक तरी कसे देणार ना? त्याची लिपी जगावेगळीच असते. तोंडी परीक्षेचे मार्क मिळून कसाबसा पास होतो दरवर्षी.

तर काल काय झालं.. बाईंनी सगळ्यांच्या इतिहासाच्या वह्य़ा तपासायला घेतल्या होत्या. सगळ्यांच्या वह्य़ा परत दिल्या. फक्त चिंटय़ाच राहिला होता. बाईंनी त्याला बोलावलं आणि म्हणाल्या, चिंटय़ा इकडे ये आणि या वहीचं कोणतंही एक पान वाचून दाखव! आता काय होणार, याचा थोडा अंदाज चिंटय़ाला आला होताच. तो घाबरत घाबरत पुढे गेला. बाईंच्या हातातून वही घेतली आणि हळूच उघडली. पहिलं पान उघडलं. धडय़ाचं नाव पाठ होतंच. त्यामुळे ते पटकन वाचलं. पण पुढचा एकही प्रश्न वाचता येईना. प्रश्न कळला असता, तर उत्तर तोंडपाठ म्हणून दाखवलं असतं त्याने. पण काहीच वाचता येत नसल्यामुळे त्याची घाबरगुंडी उडाली. तोंडातून शब्द फुटेना. बाईंनी रागाने पाहिलं आणि म्हणाल्या, ‘जा.. जागेवर बसा आणि थोडं अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा. नाहीतर पुढच्या वर्षीही याच वर्गात मुक्काम करावा लागेल.’

चिंटय़ा वही घेऊन जागेवर आला आणि चिडून वही बाकावर आपटली. वर्गात एकदम शांतता पसरली. बाई ओरडल्या की नेहमीच अशी शांतता पसरते. पण आज मला थोडय़ाच वेळात एकदम अजब आवाज येऊ लागले. मी इकडे-तिकडे पाहिलं. सगळे आपापल्या वहीत डोकं खुपसून लिहीत होते. मी दुर्लक्ष करून लिहू लागलो. दोन वाक्यं लिहून होतात तोच पुन्हा आवाज. मी दचकलोच, बाजूला पाहिलं तर चिंटय़ाचा भीतीने स्टॅच्यूच झाला होता. म्हणजे मला भास होत नव्हते. चिंटय़ाच्या बाकाखालून खरंच आवाज येत होते. हळूहळू आवाज वाढले आणि आजुबाजूची सग्गळी मुलं चिंटय़ाकडे पाहू लागली. कुजबुज वाढली. बाईंना वाटलं, चिंटय़ाच काहीतरी करतोय, म्हणून त्या त्याला पुन्हा ओरडल्या. हळूहळू बाकाखालचा गलका वाढत गेला.

आवाज चिंटय़ाच्या ‘त्या’ वहीतून येत होता. चिंटय़ाने सावधपणे वही वर काढली आणि हळूच उघडली. त्याबरोबर आतली अक्षरं किंचाळत, ढकलाढकली करत बाहेर पडली. अख्ख्या वर्गात इथे-तिथे उडू लागली. भिंती, फळ्यावर आदळू लागली, खिडकीबाहेर जाऊ लागली, पंख्यावर आदळून जमिनीवर-बाकांवर-आमच्या वह्य़ांवर पडू लागली. अख्खा वर्ग डायनासॉर पाहिल्यासारखा त्या उडत्या अक्षरांकडे मान वर-खाली करत बघत बसला. वाडय़ाने तर डोळे बंदच करून घेतले, उघडायलाच तयार नव्हता. मी चिंटय़ाच्या पुढय़ातल्या त्या वहीकडे पाहिलं. वही पूर्ण रिकामी झाली होती. अगदी कोरी करकरीत. नव्यासारखी!

एक अक्षर एका मुलाच्या डोक्यावर पडलं आणि अख्खा वर्ग सैरावैरा पळू लागला. पण आमच्या बाई कसल्या सॉल्लिड बिनधास्त आहेत माहितीये? त्या जागच्या हलल्याही नव्हत्या आणि घाबरल्यापण नव्हत्या. त्यांनी टेबलावर पट्टी आपटली आणि म्हणाल्या आधी सगळ्या दारं-खिडक्या बंद करा आणि जागेवर बसा. आता बाईंनी सांगितलेलं ऐकावं लागतंच! सगळे जीव मुठीत धरून जागेवर बसले. आमचा आवाज बंद झाला, तसा अक्षरांचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला.. ‘मी नाई बसणार तुझ्या बाजूला’, ‘तू माला का ढकल्लंस?’, ‘आउच, माझी वेलांटी दुखायला लागलीये’, ‘माझा पाय तू मोडून टाकलास’, ‘अरे माझा उकार किती ताणून ठेवलाय महिनाभर’, ‘तुला कळतंय का, तू माझ्या अंगावर का बसलयास तीन महिने’, ‘एका बाकावर पाच जणं कोंबून बसलोय आम्ही, आता मला वेगळा बाक पाहिजे म्हणजे पाहिजेच!’, ‘माझी उंची खूप वाढलीये जागा पुरत नाही या ओळीत’, ‘तू माझ्यासमोर का बसलायस? तुझ्यामुळे मला पुढचं काही दिसतंच नाहीये’.. नुस्ता कलकलाट अक्षरांचा. मधल्या सुट्टीतल्या आमच्या धिंगाण्याएवढा!

शेवटी चिंटय़ाच म्हणाला, ‘सॉरी, तुमची कोणाचीच काही चूक नाही. प्लीज मारामारी बंद करा. मी तुम्हा सर्वाना तुमचा बाक मिळवून देईन, सर्वाची उंची सेम-सेम ठेवेन, कोणाच्याही वेलांटय़ा-उकार एकमेकांना बांधून ठेवणार नाही. कोणालाही एकमेकांच्या अंगावर बसवणार नाही. सगळ्यांना त्यांची हक्काची मोकळी जागा मिळवून देईन. प्रॉमिस! पण तुम्ही प्लीज पुन्हा वहीत येऊन बसा.’ कलकलाट थांबला आणि सगळी अक्षरं हळूहळू पुन्हा येऊन आपापल्या जागी बसली. चिंटय़ाची कोरी वही पुन्हा भरून गेली.

संध्याकाळी घरी गेल्यागेल्या चिंटय़ाने कपाटातली एक नवी कोरी वही बाहेर काढली. तारीख घालून जमेल तेवढय़ा सुवाच्य अक्षरात पानभर शुद्धलेखन केलं. एकच दिवस नाही तर वर्षभर त्याने हा दिनक्रम सुरूच ठेवला. त्याचं अक्षर हळूहळू सुधारू लागलं. हुशार तर तो होताच आता मरकपण चांगले मिळू लागले. आजही कधी कधी अक्षरं चिंटय़ाच्या वहीतून बाहेर येतात. पण आता ती भांडत नाहीत. त्याच्याभोवती फेर धरतात, गाणं गातात आणि ‘थँक्यू चिंटय़ा’, ‘शाबास चिंटय़ा’, ‘वेलडन चिंटय़ा’ म्हणून पुन्हा वहीत जाऊन बसतात.