मिर्झापूर…नवा सिझन, नवे वाद

नव्या सीझनच्या बाजूने आणि विरोधात पोस्ट ट्रेंडिंगमध्ये

जय पाटील

‘जो आया है वो जायेगा भी, बस मर्जी हमारी होगी…’ मिर्झापूर-२ चा हा डायलॉग! नव्या सिझनचा ट्रेलर मंगळवारी रिलिज झाला आणि अपेक्षेप्रमाणेच ट्विटरवर उलट-सुलट मिम्सना उधाण आलं. या अॅक्शनपॅक्ड ड्रामामध्ये पुढे काय होणार? याविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे. दुसरीकडे प्रत्येक गोष्टीतून वाद शोधून काढण्याच्या सध्याच्या प्रथेनुसार ट्रेलर रिलिज होताच ट्विटरवर वाद झडू लागले आहेत. हॅशटॅग मिर्झापूर बरोबरच हॅशटॅग बॉयकॉट मिर्झापूर ही ट्रेंड झाला आहे.

अमेझॉन प्राइम व्हीडिओची उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवर आधारित असलेली ही वेब मालिका पहिल्या सिझनपासूनच वादात अडकली होती. यातील रक्तपात, शिवीगाळ यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, पंकज त्रिपाठींनी साकारलेला कालीन भैय्या, उत्कंठावर्धक आणि मसालेदार कथा आणि संवादांमुळे ती लोकप्रियही ठरली होती. ओटीटीच्या प्रेक्षकांमध्ये गुन्हेगारीवर आधारित मालिकांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचा या सिरीजला चांगला प्रतिसाद लाभला होता.

आता नव्या सिझनने नव्या वादांना तोंड फोडलं आहे. मालिकेत गुड्डू पंडितची भूमिका साकारणाऱ्या अली फैजलने सीएए विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळे कोणत्याही देशप्रेमी व्यक्तीने मिर्झापूरचा नवा सिझन पाहू नये, असे आवाहन करणारी ट्विट्स बॉयकॉट मिर्झापूर या हॅशटॅगसह केली जात आहेत. अली फैजलने रिया चक्रवर्तीला अनेकदा मदत केली आहे, त्यामुळे त्याची भूमिका असलेल्या सिरीजवर बहिष्कार टाकावा. असा सल्ला अनेकांनी दिला आहे. ट्रेलर रिपोर्ट करण्याचे आवाहनही काहींनी केले आहे. अभिनेता अली फैजल आणि सिरीजचा निर्माता फरहान अख्तर यांचे छायाचित्र व त्यावर ‘शुरू मजबुरी में किया था, अब मजा आ रहा हैं’ हा मिर्झापूरच्या पहिल्या सिझनमधील डायलॉग असलेली मिम्स व्हायरल झाली आहेत.

नव्या सिझनचे डायलॉग आतापासूनच डोक्यावर घेतले जाऊ लागले आहेत. ‘कभी भी नियम बदल सकता हैं…’ किंवा ‘शेर के मुह को खूँन लग चुका है…’ किंवा ‘अब हमको बदला भी लेना हैं और मिर्झापूर भी…’ असे डायलॉग्ज घेऊन अनेक विनोदी मिम्स तयार करण्यात आली आहेत.
या वेबमालिकेचा पहिला सिझन रिलिज झाला होता, तेव्हा मिर्झापूर किंवा एकूणच उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचं अतिरंजित चित्रण असल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. आता उत्तर प्रदेशातील सामुहिक बलात्काराचे प्रकरण तापले असल्याच्या आणि त्यावरून तेथील गुन्हेगारीवर देशभर टीकेची झोड उठली असल्याच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबरला मिर्झापूर-२ रिलीज होणार आहे. आता या वेबमालिकेला अतिरंजित म्हटलं जाणार की वास्तवदर्शी हा प्रश्न आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mirzapur new season new controversy aau