बलवान म्हणून रक्षणकर्ता अशी प्रतिमा असलेलं मारुती हे दैवत गावोगावी तर आढळतंच, शिवाय शिवकालीन महाराष्ट्राचं भौगोलिक, राजकीय वैशिष्टय़ असलेल्या गडकिल्ल्यांवरही मारुतीची आवर्जून स्थापना केलेली असल्याचं आढळतं.

महाराष्ट्र देश म्हणजे गड-किल्ल्यांचा देश. महाराष्ट्रात गिरिदुर्ग, वनदुर्ग, उदंड आहेत या गडकोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा शोधत असताना आपणास अनेक समाध्या व देवदेवतांची मंदिरे पाहावयास मिळतात. या देवांमध्ये दोन देवतांचे प्राबल्य आढळते. त्यातील एक देव आहे गिरिशिखरांचा राजा देवादिदेव शंभुमहादेव तर दुसरा देव आहे बजरंगबली अर्थात मारुती. या हनुमंताचा गड कोटांवरील स्थापनेचा प्रवास मोठा रंजक आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

हा देव म्हणजे मूळचा प्राचीन यक्षकुळीचा वीर देव होय. गावांचा संरक्षक क्षेत्रपाल म्हणून जवळजवळ प्रत्येक गावात याची स्थापना केलेली आढळते. हनुमान महाकाय, शक्तिशाली, वज्रअंग व बलाढय़ असल्याने पृथ्वी, अंतरिक्ष, मेघमार्ग, स्वर्ग व उदक यांपैकी कोठेही त्याची गती कुंठित होत नाही. असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, देवता, सागर आणि पर्वत हे सारे लोक या देवतेच्या परिचयाचे आहेत.

वायूप्रमाणेच हनुमानाची गती, तेज व त्वरा आहेत. तो पर्वतप्राय प्रचंड रूप धारण करू शकतो; यथेष्ट रूप धारण करण्याचा त्याचा हा गुण तर खास यक्षवंशीय गुण आहे. नंतरच्या काळात हा पूर्वीचा यक्ष- हनुमान रामकथेशी जोडल्यामुळे आदर्श रामभक्त म्हणून जनमानसात रूढ झाला. हनुमान शेंदूरलिप्त, रक्तवर्ण, भुतांचा स्वामी, रोगांपासून वाचविणारा, संततिदायक असल्याने गावात याचे स्थान पाण्याजवळ, पिंपळाखाली पारावर किंवा वेशीजवळ आढळते. १६-१७ व्या शतकात मारुतीचे भक्त- देवत्व झपाटय़ाने वाढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे. हे सैन्य ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे. रात्री-अपरात्री गडावर वावरणाऱ्या या मावळ्यांना तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी हनुमंताचा मोठा आधार वाटायचा. गावोगावच्या वेशींचे रक्षण करणारा हा देव आपले गडावरही रक्षण करेल, अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यामुळे १६-१७ व्या शतकात मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या गडांवर हनुमंताची मंदिरे वा घुमटय़ा स्थापन केलेल्या आपणास आढळतात. त्या वेळच्या रयतेच्या मनात मारुती शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या भुतांचा अथवा शक्तींचा स्वामी आहे अशी दाट श्रद्धा हाती. या श्रद्धेतून मराठय़ांनी गडावरील माचीच्या टोकाशी, गडावरील तळ्या टाक्यांच्या शेजारी, गडाच्या महाद्वाराच्या घुमटीत, बालेकिल्ल्यात मारुतीरायाची स्थापना केली. पुढे समर्थ रामदासांनी मारुतीच्या बहुजन समाजातील लोकप्रियतेचा फायदा घेऊन बजरंगबलीच्या निमित्ताने समाजात बलोपासना वाढावी म्हणून वीर मारुतीची उपासना सुरू केली.

या लेखाच्या निमित्ताने आपण गड-किल्ल्यांवरील मारुतीरायाचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेणार आहोत.

32-lp-hanumanराजगड

शिवछत्रपतींनी आपल्या आयुष्यातील तब्बल २५ वर्षांचा कालखंड राजगडावर घालविला. त्यामुळे इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने राजगडचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या राजगडाच्या सुवेळा माचीवर हनुमंताची घुमटी आहे. तर संजीवनी माचीच्या तटावर मारुतीची मूर्ती कोरलेली आहे. राजगडावर जननीदेवी, पद्मावतीदेवी, ब्रह्मर्षी हे मुख्य देव आहेत. पण हे देव गडाच्या मध्यभागी असल्याने दूरवरच्या माचीच्या टोकावर पहारा देणाऱ्या मावळ्यांना रात्री-अपरात्री देवाचा आधार वाटावा म्हणून सुवेळा व संजीवनी माचीवर हनुमानाची स्थापना करण्यात आली.


33-lp-hanumanरायगड

रायगडावर नाना दरवाजात, हिरकणी बुरुजावर हनुमान टाक्यावर व जगदीश्वराच्या मंदिरात हनुमंताची मूर्ती आहे. जगदीश्वराच्या कूर्ममंडपातील विशालकाय मूर्ती ही शिवकालात स्वतंत्र मंदिरात होती. पण सिद्दीच्या अमलात हे मंदिर नष्ट झाल्याने ही मूर्ती कदाचित पेशवेकालात जगदीश्वराच्या मंदिरात आणून ठेवलेली असावी. पेशवे दप्तरातील कागदपत्रात मारुती जन्मसेवा पूर्वी या मूर्तीस लावण्यासाठी तेल व शेंदूर यांचा खर्च दाखविण्यात आला आहे. रायगडावरील दुसरा मारुती बाजारपेठेच्या शेजारील चांभार टाके किंवा हनुमान टाक्यावर खोदलेला आहे. शिवकाळात या टाक्यावर सकाळ-संध्याकाळ स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत असत. त्या स्त्रियांनी पाणवठय़ावरील अनामिक दुष्ट शक्तींनी त्रास देऊ नये म्हणून अनिष्ट निवारण करणारा हनुमंत या टाक्यावर खोदण्यात आला आहे. रायगडावरील तिसरा मारुती हिरकणी बुरुजावर आहे. हा बुरुज गडावरील मानवी वस्तीपासून खूप लांबवर असल्याने येथे पहाऱ्यास असलेल्या सैनिकांना आधार वाटावा म्हणूनच त्याची येथे स्थापना करण्यात आली. याशिवाय नाना दरवाज्यात छोटी पण सुबक अशी हनुमंताची मूर्ती आहे. याच रायगडावर ३ एप्रिल १६८० ला हनुमान जयंतीच्या दिवशीच शिवरायांचे निधन झाले. आजही रायगडावर हनुमान जयंतीच्या दिवशी शिव- पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो.

34-lp-hanumanपुरंदर –

वज्रगडावरील मारुती – शंभूराजांचे जन्मस्थान असणाऱ्या पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाबाहेर हनुमंताची घुमटी आहे. अत्यंत देखण्या अशा मूर्तीच्या डाव्या पायाखाली राक्षस असून मारुतीच्या डाव्या हातात खंजीर आहे. ‘पुच्छ ते मुरडिले माथा’ या न्यायाने हनुमंताची भली मोठी गुंडाळलेली शेपूट या मूर्तीच्या  मागे आहे.

याशिवाय पुरंदरचा जोडकिल्ला असणाऱ्या वज्रगड ऊर्फ रुद्रमाळ या किल्ल्यावरही मारुतीरायाची एक छोटी मूर्ती आपणास पाहायला मिळते.

 

35-lp-hanumanदातेगड

सातारा जिल्ह्यतील पाटण तालुक्यात असणारा हा गड फारसा कोणस माहीत नाही. या गडाचे सुंदर स्थान पाहून खुद्द शिवरायांनी या किल्ल्याचे नामकरण केले ‘सुंदरगड’. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारा शेजारचे खडकात खोदलेले मारुतीचे उठावदार शिल्प महाराष्ट्रातील किल्ल्यावरील सुंदर मारु ती शिल्पांपैकी एक आहे. डोक्यावर मुकुट, कमरेला कमरपट्टा, हातापायात तोडे, गळ्यात माळ व डोक्यावरून वळवलेली शेपूट असे या मारुतीचे देखणे शिल्प आहे. पाटणापासून चालत दीड तासावर हा गड असून येथील मारुतीची, गणपतीची मूर्ती दुर्गप्रेमींनी आवर्जून पाहावी.

 

36-lp-hanumanविशाळगड

विशाळगडावर मारुतीटेक नावाची टेकडीच असून या टेकडीवर हनुमंताचे भक्कम दगडी मंदिर उभे आहे. गडाच्या दक्षिण टेपावरील मारुतीचे हे मंदिर अनिष्ट निवारणासाठी सीमारक्षक देवतेच्या स्वरूपात बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात आपणास शेंदूर फासलेली पाच फूट उंचीची मूर्ती पाहायला मिळते. विशाळगडावर वेताळ टेकडी नावाचीही एक टेकडी असून पूर्वीच्या काळी दर अमावस्येला वेताळ टेकडीहून मारुती मंदिरापर्यंत वेताळची पालखी काढली जात असे.

 

 

37-lp-hanumanपन्हाळगड

पन्हाळगडावर मारुतीच्या खूप मूर्ती असून त्यातील पहिले मंदिर तीन दरवाजांतून आत आल्यावर लागते. या छोटय़ा मंदिरातील मारुतीची मूर्ती सुंदर असून मूर्तीवर दगडी प्रभावळ व मध्यभागी व्यालमुखे कोरण्यात आलेली दिसते. पन्हाळगडावरील हुजूर गल्लीच्या कोपऱ्यावर दुर्मीळ असे पंचमुखी हनुमान मंदिर आपणास पाहायला मिळते. ताराराणीच्या वाडय़ाच्या मागेही इतिहासकालीन हनुमंताचे मंदिर आहे. याशिवाय चार दरवाजाच्या खाली एका मोठय़ा शिळेवर खालच्या बाजूला एक शिलालेख कोरण्यात आला आहे. ही मूर्ती मूळची चार दरवाजातील असावी. पण १८४४ मध्ये इंग्रजांनी चार दरवाजा तोडल्यानंतर ही मूर्ती या ठिकाणी आली असावी. तीन दरवाजातून बाहेर पडून सोमवार पेठेकडे जात असताना उजव्या हाताला पन्हाळगडाच्या डोंगरात एक सुंदर मारुतीची मूर्ती असून या मूर्तीच्या अवतीभोवतीच्या शिळा पाहण्यासारख्या आहेत. वरील मूर्तीशिवाय पन्हाळगडावर इतरत्रही छोटय़ा-मोठय़ा मारुतीच्या मूर्ती आपणास अभ्यासता येतात.

39-lp-hanumanतिकगेना

तिकोना ऊर्फ तिंडगड हा पुणे जिल्ह्य़ातील वडगाव मावळ तालुक्यात वसलेला मोठा तालेवार गड होय. या किल्ल्याच्या बालेकि ल्ल्याला जाताना डाव्या हातास भव्य या शब्दाला साजेशी अशी बलदंड हनुमंताची मूर्ती आपणास पाहायला मिळतो. ही मूर्ती अतिशय आखिव-रेखीव असल्याने हीची भव्यता पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरते. तिकोना किल्ल्यावर तळजाई देवीचे लेणी मंदिर, बालेकिल्ल्यावरील महादेव मंदिर अशी अनेक दैवते आहेत, पण सर्वाच्या लक्षात राहतो तो येथील बलदंड बजरंगबली.

 

 

38-lp-hanumanरांगणा ऊर्फ प्रसिद्धगड

रांगणा ऊर्फ प्रसिद्धगड, शिवछत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक गड होय. कोल्हापूरपासून १३० कि. मी अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यावर तब्बल ४ मारुतीच्या मूर्ती असून त्यातील सर्वात देखणी मूर्ती रांगणाई मंदिराशेजारी आहे. रांगणाई मंदिराशेजारी असणाऱ्या या हनुमान मंदिरात गोन मूर्ती असून त्यातील मोठी मूर्ती ओबडधोबड आहे. पण या मोठय़ा मूर्तीशेजारीच असणारी छोटी मूर्ती अत्यंत देखणी आहे. विशेष म्हणजे या मूर्तीच्या दोन्ही दंडांवर छोटय़ा घंटा बांधलेल्या असून हनुमंताची शेपूट माथ्यावर दुमडलेली आहे. या दोन हनुमान मूर्तीशिवाय हवालदाराच्या वाडय़ाशेजारी एक मारुती असून आणखी एक मूर्ती गडाच्या पिछाडीस आहे.

 

40-lp-hanumanविसापूर

मराठय़ांच्या इतिहासात लोहगड विसापूर या दुर्गजोडीस विशेष स्थान आहे. यातील लोहगडावर खूप दुर्गप्रेमी जात- येत असतात. पण विसापूर किल्ल्यावर फारसे कोणी जात नाहीत. विसापूर किल्ल्यावर हनुमंताच्या अनेक मूर्ती असून प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. यातील पहिली मूर्ती गडवाटेवर असणाऱ्या धान्यकोठाराच्या गुहेच्या बाहेरील कातळावर कोरलेली आहे. या हनुमान मूर्तीस शेंडी असून विशेष म्हणजे या शेंडीस गाठ मारलेली आहे. या मारुतीच्या हातात मराठय़ांचे ‘भाला’ हे शस्त्र आहे. संपूर्णपणे शेंदूर फासलेल्या या मारुतीच्या सभोवतीने दगडी महिरप कोरण्यात आली आहे. दुसरा हनुमान एका पाण्याच्या टाक्यावर असून याच्या हातात फूल आहे. या मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला शंख, चक्र  कोरण्यात आले आहे. या दोन मूर्तीशिवाय गडावर अनेक छोटय़ा-मोठय़ा मारुतीच्या मूर्ती आपणास पाहायला मिळतात.


रसाळगड
58-lp-hanuman

खेडजवळील रसाळगड म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामांकित गड होय. या गडाचे पहिले प्रवेशद्वार पार केल्यानंतर डाव्या हातास एक दगडी घुमटी लागते. या घुमटीतील हनुमंताचे खास वैशिष्टय़ म्हणजे या हनुमंतास चक्क पिळदार मिशांची कंगले कोरण्यात आली आहेत. सहसा हनुमंताच्या मूर्तीस मिशा कोरलेल्या नसतात. पण येथे चक्क हनुमंतास मिशा कोरल्याने पाहणाऱ्यास गंमत वाटते.

 

 

42-lp-hanumanअहिवंतगड

अहिवंतगड म्हणजे नाशिक जिल्ह्यतील एक अजस्र व अफाट पसरलेला गड होय. खुद्द शिवछत्रपतींनी एका पत्रात या गडाविषयी कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत. या गडावरील हनुमंत मूर्ती उघडय़ावरच असून हनुमंताच्या हातात कट्टय़ार व गळ्यात लॉकेट कोरलेले आहे.

याशिवाय कित्येक गडांच्या प्रवेशद्वारावर हनुमंताची मूर्ती कोरलेली आढळते. खरे तर गडकिल्ल्यांवरील मारुतींचा अभ्यास त्याच्या शेपटाप्रमाणेच लांबत जाणारा विषय असून या विषयाचा थोडक्यात धांडोळा घेऊन मी थांबतो.

 

भगवान चिले – response.lokprabha@expressindia.com