‘लग्न’ ही संकल्पना प्रत्येकासाठी खास असते. त्याहीपलीकडे जाऊन काहींसाठी तो शाही सोहळा असतो, तर काहींसाठी आयुष्यभरासाठीची विशेष आठवण! कलाकारांच्या मनातही लग्नाबद्दलच्या अशाच काही भावना आहेत. गेल्या वर्षी लग्न झालेल्या काही कलाकारांनी लग्नसंस्थेबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दलचे विचार त्यांच्याच शब्दांत मांडले आहेत.

नातं परिपक्व झालं – अमेय वाघ

साजिरी आणि मी १३ वर्षांपासून एकमेकांसोबत आहोत. आम्ही अनेक वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. मी कामानिमित्ताने मुंबई-पुणे असं करायचो तेव्हा ती पुण्यात असायची. नंतर काही वर्ष ती नोकरीच्या निमित्ताने हैदराबाद येथे होती, तर मी अनेकदा पुण्यात असायचो. १३ वर्षांच्या आमच्या रिलेशनशिपनंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न हा साजरा करण्याचा प्रसंग असतो, कारण दोन व्यक्तींमुळे दोन कुटुंबं एकत्र जोडली जात असतात. आम्हीदेखील लग्न करून तो दिवस अविस्मरणीय केला. नातेवाईक, मित्रपरिवार असे सगळे आमच्या लग्नात येऊन आमच्या आनंदात सहभागी झाले. लग्न साजरं करताना माझ्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने खऱ्या अर्थाने त्या दिवसाचा आनंद घेतला. लग्नाच्या आधी माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती. इतक्या वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आम्ही लग्नानंतर कसे राहू, आजवर जितकं एकमेकांना समजून, सांभाळून घेतलं तसंच लग्नानंतरही होईल ना, याचं थोडंसं दडपण होतं; पण ते अगदी सहजपणे दूर झालं. मी आणि साजिरी एकमेकांचे आधीपासून मित्र आहोत. त्यामुळे लग्नानंतरही त्यात फार काही फरक पडला नाहीये. आम्ही आजही एकमेकांना तितकीच स्पेस देतो. कोणत्याही नात्यात तेच महत्त्वाचं असतं. आजही आम्ही दोघं आमच्या कामांमध्ये व्यग्र असतो. ‘अमर फोटो स्टुडिओ’ या माझ्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे मी सतत फिरतोय. शिवाय इतर काही प्रोजेक्टची काम आहेतच. हे असंच होणार हे आम्हा दोघांनाही माहीत होतं; पण साजिरी हे सगळं समजून घेते. मुंबईत आता नवीन घरी आम्ही शिफ्ट होतोय. त्याचंही बहुतांशी काम साजिरीच करतेय. ती तिची नोकरी सांभाळून ते सगळं करतेय. लग्नाच्या नात्यात समजूतदारपणा, एकमेकांना सांभाळून घेण्याची सवय आणि जबाबदारीची जाणीव असं सगळं असलं की अनेक गोष्टी सोप्या होतात.

लग्नाचं महत्त्व पटलं – प्रार्थना बेहेरे

खरं तर मी लग्नाबद्दल कधीच इतका विचार केला नव्हता. लहान असताना तर मी नेहमी असंच म्हणायचे की, मला लग्न करायचंच नाही. मी एकटी आहे तेच बरंय; पण जसंजशी मोठी होत गेले, तसं लग्नसंस्थेबद्दल विचार करू लागले. तिचं महत्त्व पटू लागलं. आपण ज्या कुटुंबात राहतो तिथे लग्न या संस्थेला किती महत्त्व दिलं जातं, याची जाणीव होत गेली. मी लग्न करणार हे पक्कं ठरवलं. माझा प्रेमविवाह नाही. अभिषेक जावकरला लग्नासाठी भेटायचं असं ठरवून भेटले आणि त्यानंतर त्याच्याशी लग्न केलं. अभिषेकला मी पहिल्यांदा भेटले तेव्हा तो मला माझ्यासारखा वाटला. स्वभाव, वागणं, आवडीनिवडी वगैरे बरंचसं माझ्यासारखंच होतं. मी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या डोक्यात एक पक्कं होतं की, माझा होणारा नवरा अगदी माझ्यासारखा असायला हवा; मनमिळाऊ! अभिषेक अगदी तसाच आहे. माझ्या होणाऱ्या सासरविषयीही माझ्या अनेक कल्पना होत्या. मला माझं सासर हे ‘सासर’ वाटायला नको. मला ते माझंच घर वाटायला हवं. तशीच माणसं मला सासर म्हणून हवी होती आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली. माझे सासरचे सगळेच मला सांभाळून घेणारे, समजून घेणारे आणि प्रेम देणारे आहेत. माझं लग्न होऊन आता काही महिने झाले आहेत. अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी मी मुंबईत मैत्रिणीसोबत राहायचे. तेव्हा मलाच माझी कामं करावी लागत होती. आता तसं होत नाही. सासरी सगळे एकमेकांच्या कामात मदत करतात. तसंच माझ्याही काही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, प्राधान्यं बदलली आहेत. ती बदलायलाच हवीत. पूर्वीचं मैत्रिणीसोबत राहणं मी थोडं मिस करते. त्या वेळच्या रात्रभर बसून एकमेकींशी मारलेल्या गप्पा, मस्ती, फिरणं, एकत्र केलेला स्वयंपाक या सगळ्याची कधीकधी आठवण येते; पण तरी माझं लग्न झाल्यानंतरही निवांत आणि आनंदात आयुष्य सुरू आहे. तडजोड ही सगळीकडेच करावी लागते. मुली जेव्हा त्यांच्या आई-वडिलांच्या घरी असतात तेव्हाही तडजोड करावी लागतेच. मुलींच्या काही गोष्टी आई-वडिलांना पटत नाहीत, तर आई-वडिलांच्या काही गोष्टी मुलींना. हे असं असतंच. माझंही असं होतं आहे; पण म्हणून त्या नकारात्मक गोष्टी होत नाहीत. त्या गोष्टी स्वीकारून पुढे जायचं असतं. माझ्या मते लग्न ही संस्था बरंच काही शिकवते. मुलगा-मुलगी एकमेकांवर प्रेम करत असतील आणि त्यांना एकत्र राहायचं असेल तर लग्न करून त्या नात्याला नाव दिलं तर बिघडलं कुठे? लग्न माझ्यासाठी तरी सुख देणारी गोष्ट आहे.

मैत्री अधिक घट्ट झाली – मयूरी वाघ

‘अस्मिता’ या मालिकेच्या वेळी मी आणि पीयूष रानडे भेटलो. त्या मालिकेत आम्ही नवरा-बायको ही भूमिका करायचो. त्या मालिकेच्या दरम्यान आमची खूप चांगली मैत्री झाली. एक दिवस पीयूष एका सिनेमाच्या शूटसाठी १० दिवस बाहेर गेला होता. त्या वेळी मालिकेच्या सेटवर मला सतत त्याची आठवण यायची. त्या वेळी माझ्या लक्षात आलं की, आमचं नातं मैत्रीपलीकडचं आहे. हे पीयूषलादेखील जाणवलं. त्यामुळे आपलं नातं मैत्रीपलीकडचं आहे, तर त्याचा आपण विचार करायला हवा, असं आम्हा दोघांनाही वाटलं. आम्ही दोघेही आमच्या नात्याबद्दल अतिशय गंभीर होतो. एका क्षणी आम्हा दोघांनाही लग्न करावं असं वाटू लागलं. आम्ही एकमेकांशी त्याबद्दल बोललो आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘मला अजिबात लग्न करायचं नाही’ असं काहींचं असतं; पण माझं असं अजिबातच नव्हतं. योग्य जोडीदार मिळाला की मी लग्न करणार हे पक्कं होतं. पीयूषमध्ये मला माझा जोडीदार दिसू लागला. आमच्यात आधीपासून खूप चांगली मैत्री होती. ती आजही तशीच टिकून आहे. मुंबईत आम्ही दोघंच राहत असल्यामुळे आम्हाला असं वाटतंच नाही की आमचं लग्न झालंय. त्याचं कारण आहे आमच्यात आजही असलेली मैत्री! लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. लग्नाआधी आई-बाबांच्या घरी असताना घराच्या खर्चामध्ये विशेष लक्ष दिलं जायचं नाही. ते सगळं परस्पर व्हायचं; पण आता लग्नानंतर घरातले सगळे हिशोब ठेवावे लागतात. कधी काय किती लागेल याकडे लक्ष ठेवावं लागतं. पूर्वी माझ्याकडून एखादा डबा हरवला की आईची होणारी चिडचिड आता आठवते. कारण आता लग्नानंतर माझीही तशीच चिडचिड होते. मला तेव्हा वाटायचं की, ‘एवढं काय आहे त्या डब्यात’. पण आता त्याचं महत्त्व पटू लागलंय. आमच्यातही भांडणं होतात, वाद होतात, मतभेदही आहेत; पण आम्ही एक गोष्ट ठरवली आहे की, आपल्यात भांडण झालं, की ते दुसऱ्या दिवशी उकरून काढायचं नाही. ते तिथेच संपवायचं. हे आम्ही आजवर पाळत आलोय. लग्नानंतरचे सगळे पहिले सण माझ्या माहेर आणि सासरकडच्या माणसांनी मोठय़ा हौसेने केले. फेब्रुवारीत आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. या एका वर्षांत आमच्यातली लग्नानंतर मैत्री आणखी घट्ट झाली आहे.

लग्नसंस्थेबद्दलचा आदर वाढला – आरोह वेलणकर

माझं लग्न ठरलं तेव्हा मला अर्थातच आनंद झाला होता; पण लग्नाची तारीख जसजशी जवळ येते तसं एक वेगळंच दडपण येतं. आपण जे करतोय ते बरोबर आहे ना, असा प्रश्न स्वत:लाच पडू लागतो. तसाच मलाही पडला. ‘इतक्या लवकर लग्न करतोयस’ अशा प्रतिक्रियाही मला मिळाल्या; पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. अंकिता शिगवी आणि मी आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर आम्हाला दोघांनाही वाटलं की, आता आपलं नातं एक पाऊल पुढे जावं. तेव्हा आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला. लग्न या संस्थेबद्दलचा माझ्या मनातला आदर आणखी वाढला. लग्नानंतर एक व्यक्ती कायम माझी सोबती म्हणून असणार आहे, ही भावना सुखावह आहे. मला ते खूप सुरक्षित वाटतं. आयुष्यात मला कधीही काहीही लागलं किंवा काही अडचणी आल्या तर मला साथ देणारी व्यक्ती माझ्यासोबत असेल, याचा आनंद आहे आणि या सगळ्या भावना मी अनुभवल्या त्या माझ्या लग्नामुळे! म्हणून त्याबद्दलचा आदर वाढला आहे. आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत असल्यामुळे एकमेकांबद्दल सगळं माहीत आहे. कोणाला काय हवं, का हवं, कसं व्यक्त होणार, कसा प्रतिसाद देणार हे सगळं आम्हाला एकमेकांबद्दल माहीत असतं. ती आमच्या कॉलेजमध्ये थिएटर ग्रुपमध्ये नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करायची. ती अभ्यासात हुशार होती. मी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये असायचो. त्यामुळे माझ्या सबमिशन, प्रोजेक्ट्स वगैरेंसाठी मला अंकिता मला खूप मदत करायची. या मदतीमुळे आमच्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. लग्नाआधी लग्न या संस्थेबद्दल मला ज्या काही शंका होत्या त्या सगळ्याचं निरसन लग्नानंतर झालंय. अंकिता मारवाडी आणि मी मराठी; त्यामुळे सुरुवातीला आमच्याबाबतीतही थोडय़ा कुरबुरी झाल्या; पण आमच्या गोष्टीचाही शेवट गोडच झाला. आमच्या दोघांच्या कुटुंबांनी आमचं नातं आनंदाने स्वीकारलं. तसंच आमच्या कुटुंबांनीही एकमेकांना आपापसात सामील करून घेतलं. आता अंकिताच्या चांगल्या गोष्टी आम्ही स्वीकारतो, तर ती आमच्याकडच्या काही चांगल्या गोष्टींची दखल घेते. लग्नानंतर झालेली आचारविचारांची ही देवाणघेवाण नक्कीच सुखावह आहे.

शब्दांकन : चैताली जोशी