विज्ञानविचार समाजातल्या तळागाळात पोहोचावा, रुजावा, फोफावावा यासाठी सातत्याने काम करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. १५ ते १८ जानेवारी २०१६ रोजी मुंबईत एक परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा-
औपचारिक शिक्षणातून मिळणारी माहिती, ज्ञान हे केवळ अर्थार्जनासाठी नसते तर त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध असतो; मग ते शिक्षण इतिहास, राज्यशास्त्राचे असो किंवा विज्ञानाचे किंवा वाणिज्य शाखेचे.. सर्वकाही मानवी व्यवहारांचे समीकरण असते.. त्याचप्रमाणे नोकरी-व्यवसायही केवळ पोटापाण्यासाठी नसतो तर त्यातून व्यक्तीचा विकास साधणे, त्याचे ज्ञान (विस्डम) वृद्धिंगत होणे महत्त्वाचे असते, असा डोळसपणा रुजवणारे समाजशिक्षक काळाच्या कुठल्याही टप्प्यावर आवश्यक असतात. त्यांचे मार्गदर्शन अनेक पिढय़ांना लाभदायी ठरते. मराठी विज्ञान परिषदेने असेच समाजशिक्षकाचे काम गेल्या तीन पिढय़ांसाठी सातत्याने केले आहे. तिच्या विवेकी कामाचे बोट धरून अनेक स्वयंसेवी संस्था आणि प्रसार माध्यमांनी आपले ईप्सित कार्य पुढे नेण्याचा आणि विस्तारण्याचा प्रयत्न केला. ‘एनजीओ’ ही संज्ञा आली नव्हती त्या काळापासून परिषदेने आपल्या प्रगल्भतेची पाखर अनेकांवर घातली आणि त्यात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि सामान्यजनांना वाटेकरी करून घेतले. माहिती महाजालाचा शोध लागला नव्हता, तेव्हा ती त्याची भूमिका पार पाडत होती आणि आजही तिच्या त्या कामाचे महत्त्व कमी झालेले नाही. आणि सगळे कार्य मराठी भाषेतून चालत असल्यामुळे मराठी भाषकांसाठी खास सेवा, असे तिचे स्वरूपही फार महत्त्वाचे आहे.
संस्थेच्या नावात ‘विज्ञान’ असल्यामुळे प्युअर सायन्सवर तिच्या कामाचा फोकस असणे साहजिक होते, पण संस्थेचे गेल्या ५० वर्षांतले काम पाहता तिने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राचीही बरीच सेवा केल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ वैज्ञानिक संज्ञांची मराठीतून निर्मिती असा उपक्रम साध्य करताना अनुषंगाने मराठी भाषा समृद्धीचे काम परिषदेने केले आहे तसेच उपयोजित विज्ञान समजावून देताना अल्पशिक्षितांना रोजगाराच्या संधी दाखवून दिल्या आहेत. संस्था स्थापन झाली त्या काळी प्रदूषणाने तितकेसे विक्राळ रूप (निदान भारतात) घेतले नव्हते. त्या वेळी पर्यावरण ही विज्ञानाची एक शाखा होती परंतु अलीकडच्या काळात पर्यावरणाचा प्रश्न ही सामाजिक समस्या झाल्याकारणाने परिषदेचे पर्यावरणविषयक उपक्रम सामाजिक हिताचा अंगाने जातात.
lp16
सरकारी धोरणाचा भाग म्हणून ‘विविध राज्यभाषांमध्ये विज्ञानाचा प्रसार’या हेतूसाठी १९६६साली ठिकठिकाणी विज्ञान परिषदा काढण्यात आल्या होत्या. तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ होता. नवे सार्वभौम राष्ट्र अशी संकल्पना असल्याने त्या अनुषंगानेच हा प्रयत्न होता. शिक्षण सार्वत्रिक करणे, तळागाळतल्यांना समजेल अशा भाषेत विज्ञानसाहित्य निर्माण करणे ओघाने आले होते. त्यासाठी विज्ञान परिषदेने काम करावे अशी अपेक्षा होती. ती परिषदेने शंभर टक्के पूर्ण केली. शालेय अभ्यासक्रमातून मिळणाऱ्या विज्ञानाच्या ज्ञानाव्यतिरिक्त वैविध्यपूर्ण आणि समकालीन ज्ञान पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, रेडिओ आणि दूरचित्रवाणी यांतून महाराष्ट्राच्या शिक्षित-अशिक्षित लोकांपर्यंत पोहोचवले ते ‘मविप’ने. हे लेख वाचणारेच अधिक सांगतील. कारण आज मराठीतला एकही वाचक- किमान तिशीच्या पुढचा- असा नसेल की ज्याने परिषदेने केलेले लिखाण वाचलेले नाही किंवा त्यांच्या उपक्रमांची माहिती वाचलेली नाही. केवळ पोकळ स्तुतीचा हेतू इथे नाही तर ज्या रंजकतेने हे सर्व विज्ञानविषयक लिखाण झाले, त्याची पोचपावती म्हणून हे शब्द आले. इथे प्रा. रा. वि. सोवनी, अ. पां. देशपांडे अशी नावे आपसुक आठवतात, कारण त्यांनी केलेल्या लिखाणाचेच वर्णन वर आहे. परिषदेच्या कामाचा तपशील द्यावयाचा तर संगतवार सांगावे लागेल.
विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून मराठी विज्ञान परिषदेने सातत्याने गेली ४९ वष्रे मराठीतून लिखाण, भाषणे, चर्चा, परिसंवाद, सभा, संमेलने घेतली आहेत. मराठीतून ‘पत्रिका’ नावाचे मासिक चालवले आहे. (संपादक चिं. मो. पंडित) नोव्हेंबर २०१४ मध्ये पत्रिकेचा ५०१ वा अंक प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा भाषा संचालनालय विभाग गेली ५० वष्रे इंग्रजी शब्दांना मराठी शब्द तयार करण्याचे काम करीत असून त्यांनी आजवर कित्येक कोश निर्माण केले आहेत. त्यात मराठी विज्ञान परिषदेचा सहभाग आहे. या कोशांतील शब्द पाठय़पुस्तकात, रोजच्या लिखाणात व संभाषणात वापरले जावेत, मंत्रालयात वापरले जावेत असा शासनाचा आग्रह आहे. तसे ते मोठय़ा प्रमाणावर वापरले जातही आहेत. कोणत्याही शब्दकोशातील शंभर टक्के शब्द समाज स्वीकारत नसतो. त्या नियमाप्रमाणे या कोशांचेही आहे.
येथे प्रा. रा. वि. सोवनी यांचे नाव हटकून आठवते. प्राणिशास्त्राचे प्राध्यापक असूनही त्यांनी भौतिकशास्त्रीय माहिती, रासायनिक शोधांचे विश्लेषण करणाऱ्या लेखांच्या मालिका रसाळ शैलीत लिहिल्या. त्यांचे लिखाण तीन पिढय़ांनी वाचले. अत्र्यांच्या ‘मराठा’पासून ते ‘लोकसत्ता’त आतापर्यंत त्यांनी लिहिलेल्या लेखांना पर्याय नसे. जुन्या लेखांची पुस्तके झाली आणि ती पुढच्या पिढय़ांना वाचायला मिळाली.
दूरदर्शनवरील प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रम आजही लोकांना चांगलाच आठवतो. त्यात डॉ. जयंत नारळीकर, वसंत गोवारीकर यांसारख्या संशोधकांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या. आकाशवाणीवर त्यांनी तयार केलेला ‘परिसर’सारखा कार्यक्रम श्रोत्यांचे दैनंदिन ‘खाद्य’ ठरला. उद्बोधक माहिती गोळा करण्यासाठी प्रा. सोवनींनी घेतलेले कष्ट त्यांच्या निर्मितीतून जाणवतात.
परिषदेने विज्ञानलेखांनाही वाचकांपर्यंत आणि प्रकाशकांपर्यंत पोहोचवले. गेल्या ४५ वर्षांतील विज्ञानरंजन कथास्पध्रेतील प्रथम पारितोषिक विजेत्या कथांची दोन पुस्तके लवकरच छापली जाणार आहेत. साहित्यातली ही शाखा जन्माला घालण्याचे श्रेय अ. पां. देशपांडे यांचे. पत्रिकेत छापून आलेल्या मूलभूत विज्ञानावरील निवडक लेखांचे एक आणि उपयोजित विज्ञानवरील लेखांचे आणखी एक पुस्तकही यंदा प्रसिद्ध होत आहे.
संस्थापक अ. पां. देशपांडे यांनी परिषदेच्या कामाचा आवाका फार विस्तृत कल्पिला होता. त्याप्रमाणे त्यांनी अंधश्रद्धा दूर व्हावी या उद्देशाने कार्यक्रम आखण्यापासून गच्चीतही ‘शेती’ करता येते हे दाखवणाऱ्या प्रात्यक्षिकांपर्यंत विविध उपक्रम राबवले. पाठय़पुस्तकातील संकल्पना मुलांना समजावून सांगण्याचा अभ्यासक्रमही त्यांनी तयार केला व राबवला. घरगुती टाकाऊ वस्तूंचा वापर करून प्रयोग करण्याचे वर्ग, लैंगिक शिक्षण, सौर कुकर व सौर बंब बनवण्याच्या कार्यशाळा असे अगदी रोजच्या जगण्याशी संबंधित उपक्रम त्यांनी राबवले.

शालेय वयातल्या मुलांसाठी वैज्ञानिक खेळण्यांद्वारे सामान्य विज्ञान समजावून दिले जाते. यासाठी छोटी शिबिरे आयोजित केली जातात. महाविद्यालयात शिकणाऱ्या ११वी ते पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर एखादे संशोधन करून ते परिषदेला सादर करायचे असते, त्यासाठी परिषद दरवर्षी दहा-दहा हजार रुपयांची तीन पारितोषिके देते.
मुले शुद्ध विज्ञानाकडे जाण्याऐवजी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि माहिती तंत्रज्ञानाची वाट जास्त प्रमाणात चोखाळताना दिसत आहेत. या सर्व ठिकाणी संशोधनाला पुरेसा वाव असला, तरी मुले तिकडे चांगल्या पगाराच्या कारणाने जाताना दिसतात. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र घेत असलेल्या विज्ञानाच्या ऑलिम्पियाडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवणाऱ्या मुलांना एम.एस्सी.नंतर बीएआरसीत सरळ नोकरी मिळण्याची सोय डॉ. अनिल काकोडकर यांनी बीएआरसीचे संचालक असताना केली होती. पण अनेक वष्रे ही पारितोषिकप्राप्त मुले विज्ञानाकडे न जाता इतर शाखांत प्रवेश घेताना दिसत. मात्र आता गेल्या काही वर्षांत ही कोंडी फुटली असून १०-१२ टक्के मुले विज्ञानाकडे जाताना दिसतात. मुलांना विज्ञानाची आवड लावली याचा अर्थ ती पुढे विज्ञानाकडे वळतीलच असे नाही. पण एक गोष्ट नक्की की, ही मुले पुढे कुठल्याही शाखेत काम करू देत, पण त्यांना लागलेली विज्ञानाची गोडी अविरत राहणार.
भारतीय विद्यार्थ्यांत मूलभूत संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रथम त्यांच्या प्राध्यापकांत ती निर्माण व्हायला हवी. म्हणून परिषदेने २०१४ पासून ‘महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी एक आणि विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी एक अशी एकेक लाख रुपयांची दोन पारितोषिके प्रा. एम. एम. शर्मा यांच्या नावे निर्माण केली असून ती प्राध्यापकांच्या उत्तम संशोधनाला मिळतात. २०१४ सालचे विद्यापीठ स्तरावरील पारितोषिक मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’मधील रसायनशास्त्रप्रमुख प्रा. डॉ. भालचंद्र भणगे यांना मिळाले. महाविद्यालयीन स्तरावर योग्य संशोधन न मिळाल्याने पारितोषिक दिले गेले नाही.
लघुउद्योजकांत जो कोणी लघुउद्योजक संशोधनपूर्वक एखादी वस्तू बनवेल अथवा प्रक्रिया विकसित करेल आणि ती विकली जात असेल, तर अशा लघुउद्योजकाला परिषदेने २०१२ सालापासून श्री. सु. त्रिं. तासकर यांच्या नावे एकेक लाख रुपयांचा पुरस्कार सुरू केला आहे.
अशा उपक्रमांच्या अनुभवामुळे व व्याप्तीमुळे स्वयंसेवी आणि सरकारी अशा दोन्ही उपक्रमांकरिता वेळोवेळी मविपचे बोट कार्यकर्त्यांनी धरले.
आता वातावरण विज्ञानप्रसाराला पोषक आहे. माहिती महाजालाचा उपयोग होत आहे. संदर्भ करणे सोपे झाले आहे. विज्ञानात आणि तंत्रज्ञानात संशोधन करायला केवळ उच्चशिक्षित लोकच हवेत असे नसून ते कोणीही करू शकतो, हे ओळखून केंद्र सरकारने डॉ. रघुनाथ माशेलकर काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक असताना अहमदाबादला नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली. सुतार, लोहार, वायरमन, रंगारी, गवंडी, नर्स, मोटरमेकॅनिक असे कोणीही आपले रोजचे काम करत असताना अनेक अडचणींना तोंड देतात. ते अशा अडचणी सोडवतातही. मात्र त्या अडचणी सोडवण्यासाठी वापरलेल्या युक्त्या त्यांच्यापाशीच राहतात. त्या इतरांना समजाव्यात, वापरता याव्यात, अडचणी सोडवणारा समजा वाटेत कुठे अडला असेल तर त्याला मदत मिळावी, त्यासाठी हवे तर पसे पुरवावेत, ते संशोधन अव्वल दर्जाचे असेल तर त्याला पेटंट घ्यायला मदत करावी असे नाना उद्देश या नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचे आहेत. गेल्या १५ वर्षांत या संस्थेने भारतातील दोन लाखांच्या वर असे खटपटे लोक शोधून काढले आहेत. शिवाय हे असे लोक केवळ भारतातच आहेत असे नसून येथून प्रोत्साहन घेऊन परदेशात स्थायिक झालेलेही अनेक भारतीय आहेत.
मूळचे मुंबईकर असलेल्या निखिल देशपांडे या अमेरिकास्थित नागरिकाने, अमेरिकन शासनप्रणालीत सर्वसामान्यांसाठी असलेल्या हजारो सोयीसुविधा डेस्कटॉपवरून मोबाइलवर उपलब्ध करून दिल्या. देशपांडे जॉर्जयिा स्टेट पोर्टलमध्ये चीफ स्ट्रॅटेजी डायरेक्टर आहेत. आयआयटीमध्ये शिकलेली काही मुले आता समाजोपयोगी कार्यात उतरली आहेत. नाशिकमध्ये कोणी ताज्या, निवडलेल्या भाज्या कापून घरोघरी पोहोचवण्यचा उद्योग करू लागला, तर मुंबईत कोणी भारतभर इंटरनेटवरून रेल्वे बसचे बुकिंग करून तिकिटे घरी पोहोचवून बस उशिरा असेल, तर घरून उशिरा निघा, प्रवास झाल्यावर प्रवास नीट झाला ना, हेही विचारू लागले आहेत. डॉ. बिप्लब पटनाईक नावाच्या आयआयटीमधील मुलाने सांडपाणी, मलापाणी, माती यांवर आधारित जैविक प्रक्रिया तंत्रज्ञान वापरून चांगले पाणी मिळवण्याचा प्रयोग ठाणे जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात यशस्वीपणे राबवला आहे. (महाराष्ट्र टाइम्स, दिनांक १७ मे २०१५) अशा अनेक विद्यार्थ्यांनी पवईला आयआयटीभोवतीच आपली छोटी-छोटी कार्यालये उघडली आहेत.
असे असले तरी विविध धडपडय़ा संस्था आजही मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने प्रसाराचे काम करीत आहेत. त्याची गरज उरली नाही असे नाही.
पन्नासाव्या वर्षांत मराठी विज्ञान परिषदेने अनेक महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या मदतीने देशातल्या २५० विज्ञान शिक्षकांचे एक अधिवेशन १७ ते २१ डिसेंबर या दिवशी पुण्यात आयसेर येथे भरले. हे विज्ञान शिक्षक वर्गात शिकवत असताना मुलांना विषय समजावा म्हणून काही नवीन पद्धती शोधून काढतात, काही शैक्षणिक साधने बनवतात, काही प्रारूपे बनवतात. मात्र या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळच राहतात. त्या सार्वत्रिक व्हाव्यात हा या परिषदेमागील उद्देश आहे. त्यासाठी हे २५० शिक्षक आपण शोधून काढलेल्या पद्धतींचे, शैक्षणिक साधनांचे व प्रारूपांचे सादरीकरण करणार आहेत.
मुंबईत १००० शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोग शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञानावर दहा मिनिटांची फिल्म बनवावी याची स्पर्धा घेतली जाईल. विज्ञान एकांकिका लिहिण्याची व सादर करण्याची स्पर्धा महाराष्ट्र स्तरावर आयोजित केली जाईल. ४० वा आणि ५० वा वर्धापन दिन प्रसिद्ध शास्त्रज्ञांना बोलावून साजरा केला जाईल. (२६ एप्रिल २०१५ ला आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ४९ वा वर्धापन दिन साजरा झाला आणि जलसाठय़ाच्या वाढीतील समस्यांची चर्चा त्यांनी आपल्या भाषणात केली.)
५० वे वार्षकि अधिवेशन भव्य प्रमाणात साजरे केले जाईल. परिषदेचा ५० वर्षांचा इतिहास लिहिला जाईल. याशिवाय मराठी विज्ञान परिषदेच्या विभागात बरेच कार्यक्रमही होतील. अनेक विषयांवरचे व सर्व वयोगटांच्या लोकांसाठी वर्षभर कार्यक्रम करावेत हाच यामागचा उद्देश आहे.