scorecardresearch

गाजा-वजा पुस्तके : आजगांवकरांचा ‘दासूनाका’..

टाळेबंदी आणि त्यामुळे प्रकाशित होऊनही पोहोचू न शकलेल्या, विस्तृत चर्चा घडू न शकलेल्या मराठीतील कथात्म पुस्तकांवर बोलू पाहणारे हे मासिक सदर..

गाजा-वजा पुस्तके : आजगांवकरांचा ‘दासूनाका’..

पंकज भोसले response.lokprabha@expressindia.com

करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी आणि त्यामुळे प्रकाशित होऊनही पोहोचू न शकलेल्या, विस्तृत चर्चा घडू न शकलेल्या मराठीतील कथात्म पुस्तकांवर बोलू पाहणारे हे मासिक सदर..

गिरणी संपामुळे नष्ट होत गेलेल्या निम्नमध्यमवर्गाची, अस्मिता अतिरेकाचे विष भिनलेल्या समाजाची आणि विचार-संवेदना शाबूत असल्याने समोर येणाऱ्या परिस्थिती प्रवाहात भेलकांडत जाणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. तिला शोकांत म्हणायचे की सुखांत, हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण आजगांवकरांनी उभा केलेला हा ‘दासूनाका’  पानोपानी प्रचंड गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे..

* नाकासंस्कृतीच्या ऱ्हासपर्वातील साहित्यसंसार..

याकडे आधी कुणी लक्ष वेधले की नाही, याची कल्पना नाही, पण नव्वादोत्तरीतील उदारीकरण, ठोक मनोरंजन वाहिन्यांचा सुकाळ यामुळे साठोत्तरीच्या पिढीने अनुभवलेल्या, जगलेल्या आणि स्वीकारलेल्या नाकासंस्कृतीच्या ऱ्हासपर्वालाही आरंभ झाला होता. म्हणजे आबालवृद्धांमध्ये पुस्तकाला मनोरंजन वाहिन्यांचा पर्याय निर्माण झाला, तसा शहरी भागांतून विद्युतवेगात मासिक-साप्ताहिक-नियतकालिकांना ओहोटी लागण्याची बिकट परिस्थिती तयार झाली किंवा सरकारी-खासगी संस्था, आस्थापनांत राबणाऱ्या निम्नमध्यमवर्गालाही आपल्या मुलांना मराठी शाळांऐवजी इंग्रजी शाळांत घालण्याचा साक्षात्कार घडून मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला. तीच स्थिती नाका नावाच्या अपारंपरिक संस्थेबाबतही झाली. चोवीस तास चित्रपट ओतणारे, गाणी दाखविणारे आणि दृश्यभुकेल्या मनांची वाच्छापूर्ती करणारे सारेच वाहिन्यांद्वारे टीव्हीच्या खोक्यात सामावू लागले. टीव्हीच्या प्राइम टाइममध्ये नाके-कट्टे हे ओस दिसण्याचे प्रमाण याच काळात सुरू झाले आणि त्याचाही एक प्रच्छन्न परिणाम प्रत्येकाचा भवताल आक्रसण्यावर झाला. या नाका संस्कृतीची अखेर दोनहजारोत्तर काळात आणखी वेगाने झाली, कारण साहित्य-संगीतास्वादाचे आणि जागण्याच्या विविधांगी उफराटय़ा तऱ्हांचे आकलन आपसूक घडून देणारे नाके तरुणांना नकोसे झाले. त्याउलट संगणक-लॅपटॉपवर जगाशी एकरूप होऊ पाहणारे तरुण करिअर घडविणारे कोर्सेस आणि तत्सम उद्योगांत चोवीस तास अडकले. पोर्नोग्राफी मोफत मिळण्याचे युग आल्यानंतर तर एकांडय़ा शिलेदारांचे एककल्ली नाके घराघरांत तयार झाले. समाजाशी फारकत घेणाऱ्या तरुणांच्या एकलफौजा तयार झाल्या.

साठच्या दशकात ज्या वयात तरुण-तरुणी कथा, कविता-कादंबरी अथवा वैचारिक अशा वाचनाच्या फेऱ्यांत स्वत:ला भाषिक आणि आकलनिक अंगाने घडवत होते, त्याच्या उलट नव्वदीच्या दशकातील त्याच वयातील युवक-युवती चित्रपट-रिअ‍ॅलटी शो- टॅलंट हंट आदींमध्ये लिप्त झाल्याने वाचनापासून कैक प्रकाशवर्षे दूर राहिली होती. कैक मासिकांनी अचानक सभासद घटल्याने आपला साहित्यखटाटोप आटोपता घेतला, कित्येक खासगी ग्रंथालये आणि सक्र्युलेटिंग लायब्रऱ्या याच काळात थंड पडत गेल्या. नाकासंस्कृतीतून तयार होणाऱ्या मौखिक आणि तात्कालिक साहित्यातही भाषावृद्धी आणि रांगडय़ा तत्त्वज्ञानाची बीजे असत. त्यावरच्या संक्रांतीनेही कुठे तरी मराठी साहित्याचे नुकसानच केले अन् त्याबाबत कुणी चर्चाच केली नाही.

साहित्यात साठोत्तरीतल्या ताकदीचे नव्वदोत्तरीतही प्रयोग झाले. बदलत्या काळानुरूप हे प्रयोग समाजाच्या धमन्यांना आणि सुमार होत चाललेल्या जाणिवांना पकडत होते; पण त्यांच्या गंभीर प्रयत्नांना ना वाचकांनी गांभीर्याने घेतले, ना मुख्य धारेत उरलेल्या लेखकांच्या पिढीने कौतुकाने पाहिले.

ऐंशीच्या दशकात जनता सरकारची राजवट आल्यानंतर तरुणांच्या समविचारी गटाकडून ‘दिनांक’ या साप्ताहिकाचा जन्म झाला. त्यात जी २०-२५ सक्रिय मंडळी होती, ती ‘ग्रँट रोड’वरच्या दिनांकच्या कार्यालयात अंकाच्या आखणीनिमित्ताने भेटत. त्यांत एकाच बँकेत काम करणाऱ्या सतीश तांबे, हेमंत कर्णिक आणि गोपाळ आजगांवकर या त्रयीचाही समावेश व्हायला लागला. राजकारण, समाजकारण, संस्कृती, परंपरा, क्रीडा, अर्थकारण, नाटक-सिनेमा, साहित्य-चित्र संगीतादी कलांवर शनिवारी संध्याकाळी चर्चाचे फड रंगू लागले. पुढे जनता सरकारचे राज्य कोलमडले आणि ‘साप्ताहिक दिनांक’ बंद पडले. तिथल्या लेखक आणि विचारवंतांची पांगापांग झाली. यातून आधीच बाहेर पडलेल्या निखिल वागळे-मीना कर्णिक, द्वारकानाथ संझगिरी आदींनी ‘अक्षर’ हा दिवाळी अंक, ‘चंदेरी’ हे सिनेसाप्ताहिक आणि ‘षटकार’ हे क्रीडा साप्ताहिक सुरू केले होते. द्वारकानाथ संझगिरी यांनी पुढे ‘यशस्वी कर्णधार’ हे षटकारसारखेच साप्ताहिक सुरू केले. (ज्याचे १९९२-९३ दरम्यान बहुधा दोन-तीनच अंक निघाले असावेत.)

 दिनांकमधीलच विनायक पडवळ यांनी ‘भरतशास्त्र’ हे फक्त नाटकाला वाहिलेले नियतकालिक सुरू केले आणि ‘स्पंदन’ नावाचा दिवाळी अंक सुरू केला. राजन पडवळ यांनी ‘बखर’ नावाचा दिवाळी अंक १९९१ साली सुरू केला. या अंकात तत्कालीन दिग्गज लिहीत होतेच, पण मेघना पेठे, अनंत सामंत, राजन गवस, रंगनाथ पठारे, अनिल दाभाडे, प्रवीण पाटकर, दिवाकर कांबळी, अरविंद रे ही पुढे कसदार कथांसाठी ओळखली जाणारी तेव्हा नवखी असलेली तरुण फळीही सहभागी झाली होती. विनायक पडवळ यांनी काही काळ ‘श्री’ साप्ताहिकाचे संपादन करून ‘करूया टवाळकी’ हे मासिक सुरू केले. त्याच्या दिवाळी अंकाचे संपादन प्रसिद्ध अभिनेते ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ करीत हा तपशीलही आता कुणाच्या खिजगणतीत राहिलेला नसेल. करूया टवाळकीच्या १९९६ च्या अंकात सतीश तांबे, हेमंत कर्णिक, बियन चव्हाण हे कथा विभागात तर संजय मोने, संजय पवार, अवधूत परळकर ही वेगवेगळ्या लेखन विभागात सापडू शकतील. खासगी वितरणासाठी पुण्यातील काही मंडळींनी ‘कट्टा’ या अनियतकालिकाची निर्मिती केली तर त्याच्या प्रेरणेतून मुंबईतील सांस्कृतिक नगरीत केतन दुर्वे, उदय तानपाठक, अभिजीत ताम्हणे, प्रवीण दामले, हेमंत मिराशी या तरुणांनी ‘नाका’ हा विडंबांक काढला. ‘नाका’चा एकच अंक निघाला.   

समोरच्या भवतालात सर्वच बाजूंनी अवनीती दिसत असताना दिनांकमधील अनुभवाच्या बळावर सतीश तांबे, हेमंत कर्णिक आणि गोपाळ आजगांवकर या त्रयीला काही तरी करायची खुमखुमी निर्माण झाली. ‘दिनांक’ असताना चालणाऱ्या त्यांच्या चर्चा ‘कॅफे मोकॅम्बो’ या फोर्टातल्या वास्तूत भरू लागल्या. या बँक ऑफ इंडियावाल्या तिघांनी जमवलेल्या नव्या गोतावळ्यातून ‘कॅफे मोकॅम्बो’ हा बीअरयज्ञासह भल्यामोठय़ा चर्चाचा अड्डा झाला. या अड्डय़ामधूनच ‘आजचा चार्वाक’ या दिवाळी अंकाची निर्मिती झाली. ‘सत्यकथा’ बंद पडून काही वर्षेच झाली होती आणि हळूहळू दर्जेदार साहित्य देणारी मासिके संपत चालली होती. कॅफे मोकॅम्बोत बसणाऱ्या साऱ्या कंपूला सत्यकथेबद्दल आदर होता. वास्तववाद आणि देशीवाद यापलीकडे आणखी काहीतरी देण्याच्या मिषाने आजचा ‘चार्वाक’ या अंकाचा जन्म झाला. ‘सत्यकथा’, ‘युगवाणी’, ‘अनुष्टुभ’ ही साहित्यिक आणि ‘नवभारत’, समाज प्रबोधन पत्रिका ही सामाजिक नियतकालिके त्यांची आदर्श होती.

‘मराठीमध्ये आपण एक वेगळी अभिरुची जोपासूया असं भान सगळ्यांनाच होतं. ढोबळमानाने या अभिरुचीचं स्वरूप असं होतं की, मराठीमध्ये साहित्य काय किंवा वैचारिक लेखन काय, एकूणच भावुकतेवर भर आहे आणि बौद्धिकतेला थारा नाही. तर हे चित्र बदलण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करणे, ललित लेख या बोकाळलेल्या अल्लड लडिवाळ प्रकाराला पायबंद घालण्यासाठी सज्जड वैचारिक लेखांचं पुनरुज्जीवन करणे, परंपरेवर केवळ हल्ले चढवायचा आततायीपणा करण्याऐवजी तिची रीतसर चिकित्सा करणे आणि साहित्यातदेखील कल्पकतेला वाव देणाऱ्या कलाकृती बव्हंशाने प्रकाशित करणे आमच्या डोक्यात होते’ असे सतीश तांबे यांनी ‘रेषेवरची अक्षरे’ या ऑनलाइन अंकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

‘आजचा चार्वाक’मध्ये कला आणि साहित्याची खाण सापडू शकते. चंद्रकांत पाटील, जी. के. ऐनापुरे, मनोहर शहाणे, कृष्णा किंबहुने, समर खडस, मनोहर शहाणे, रामदास भटकळ, प्रभाकर बरवे, विजय तांबे, विश्वनाथ खैरे, नितीन अरुण कुलकर्णी ही लेखकनावांची झलक. अर्धाग वायूने जखडलेल्या भाऊ पाध्यांनी चेंबूरनगरीवर लिहिलेल्या कादंबरीची चार फक्कड प्रकरणे १९९५ सालच्या दिवाळी अंकात आहेत. पुढे ही कादंबरी काही पूर्ण झाली नाही; पण ही चार प्रकरणे त्यांनी चार्वाकसाठी लिहिली. (‘बखर’च्या दिवाळी अंकासाठीही भाऊ पाध्येंनी याच अवस्थेत झंगड लेख लिहिले आहेत.) या अंकाला सलग तीन वर्षे मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला होता अन् वेगळे वाचण्याची मनीषा बाळगणाऱ्यांना दरवर्षी काही तरी हुकमी देण्याची परंपरा आजचा चार्वाक जपत होता.

‘चार्वाक’च्या पहिल्या अंकाला मिळालेल्या यशानंतर या संपादकत्रयीने ‘अबब हत्ती’ या बालमासिकाची निर्मिती केली. लहानपणापासून मुलांवर साहित्यमूल्यांची जाणीव व्हावी या अट्टहासातून ‘अबब हत्ती’ काढण्यात आला होता. शाहीर पांडुरंग माळी, स. गं मालशे, कमल देसाई, श्रीराम लागू, रमेश रघुवंशी, नीलकांती पाटेकर, उर्मिला पवार, रघुवीर कुल, वसंत आबाजी डहाके, ज्योत्स्ना कदम, सुचेता भिडे-चापेकर, पंडित विद्यासागर, मारुती चित्तमपल्ली, निर्मला देशपांडे, वीणा गवाणकर, देवदत्त साबळे, सिसिलिया काव्‍‌र्हालो, मंगला नारळीकर, भारत सासणे ही ‘अबब हत्ती’तील नावे पाहिली तरी कुणीही अचंबितच होईल. अंक मुलांच्या विचारांना चालना देणारा, त्यांच्याकडून कविता, लेखनही करून घेणारा असा सर्वगुणी आणि अल्पमोली. ‘ठकठक’, ‘चंपक’ आणि इतर बालमासिकांचा ओहोटीकाळ सुरू झालेला असताना या अंकाच्या वाटेला काही फारसे वेगळे आले नाही. पन्नास अंकांनंतर आर्थिक गणित बिघडल्याने हा अंक बंद पडला आणि त्याच्या प्रयोगांची आठवणही कालांतराने पुसत गेली. ‘हत्ती’ने आर्थिक पोळून निघालेल्या तांबे, आजगांवकर आणि कर्णिक या तिघांना पुढे ‘आजचा चार्वाक’ चालविणेही अवघड झाले. त्याचे कारण आर्थिकही होते, पण त्यापेक्षा कैकपटीने अधिक नव्या अभिरुचीशी एकरूप होणाऱ्या वकुबाचा वाचक मिळवण्यातील अडचणी हे होते.

नव्वदोत्तरीनंतर इतर माध्यमांच्या आक्रमणानंतर उरलेल्या वाचकांमध्ये सर्वाधिक टक्का हा साठोत्तरीतल्या लेखकांचे साहित्य कुरवाळणारा आणि तेच श्रेष्ठ असल्याचे पुढच्या पिढय़ांच्या मनावर बिंबवत जाणारा होता. उरलेला टक्का जुन्या आणि नव्या अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवत प्रायोगिकतेला स्वीकारणारा होता. चंद्रकांत खोतांच्या ‘अबकडई’ने तयार केलेला खरा वाचनसाक्षर हा अत्यल्प प्रमाणातील होता. तो विचारी असला, तरी खिशाने पुरता कफल्लक होता किंवा वाचण्यासाठी विकत घेऊन-सभासद होऊन मासिक, दिवाळी अंक घेण्याची ऐपत नसलेला होता. या तीन तऱ्हेच्या वाचकटक्केवारी युगात ‘चार्वाक’चे जे व्हायला नको तेच झाले. चांगला मजकूर दहा वर्षे सातत्याने देऊन हा वार्षिकांक थंडावला. ‘अनुभव’, ‘अंतर्नाद’ ही मासिके या काळात धाडसाने निघाली आणि चालली. पण पुढे अंतर्नादला बदलत्या भवतालापुढे माघारच घ्यावी लागली. नव्वदोत्तरीत मासिकांचे, दिवाळी अंकांचे आर्थिक गणित न जुळण्यामागे वाचकसंख्या घटणे होते आणि वाचकसंख्या घटण्याचे कारण जे चांगले आहे, त्याचा प्रचार करणाऱ्या नाकासंस्कृतीसारख्या अपारंपरिक संस्थांचा अस्त होणे यात होते. विविधांगी दुष्टचक्रात साहित्याचे लेखन आणि लेखक सापडले होते अन् या काळाची, त्यामध्ये जगण्यातील पराभूततेची प्रतिबिंबे ‘आज दिनांक’, ‘स्पंदन’, ‘बखर’, करुया टवाळकी आणि प्रामुख्याने आजचा चार्वाकमधील लेखनातून उमटत होती.

‘चार्वाक’च्या संपादकत्रयीमधील हेमंत कर्णिक यांनी काही कथा, अनेक लेख आणि गेली दोन दशके स्वत:ला ‘अक्षर’, ‘महानगर’च्या संपादनामध्ये बुडवून घेतले. त्यांनी अनुवाद केलेले ‘दुष्काळ आवडे सर्वाना’ हे पी साईनाथांचे अनुवादित पुस्तक हे त्यांचे सर्वज्ञात कार्य. सतीश तांबे यांचे गेली अडीच-पावणेतीन दशके चाललेले वर्षांला फार तर दोन या गतीने चाललेले दीर्घकथा लेखन, हे त्यांचा खास चाहतावर्ग बनवून आहे. तिकडम शैलीतील कथांची चार-पाच पुस्तके, विचक्षण समीक्षण-व्यक्तिचित्रे आणि सदर लेखनाची दोन पुस्तके त्यांच्या नावावर होत. गोपाळ आजगावकर हे या दोघांइतके नजरेत न भरलेले, मात्र त्यांच्याइतक्याच ताकदीने लिहिणारे लेखक. आजगावकरांनी दिनांकपासून कथा लिहिण्यास सुरुवात केली. नव्वदीच्या दुर्लक्षकेंद्री युगात त्यांच्या काही मोजक्या मात्र विलक्षण कथा छापून आल्या, याची कल्पना काही जाणकार वाचकांना आणि कथाअभ्यासकांनाच असू शकेल. देशीवादी, वास्तववादी साहित्याच्या पलीकडे असणारी प्रायोगिकता, एकाच वेळी महानगरी आणि जागतिक भान असलेले विचार आणि प्रचंड गुंतवून ठेवणारे लेखन ही आजगावकरांच्या कथांमधील ठळक वैशिष्टय़ं सांगता येतील. नाकासंस्कृतीचा ऱ्हास, मनोरंजनाच्या सवंग उद्योगापुढे एकत्रित शरण गेलेली दोन पिढय़ांतील माणसे आणि विचार-आकलनाअभावी निर्थक ठरत चाललेली समाजाची अवस्था हे आजगावकारांच्या कथांतून डोकावणारे विषय. या कथांना पुस्तकरुप आले नाही. मात्र रशियन क्लासिक्स कादंबऱ्या देणाऱ्या लेखकांच्या आडवाटेला पडलेल्या उत्तम पुस्तकांचे त्याने हिरिरीने अनुवाद केले. फ्योदोर दस्तयेवस्की यांच्या कादंबरीचे ‘निरंतर नवरा’ आणि लिओ टॉलस्टायच्या कादंबरीचे ‘कबुलीजबाब’ ही गेल्या दोन दशकांत झालेली त्यांची अनुवादनिर्मिती. २०१९ च्या अखेरीस करोना विषाणूच्या महासाथीच्या आरंभकाळात आजगावकरांची ‘अंतर्यामी खजुराहो’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतरच्या काळात देशभरात लागलेली टाळेबंदी, प्रकाशनविश्वाची-पुस्तकविक्रीची झालेली बिकटअवस्था आणि आधीच असलेल्या दीड-दोन टक्के कादंबरी ई वाचकांच्या आपल्या राज्यात या पुस्तकाकडे लक्ष द्यावी इतपत परिस्थिती राहिली नाही. आजगावकरांनी नाकासंस्कृती विघटन झालेल्या काळातील एक उत्तम प्रतिनिधी ‘अंतर्यामी खजुराहो’तून समोर आणला पण तो करोनाच्या काळात किती जणांपर्यंत पोहोचला, हे सांगणे अवघड आहे.

* बर्थवरच बसणारा लेखक..

गोपाळ आजगावकरांची एक कथा २००० किंवा आगे-मागे ‘अक्षर’च्या दिवाळी अंकात आली होती. ‘बर्थवरच बसतो लेखक’ या नावाची. तिच्यातील अचाट आणि अफाटपण तिची रचना होती. पारंपरिक ‘अ’ बिंदूपासून ‘ब’ बिंदूर्प्यत जाणाऱ्या कथांच्या आणि सुरुवात-मध्य-शेवट या सूत्राच्या कथा वाचकांना बरीचशी चक्रावून सोडणारी. म्हणजे यात कथानकच नाही. आहेत त्या चर्चा संवाद. कुणीकडून कुणीकडेही जाणारे; पण त्या संवादात गंमत आहे ती बदललेल्या वृत्ती-प्रवृत्ती आणि मूल्यांची घेतली गेलेली दखल; साहित्याकडे, लेखकाकडे पाहण्याच्या दृष्टीचीही. बरे हे इतके ओघवते आणि अ-कृत्रिम आहे, की कथा वाचताना धक्क्यांवर धक्के बसायला लागतात. या संपूर्ण दशकात मुंबईकरच नाही, तर देशातील प्रत्येक शहरातील लोकांच्या जगण्याचा क्रम आधीच्या नव्वद वर्षांत बदलला नव्हता तितका बदलला. हाती पैसा अधिक खेळू लागला. मनोरंजनाची चटक अधिक लागली. कुटुंबेच्या कुटुंबे टीव्हीसमोर किंवा संगणकाच्या स्क्रीनवर त्राटकावस्थेत बसू लागली. वाचणाऱ्या-लिहिणाऱ्या किंवा विचार करणाऱ्या माणसांमध्येही हळूहळू साऱ्या भवतालाविषयी नकारात्मकतेची भावना तीव्र व्हायला सुरुवात झाली. सर्वच क्षेत्रांत सुमारांची सद्दी बेसुमार होऊ लागली अन् या अनुत्पादक किंवा क्षुद्र वर्षांच्या जाणिवांची दखल गोपाळ आजगावकरांच्या लेखनात सूक्ष्मपणे डोकावू लागली. ‘बर्थवरच बसतो लेखक’ या कथेचा आरंभ ‘कॅफे मोकॅम्बो’ परिसरापासून सुरू होतो बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या तीन मित्रांच्या उत्तर भारताच्या प्रवास नियोजनाने होतो. उत्तर भारतातील प्रवासात त्यांच्या चर्चा विविधांगी विषयांना स्पर्श करतात. पुढ ‘लेखका’च्या लेखकपणाबद्दल आणि समाजाने त्याचे आत्ता बनविलेल्या स्थानापेक्षा त्याचे अस्तित्व आणि महत्त्व काय आहे, यावर भांडणथाटात चर्चा घडून कथा संपते. कथेचा आरंभ पहा.

‘दर शनिवारी एकत्र जमून बीअर पिण्याचे दिवस उलटून आता खरी तर खूप वर्षे झाली होती. तरी एखाद्या शनिवारी अनिकेतला त्या दिवसांची आठवण येई.आज लवकरची बस मिळाल्यामुळे तो गर्दी न्याहाळत रमत-गमत पी.एम. रोडवरून चालला होता आणि समोर कॅफे मोकॅम्बो येताच त्याची पावलं थांबली. मनात उमटणाऱ्या हव्याहव्याशा हुरहुरीची चव घेत तो उभा राहिला. उगाचच उभं राहणं बरं दिसणार नाही, म्हणून त्याने सिगारेट घेतली. कॅफेमध्ये चार-पाचच गिऱ्हाईकं होती. त्यातल्या दोघांसमोर बीअरच्या बाटल्या होत्या. बाकी कॅफेमध्ये शांतता होती. काऊंटरवरचा म्हातारा गब्दूल पारशी तसाच होता; इतक्या वर्षांत त्याच्यात काही फरक झालेला वाटत नव्हता. एक वेटर नवीन वाटत होता. पण एकूण कॅफे तसंच होतं. सिगारेट संपत आली तेव्हा ‘घालवला तेवढा वेळ पुरे झाला’ असं वाटून तो तिकडून निघाला. तरी त्याचे मन खुटखुटत राहिलं. ‘नक्की आपणाला काय हवंय,’ असं त्याने स्वत:ला अगदी थेट विचारलं, तेव्हा आतून नि:संदिग्ध उत्तर आलं, की आज आपल्याला प्यावीशी वाटतेय बीअर. कारण आज शनिवार आहे.’

आता हा अनिकेत एकटय़ाने बियर काय पिणार म्हणून आपल्यासह पूर्वी याच कॅफे मोकॅम्बोत बसून बिअरयज्ञात झोकून देणाऱ्या जगत आणि लाल्या या दोन मित्रांना बोलावतो. हातातील कामे टाकून देण्याचे निमित्त शोधत असल्यासारखे ते दोघे तेथे दाखल होतात. बियरसोहळा खुमासदार चर्चानी रंगू लागतो.

‘आजचा चार्वाक’ आणि ‘अबब हत्ती’ या मासिकांचा जन्म ज्या ‘कॅफे मोकॅम्बो’त झाला त्या वेळी त्या संपादकत्रयीच्या चर्चा काय तोडीच्या असतील याचा अंदाज घेण्यासाठी या चर्चा वाचणे उपयुक्त ठरतील. उत्तरेकडच्या प्रवासात त्यांची चर्चा मद्यमिश्रित अवस्थेत आणखी उफाळत आणि उधाणत जाते. उत्तरेकडची पर्यटनप्रेमी आणि जगज्ञात स्थळांऐवजी कुठल्यातरी निर्जन पठारावर हे तिघे मद्यसफारी करतात. तिकडे उंच टेकाडावर एका बाईसह राहणारा कुणी बंगाली बाबू त्यांना भेटतो. तर त्यांच्यासमवेत ते एक संपूर्ण दिवस काढतात. नंतर परतीच्या प्रवासात स्टेशनावरची घाण, ओकाऱ्या यांचे तपशील येतात. कर्वे आडनावाचा एक व्यक्ती त्यांच्या बर्थमध्ये येतो अन् त्याच्याशी ते तिघेही मैत्री करतात पण चर्चाची, वादांची खुमखुमी काही थांबत नाही. रेल्वेच्या वेगात तिची धडधड सुरूच राहते.

बोलता बोलता वादात अनिकेत जे सांगू लागतो, ते त्यांच्यातील चर्चेचे काही नमुने म्हणून इथे देतो.

‘मला तर नेहमी असं वाटतं की, याच देशात आणि याच काळात आपण जन्माला आलो, ही केवढी ग्रेट गोष्ट आहे. ज्याला माणसं बघायची आहेत ना, त्याला भारतातच राहायला हवं. एक-एक माणूस म्हणजे एकेक कादंबरी आहे. शंभर जन्म घेतले तरी लिहायला पुरणार नाहीत इतकी माणसं आहेत इथे. आपण जगत असतो, तोच काळ सगळ्यात चांगला. स्वातंत्र्यापूर्वी आपण जन्माला आलो असतो, तर स्वातंत्र्य मिळविण्याची भुणभुण आपल्याला लागून राहिली असती आणि मला शंभर टक्के खात्री आहे की, आपण स्वातंत्र्यासाठी काडीचाही प्रयत्न केला नसता. नुसती डोक्यात भुणभुण ठेवून दिली असती. म्हणजे फुकटचा ताप. स्वातंत्र्याच्या मागे पेशवाई. म्हणजे सगळा चिखल. त्याच्यामागेही शिवशाही. शिवाजी थोरच; पण सारख्या हाणामाऱ्या. मारा किंवा मरा. कायम असं जगायचं. आपण बुद्धी चालवणारी माणसं. आताच जन्माला आलो, ते बरं नाही का? आणि आत्ता मला हे सुचलं. आपण आत्ताच्या काळात जन्मलो म्हणून आपणाला सत्यजीत रे आणि चॅप्लिन माहिती आहेत. माणसाचं कल्चरल धन प्रत्येक पिढीगणिक वाढणार.’

याच कथेतील पत्रकार असलेली जगजीची व्यक्तिरेखा लेखक असलेल्या अनिकेतच्या चर्चावर भडकून वादाच्या पवित्र्यात जाते आणि त्याला जे ऐकवते, ते वीस वर्षांपूर्वी मराठी लेखकाच्या जनमानसातील प्रतिमेचे एक स्पष्ट वर्णन म्हणून पाहता येईल.

‘अरे भडव्यालेखक म्हणून किती माज करशील. हे सारं भिकार वीतभर लिहून स्वत:ला लेखक मानतं. अरे साल्या, लेखक असला पाहिजे, दिसला नाही पाहिजे आणि लिहिताना असशील तू लेखक.. बाकी आमच्यासारखाच ना. अरे मीपण गेल्या वर्षी एक कथा लिहिली. आम्हालापण कळतं लिहायचं कसं ते पण आपण नाही मानत स्वत:ला लेखकबिखक. मी स्वत:ला नॉर्मल मानतो. हे साला कायम आमच्याकडे उंचावरून बघणार. लेखक ना. लेखक म्हणजे एकदम महाडेंजरस. तुमचा गळा दाबून डायलॉग काढतात आणि कथे-बिथेत घालतात. हलकट साले. अरे अन्या, तुला कोण विचारतोय? अरे, तू कशाला.. एकदा मी बसमधून चाललो होतो, तर बसमध्ये विंदा करंदीकर उभे. हातात ती पेटंट पिशवी घेऊन. कोणएक माणूस त्यांना ओळखत नव्हता. अगदी म्हातारा म्हणूनसुद्धा कुणी त्यांना जागा दिली नाही. विंदांसारख्या माणसाला इथे कोण ओळखत नाही, तर तुला कोण ओळखणार? आणि ते तसं असणार. मागे एकदा ‘सत्यकथे’च्या जुन्या अंकांचा गठ्ठा फूटपाथवर बघितला. भीती वाटली. अनेक माणसं सिन्सिअरली लिहीत असतात. त्यातही चार-दोन नावं पाचपन्नास वर्षे टिकतात. बाकीच्यांना विचारतंय कोण?’

या दाव्यावर बर्थवर चढून आडवा झालेला अनिकेत तोल जाऊन भांडू लागतो आणि प्रेषितासारखा गरजू लागतो.

‘जगजी.. तू कितीही घासलीस ना. तरी तू जर्नलिस्टच रे.. आम्ही लेखक कायम बर्थवरच असणार आणि बर्थवरून मी तुला नीट ऑब्झव्‍‌र्ह करतोय.. लक्षात ठेव.. बर्थवरच बसतो लेखक.. खंक असला तरीही;

आजगावकरांचे बर्थवरून बसून किंवा उंचावरून जग बघणे आणि लेखनात उतरवणे त्यांच्या ‘दिनांक’मधील कथालेखनापासून स्पष्ट होते. सवरेत्कृष्ट मराठी कथांचे राम कोलारकृत खंड त्यांच्या काळात असते, तर आजगावकरांच्या कथा त्यात सहज सामावल्या असत्या. मात्र आज शोध घ्यायचा झाला, तर ‘दिनांक’, आजचा ‘चार्वाक’, ‘हळक्षज्ञ’, ‘अक्षर’मध्ये विखुरलेल्या अवस्थेतच सापडू शकतील.

‘न्  न् नाकात पाय’ नावाची एक कथा आजचा चार्वाकच्या १९९५ च्या दिवाळी अंकात आली आहे अफलातून सुरुवात आणि मध्यासह. यात एक सडाफटिंग तरुण आपण लग्न केल्यानंतर होणाऱ्या मुलाचे नाव सारासार ठेवावे हा विचार पक्का करतो. त्याचे लग्न ठरते आणि नियोजित वधूसह तो समुद्रकिनारी नामचर्चाची गंमत उडवून देतो. साठोत्तरी-सत्तरोत्तरी समुद्रकिनारी प्रेमसंवादाची थेट फिरकी घेणारी ही संवादाची गाडी चित्रपट कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा समाजात मुलांची नावे ठेवण्यात कशी फॅशन झाली आहे, यांच्याकडे बोट ठेवते. रोमॅण्टिक गप्पांऐवजी चालणारी ही नामॅण्टिका कथा आवडण्यास कारणीभूत ठरते. कथानायक म्हणतो, ‘अगं हल्ली नवीनवी नावं ठेवायची फॅशन आहे ना. खरं तर आता तेवढीच क्रिएटिव्हिटी उरलीए लोकांकडे, पण मला ती गोडूगोडू वाटतात. आणि परत त्यातही बहुतेक जण नटाबिटांची ठेवून मोकळी होतात. एकमेकांची चोरतातपण. आमच्या बिल्डिंगमध्ये तीन राजू होते.’ त्यावर नायिका म्हणते, ‘अन् आमच्याकडे सगळे अमित.’

या कथेची सुरुवातही विलक्षणच आहे. तीदेखील काळाचा श्वास चपखल पकडणारी.

‘आपल्या मुलाचं नाव सारासार ठेवावं असं त्याच्या मनात आलं तेव्हा ‘रेडिओवर दिलकी, धडकन’ असं कायसं गाणं वाजत होतं आणि त्यानं लग्न करावं म्हणून आई त्याच्या विनवण्या करीत होती. आई समोर बसली होती आणि रेडिओ बाजूला होता. त्याला वाटत होतं की रेडिओ समोर असता आणि आई बाजूला असती, तर जास्त बरं झालं असतं. म्हणजे आईच्या नजरेला नजर देण्याचा प्रसंग आलाच नसता आणि त्यामुळे आईच्या बोलण्याकडे जास्त दुर्लक्ष करता आलं असतं. तशी त्याने मान खाली घातली होती आणि डोळे मिटून घेतले होते; पण नकोश्या आवाजाचं काय? आई समजा रेडिओ झाली तर बटण फिरवून तिचं हे बोलणं बंद करता येईल आणि अगदी लहान असताना ती केव्हाकेव्हा अतिशय वात्सल्याने अर्धवट त्याच्याशी अर्धवट स्वत:शी बोलत असे, ते लावता येईल. अर्थात त्याहून खटकन् रेडिओ बंद करणेच चांगले. ते बोलणे त्याला आता आठवत नाहीये. त्यांच्यात आता बोलणेच नाही. फक्त उपदेश, सूचना किंवा आज्ञा आणि विनवण्या. अधूनमधून.’

‘दिनांक’च्या दिवाळी अंकात आजगांवकरांची ‘बागेत बाकडा बापडा’ ही आणखी एक थोर कथा आहे. जिची व्हायला तेवढी सोडा, पण काहीच चर्चा झाली नाही. मधुसूदन पंडित या तरुणाची ही कथा. जमदग्नी वडिलांच्या धाकाने त्यांचा तिरस्कार करायला लागलेला आणि त्यांच्या अकाली मृत्यूनंतर आईसह घर सावरण्याची जबाबदारी आलेला हा तरुण भरल्या घरात जसा एकटा असतो, तसाच भरल्या समाजाशीही फारकत घेऊन राहतो. वेळ घालविण्यासाठी आणि स्वत:ला इतरांपासून लांब ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या तो करताना दिसतो. त्यातलीच एक जवळच्या बागेतील बाकडय़ावर बसण्याची. शिकविण्या घेऊन, एसएससी होऊन आणि बँकेत नोकरीला चिटकून तिथल्या भवतालाची चिकित्सा करीत त्याचा एकलकोंडेपणा वाढत जाताना दिसतो. नव्वदीच्या दशकात अनेक तरुणांची अवस्था विविध कारणांमुळे अशा प्रकारची झाली होती. आजगांवकर यांचा कथानायक त्या सगळ्यांचे प्रतिनिधित्व करतो. ही कथा वाचताना भालचंद्र नेमाडे यांच्या कोसलातील पांडुरंग सांगवीकर भेटतो, तसेच भाऊ पाध्येंचे ‘सुनहरा ख्वाब’ सतत डोक्यात बाळगणारे नायकही आठवू लागतात. आजगांवकरांनी हे लेखक त्याचबरोबर जागतिक साहित्य, वैचारिक लेखन किती पचविले आणि रिचविले त्याचे प्रतिबिंब कथेमध्ये पडले आहे. त्यांची वाचकाला पकडून ठेवण्याची शैली ही खास त्यांनी घासून-पुसून आणि कायमच बर्थवर बसून केली आहे. ‘बागेत बाकडा बापडा’ वाचणाऱ्याला या कथेचा दीर्घाक ‘अंतर्यामी खजुराहों’मध्ये सापडू शकेल. या कथेच्या तब्बल दोन दशकानंतर रचलेल्या या कादंबरीत नाकासंस्कृतीशी दूर असलेला नायक स्वत:चाच नाका तयार करताना दिसतो. या एकलफौजेला म्हणूनच समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.

* एकलफौजेची अंतर्यामी आग..

‘आपण पुरुष म्हणजे बाहेरून अजंठा-वेरूळ.. पद्मासनात बुद्ध वगैरे.. पण अंतर्यामी मात्र खदखदता खजुराहोच असतो. म्हणून तर लग्न करावंच लागतं. लग्नाचा तोच एक खरा उपयोग आहे. एक अख्खी बाई तुमच्यासाठी असणं म्हणजे किती सुख. बाकी आपल्यासारखे आंडुपांडु काय किंवा लफडेबाज, रंगिले, पोरी पटविणारे पुरुष काय, त्यांना आपलं चोरून-मारून लपतछपत करावं लागतं. त्याचा जमाखर्च काढला, तर जमा फार तर अर्धा तास आणि खर्च कित्येक दिवस.’ ( ‘दासू’, ‘अंतर्यामी खजुराहो’ पान क्रमांक १०१)

अमुक-अमुकवादी कादंबऱ्या असतात हे मान्य केले आणि स्त्रीवादी कादंबरी असा गट केला, तर आजगांवकरांची कादंबरी ही पुरुषवादी आहे. जिच्या आरंभापासून अंतापर्यंत नायकाची कामभावना आणि त्यांचे विविधमार्गी विरेचन असले, तरी कादंबरी नुसती त्याबद्दलच नाही बोलत. निम्नमध्यमवर्गीय कुटुंबातला, चाळीत राहणारा हा संवेदनशील मनाचा तरुण आहे. तो वाचतो, कविताही करतो. त्याला जुन्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट सिनेमांतील गाण्यांच्या रेकॉर्ड्स आवडतात. आपल्या भवतालातील बदलांच्या घटकांनी तावून-सुलाखून त्याचे घडत किंवा बिघडत जाणे या कादंबरीत आले आहे.

‘अंतर्यामी खजुराहो’तील दासू (हे त्याचे टोपण आणि परिचित नाव आहे.) हा आजगांवकरांच्या ‘बागेत बाकडा बापडा’मधल्या किंवा ‘या खैरनारचा काय खरां नाय’ या कथानायकांसारखाच शिकविण्या घेऊन मोठा झालेला आणि पुढे बँकेत चिकटलेल्या नायकांप्रमाणे आहे. मात्र त्या कथानायकांना न छळणारा कामविचार या दासूला पछाडून टाकणारा आहे. जिथे-तिथे तो आपल्या लिंगोद्दीपनाच्या प्रसंगांना विषद करतो आणि त्याबद्दल स्वत:ची चिकित्साही करतो. कादंबरीच्या आरंभी तो भेटतो ते बेकारावस्थेत. बीएससी होऊनही नोकरी मिळविण्याच्या खटपटीत अपयशी ठरलेला. अन् ती बेकारी सोडविण्यासाठी नाना उपाय केल्यानंतर दादरमधील एका क्लासमध्ये शिकविणी घेण्याची जबाबदारी स्वीकारलेला हा तरुण दोनेक मित्रांमध्येच वावरतो. क्लासमधील एका मुलीच्या आईच्या ओळखीने बँकेत लागतो. दारू पिण्याच्या बहाण्याने मित्राकडे जाण्याची वाट चुकून एका वेश्येच्या घराजवळ पोहोचतो. तिथे तिच्याशी ओळख वाढत गेल्याने पहिला संभोगानुभव घेतो. पुढे बँकेत लावणाऱ्या बाईशीही त्याचा संग होतो. त्याच्या आईच्या मृत्यूनंतर वडील गावाला निघून जातात. मग ‘एकला जीव सदापिव’ची अवस्था आल्यानंतर त्याच्या आयुष्याचा अस्ताव्यस्त पसारा यांनी कादंबरी पुढे सरकत राहते.

आजगांवकरांच्या कथांमध्येही ‘अ’ ते ‘ब’ बिंदूपर्यंत जाणारे आणि शोकांत अथवा सुखांत अनुभूती देणारे घटक नाहीत. तर कादंबरीकडून त्यांची अपेक्षा करणेही चुकीचे आहे. एकूण ६३ प्रकरणांची ही दासू नावाच्या तरुणाची कहाणी आहे. ज्यातील प्रत्येक प्रकरण म्हणजे त्यांच्या खास शैलीतील एक कथा म्हणता येईल.

आजगांवकरांनी येथे दासूचा पहिला दारुअनुऊभव, तसाच पहिला पारुअनुभव (लक्ष्मी), पहिला चरसानुभव दाखवून दिला आहे. पण पुढे ना त्याला दारुडा केला आहे; ना त्याला पारुडा बनवलाय किंवा चरसी म्हणून पेश केलाय. क्लासमधील शिकविण्याच्या अनुभवांनी, बँकेतील नोकरीने स्थिर होण्याच्या आनंदांनी आणि पुढे दासूचे जगाचे आकलन विस्तारात होण्याच्या घटनांची जंत्री या कादंबरीत येते.

एका प्रकरणात ऑक्टोबरमध्ये दहावी देणाऱ्यांसाठीच्या विशेष क्लासमध्ये शिकविण्याचा एक जबरदस्त किस्सा दासूला अनुभवायला येतो.. त्याचे वर्णन आवश्यक आहे.

‘दहावीचे वर्ग सुरू झाले होते. एकूण मुलं दहा झाली होती. दासूला एक लक्षात आलं की, शिकविताना प्रश्न विचारायचा नाही. कारण प्रश्न विचारला की एकही जण उत्तर द्यायचा नाही. उगाच वेळ फुकट जायचा आणि एक चमत्कारिकपणा उत्पन्न व्हायचा. एकदा त्याने बोलता बोलता भारताचे पंतप्रधान कोण, असा प्रश्न अगदी सहज म्हणून पुढे बसणाऱ्या मुलाला विचारला. हा मुलगा खूप जाडा चष्मा लावायचा. कुठे तरी बाइंडरकडे तो कामाला होता. तर त्याने नेहरू असं उत्तर दिलं. ‘नेहरू’ असं आश्चर्याने दासू म्हणाला. तेव्हा त्याने पंडित नेहरू म्हणून सांगितलं. बाकीच्या मुलांनाही त्यात काही खटकलं नाही. दासूला इतकं ओशाळल्यासारखं झालं की, आणखी काही न बोलता त्याने आपले पंतप्रधान राजीव गांधी आहेत, एवढं सांगून पुढे शिकवणी सुरू केली.’

या क्लासमध्येच आईवरची सुभाषिते लिहिणाऱ्या कोमल नावाच्या विद्यार्थिनीविषयी दासूला वाटत जाणारे कुतूहल आणि अनेक दिवसांच्या तिच्या अनुपस्थितीमुळे तिच्या घरी पोहोचून करून घेतलेले तीव्र कोमल दु:खांचे प्रकरणही आजगांवकरांच्या तिरकस आणि गंभीर शैलीचे एक उदाहरण ठरावे.

कादंबरीत हिंदसेना नामक शिवसेनेशी साधम्र्य साधणारी एक संघटना आहे आणि त्या संघटनेचा ‘साहेबांना’ देव मानणारा गळवणकर नावाचा म्होरक्या आहे. जो दासूचा शाळकरी मित्र आहे. त्याच्या घरी दारू पिण्याचा एक अतिविनोदी प्रसंग आहे आणि पुढे पुढे गळवणकराचे एकाच वेळी भाबडे आणि कट्टर तत्त्वज्ञान अनेकदा प्रकरणांमध्ये ओघाने येत राहिले आहेत.

आजगावकरांनी इथे एक मोठा ‘काळकल्लोळ’ उभा करून ठेवला आहे. दासू आपल्या भिडे या मित्रासोबत माधुरी दीक्षितचा तेजाब पाहायला जाताना सुरुवातीला दाखविला आहे. मात्र दासू ऐकत असलेली गाणी ६० च्या दशकातील आहेत. एस. डी. बर्मन यांचे ‘मितवा’ कुणाला माहिती नसल्याची त्याला खंत वाटते. संगदिलमधील ‘दिल मे समा गये सजन’ या गाण्याच्या रेकॉर्डवर दासूू आणि त्याचा मित्र उल्ताफ दारू पिण्याचा कार्यक्रम आखतात. ऐंशीच्या दशकातील डिस्कोयुगाचा त्यांना पत्ताही नाही. राजीव गांधींचे पंतप्रधानपद आणि ‘तेजाब’ चित्रपटाचा काळ हा ऐंशीच्या नंतरचा आहे. मात्र या दशकात आजगावकरांच्या कादंबरीतील हिंदसेना दक्षिणी बाबूंविरोधात उभी ठाकलेली दिसते. कादंबरीमध्ये दासूचा जीवनक्रम त्याचे आई-वडील त्याच्यासह राहत असतानाचा आणि त्यांच्यानंतरचाही वाचकांना इतका परिचयाचा झालेला असतो, की नंतर पोर्नोग्राफिक मटेरियल पाहून हस्तमैथुन करण्याचा येणारा उल्लेख अचानक आकाशातून पडल्यासारखा परका वाटतो.

बाप्या नावाचे दासूच्या नातेवाईकाचे एक कुटुंब यात येते. गिरणी बंद झाल्यानंतर त्या घराची चाललेली वाताहत आजगांवकर अचूक पकडतात. अनेक प्रकरणांत बाप्याच्या घरात जेवणाचा कार्यक्रम, त्याच्यासोबत पिण्याचा कार्यक्रम आणि कष्ट करून वहिनीची संसारासाठी सुरू असलेली ओढाताण यांचे तपशील आणले आहेत अन् ते प्रचंड दाहक आहेत. कादंबरीत राजकारण आहे, समाजकारण आहे आणि नीतिमूल्ये खुंटीवर टांगून सतत उभे राहणारे लिंगोपनिषद आहे. गावात गेल्यानंतर तिकडे एका छोटय़ा प्रसंगातूनही आणलेला अपराधगंड आहे. नायकाचे हे जगणे आणि त्याच्या कामजाणिवांचे बिंदू प्रामाणिकपणे दाखविण्याची    अवघड कला आजगांवकरांनी साधली आहे. हिंद सेनेने बंद केलेल्या मुंबईत दासूची झुंडीपुढील हतबलता आणि ऑफिसला जाताना रेल्वेगाडीत त्वेषाने चढल्यानंतर ‘सूर्याजी पिसाळची अवलाद.. मादरचोद’ या अपमानाची बोच    अत्यंत परिणामकारक वठली आहे.    पुढे चर्चगेटवरून चालत प्रवास करताना झुंडीच्या मानसशास्त्राची अनेक रूपे पाहणारा दासू आजगावकरांच्या वर्णनांतून खास अनुभवावा असा आहे. भाऊ पाध्ये आणि श्रीकांत सिनकर यांच्या मुंबईवरच्या कादंबऱ्यांमधील नायकांचा भाऊबंध म्हणून दासूकडे पाहता येऊ शकते. पण आजगांवकरांनी पुढल्या दोन दशकांतील समाजात त्याला जन्माला आणले आहे. म्हणूनच गिरणी संपामुळे नष्ट होत गेलेल्या निम्नमध्यमवर्गाची, अस्मिता अतिरेकाचे विष भिनलेल्या समाजाची आणि विचार-संवेदना शाबूत असल्याने समोर येणाऱ्या परिस्थिती प्रवाहात भेलकांडत जाणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. तिला शोकांत म्हणायचे की सुखांत, हे ज्याचे त्याने ठरवायचे; पण आजगांवकरांनी उभा केलेला हा ‘दासूनाका’ पानोपानी प्रचंड गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2022 at 19:47 IST

संबंधित बातम्या