रामदासांच्या बलोपासनेचे महत्त्व रुजविण्याच्या प्रेरणेतून अनेक गावांत मारुतीची मंदिरे उभी राहिली. हे लोण गावातच नव्हे, तर शहरांतही पोहोचले. वेगात धावणाऱ्या मुंबईसारख्या महानगरातही शनिवारच्या संध्याकाळी मारुतीसमोर दर्शनासाठी लागलेल्या रांगा आजही पाहायला मिळतात.

पायी एखाद्या अनोळखी गावाकडे जाण्याचा पल्ला गाठताना खूप वेळ चाललं, की रस्त्याकडेला एखादं डेरेदार झाड दिसायचं. एखादा ऐसपस दगड शोधून त्यावर बूड टेकलं, की चालण्याचा सारा शीण संपून जायचा. मग आसपास न्याहाळताना दुसऱ्या बाजूला एक घुमटी दिसायची, आणि लाल शेंदूर फासलेला, रुईची माळ अडकवलेला एखादा ओबडधोबड उभा दगडही घुमटीच्या सावलीत दिसायचा.. थोडं निरखलं, की त्याचा आकार हनुमानासारखा भासायचा.. कुठे एखाद्या घुमटीतल्या मूर्तीला कपाळाखाली रंगाने डोळेही रेखलेले दिसायचे.. मग शिणलेला वाटसरू, त्या मूर्तीसमोर डोकं झुकवायचा.. जय बजरंग बली. म्हणून स्वतशीच सुखावून जायचा.. कारण, त्या सुखात, गावात पोहोचल्याचा आनंदही सामावलेला असायचा.

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
A drunken boy who beat his parents at Rethere Budruk in Karad taluka was killed by his father
आई वडिलांना मारहाण करणाऱ्या मद्यपी मुलाचा वडिलांकडून खून; कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील घटना

शहरीकरणाचे वारे गावखेडय़ात पोहोचण्यास नुकतीच सुरुवात झाली होती, त्याआधीचा महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ातला काळ असा असायचा. गावात चालत जाताना, मारुतीचं देऊळ दिसलं, की गावाच्या वेशीवर पोहोचल्याचं समाधान मिळायचं. गावाच्या वेशीवरचा मारुती हा जणू रक्षणकर्ता बनून वेशीवर खडा पहारा देत असायचा. उभा गाव या मारुतीचा भक्त असायचा. काहीही अडचण आली, संकटाची चाहूल लागली, की गावकरी इथे येऊन मारुतीच्या पायाशी डोकं टेकवून प्रार्थना करायचे. संकटमोचक हनुमान आता गावाला संकटातून सोडवणार, या श्रद्धेने आश्वस्त होऊन आपापल्या व्यवहारात गुंतून जायचे.. कधीकधी संकट आपोआपच परतलेलं असायचं. पण मारुतीवरील श्रद्धा अधिकच दृढ व्हायची. मग त्या निराकार मूर्तीभोवती रुईच्या माळांचा खच पडायचा..

गाव तेथे मारुती अशी महाराष्ट्राची परंपरा असल्याने, गावाने मारुतीची उपासना नुसते मूर्तीसमोर नाकं घासून करू नये, मारुती हा शक्तीचे प्रतीक असल्याने, लोकांनी बलोपासना करावी आणि गावे आरोग्यसंपन्न राहावीत या हेतूने समर्थ रामदासानीही बलोपासनेचे महत्त्व रुजविण्यास सुरुवात केली आणि रामदासांच्या प्रेरणेतून अनेक गावांत मारुतीची मंदिरे उभी राहिली. हे लोण शहरांतही पोहोचले. आजही, प्रगतीच्या वाटेवरून चालणाऱ्या आणि घडय़ाळाच्या काटय़ाशी स्पर्धा करणाऱ्या मुंबईसारख्या महानगरातही, शनिवारी मारुतीसमोर दर्शनासाठी लागलेल्या रांगा पाहायला मिळतात. म्हणूनच, भाविकांच्या सोयीसाठी मुंबईतही वर्षांगणिक मारुतीची नवनवी मंदिरे उभी राहिली, बघता बघता त्यासमोर भाविकांच्या रांगा लागू लागल्या, आणि मग त्या मंदिरांची वेगवेगळी वैशिष्टय़े कर्णोपकर्णी होऊ लागली. कुणी नवसाला पावणारा, तर कुणी इच्छापूर्ती मारुती झाला.. कुठला मारुती स्वयंभू म्हणून भक्तांचा लाडका झाला, तर कुणी संकटमोचक म्हणून नावारूपाला आला. मारुतीच्या मंदिरांना धंदेवाईक रूप आले असले, तरी हनुमानाची भक्ती मात्र निखळच राहिली. एखाद्या दगदगीच्या दिवसातही, चार निवांत क्षण शोधून मंदिरासमोर रांग लावावी आणि संधी मिळताच त्या वायुपुत्राच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन बाहेर पडताना, सारा मानसिक शीण संपल्याच्या आनंदात डुंबत राहावे असा अनुभव आजही भक्तांना मिळतो. मानसिक समाधानाची अनुभूती देणाऱ्या या मंदिरांमागील धंदेवाईकपणाचा विचारदेखील त्या वेळी भाविकाच्या मनाला शिवत नाही.

यातली कित्येक मंदिरे मुंबईच्या इतिहासाची साक्षीदार आहेत. खार येथील घंटेश्वर हनुमान, दक्षिण मुंबईतील लघुवाद न्यायालयाशेजारचा पिकेट रोड मारुती, बंडय़ा मारुती अशा काही हनुमान मंदिरांत जाऊन दर्शन घेतले नाही, असा हनुमान भक्त विरळाच. दादर स्थानकाबाहेर १९३८ च्या सुमारास एका िपपळाच्या झाडाखाली हनुमानाची प्रतिमा ठेवून हमालांनी त्याची उपासना सुरू केली. पुढे येजा करणारे प्रवासीही या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊ लागले, आणि मग अनेकांच्या सहकार्याने तेथे देखणे मारुती मंदिरच उभे राहिले. हा मारुती नवसाला पावतो, अशी श्रद्धा असल्याने तेथे शनिवारी भक्तांची मोठी गर्दी होते. दादर पश्चिमेला कबुतरखान्याजवळ चौकात मधोमध एक मारुतीचे मंदिर आहे. असे सांगतात, की फार पूर्वी या परिसरात गुंडांची मोठी दहशत होती. स्थानिक नागरिक भेदरतच तेथून येजा करत. त्यांना धीर मिळावा म्हणून तेथे मारुतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मुंबईशेजारच्या ठाण्यात कौपिनेश्वर मंदिराच्या आवारातील दक्षिणमुखी मारुती हा संकटमोचक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. जांभळी नाक्यावर पेढय़ा मारुतीच्या मंदिरात नवस पूर्ण करण्यासाठी मारुतीच्या उघडय़ा मुखात पेढा भरविण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते. ठाणे मध्यवर्ती कारागृहाशेजारच्या मारुतीची तर, जेलचा मारुती अशीच ओळख आहे.

अलीकडे प्रवासात वाया जाणारा वेळ वाचविणे महत्त्वाचे झाल्याने जागोजागी हनुमानाची नवी मंदिरे उभी राहू लागली. कोठूनही कुठेही जायचे असले, तरी या प्रवासात एखादे तरी हनुमान मंदिर सहज दिसू लागले. काहींनी तर, हातगाडीवर किंवा जुन्या, लहान टेम्पोवर मंदिरे उभारून त्यामध्ये हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना केली. भक्तांची नेमकी गरज ओळखून काहींनी ती गरसोयही दूर केली.

पुणे महानगर मारुतीच्या वेगवेगळ्या वैशिष्टय़पूर्ण नावांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. कदाचित, मारुती या दैवताशी पुण्याएवढे घरगुती आणि आपुलकीचे नाते अन्यत्र कुठेच कुणाचे नसावे. इथे अकरा मारुती आहे, अवचित मारुती आहे, आणि केईएम हॉस्पिटलच्या जवळचा ऐतिहासिक महत्त्व असलेला उंटाडे मारुतीदेखील आहे. पूलगेट बसस्थानकाजवळचा  गंज्या मारुती, गवत्या मारुतीही प्रसिद्ध आहे. पूर्वी पुण्याची वेस जिथे सुरू व्हायची, त्या वेशीवरचा गावकोस मारुती आता शहराच्या मध्यवस्तीत आलाय. शनिपार चौकातून मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर जिलब्या मारुती हा या परिसरातील पत्त्याची खूण होता. डुल्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, दुध्या मारुती, धक्क्या मारुती, 57-lp-hanumanनवश्या मारुती, पंचमुखी मारुती, पत्र्या मारुती, पावन मारुती, पोटसुळ्या मारुती, बटाटय़ा मारुती, भांग्या मारुती, भिकारदास मारुती, वीर मारुती, शकुनी मारुती, शनी मारुती, सोन्या मारुती, पेन्शनर मारुत अशा नावांच्या मारुतीची मंदिरे हे पुण्याचे वेगळेपण ठरले आहे.

अंबाजोगाईचा काळा मारुती, अंमळनेरचा डुबक्या मारुती, अहमदनगरला वारुळाचा मारुती, तर आर्वीचा रोकडोबा हनुमान.. औरंगाबादेत सुपारी मारुती आणि भदऱ्या मारुती, तर सोलापुरात चपटेदान मारुती. साताऱ्यातला दंग्या मारुती आणि गोळे मारुती, तर डोंबिवलीत पंचमुखी मारुती. संगमनेरात मोठे मारुती, तर नाशिकला दुतोंडी मारुती.. कराडचा मडय़ा मारुती.. अशा मंदिरांच्या नावामागे एकएक आख्यायिकादेखील आहे. समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मारुतींमध्ये अनेक मूर्ती गदाधारी दिसतात. मात्र, विदर्भातील अकोल्यात सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मंदिरात धनुर्धारी हनुमान मूर्ती पाहावयास मिळते.

मारुती हे शक्तीचे आणि बुद्धीचे दैवत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या दैवताच्या उपासनेमुळे संकटाचे भय दूर होते आणि संकटाशी सामना करण्याचे मानसिक बळ मिळते, असा भाविकांचा विश्वास आहे.

मुंबईच्या दगदगीत वावरताना समोर दिसणारी कोणतीही मूर्ती असे मानसिक बळ देते, असा असंख्य भाविकांचा विश्वास आहे. म्हणूनच, जिवावर उदार होऊन धावती रेल्वेगाडी पकडून स्थिरस्थावर झालेला भाविक अज्ञाताकडे पाहत अगोदर हात जोडून नमस्कार करतो, आणि खिशातून किंवा खांद्यावरच्या पिशवीतून हनुमानचालीसा काढून कपाळाला लावत वाचू लागतो.. संकटातून वाचविण्यासाठी काहीच हातात नसते, तेव्हा अशा अज्ञात शक्तींचा मानसिक आधार हाच केवढा तरी दिलासा असतो..
दिनेश गुणे – response.lokprabha@expressindia.com