यंदा महिला दिनाच्या शुभेच्छांची लाट दोन प्रकारची होती. पारंपरिक मानसिकतेच्या दिशेने आलेल्या लाटेत स्त्रीत्वाला सलाम केला होता. दुसरी व्यक्ती म्हणून समान संधी, समान हक्क सांगणाऱ्या संदेशांची होती.

मराठीतला साजरे करणे हा खूप सुंदर शब्दप्रयोग आहे. आपल्या भारतीय मानसिकतेत, संस्कृतीत, स्वभावात अगदी चपखलपणे बसणारा! सण-उत्सवांप्रमाणे वेगवेगळे दिन साजरे करणे ही आपली आवडती गोष्ट.. परंपराच ही एक प्रकारची. (कुठल्याही लिखाणाची, वक्तव्याची, भाषणाची सुरुवात अशी भारतीय संस्कृती, परंपरा शब्दांनी केली की, पुढचं काम हल्ली सोपं होतं. लगोलग समर्थनाचे अंगठे उंचावतात.) गेल्या आठवडय़ात आपला रंगांचा उत्सव झोकात साजरा झाला. तसे आपल्याकडे दोनच रंग जास्त चर्चेत असतात नेहमी- विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत- काळा आणि गोरा. पण होळीच्या आधीच्या आठवडय़ात साजरा झालेल्या महिला दिनानिमित्त स्त्रीवादाचे आणखीही काही रंग दिसले.

हल्ली इतर काही सणांसारखा सर्व कार्यालयांमधून आंतरराष्ट्रीय महिला दिनही साजरा होतो. या दिवशी नटून-थटून, साडय़ा नेसून आलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयातच विविध अ‍ॅक्टिव्हिटीज, स्पर्धा, खाण्यापिण्याची रेलचेल अशी पार्टी असते. हा सण केवळ कार्यालयांपुरताच राहिलाय असं नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांतून हा सण घराघरांतही साजरा होतोय असं दिसलं. म्हणजे या दिवशी बायकोला स्वयंपाकातून सुट्टी दिलेल्या नवऱ्यांच्या पोस्ट्स दिसल्या. बायकोच्या आवडीच्या गोष्टी करणे किंवा खरेदीआदी उद्योगदेखील झाले, हे या समाजमाध्यमांच्या भिंतींवरून समजलं. सार्वजनिक जीवनातही हल्ली महिला दिन ठळकपणे साजरा होऊ लागला आहे. कारण दुकानांमध्ये या दिवशी स्त्रियांसाठी भरभक्कम सवलती असतात. हॉटेलांमध्ये खास मेन्यू असतात. या साजरीकरणाचा महत्त्वाचा भाग म्हणून महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर समाजमाध्यमांमधून शुभेच्छा देण्याची लाटही होती यंदा. फेमिनिझमचा हॅशटॅग सध्या वर्षभर चर्चेत असतोच, या दिवशी तो ऐन भरात होता. पण यंदा ही शुभेच्छांची लाटसुद्धा दोन प्रकारची आहे असं दिसलं- दोन दिशांनी आलेली. एकाचा उद्देश स्त्रीत्व साजरं करण्याचा- पारंपरिक मक्तेदारी मानसिकतेच्या दिशेने आलेल्या लाटेत स्त्रीला सलाम करणाऱ्या शुभेच्छा साधारण अशा दिसल्या- स्त्रीला सलाम! कारण ती शक्ती आहे, घराला बांधून ठेवणारी. ती सुंदर मुलगी आहे, आदर्श पत्नी आहे, वात्सल्यमूर्ती आई आहे, प्रेमळ बहीण आहे वगैरे वगैरे.. आणि दुसरी दिशा अर्थातच एक व्यक्ती म्हणून समान संधी, समान हक्क सांगणाऱ्या संदेशांची. ठोकताळे मिटवून टाकू या. स्त्रीला साचेबद्ध भूमिकांतून मोकळे करू या, असं सांगणाऱ्या या शुभेच्छा. स्त्रीत्व नात्यांमधून साजरं करण्यापेक्षा व्यक्ती म्हणून तिला समान दर्जा द्या, हे सांगणाऱ्या. स्त्रीची ओळख किंवा सन्मान केवळ तिच्या नात्यांवर अवलंबून ठेवू नका, असं या शुभेच्छा सांगत होत्या.

स्त्रियांना परंपरेच्या जोखडातून मुक्त करा, त्यांना स्वातंत्र्य मिळू दे, त्यांना ठोकताळ्यांमध्ये बांधून ठेवू नका, हे सांगणारी ही लाट काहींना नवस्त्रीवाद वाटतो. खरं तर स्त्रीवादाचा उद्देश एक व्यक्ती म्हणून समान न्यायाची अपेक्षा ठेवणारा. मग हा नवा आणि जुना स्त्रीवाद आला कुठून? तो आला आपल्या उदात्त परंपरांच्या आणखी उदात्तीकरणातून. ‘आमच्या परंपरेत स्त्रीला नेहमीच मोठं स्थान आहे. आम्ही स्त्रीला शक्ती मानतो.. आदिशक्ती..’ असं म्हणता म्हणता ‘आमच्या स्त्रिया अशी नोकरी वगैरे करण्यासाठी बाहेर पडत नसतात. आमच्या स्त्रिया शालीन आहेत, स्त्रियांनी घर सांभाळायचं ही आमची परंपरा आहे,’ असं कधी म्हणायला लागतो आपण कळतही नाही. ‘आमच्या स्त्रिया’ यातूनही तो मालकी हक्क डोकावतोच. आपल्यावर या तथाकथित परंपरांचा किती पगडा आहे, हे सांगणारी केवळ दोन उदाहरणं..

एक सुहाना सईदचं. सुहाना सईद या तरुणीने कानडी चॅनेलवरच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये गायलेली श्रीबालाजीची भक्तीगीतं खूप गाजली. ‘हिजाब’वाल्या सुहानानं भक्तीगीतं गायल्याने ती राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक वगैरे झाली. पण मंगलोरच्या एका इस्लामी गटाला हे आवडलं नसावं. त्यांनी सुहानाला समाजमाध्यमांतूनच लक्ष्य केलं. कारण ती दुसऱ्या धर्मातील देवाची भक्तीगीतं गाते म्हणून नव्हे, तर ती मुलगी असून धार्मिक परंपरांचं पालन करीत नाही, हा त्यांचा मुख्य आक्षेप. त्यावरूनच तिचं ‘ट्रोलिंग’ सुरू झालं. समाजमाध्यमावर तिच्याविरोधात लिहिलेल्या पोस्ट्सचा मथितार्थ असा   ‘अनेक पुरुषांसमोर, माध्यमांसमोर उभं राहून एका स्त्रीचं असं गाणं धार्मिकतेत न बसणारं. वर ती हिजाब घालते, म्हणजे धर्माचार पाळते. तरीही ती अशी हिजाब घालून अशी टीव्हीवर गाऊ कशी शकते? तिला हिजाबचा अर्थ कळला नाही, धर्माचा अर्थ समजला नाही. वगैरे वगैरे.’ यावर अर्थातच हजारो अंगठे उंचावलेले. कारण परंपरांच्या विरोधी जाणं हा स्त्रीचा सगळ्यात मोठा गुन्हा. हे एवढय़ावरच थांबलं नाही तर सुहानाला धमक्याही आल्या.

womens-ladies

दुसरं उदाहरण सौंदर्या आणि ऐश्वर्याचं. या दोन तरुणी प्रत्यक्षातल्या नसून एका जाहिरातीतली पात्रं आहेत. जाहिरात एका भारतीय परंपरा जपणाऱ्या नामांकित ब्रॅण्डच्या फेअरनेस क्रीमची. सौंदर्या आणि ऐश्वर्या दोन बहिणी. त्यातली सौंदर्या परंपरा पाळणारी (म्हणजे काय याची स्पष्टता अर्थातच नाही) आणि ऐश्वर्या ‘बिनधास्त.. वान्ना बी टाइप्स’! (हे मूळच्या हिंदी जाहिरातीतलेच शब्द आहेत.) सौंदर्याचं सौंदर्य वाढत गेलं आणि तिला कॉलेजमध्ये वाहवा मिळाली आणि ऐश्वर्याला मात्र सौंदर्य टिकवण्याच्या असफल प्रयत्नात मेकअपची साथ घ्यावी लागली. त्यामुळेच तिचं सौंदर्य कमी झालं.  सौंदर्याने मात्र त्या परंपरा मानणाऱ्या ब्रॅण्डचं फेअरनेस क्रीम लावलं, त्यामुळे तिचं सौंदर्य वाढलं.

या जाहिरातीतून काय नेमकं काय सांगायचा प्रयत्न केलाय? परंपरा पाळणारी स्त्री सुंदर दिसते, कारण ती बिनधास्त नसते. (शब्दांचा कीस पाडायचा नाही, असं ठरवलं तरीही काही गोष्टी खटकतातच.. परंपरासुद्धा पुरुष ‘मानतात’ आणि स्त्री ‘पाळते’.)  आणि बिनधास्त स्त्री वाईटच. तिचं भलं होऊ शकत नाही, कारण ती परंपरा पाळत नाही. ही भारतीय परंपरा पाळणारी संस्था गोरं होण्याचं क्रीम कसं काय बनवते? गोरं दिसण्यासाठी क्रीम लावणं हे कुठल्या परंपरेचा भाग आहे?  या प्रश्नांची उत्तरं अर्थातच यातून मिळणार नाहीत.  कारण परंपरा म्हटलं की प्रश्नच संपतात आणि असे प्रश्न विचारायचेच नसतात कधी स्त्रीने. परंपरेच्या नावाखाली ‘सॉफ्ट टारगेट’ सहज हेरता येतात आणि त्यातून संपूर्ण समुदायाची दिशाभूल करण्यात येते. याची ही उदाहरणं.

या तथाकथित परंपरांच्या जोखडातून मुक्ती किती अवघड आहे, हे या दोन उदाहणांवरून स्पष्ट व्हावं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे शुभेच्छा संदेश समाजमाध्यमांतून एकमेकांना दिले जात होते, त्याच वेळी या दोन उदाहरणाबंद्दलच्या भावनाही समाजमाध्यमांतूनच उमटत होत्या. मगाशी सांगितलेल्या नवस्त्रीवादी लाटेतील अनेक जण यावर व्यक्त होत होते. धर्म कुठलाही असला तरी परंपरांचं पालन हे स्त्रीचं परमकर्तव्य. त्यामुळे यावर्षी अशा स्त्रीत्वाला परंपरांमध्ये गुंडाळणाऱ्या शुभेच्छांना दुसऱ्या तथाकथित नवलाटेतून उत्तर मिळालं खरं. लाटेत गैर काही नाही, फक्त लाटेपुरताच हा स्त्रीवाद सीमित नसावा ही भीती यामध्ये आहे. कारण लाट कधीतरी फुटतेच. त्या लाटेचं प्रवाहात रूपांतर होणं जास्त आवश्यक. या सगळ्या स्त्रीवादाच्या नव्या-जुन्या लाटांमध्ये काही गोष्टी हरवून जाऊ शकतात. समाजमाध्यमाच्या झंझावातात त्याही खरं तर सैरावैरा पसरलेल्या, पण सोयीस्कर लक्षात ठेवणे आणि त्यातून मत बनवणे हादेखील आपल्या परंपरेचा भाग झाला असावा. त्यासाठीच महिला दिनाच्या या रंगपंचमीतले हे दोन रंग या लेखासाठी आवर्जून जपून ठेवलेले!
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com